राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर RSS मधल्या महिलांचा गणवेशही चर्चेत

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे गुजरात दौऱ्यावर होते. गुजरातच्या वडोदरामध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेम साधला. विषय होता संघातला महिलांचा सहभाग.

राहुल गांधी यांनी थेट महिलांना प्रश्न विचारला, "आरएसएसच्या शाखांमध्ये कधी तुम्ही शॉर्ट्स घातलेल्या महिलांना पाहिलं आहे का? मी तर नाही पाहिलं. आरएसएसमध्ये महिलांना परवानगी का नाही?"

"भारतीय जनता पक्षात महिला आहेत मग आरएसएसमध्ये महिला का नाहीत?," राहुल गांधींच्या या विधानानंतर ते चांगलेच चर्चेत आले.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी समाचार घेतला.

"राहुल गांधी यांना पुरुष हॉकी मॅचमध्ये महिलांचा सहभाग हवा आहे. जर त्यांना महिलांचा खेळ पाहायचा असेल तर असेल तर त्यांनी महिलांचीच मॅच पाहायला हवी," असं वैद्य म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक तरुण मुलं आहेत पण महिलांचा सहभाग नसल्याचं म्हटलं जातं. यामध्ये तथ्य आहे की नाही याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांसाठी वेगळी संघटना आहे. राष्ट्र सेविका समिती असं त्या संघटनेचं नाव आहे.

दिल्लीमध्येदेखील समितीच्या 100 शाखा आहेत. देशभरात एकूण 3500 हून अधिक शाखा आहेत.

या शाखेत जाणाऱ्या सुश्मिता सन्याल यांच्याशी बीबीसीने संवाद साधला.

सुश्मिता 40 वर्षांच्या आहेत. त्या गेल्या 16 वर्षांपासून शाखेत जातात. 2001 मध्ये त्या ब्रिटीश रेड क्रॉससोबत काम करत होत्या. त्यावेळी त्या लंडनमध्ये होत्या. तेव्हा त्यांना समितीबाबत कळलं आणि त्या शाखेत जाऊ लागल्या.

बीबीसीने त्यांना पोशाखाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं, "आम्ही पांढरी सलवार-कमीज घालतो किंवा ज्या महिलांना साडी नेसायची आहे त्या महिला गुलाबी काठ असलेली साडी नेसतात."

राहुल यांच्या वक्तव्याबाबत जेव्हा आम्ही सुश्मिता यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "या ड्रेसची 80 वर्षांची परंपरा आहे. असं कुणाच्या सांगण्यावरून आम्ही आमचा गणवेश बदलू शकत नाही."

"महिलांचं आणि संघाचं नातं जुनचं आहे. अनेक मुली किशोरावस्थेपासूनच शाखेत येतात. त्या बरोबरच ज्या मध्यमवयीन महिला आहेत त्यांना देखील शाखेत येता येतं. ज्या महिलांचं मन भजन कीर्तनात रमतं त्यांच्यासाठी धर्म शाखा आहे. त्यामध्येदेखील तुम्ही सहभागी होऊ शकता," असंही सुश्मिता सन्याल म्हणाल्या.

"पुरुषांच्या शाखेप्रमाणे अगदी भल्या सकाळी महिलांच्या शाखा लागत नसल्या तरी दिवसभरातून एखाद्या ठरलेल्या वेळी महिलांची शाखा लागतेच. स्थानिक सभासद ठरवतात की, शाखा केव्हा घ्यायची. त्यानुसार हा निर्णय होतो," असं त्या सांगतात.

राष्ट्रीय सेविका समितीच्या वेबसाइटनुसार महिला राष्ट्राचा आधारस्तंभ आहे हे ब्रीदवाक्य आहे.

राष्ट्रीय सेविका समितीची स्थापना 1936 ला विजयादशमीच्या दिवशी झाली होती. लक्ष्मीबाई केळकर यांनी वर्ध्यामध्ये समितीची स्थापना केली होती. सध्या शांताक्का या समितीच्या संचालिका आहेत. त्या नागपूरमध्येच राहतात.

सुषमा स्वराज आणि लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन या देखील राष्ट्रीय सेविका समितीशी निगडित आहेत.

आरएसएसशी संबंधित असलेले आणि दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले राकेश सिन्हा म्हणतात, "राष्ट्रीय सेविका समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे परस्परपूरक आहेत."

"दोन्ही संघटनांची रचना एकसारखीच आहे. दोन्ही संघटनांचे मुख्य हे संचालक आणि संचालिका हेच असतात. दोन्ही संघटनामध्ये प्रचारक आणि प्रांत प्रचारक असतात."

राहुल गांधी यांच्या विधानाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, "राहुल यांचं विधान हे त्यांचं अज्ञान स्पष्ट करतं. म्हणूनच 80 वर्षांच्या संघटनेबाबत त्यांना हा प्रश्न पडला."

"महिलांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र असून त्या पुरुषांवर अवलंबून नाहीत असं आम्ही मानतो. त्यामुळेच त्यांची वेगळी संघटना आहे," असं ते म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)