पी. व्ही. नरसिंह राव: बाबरी मशिदीचा घुमट पडला आणि नरसिंह रावांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
6 डिसेंबर 1992ला तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव सकाळी 7 वाजता झोपून उठले. दिनचर्येनुसार ते या वेळेआधीच उठत असत. पण त्यादिवशी उशीर झाला कारण रविवार होता. वर्तमानपत्र वाचून ते अर्धा तास ट्रेड मिलवर चालले.
त्यानंतर त्यांचे खासगी डॉक्टर के. श्रीनाथ रेड्डी आले. त्यांनी राव यांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेतले. त्यादरम्यान ते इंग्रजी आणि तेलुगू वर्तमानपत्र वाचत होते.
त्यानंतर रेड्डी आपल्या घरी केले. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी टीव्ही लावला. टीव्हीवर त्यांनी पाहिले की, हजारो कारसेवक बाबरी मशिदीच्या घुमटावर चढले होते.
1 वाजून 55 मिनिटांनी पहिला घुमट कोसळला होता. अचानक रेड्डी यांना लक्षात आले की, नरसिंह राव यांना हृदयविकाराचा त्रास आहे. 1990 साली झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते राजकारणातून जवळजवळ निवृत्तच झाले होते.
'त्यांच्या हृदयाचे, नाडीचे ठोके वाढले आणि रक्तदाबही वाढला'
रेड्डी पंतप्रधानांचा रक्तदाब तपासण्यासाठी पुन्हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेव्हापर्यंत बाबरी मशिदीचा तिसरा घुमटसुद्धा कोसळला होता.
डॉ. रेड्डी सांगतात, "त्यांनी माझ्याकडे बघून रागानं विचारलं, तुम्ही पुन्हा का आला आहात? मी सांगितलं, मला तुमच्या आरोग्याची तपासाणी करायची आहे."
"मी त्यांना जवळच्या लहान खोलीत घेऊन गेलो. माझ्या अंदाजानुसार त्यांच्या हृदयाचे आणि नाडीचे ठोके तसंच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यांचा चेहरा लाल झाला होता आणि ते फारच अस्वस्थ झाले होते.

फोटो स्रोत, Google
मी त्यांना बीटा ब्लॉकरटचा अतिरिक्त डोस दिला. तेव्हा त्यांची स्थिती थोडी सुधारली. त्यांची प्रकृती चांगली वाटल्यानंतरच मी बाजूला झालो. त्यांच्या तब्येतीचा या प्रकरणाशी संबंध होता, असं वाटलं कारण शरीर कधी खोटं बोलत नाही."
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राव यांचं मौन
असं सांगितलं जातं की, त्यानंतर राव यांनी स्वत:ला एका खोलीत बंदिस्त करून घेतलं. संध्याकाळी सहा वाजता त्यांनी त्यांच्या घरीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली.
अर्जुन सिंह यांनी आपल्या 'ए ग्रेन ऑफ सँड इन द अवरग्लास ऑफ टाईम' या आत्मचरित्रात या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा उल्लेख केला आहे.

फोटो स्रोत, HAY HOUSE
ते लिहितात, "संपूर्ण बैठकीत ते इतके हतबल होते की, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. सगळ्यांच्या नजरा जाफर शरीफ यांच्याकडे वळल्या. असं वाटलं की, ते जाफर शरीफ यांना तुम्हीच काहीतरी बोला असं सांगत होते."
"जाफर शरीफ म्हणाले, या घटनेमुळे देश, सरकार आणि काँग्रेस पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागेल. माखनलाल फोतेदार यांना तर त्याच वेळी रडू कोसळलं पण राव पुतळ्यासारखे बसले होते."
कमीत कमी एक तरी घुमट वाचवण्याची विनंती
त्याआधी जेव्हा बाबरी मशीद तोडली जात होती तेव्हा तत्कालीन केंद्रीय मंत्री माखनलाल फोतेदार यांनी नरसिंह राव यांना फोन करून लगेच काहीतरी करण्याची विनंती केली होती.
माखनलाल फोतेदार 'द चिनार लिव्ज' मध्ये लिहितात, "मी पंतप्रधानांना आग्रह केला होता की, वायुसेनेला सांगून फैजाबादमध्ये तैनात असलेल्या हेलिकॉप्टरमधून अयोध्येतल्या कारसेवकांना हटविण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या सोडण्यात याव्यात. राव यांनी विचारलं, 'मी असं कसं करू शकतो?' मी म्हटलं, अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं कोणताही निर्णय घेतला, तरी त्याची अंमलबजावणी करण्याची सगळी यंत्रणा उपलब्ध आहे."

