मासिक पाळीदरम्यान महिलांना सुटी असावी की नाही?

    • Author, क्लॅरी लॅम्पेन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मासिक पाळीच्या दिवशी महिलांना सुट्टी देण्याबाबत सकारात्मक तसंच नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. प्रश्न असा आहे की, महिला कर्मचाऱ्यांच्या सबलीकरणासाठी कंपन्यांनी असं धोरण बनवावं तरी कसं?

भारतातल्या काही कंपन्यांनी 'पीरियड लीव्ह' द्यायला सुरुवात केली, तेव्हा बरीच चर्चा झाली. काहींनी याला स्वागतार्ह पाऊल म्हणून संबोधलं तर काहींनी यावर टीका केली.

मासिक पाळीदरम्यान महिलांना तीन दिवस सुट्टी मिळावी म्हणून मार्च महिन्यात इटलीच्या संसदेनं नॅशनल 'पीरियड लीव्ह' धोरण मांडायचा प्रयत्न केला.

पण असं केल्यास कंपन्या महिलांना कामावर घेणार नाहीत, अशी भीती तेव्हा अनेकांनी व्यक्त केली.

ब्रिटनमधल्या एका नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत असणाऱ्या बेक्स बॅक्स्टर यांना आलेला एक अनुभव : ऑफिसमध्ये शिरल्या-शिरल्या त्यांचं लक्ष रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर गेलं.

तिच्यासमोर असलेल्या टेबलाला रेलून ती अक्षरश: पोटात गोळा आल्यासारखी बसली होती. या अवस्थेतही ती तिचं काम करत होती.

तिची परिस्थिती बघून बेक्स बॅक्स्टरनी तिला घरी जाण्यास सांगितलं. पण त्या रिसेप्शनिस्टला हे अपेक्षित नसावं. ती उत्तरली, ''मला काहीही झालेलं नाही. माझे पीरियड्स तेवढे सुरू आहेत.''

बॅक्स्टर पूर्वी ब्रिस्टलस्थित को-एक्झिस्ट कंपनीत काम करत होत्या. पण, हा प्रसंग अनुभवेपर्यंत त्यांना को-एक्झिस्टमध्ये असलेल्या पीरियड पॉलिसीबद्दल काहीही कल्पना नव्हती.

मग या प्रसंगानंतर त्यांच्या मनात मूलभूत हक्कांबद्दल विचार आला. पाळीदरम्यान विश्रांतीचा हक्क असायलाच हवा. मासिक पाळी नैसर्गिक आहे आणि त्याबद्दल कुणाला काहीही शरम वाटता कामा नये.

काही कंपन्यांमध्ये मेन्स्ट्रुअल लीव्ह पॉलिसी अस्तित्वात आहे. 'मेन्स्ट्रुअल लीव्ह'मध्ये महिलेल्या तिच्या मासिक पाळीच्या काळात खूप त्रास होत असेल तर एक ते दोन दिवसांची सुट्टी दिली जाते.

हे धोरण अनेक देशांत अवलंबलं जात आहे. पण, सध्या याबद्दल बराच वाद सुरू असलेला दिसून येतो.

काही लोकांचं म्हणणं आहे की, 'मेन्स्ट्रुअल लीव्ह'चं धोरण अंमलात आणल्यास कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. शिवाय, यातून महिला कर्मचाऱ्यांबद्दल असलेल्या गैरसमजांना बळकटी मिळेल.

जपान, इंडोनेशिया, तैवान, दक्षिण कोरिया यांसारख्या आशियाई देशांत तसंच चीनमधील काही भागात महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात सुट्टी घेण्याची परवानगी आहे.

काही जणी त्याचा सदुपयोग घेताना दिसून येतात. पण, बहुसंख्य जणींना मात्र असं केल्यानं आपण दुबळे आहोत, अशी भावना पसरेल याची चिंता वाटते. आणि त्याला ही व्यवस्था जबाबदार असल्याचं वाटतं. मासिक पाळीविषयीच्या गैरसमजुतींमधून असं घडत असल्याचं त्या मानतात.

निषिद्ध मानला गेलेला विषय

मासिक पाळीकडं अपवित्र, लज्जास्पद आणि जाहीरपणे बोलता न येणारी गोष्ट म्हणून पाहिलं जातं. पण, याच समजामुळं अनेक मुली शिक्षणापासून आणि असंख्य महिला नोकरीपासून वंचित राहात आहेत.

जिथं स्वच्छतागृहं आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत अशा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांनासुद्धा त्यांचे पीरियड्स लपवण्यासाठी कसरत करावी लागते.

