You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : मोदींचा सामना राहुल गांधीशी नाही तर स्वत:शीच आहे
- Author, राजेश प्रियदर्शी
- Role, डिजिटल एडिटर, बीबीसी हिंदी
'मोदींना पर्याय नाही' या वाक्यालाच परमसत्य मानणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे. त्यांना चूक सिद्ध करणारं कोणतंही कारण अजून समोर आलेलं नाही.
राहुल गांधींचा सामना थेट मोदींशीच व्हावा ही तर भाजपाच्या चाणक्यांची सुप्त इच्छा आहेच.
राजकारणाच्या आखाड्यात दोघंही वेगवेगळ्या पद्धतीचे कुस्तीगीर आहेत. त्यात मोदी हे वजनदार नेते आहेत. तर राहुल यांचं वजन कमी अधिक होत असलं तर ते मोदींच्या कॅटेगरीत बसत नाहीत.
वारसाहक्काने मिळालेल्या पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी राहुल गांधी सक्षम नाहीत, हे सगळ्यांना दिसतं आहे. किंवा त्यांच्या आई अजूनही त्यांना पक्षभार द्यायला तयार नाहीत. मग अशा परिस्थितीत मोदींसाठी राहुल गांधीच आव्हान आहे, असं का मानावं?
एकीकडे मोदी आहेत, ज्यांनी अगदी पृथ्वीपासून आकाशापर्यंत स्वत:चा रस्ता तयार केला आहे. लहानपणी अगदी मगर पकडण्याचं काम सुद्धा केले आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरी त्यांची कहाणी एखाद्या नयनरम्य फँटसीपेक्षा कमी नाही.
दुसऱ्या बाजूला आहेत राहुल गांधी जे अनेक वर्षं स्वत:शी संघर्ष करत आहेत. त्यांनी आपली कोणतीच वेगळी कहाणी सांगितली नाही, किंवा आपल्यात काहीतरी वेगळं आहे याची जाणीव देखील करून दिलेली नाही.
'राहुल आ गए, राहुल छा गए'चा आवाज अनेकदा सोशल मीडियावर ऐकू आला. मग ते एका सुटीवरून दुसऱ्या सुटीवर गेले.
एकदा तर त्यांना बेपत्ता म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे कोणतीही सुटी न घेता राजकारणाच्या आखाड्यात ते किती टिकतील, याबद्दल लोकांना बरीच शंका आहे.
वारसाहक्काचं राजकारण
भारताच्या राजकारणात अशी अनेक मोठे नावं आहेत ज्यांना इंग्रजीत "reluctant politician" म्हटलं जातं. राजीव गांधीच्या बाबतीत असं म्हणतात की ते निरिच्छेने राजकारणात आले होते. तेव्हाच्या परिस्थितीपुढे हतबल होते.
वडील आणि मुलगा यांच्यात एक मोठं अंतर असं आहे की, राजीव गांधीना पंतप्रधान होण्याच्या आधी फारशा अडचणींचा सामना करावा लागला नाही. मात्र समोर आव्हानं असूनसुद्धा राहुल उत्तराधिकारी होण्याइतपत कधीही सक्षम वाटले नाही.
वंशवादाचा आरोप आपल्या जागी आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी प्रभावी व्यक्तींची मुलं असल्यामुळे ते सत्तेच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचले होते. पण लोकांनी त्याची पर्वा केली नाही.
मात्र राहुल गांधींची गोष्ट थोडी वेगळी आहे. जर राजीव गांधींचा वारसा नसता तर त्यांची नक्की काय ओळख असती, हे ते अजूनही सिद्ध करू शकलेले नाही.
वंशवादाचा आरोप भारतात फार गंभीर नसतो. त्याचा उलट फायदाच असतो. असं असलं तरी अंतिम निर्णय जनताच घेते.
म्हणूनच देव आनंद आणि अमिताभ बच्चन कितीही इच्छा असली तरी आपल्या मुलांना पुढे आणू शकत नाही. कारण जनतेनं त्यांना स्वीकारलेलं नाही. वंशवादामुळे संधी मिळू शकते, यश नाही.
आता राहुल गांधी या संधीचं सोनं करतील, असं मानण्याचं काही कारण आतापर्यंत तरी दिसत नाही. कारण राजकारण क्रिकेटच्या खेळापेक्षाही जास्त अनिश्चित आहे.
मोदींचा सामना मोदींशीच
2014 च्या निवडणुकीत भाजप नव्हे तर मोदी जिंकले होते. 'अब की बार बीजेपी सरकार' ऐवजी 'अब की बार मोदी सरकार' ही घोषणा आठवा.
मोदी देशाच्या संसदीय लोकशाहीला अमेरिकेसारख्या प्रेसिडेंशिअल डेमोक्रसीमध्ये बदलू शकले आहेत का, हे 2019 साली कळेल.
मोदी हे निर्विवादपणे भारतातील सगळ्यांत प्रभाशाली नेते आहेत. पण त्यांचा प्रभाव अजूनही पूर्ण देशात पडलेला नाही.
म्हणून भाजप काही राज्यांमध्ये, विशेषत: दक्षिण आणि इशान्येकडील राज्यांमध्ये प्रभावी नेत्यांना चिरडण्याऐवजी त्यांना छोट्या तुकड्यांत वाटून हरवण्यात मग्न आहे. म्हणूनच आज त्यांना उपेंद्र कुशवाहा आणि अनुप्रिया पटेल, अशा लोकांना सोबत घेऊन जावं लागतं आहे.
