बाबरी पाडण्याची 'रंगीत तालीम' 5 डिसेंबरला झाली होती का?

फोटो स्रोत, Praveen Jain
- Author, प्रवीण जैन
- Role, छायाचित्रकार
बाबरी मशीद आणि राम मंदिर वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येत 16व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशभर उसळलेल्या दंगलींत 2000वर लोक मारले गेले.
बाबरी मशीद पडली, ते पूर्वनियोजित नसून कार्यकर्त्यांची उस्फूर्त प्रतिक्रिया होती, असं भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी वारंवार नमूद केलं आहे.
पण बाबरी मशीद पाडण्याची रंगीत तालीमही झाली होती, असा दावा 25 वर्षांपूर्वी या घटनेच्या दिवशी तिथे असणाऱ्या छायाचित्रकारानं केला आहे.
बाबरी मशीद पाडण्याच्या एक दिवस आधी छायाचित्रकार प्रवीण जैन हिंदू स्वयंसेवकांच्या एका गटाबरोबर तिथे गेले होते. बाबरी मशीद पाडण्याची कथित 'रंगीत तालीम'ही त्यांनी पाहिली. या दिवसाची त्यांनी सांगितलेली ही गोष्ट प्रवीण जैन यांच्याच शब्दांत...
4 डिसेंबर 1992च्या धुक्यात हरवलेल्या सायंकाळी मी अयोध्येत पोहोचलो.
अयोध्येत येत असलेल्या 'कारसेवकां'चे आणि कडव्या हिंदू नेत्यांचे फोटो घेण्याची जबाबदारी माझ्याकडं होती. 'द पायोनिअर' या वृत्तपत्रासाठी मी या असाईनमेंटवर होतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो कार्यकर्ते अयोध्येत आधीच दाखल झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या देशात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासह कितीतरी हिंदुत्ववादी संघटनांची मातृसंस्था आहे.
अयोध्येत या ठिकाणी राम जन्मभूमी असल्याचा त्यांचा दावा असून तिथं मंदिर बांधण्याचं नियोजन त्यांनी केलं होतं. मशिदीला धक्का न लावण्याचं आश्वासन आणि फक्त मंदिर बांधण्यासाठी प्रतीकात्मक कोनशिला कार्यक्रम घेण्याचं वचन त्यांनी दिलं होतं.
भाजपचे एक खासदार माझ्या संपर्कात होते. 5 डिसेंबरला सकाळी बाबरी मशीद पाडण्याची 'रंगीत तालीम' होणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं.
"या कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश द्यायचा नाही, अशा सक्त सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. पण तुम्ही माझे मित्र आहात, म्हणून मी तुम्हाला ही माहिती देत आहे," असं त्यांनी मला सांगितलं.

फोटो स्रोत, Praveen Jain
डोक्याला भगवी कफनी आणि कपाळावर भगवी पट्टी आणि स्वयंसेवकांसाठी असलेला एंट्री बॅज जॅकेटवर घालून मी स्वयंसेवक असल्याचं दाखवत या गटात सहभागी झालो.
मशिदीपासून काही अंतरावर फुटबॉल मैदानाएवढ्या एका मोठ्या मैदानावर मला नेण्यात आलं. इथे भगवे स्कार्फ परिधान केलेले हजारो कार्यकर्ते आधीच जमले होते. या मैदानाच्या भोवतीने स्वयंसेवकांनी कडं केलं होतं.
माझ्यासोबत एक कार्यकर्ता होता. "तुम्ही या रंगीत तालमीचे फोटो काढू इच्छित असाल तर असंच करावं लागेल. तुम्ही माझ्यासोबतच राहा आणि कार्यकर्त्यांसारख्या घोषणा द्या म्हणजे तुम्ही स्वयंसेवकांपैकीच एक वाटाव आणि तुम्ही सुरक्षित राहाल," असं त्यांनी मला सांगितलं.
तोपर्यंत एक स्वयंसेवक माझ्यासमोर आला आणि त्यानं मला कॅमेरा बाजूला ठेवण्यासाठी खुणावलं. मी माझा बॅच दाखवला आणि त्यांच्यासारख्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
मी माझा कॅमेरा पुसला आणि माझ्यासमोर जे काही घडत होतं त्याचे फोटो टिपायला सुरुवात केली. इथे स्वयंसेवक पहार, फावडं, कुदळ अशी हत्यारं घेवून मातीचा एक डोंगर खाली ओढण्याचा प्रयत्न करत होते. अगदी लष्करी शिस्तीमध्ये हे काम सुरू होतं.
हे फक्त कार्यकर्ते नव्हते, तर एखादी इमारत कशी पाडायची याचं तंत्र माहीत असलेले व्यावसायिकच होते.

