दृष्टीकोन : निर्नायकी गुजरात काँग्रेसला राहुल गांधी तारू शकतील?

    • Author, नीरजा चौधरी
    • Role, ज्येष्ठ राजकीय पत्रकार

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर सोडलेल्या टीकास्त्रामुळे सध्या भलतेच चर्चेत आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पूर्ण जोर लावला आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

कंबर कसून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

राहुल गांधींनी त्यांची संवाद साधण्याची पद्धत जाणीवपूर्वक सुधारली आहे का? आणि गुजरातमध्ये काँग्रेसला याचा मतांच्या स्वरूपात फायदा होईल का?

राहुल गांधी गेल्या महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापिठात गेले होते. तिथं त्यांच्या 'कम्युनिकेशन स्किलनं' अनेकांचं लक्ष वेधलं. त्यांच्या बोलण्यात नक्कीच सुधारणा झाली आहे. त्यात तीक्षपणा जाणवत आहे.

पण, यावेळी फक्त राहुल गांधींमध्येच सुधारणा झाली आहे असं नाही, तर संपूर्ण काँग्रेसनेच त्यांच्या बोलण्यात आणि सोशल मीडियावर भरपूर मेहनत घेतल्याच दिसत आहे. गुजरातमध्ये पक्षाची आक्रमकता दिसून येत आहे.

सोशल मीडियावर काँग्रेसनं सुरू केलेला ट्रेंड 'विकास पगला गया है' (विकासला वेड लागलं आहे) हे आता व्हायरल होऊन घराघरात पोहोचलं आहे. भाजपला या मुद्द्यावर बचावात्म पवित्रा घ्यावा लागला आहे.

जनतेचा मूडही बदलला

पण, या व्यतरिक्त आणखी एक गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे जनतेचा मूड. परिणामी नेत्यांचं वागणंही बदललं आहे. काँग्रेसचे नेते स्वत: हे मान्य करतात की आधी भाजपवर टीका करताना भिंतींशी बोलत आहोत असं वाटायचं. पण, आता वाटतं की आमचं ऐकलं जात आहे.

गुजरातमध्ये एक मोठा बदल दिसून येत आहे. काँग्रेसनं जर योग्य चेहरा दिला असता तर ते कदाचित गुजरात जिंकू शकले असते असं बऱ्याच लोकांना वाटतं.

मला असं वाटतं की सध्या काँग्रेस जी चर्चेत आहे ती कोणा एका नेत्यामुळे नाही तर पूर्ण पार्टीमुळे आहे. काँग्रेसेची सुधारलेली रणनीती आणि राहुल यांचं आक्रमक रूप ही यामगची कारणं आहेत.

मोदींचा 'एक्झिट पॉईंट' अजून नाही

राहुल गांधी आपलं भाषण आणि संवादशैलीत सुधारणा करत आहेत. पण प्रश्न हा आहे की भविष्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादकौशल्याला आव्हान देऊ शकतील का? सध्याची स्थिती पाहिली तर राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या संवादशैलीत मात करेल असं कुणीच नाही.

अमित शाहांच्या मुलाच्या चौकशीतून काहीही समोर येऊ दे, सध्या प्रश्न मात्र उपस्थित झाले आहेत. अर्थव्यवस्थेबाबतही चिंतेचं वातावरण आहे.

असं असलं तरी मला नाही वाटत की मोदींचा 'एक्झिट पॉईंट' आला आहे. अजूनही लोक त्यांच्याकडे प्रभावी नेते म्हणून पाहतात. त्यासोबतच, सोशल मीडिया आणि भाषणांमध्ये त्यांची जी पकड आहे, त्याला कुणाचीही तोड नाही.

त्यामुळे राहुल गांधीसमोर सध्याही तेवढंच आव्हान आहे जेवढं 2014 मध्ये होतं. आता लोकं अस्वस्थ नक्की आहेत. पण, त्याचं आक्रोशात रुपांतर झालं तरच लोकं भाजपला हारवण्यासाठी मतदान करतील. पण, अजून अशी स्थिती आलेली नाही.

जिथे काँग्रेसकडे 'चेहरा', तिथं झाला फायदा

पंजाबमध्ये काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे नेतृत्व सोपवलं. तिथं त्यांचा प्रभाव आहे, स्वतःची अशी वोटबँक आहे. ज्याचा काँग्रेसला फायदा झाला.

तसंच, कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या एक तगडे नेते आहेत. काही महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये यंदा भाजपचं कमळ नक्की फुलेलं असं बोललं जात होतं.

पण, आता असं छातीठोकपणे सांगता येणार नाही. इथं अटीतटीची लढाई होणार असंच चित्र सध्या आहे. हरियाणामध्येही भूपेंदर सिंह हुड्डा अडचणीतून बाहेर आलेले नाहीत. पण, लवकरच त्यांच्या फॉर्माची वापसी होईल असं दिसत आहे.

जिथं जिथं काँग्रेसनं स्थानिक नेत्यांना संधी दिली आहे, तिथं एकतर ते जिंकून आले आहेत किंवा काँग्रेसला त्याचा फायदाच झाला आहे. पण, गुजरातमध्ये काँग्रेससाठी हेच नुकसानकारक आहे.

त्यामुळेच मला नाही वाटतं की गुजरातमध्ये राहुल गांधींमुळे फारसा फरक पडेल. पण, दुसरीकडे मोदींनी प्रचार केल्यामुळे नक्कीच फरक पडेल. कारण गुजरातमध्ये ते बराच काळ मुख्यमंत्री होते.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे 'गुजराती गौरव'ची भावना मोदींना पराभूत करण्याआड येईल. मोदी हारले तर गुजरातच्या गौरववर बट्टा लागेल असा प्रचार भाजप करत आहे.

उत्तर भारतात प्रभाव ओसरला

यात काहीच शंका नाही की, मोदींचा उत्तर भारतामध्ये आधी जसा प्रभाव होता, तो आता कमी झाला आहे.

घराघरात होणाऱ्या चर्चांमध्येही आता मतभेद दिसून येत आहेत. मध्यम वर्गातील लोकं तर आतापासूनच विचारात पडलेत की 2019मध्ये कुणाला मत द्यायचं. असं पण होऊ शकतं की काही लोक नोटाचा पर्याय निवडतील किंवा मतदानाला बाहेरच पडणार नाहीत.

बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा ज्यांच्यावर थेट परिणाम झाला आहे, तसंच ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तो वर्ग खूपच नाराज आहे.

गरीबांनाही वस्तूंचे भाव वाढल्यामुळे त्रस्त आहेत. पण, अजूनही त्यांचा मोदींवरचा विश्वास कायम आहे. मोदी आमच्यासाठी काही तरी करतील असं ते सांगतात. ते अजूनही मोदींनाच मतदान करण्यावर ठाम आहेत.

गरीबांच्या मनात मोदींनी ज्या आशा जागवल्या आहेत, त्या अजूनही कायम आहेत. अजूनही मोदींनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नसल्या तरी लोकांना असं वाटतं की भविष्यात काहीतरी होईल. पण हे सुद्धा खरं आहे की परिस्थिती गेल्यावर्षी होती तशी राहीलेली नाही.

खुद्द सरकारमध्येही चिंतेचं वातावरण असल्याचं दिसून येतं. मोदींनी थोडं गमावलं नक्की आहे, पण म्हणून त्यांचा 'एक्झीट पॉईंट' जवळ आलेला नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)