त्याचवेळी मोदींनी पंतप्रधान होण्याआधी एक मोठी रिस्क घेतली होती. युपीए आणि एनडीएच्या आघाड्यांच्या राजकारणाला फाटा देत त्यांनी पक्षासाठी मत मागण्याऐवजी स्वत:च्या नावावर मत मागितलं. पार्टीच्या अंतर्गत राजकारणात त्यांनी आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शक मंडळाचा रस्ता दाखवला.
खूप वाद झाल्यावरसुद्धा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होते. या दृष्टिकोनातून बघितलं तर राहुल गांधीच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात एकही मैलाचा दगड नाही. उलट ते आपल्या मतदारसंघात दुर्बळ झालेले दिसतात.
लोकसभा निवडणुकीत दमदार बहुमत मिळूनसुद्धा बिहार आणि दिल्लीत भाजपचा पराभव झाला. उत्तर प्रदेशातील विजयाच्या रूपात पक्षानं या पराभवाला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक आणि चीनसोबतच्या वादांनंतर आपण कच्चे खेळाडू नाही, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
पंजाब विधानसभेतील काँग्रेसचा विजय हे अमरिंदर सिंग यांचं यश मानलं गेलं. गोवा आणि मणिपूरमध्ये सगळ्यांत मोठा पक्ष झाल्यावरसुद्धा काँग्रेस सरकार बनवू शकलं नाही. त्याला राहुल गांधीच्या नेतृत्वाचा पराभव मानलं गेलं.
अयोध्या ते गुजरातपर्यंत त्यांनी अनेक मंदिराचं दर्शन करून राहुल गांधी मोदींसारखं होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सध्यातरी ते मोदींच्या आसपाससुद्धा नाहीत.
याचबरोबर अयोध्येच्या राम मंदिराचं दार त्यांच्या वडिलांनीच उघडलं होतं हे सांगण्याची ते हिम्मत दाखवत नाहीत. त्याचप्रमाणे 'तिलक आरती' बरोबरच गंगेचा जयजयकारसुद्धा राजीव गांधींनी मोठ्या थाटामाटात केला होता. पण गंगा तेव्हाही आणि आताही स्वच्छ झाली नाही हा भाग वेगळा.
बदलत्या वातावरणातील राहुल आणि मोदी.
गेल्या दोन महिन्यात कमी झालेला विकास दर, वाढती बेरोजगारी, नोटाबंदीचं अपयश, अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे आणि जनता त्यांच्यावर नाखूश आहे, अशी चर्चा जोरावर आहे.
सोशल मीडियाचा ट्रेंड लक्षात घेतला तर 'मोदी-मोदी' या घोषणा क्षीण होत आहेत.
'मोदींना पर्याय नाही' असं म्हणणाऱ्या भाजप समर्थकांचा सूर बदललेला आहे. 'मोदी नाही, तर मग राहुल का?' असा प्रश्न ते विचारतात आहे.
पंतप्रधान होण्याआधी मोदींना गमावण्यासारखं काहीच नव्हतं, आणि आता जे आहे ते सगळं गमावण्यासारखंच आहे. मिळवण्यासारखं काहीच नाही. त्याचवेळी राहुल यांनी आतापर्यंत काय मिळवलं आहे, हा प्रश्न आहेच.
मोदींनी निवडणुकीआधी जितकी आश्वासनं दिली होती, जितक्या आशा जागृत केल्या होत्या, त्यांची यादीच मोदींना सतावण्यासाठी खरंतर पुरेशी आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही राहुल गांधीची गरज नाही.
देशाला चमकवण्याचे, रोजगारनिर्मितीचे, काळा पैसा परत आणण्याचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी बनवणं, अशी अनेक आश्वासनं मागे पडली आहेत.
पूर्ण बहुमत असतांनासुद्धा कामं का झाली नाहीत आणि 2019 मधले मोदी ही सगळी कामं कशी करणार, यांची उत्तरं 2014 तील मोदींना द्यावी लागणार आहेत.
मोदी-2 साठी मोदी-1 ने केलेली निराशा, हे सगळ्यांत मोठं आव्हान असेल.
लोक अनेकदा विसरतात की जनता अनेकदा अनेक कारणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मत देते. लोकांनी राहुल गांधीना जिंकवायला मत दिलं नाही, तरी अनेकदा लोक कोणाला तरी हरवण्यासाठी मत देतात.
2004 सालची निवडणूक आठवा. तेव्हा शायनिंग इंडियातील लोकांनी अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत केले, पण सोनिया गांधी खरंच त्यावेळी पर्याय होत्या का?
आता प्रश्न असा पडतो की मोदी नाही, तर मग कोण? पण हा प्रश्न विचारणारे लोक हे विसरतात की, देशात अजूनही संसदीय लोकशाही आहे.
प्रत्येक राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. तिथे मोदींसारखा कोणताही चेहरा दिसत नसला तरी विरोधी आघाडी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या मोदींना दिल्लीमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
त्यामुळे गुजरात निवडणुकांमुळे 2019 च्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल, असं म्हणता येणार नाही. गुजरातमध्ये भाजप बऱ्याच काळापासून सत्तेत आहे आणि उर्वरित देशापेक्षा गुजरातची परिस्थिती वेगळी आहे.
गुजरातेत कोणताही विरोधी पक्ष नाही. विकास आणि हिंदुत्व यांच्यापलीकडेही मोदी यांचा मुकाबला मोदींशीच आहे, ज्यांनी नोटाबंदी आणि GST सारखे निर्णय घेतले आहेत.
2019 साठी अजून बराच वेळ आहे. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की या निवडणुकीत एका बाजुला मोदी आणि दुसऱ्या बाजुला इतर नेते असतील.
त्यामुळे हे इतर नेते होण्याचं कटू आव्हान राहुल गांधींसमोर आहे. त्यानंतरसुद्धा मोदींची लढाई ही मोदींशीच आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)