फोटो स्रोत, Praveen Jain
बाबरी मशीद पाडल्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या लिबरहान आयोगानं खालील नोंदी केल्या आहेत. (या आयोगानं आपला अहवाल 2009ला सादर केला.)
"मशीद पाडण्यासाठीची तालीम झाली होती, असं आयोगापुढं मांडण्यात आलं. आयोगासमोर याच्या समर्थनासाठी काही फोटोही सादर करण्यात आले होते. पण ठोस पुराव्याअभावी तसं ठामपणे मान्य करता येत नाही."
"तरीसुद्धा काही परिस्थितीजन्य पुरावे आणि काही साक्षी कारसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं होत, याकडे बोट करतात."
माझ्या फोटोंत एक माणूस दिसतो. या गर्दीत चेहरा झाकलेला तो एकमेव होता. इथला मातीचा डोंगर दोरखंड आणि लोखंडी वायरनी ओढणाऱ्या लोकांवर तो ओरडत होता.
तो या उजव्या संघटनांपैकी एखाद्या संघटनेचा नेता असावा. म्हणून त्याला त्याची ओळख उघड करायची नसावी.

फोटो स्रोत, Praveen Jain
तो मातीचा डोंगर यशस्वीपणे खाली ओढण्यात आला आणि तिथल्या स्वयंसेवकांनी आनंदाने घोषणा दिल्या.
मी माझा कॅमेरा माझ्या जॅकेटमध्ये लपवला आणि तिथून बाहेर पडलो. मी तिथल्या स्वयंसेवकात मिसळून घोषणा देत बाहेर पडलो. या तालमीचे फोटो घेता आलेला मी एकमेव पत्रकार होतो, या भावनेनं मी शहारलो.
दुसऱ्या दिवशी मी इतर काही पत्रकारांसमवेत एका चार मजली इमारतीवर जागा पकडून बसलो होतो. तिथून मशीद दिसत होती आणि विश्व हिंदू परिषद, भाजपचे नेते यांच्यासाठी उभारलेलं व्यासपीठही चांगलं दिसतं होतं. दीड लाखांवर स्वयंसेवक तिथे जमले होते.

फोटो स्रोत, Praveen Jain
इथे सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले पोलीस कर्मचारीही घोषणा देत होते. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास जमाव प्रक्षुब्ध झाला. हा जमाव पोलीस आणि मशिदीच्या सुरक्षेसाठी तैनात स्वयंसेवकांच्या दिशेनं धावला.
काही जणांनी चौथ्या मजल्यावरच्या पत्रकारांवर हल्ला केला आणि कॅमेरे फोडून टाकले. त्यांना बाबरी मशीद पाडत असतानाचे पुरावे ठेवायचे नव्हते.
काही तासांतच मशीद पाडण्यात आली. मी जोरात माझ्या हॉटेलच्या दिशेने धावलो.

फोटो स्रोत, Praveen Jain
दंगे तर आधीच सुरू झाले होते. मी आजूबाजूला पोलीस आहेत का पाहात होतो. दुकानं पटापट बंद झाली. घरांचे दरवाजे आणि खिडक्याही बंद झाल्या.
ज्या दिवशी मशीद पाडली गेली, त्यावेळी मला मी हिंदू असण्याची लाज वाटली.
लिबरहान आयोगासमोर मी साक्ष दिली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात साक्ष देण्यासाठी मला आजही बोलवलं जातं.
आता या घटनेला 25 वर्ष झाली आहेत, पण मशीद पाडण्यासाठी जबाबदार असलेल्यांना अजूनही शासन झालेलं नाही.
(अनसुया बसू यांनी इंडियन एक्स्प्रेसचे सल्लागार फोटोग्राफर प्रवीण जैन यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित.)
हे वाचलं का?
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