फोटो स्रोत, Fotedar Family
मी त्यांना विनंती केली की, "रावसाहेब कमीत कमी एक तरी घुमट वाचवा. म्हणजे तो घुमट आपण काचेच्या आवरणात ठेवून जगाला सांगू शकू की, बाबरी मशीद वाचवण्यासाठी आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केले. पंतप्रधान नि:शब्द होते आणि काही क्षण शांततेत गेल्यानंतर म्हणाले, फोतेदारजी मी तुम्हाला नंतर फोन करतो."
शंकरदयाळ शर्मा लहानमुलासारखे रडले
फोतेदार पुढे लिहितात, "मी पंतप्रधानांच्या अकार्यक्षमतेमुळे खूप निराश आणि दु:खी झालो. मी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांना फोन करून त्यांच्या भेटीची वेळ मागितली. त्यांनी मला साडेपाच वाजता भेटायला बोलावलं. तेव्हा पंतप्रधानांचा मला फोन आला की, सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. तरी मी राष्ट्रपतींना भेटायला गेलो."

फोटो स्रोत, Getty Images
"त्यांनी मला बघितलं आणि लहान मुलासारखं रडायला सुरूवात केली आणि म्हणाले, पीव्हींनी हे काय केलं? मी राष्ट्रपतींना म्हटलं की, त्यांनी टीव्ही आणि रेडिओवरून लोकांना संबोधित करावं. राष्ट्रपती यासाठी तयार झाले. पण म्हणाले की, पंतप्रधानाची परवानगी घ्यावी लागेल आणि ते राजी होतील असं काही वाटत नाही."
माखनलाल फोतेदार लिहितात, "मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 ते 20 मिनिटं उशीरा पोहोचलो. तिथं सगळ्यांना शांत बसलेलं बघून म्हणालो, 'सगळ्यांची बोलती का बंद झाली आहे?' त्यावर माधवराव शिंदे म्हणाले, 'फोतेदारजी बाबरी मशीद पाडली आहे. हे तुम्हाला माहीत नाही का?' मी पंतप्रधानांकडे बघून विचारलं, 'राव साहेब हे खरं आहे का?' पंतप्रधान माझ्या नजरेला नजर देऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी कॅबिनेट सचिवांनी उत्तर दिलं हे खरं आहे. मी संपूर्ण कॅबिनेट समोर राव यांना सांगितलं की, तुम्ही या घटनेसाठी जबाबदार आहात. यावर पंतप्रधानांनी एकही शब्द तोंडातून काढला नाही."
मशीद तुटत होती, राव पूजा करत होते
कुलदीप नय्यर यांनी 'बियाँड द लाईन्स' या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "मला माहिती होतं राव यांची बाबरी मशीद विध्वंसात भूमिका होती. जेव्हा कारसेवक मशीद पाडत होते तेव्हा ते आपल्या घरी पूजा करत होते. ते जेव्हा तिथून उठले तेव्हा मशिदीचा शेवटचा दगडही हटवण्यात आला होता."

