चार दिवसीय कसोटी दुसऱ्या दिवशीच आटोपली; दक्षिण आफ्रिकेनं उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे ( ICC) आयोजित पहिल्यावहिल्या चारदिवसीय कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेचा अवघ्या दोन दिवसात धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेनं ही कसोटी एक डाव आणि 120 धावांनी जिंकली.

काय घडलं या कसोटीत?

1) आयसीसीतर्फे आयोजित ही पहिलीवहिली चारदिवसीय कसोटी आहे. मंगळवारी सुरु झालेल्या या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

2) एडन मारक्रमनं कारकीर्दीतलं दुसरं शतक झळकावलं. एडननं 14 चौकार आणि 2 षटकारांसह 125 धावांची दिमाखदार खेळी साकारली.

3) दक्षिण आफ्रिकेनं कसोटीच्या पहिल्याच दिवशी 309/9 धावसंख्येवर डाव घोषित केला. झिम्बाब्वेतर्फे कायले जार्विस आणि ख्रिस्तोफर मोफू यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

4) पहिल्या दिवसअखेर झिम्बाब्वेची 30/4 अशी घसरगुंडी उडाली होती.

5) बुधवारी म्हणजे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वेचा पहिला डाव 68 धावांतच अवघ्या 30.1 षटकातच गडगडला. दक्षिण आफ्रिकेतर्फे मॉर्ने मॉर्केलनं 21 धावांत 5 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.

6) झिम्बाब्वेनं दुसऱ्या डावातही सुधारणा न करता शरणागती पत्करली. 42.3 षटकांत झिम्बाब्वेचा दुसरा डाव 121 धावांतच आटोपला. फिरकीपटू केशव महाराजनं 59 धावांत 5 बळी घेतले.

7) एडन मारक्रमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

8) झिम्ब्बावेच्या संघाला दोन्ही डावात मिळून केवळ 72.4 षटकं खेळता आली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात मिळून 24 निर्धाव षटकं टाकली.

9) या कसोटीत पाच सत्रं मिळून केवळ 907 चेंडूंचा खेळ झाला आणि तरीही कसोटी निकाली ठरली. 2 दिवसात संपलेली ही 20 वी कसोटी आहे. कमीत कमी वेळात संपलेल्या कसोटी सामन्यांच्या यादीत ही कसोटी नवव्या स्थानी आहे.

10) याआधीच्या दोन दिवसात संपलेली कसोटी न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात 2005 मध्ये झाली होती. त्या सामन्यातले ब्रेंडन टेलर, ग्रीम क्रीमर आणि ख्रिस्तोफर मोफू बुधवारी संपलेल्या कसोटीतही झिम्बाब्वे संघाचा भाग होते.

11) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 1932 मध्ये झालेली कसोटी पाच तास आणि 53 मिनिटांत निकाली ठरली होती. कमीत कमी वेळेत संपलेल्या कसोटींमध्ये (वेळ निकषानुसार) ही कसोटी अग्रस्थानी आहे.

12) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1931-32 मध्ये झालेली कसोटीत केवळ 656 चेंडूत निकाली ठरली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)