मनमोहन सिंग यांना राजकारणात आणण्याचं श्रेय कुणाला दिलं जातं?

मनमोहन सिंह

फोटो स्रोत, Twitter

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला, आणि राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

गुरुवारी रात्री भारतीय जनता पक्षानं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन या चित्रपटाचा जणू प्रचारच केला.

भाजपनं ट्वीट करताना लिहिलंय "एका कुटुंबानं एका देशाला दहा वर्षं कसं गहाण ठेवलं, याची ही कहाणी आहे. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदाची खुर्ची फक्त गांधी घराण्याचा वारस राजकीयदृष्ट्या तयार होईपर्यंत सांभाळत होते का? अगदी निकटच्या माणसाच्या अनुभवावर आधारीत 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' फिल्मचा ट्रेलर नक्की बघा. ही फिल्म 11 जानेवारीला रीलीज होणार आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

हा चित्रपट संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. बारु 2004 ते 2008 या काळात डॉ.मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते.

फिल्मच्या ट्रेलरसोबतच डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय करिअरचं विश्लेषणही सुरू झालं आहे. पण कदाचित आपल्याला माहिती नसेल, की डॉ. मनमोहन सिंग यांना राजकारणात आणण्याचं श्रेय जातं ते माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना.

1991 मध्ये नरसिंह राव यांचं राजकीय करिअर जवळपास संपलं होतं. रोजर्स रिमूव्ह कंपनीचा ट्रक त्यांच्या पुस्तकांची 45 खोकी घेऊन हैदराबादला रवाना झाला होता.

डॉ.मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अनुपम खेर

फोटो स्रोत, PEN MOVIES

फोटो कॅप्शन, डॉ.मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अनुपम खेर

मात्र त्यावेळी नरसिंह राव यांना त्यांच्या एका मित्रानं ही पुस्तकं इथंच ठेवा, असा सल्ला दिला होता. ते प्रशासनात बडे अधिकारी होते. आणि हौशी ज्योतिषीही. त्यांनी नरसिंह रावांना सांगितलं होतं, की माझ्या अंदाजानुसार तुम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहात. त्यामुळे ही पुस्तकं इथेच राहू द्या.

विनय सीतापती आपल्या 'हाफ लायन- हाऊ पी. व्ही. नरसिंह राव ट्रान्सफॉर्म्ड इंडिया' या पुस्तकात लिहितात की "राव रिटायरमेंट मोडमध्ये गेले होते. त्यांनी दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. कधी दिल्लीत यावं लागलं तर राहण्याची अडचण होऊ नये, हा त्यामागे हेतू होता."

मात्र काहीच दिवसात सगळं चित्र पालटलं. 21 मे 1991 या दिवशी श्रीपेरंबदूरमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. या घटनेनंतर बीबीसीचे पत्रकार परवेज आलम यांनी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना दूरदूरपर्यंत असं वाटलं नव्हतं की राव पुढच्या काही दिवसांत देशाचे पंतप्रधान होणार आहेत.

नटवर सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जेव्हा राजीव यांच्या हत्येनंतर विदेशी नेते आणि पाहुणे सोनियांना भेटून परतले त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे माजी मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांना 10 जनपथला बोलावून घेतलं. आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोण योग्य व्यक्ती आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी हक्सर यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाची शिफारस केली.

डॉ.मनमोहन सिंग

फोटो स्रोत, PIB

फोटो कॅप्शन, नरसिंह राव यांना आदरांजली वाहताना डॉ. मनमोहन सिंग

शंकर दयाळ शर्मांचं मन वळवण्याची जबाबदारी नटवर सिंह आणि अरुणा असफ अली यांच्यावर होती. शर्मांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. सोनियांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास हा आपला सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलं.

पण "भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी हे पूर्णवेळ काम आहे. माझं वय आणि प्रकृती पाहता देशातील सर्वांत मोठ्या पदाला मी न्याय देऊ शकेन असं वाटत नाही" असं शर्मांनी स्पष्ट केलं.