फोटो स्रोत, Getty Images
पण, नरसिंह राव यांचं 'हाफ लायन' हे बहुचर्चित चरित्र लिहिणारे विनय सीतापती मात्र या प्रकरणात नरसिंह रावांना क्लीन चीट देतात.
राव सरकारमध्येच राजकारण
सीतापती सांगतात, "नोव्हेंबर 1992 साली दोन गोष्टीचा विध्वंस करण्याची योजना होती. एक बाबरी मशीद आणि दुसरं नरसिंह राव यांना. संघ परिवाराला बाबरी मशीद पाडायची होती आणि काँग्रेसमधील अंतर्गत प्रतिस्पर्ध्यांना नरसिंह राव यांना जमीनदोस्त करायचं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
"राव यांना माहिती होतं की, बाबरी मशीद पडो न पडो त्यांचे विरोधक त्यांना 7 RCRच्या बाहेर काढण्यासाठी आतूर होते. नोव्हेंबर 1992 साली CCPA (Cabinet committee for political affairs) च्या कमीत कमी पाच बैठका झाल्या. त्यात एकाही काँग्रेस नेत्यानं कल्याण सिंह यांना बरखास्त करावं, असं म्हटलं नाही," असं ते सांगतात.
सीतापती पुढे सांगतात, "राव त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगत होते की, तुम्ही एखादं राज्य सरकार तिथली कायदा सुव्यवस्था बिघडल्यावर बरखास्त होऊ शकतं. पण तिथली कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या अंदाजावर राज्य सरकार बरखास्त करता येत नाही."

पूजेच्या विषयावर विचारलं असात, "कुलदीप नय्यर तिथं उपस्थित होते का?" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले,"ही माहिती समाजवादी नेते मधू लिमये यांनी दिली होती. त्यांना ही माहिती पंतप्रधान कार्यालयातील त्यांच्या एका 'सूत्रानं' दिली होती. पण या सुत्राचं नाव त्यांनी सांगितलं नव्हतं."
विनय सीतापती सांगतात, की त्यांच्या अभ्यासानुसार बाबरी मशीद पाडली जात असताना राव पूजा करत होते हे चूक आहे. नरेश चंद्रा आणि तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले त्यांच्या संपर्कात होते आणि मिनिटामिनिटाची माहिती घेत होते.
राव यांचे राजकारण
राजकीय विश्लेषक आणि इंदिरा गांधी सेंटर ऑफ आर्ट्सचे प्रमुख राम बहादूर राय सांगतात, "1991 साली जेव्हा बाबरी मशिद प्रकरणाचा धोका वाढायला लागला होता. तेव्हा तो थांबवायला त्यांनी कोणतीही पाऊलं उचलली नाही. राव यांचे माध्यम सल्लागार पी. व्ही. आर. के. प्रसाद यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी नरसिंह राव यांनी मशीद कशी पाडू दिली, याचा उल्लेख केला आहे.
ते तिथे मंदिर व्हावं यासाठी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी रामालय ट्रस्ट तयार केला. मशीद पाडल्यावर निखील चक्रवर्ती, प्रभाष जोशी आणि आर. के. मिश्रा नरसिंह राव यांना भेटायला गेले. मी त्यांच्याबरोबर होतो. 6 डिसेंबरला त्यांनी असं का होऊ दिलं हे लोकांना जाणून घेण्याची इच्छा होती. सगळ्यांचं ऐकून घेतल्यावर त्यांनी प्रश्न विचारला की, मला राजकारण येत नाही, असं तुम्हाला वाटतं का?"

फोटो स्रोत, Rao Family
राय सांगतात, "मी त्याचा असा अर्थ काढतो की, जर मशीद पाडली तर भारतीय जनता पक्षाचा मंदिराच्या राजकारणाचा मुद्दा कायमचा संपेल असं वाटत होतं. हे थांबवण्यासाठी त्यांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत.
मला वाटतं की, राव यांना कोणतेही गैरसमज पसरवून नाही, त्यांच्याशी कोणतेही लागेबांधे करून नाही तर बाबरीच्या मुद्द्यावरूनच हा मुद्दा त्यांच्याकडून हिरावता येऊ शकतो. त्यांनी एक एक पाऊलच असं उचललं की मशीद उद्धवस्त होईल."
राजकीयदृष्ट्या चुकलेलं गणित
राव यांचे निकटवर्तीय असलेल्या पत्रकार कल्याणी शंकर मानतात की, बाबरी विध्वंस हा नरसिंह राव यांच्या भूमिकेपेक्षा ते राजकीयदृष्ट्या चुकलेलं गणित मानलं पाहिजे.
"अडवाणी आणि वाजपेयी यांनी राव यांना काहीही होणार नाही, अशी खात्री दिली. सर्वोच्च न्यायालयानंसुद्धा केंद्राला रिसिव्हरशिप घेण्यापासून रोखलं. तिथं सुरक्षाबळ पाठवायचं की नाही हा राज्याचा निर्णय आहे. कल्याण सिंह यांनी तिथं संरक्षण दलं पाठवलीच नाहीत."
मी प्रसिद्ध पत्रकार सईद नकवी यांना बाबरी प्रकरणात नरसिंह राव यांची भूमिका राजकीयदृष्ट्या चुकलेला निर्णय म्हणायचं की राजकीयदृष्ट्या चुकलेलं गणित म्हणायचं असं विचारलं.

नकवी यांचं उत्तर होतं, "राव यांच्याबरोबर गृहमंत्री पण याचे बळी ठरले, असं म्हणायचं का? संध्याकाळी सरकारमधील अनेक मोठे अधिकारी कपाळावर टिळा लावून ही घटना साजरी केल्यासारखे फिरत होते. आता त्याला तुम्ही काय म्हणणार?"
अननुभवी लोकांना जबाबदारी
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आपल्या आत्मचरित्रात 'द टर्ब्युलंट इयर्स'मध्ये लिहितात, "बाबरी मशिदीची घटना हे पीव्हींचं सगळ्यात मोठं अपयश होतं. त्यांनी दुसऱ्या पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी उत्तर प्रदेशाचं राजकारण जवळून बघितलेल्या नारायण दत्त तिवारींसारख्या मोठ्या नेत्यांकडे सोपवायला हवी होती."

फोटो स्रोत, Getty Images
"शंकरराव चव्हाण चर्चा करण्यास सक्षम होते, पण त्यावेळच्या परिस्थितला भावनात्मक पैलू त्यांच्या लक्षात आला नाही. रंगराजन कुमारमंगलम् यांनी प्रामाणिकपणे काम केलं. पण तेसुद्धा युवा आणि अपेक्षेप्रमाणे अननुभवी होते आणि पहिल्यांदाच राज्यमंत्री झाले होते"
मुखर्जी यांचे राव यांना खडेबोल
प्रणव मुखर्जी पुढे लिहितात, "नंतर जेव्हा मी नरसिंह राव यांना एकटा भेटलो तेव्हा त्यांना खूप ऐकवलं. मी म्हटलं या धोक्याचा इशारा देणारं तुमच्या आजूबाजूला कोणी नव्हतं का? बाबरी मशीद पाडल्यावर जगभर उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा अंदाज आला नाही का?"

फोटो स्रोत, Getty Images
"कमीत कमी मुस्लिमांच्या उसळलेल्या भावना शांत करण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचला. जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा त्यांचा चेहरा निर्विकार होता. मी त्यांच्याबरोबर बराच काळ काम केलं आहे आणि मी त्यांना ओळखतो. त्यांचा चेहरा वाचण्याची गरज नव्हती. त्यांचं दु:ख आणि निराशा मला स्पष्टपणे दिसत होती."
अर्जुन सिंह यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पण या संपूर्ण प्रकरणात अर्जुन सिंह यांच्या भूमिकेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
माखनलाल फोतेदार यांनी 'चिनार लिव्ज' या आत्मचरित्रात लिहिलं, "अर्जुन सिंह यांना चांगलं माहीत होतं की 6 डिसेंबरला मोठं काहीतरी होणार आहे. पण ते तेव्हा राजधानी सोडून पंजाबला निघून गेले. नंतर ते म्हणाले की, तिथे त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता.
मला असं वाटतं की, 6 डिसेंबर 1992 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अनुपस्थितीनंतर राजीनामा देण्यासाठी केलेल्या टाळाटाळीमुळे त्यांचं खूप राजकीय नुकसान झालं. पण तरी त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते. पण मला माहीत होतं की, आव्हानं घेण्याची त्यांची तयारी नव्हती. अर्जुन सिंह आणि एकूणच हिंदी भाषिक प्रांतातील मंत्र्यांनी या प्रकरणावर मौन बाळगल्यामुळे मुस्लिमांनी काँग्रेसला इतकं दूर सारलं की 8 वर्षं काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