नटवर सिंह आणि अरुणा असफ अलींनी शंकर दयाळ शर्मांचं म्हणणं सोनियांच्या कानावर घातलं. सोनियांनी पुन्हा पी. एन. हक्सर यांना बोलावून घेतलं. आणि यावेळी हक्सर यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांचं नाव पुढे केलं. त्यानंतर जे घडलं तो केवळ इतिहास आहे.

नरसिंह राव राजकीय खाचखळग्यातून मार्ग काढत देशातील सर्वोच्च पदावर पोहोचले होते. कुठल्याही पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी राजकीय पॅराशूटचा उपयोग केला नाही. राव यांचं भारतासाठी सगळ्यांत मोठं योगदान होतं, ते डॉ.मनमोहन सिंग यांचा शोध.

माजी पंतप्रधान नरसिंह राव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी पंतप्रधान नरसिंह राव

अलेक्झांडर यांनी सुचवलं मनमोहन यांचं नाव

विनय सीतापती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की "जेव्हा नरसिंह राव पंतप्रधानपदावर विराजमान झाले, तेव्हा ते बऱ्याच विषयात तज्ज्ञ झाले होते. आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय त्यांनी आधीच सांभाळलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. पण अर्थ खात्यात त्यांना विशेष गती नव्हती. पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी दोन दिवस कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी राव यांना आठ पानी नोट सोपवली. ज्यात भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचं म्हटलं होतं."

सीतापती पुढे सांगतात, "राव यांना असा एक मुखवटा हवा होता, जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पक्षांतर्गत विरोधकांना हे पटवून देईल, की भारत आता जुन्या अर्थधोरणानं तगणार नाही. त्यावेळी पी. सी. अलेक्झांडर राव यांच्या निकट होते. राव यांनी अलेक्झांडर यांना विचारलं की तुम्हाला असा एखादा अर्थतज्ज्ञ माहिती आहे का, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. अलेक्झांडर यांनी तात्काळ रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक आय. जी. पटेल यांचं नाव सुचवलं."

सीतापती यांच्या माहितीनुसार "आय. जी. पटेल यांना दिल्लीला यायचं नव्हतं. त्यांची आई आजारी होती. त्यावेळी ते बडोद्यात राहत होते. त्यामुळे अलेक्झांडर यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं. अलेक्झांडर यांनी शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी डॉ. सिंग यांना फोन केला. त्यावेळी ते परदेशातून परतले होते आणि घरी विश्रांती घेत होते. त्यांना झोपेतून उठवण्यात आलं. आणि राव यांचा प्रस्ताव सांगण्यात आला. पण डॉ. मनमोहन सिंग यांना त्यावर विश्वास बसला नाही."

डॉ.मनमोहन सिंग

फोटो स्रोत, AFP

"दुसऱ्या दिवशी शपथग्रहण सोहळ्याआधी अवघे तीन तास यूजीसीच्या कार्यालयात मनमोहन सिंग यांना स्वत: नरसिंह राव यांनी फोन केला. राव यांनी मनमोहन यांना अर्थमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र त्याचवेळी आपली आर्थिक नीती यशस्वी झाली, तर श्रेय आपल्या दोघांना मिळेल, पण त्यात अपयश आलं तर तुम्हाला पदावरून जावं लागेल, असं स्पष्ट सांगितलं"

सीतापती सांगतात की 1991 च्या अर्थसंकल्पाआधी दोन आठवडे मनमोहन सिंग मसुदा घेऊन पंतप्रधान नरसिंह रावांकडे गेले. डॉ. सिंग यांचा मसुदा राव यांनी फेटाळून लावला. "हेच करायचं होतं, तर मग मी तुमची निवड कशाला केली?" असा संतप्त सवालही राव यांनी केला.

आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाला डॉ. मनमोहन सिंग यांनी "ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही," या व्हिक्टर ह्यूगोच्या ओळींनी सुरुवात केली.

आपल्या भाषणात त्यांनी वारंवार राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि नेहरुंचा उल्लेख केला. पण त्यांच्या आर्थिक धोरणांच्या बरोबर उलट पावलं उचलण्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच हयगय केली नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)