एखाद्या महिलेचे पीरियड्स सुरू असतील तर पीरियड्सबद्लचं ज्ञान तिच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेवर कसं परिणामकारक ठरतं, हे काही संशोधकांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

2002 सालच्या एका अभ्यासानुसार, ज्या महिला मासिक पाळी असल्याने टॅम्पॉन घेऊन वावरतात, त्यांच्याकडं लोक अकार्यक्षम, शारीरिक संबंधांसाठी कमकुवत म्हणून बघतात.

आज जगभरातील एकूण कार्यरत मनुष्यबळापैकी 40 टक्के या महिला आहेत आणि 20 टक्के महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात रक्तस्रावाचा खूप त्रास होतो. यालाच 'डिसमेनोऱ्हिया' असं म्हणतात.

या दरम्यान महिलांना होणारा त्रास इतका जास्त असतो की, त्यांना दिवसभर दुसरं काहीही काम करता येत नाही. या अशा महिलांसाठी 'मेन्स्ट्रुअल लीव्ह' नक्कीच आरामदायी ठरू शकते.

पण कंपन्यांच्या पातळीवर अशा प्रकारच्या रजेची परिणामकारक अंमलबजावणी होईल तेव्हाच याचा खरा उपयोग आहे.

आता प्रश्न असा आहे की, कशा पद्धतीनं आपण या रजेच्या धोरणाला परिणामकारक बनवू शकतो जेणेकरून महिलांवर दुर्बलतेचा शिक्का बसणार नाही याचा विचार होणं गरजेचं आहे.

"कॉर्पोरेट कंपन्यांनी मासिक पाळीसंबंधी गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी 'मेन्स्ट्रुअल लीव्ह' संबंधीच्या उद्देशांची उजळणीही करायला हवी. तसंच मासिक पाळीमुळं महिलांना भेदभावाची वागणूक न मिळता महिलेला फक्त महिला म्हणून स्वीकारायला हवं,'' असं बॅक्स्टर यांनी सांगितलं.

बॅक्स्टर यांनी को-एक्झिस्ट कंपनी सोडली असली तरी त्या या कंपनीच्या पीरियड्स पॉलिसीवर सल्लागार म्हणून काम करत आहेत.

''पाळीसंबंधी मुक्तपणे चर्चा झाली तर 'पीरियड लीव्ह'बद्दल लोक बोलायला लागतील आणि पाळीबदद्लच्या गैरसमजांचं निरसन होईल. पण, खरं आव्हान 'पीरियड लीव्ह'ची अंमलबजावणी कशी करणार हे असणार आहे. तीही अशा पद्धतीनं ज्यात महिलेची मासिक पाळी कंपनीच्या उत्पादनासाठी हानीकारक ठरेल असा पूर्वग्रह न बाळगता!'' असं त्या पुढं सांगतात.

पीरियड ड्रामा

पाळीसंबंधीच्या गैरसमजांमुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. 2016 साली बीबीसीने YouGov च्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणातून पुढील बाबी समोर आल्या.

  • पीरियडच्या काळात होणारा त्रास आमच्या कामात व्यत्यय आणतो, असं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक महिलांचं म्हणणं होतं.
  • फक्त 27 टक्के महिला या त्यांच्या बॉससोबत पाळीसंबंधीच्या प्रश्नांबद्दल सहजपणे बोलत होत्या.

रजेचं धोरण कसं असावं?

मासिक पाळी आणि मेनोपॉजसंबंधीच्या सल्लागार लारा ओवेन यांच्या मते, ''कंपनीचा आकार आणि कार्यशैली यावर हे पाळीच्या रजेचं धोरण अवलंबून आहे. या रजेला नेमकं कोणत्या भाषेत मांडता यावरदेखील अवलंबून आहे."

"पाळीदरम्यानच्या वेदनांची कल्पना नाही अशा लोकांना मासिक पाळी ही क्षुल्लक बाब वाटते आणि उगाचच महिलांना यानिमित्ताने सुट्टी मिळते, असं वाटतं. म्हणून मेन्स्ट्रुअल लीव्ह अशी संज्ञा वापरणंच टाळायला हवं'', असं लारा ओवेन सांगतात.

''मेन्स्ट्रुअल लीव्हच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना सरळ घरी पाठवण्याऐवजी कंपन्यांनी ऑफिसमध्येच काही आरामाची व्यवस्था करायला हवी किंवा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून महिला कर्मचाऱ्यांवर घरी थांबायची वेळ येणार नाही.'' असं ओवेन सांगतात.

एडन किंग या टेक्सस राईस युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्या तिथं मानसशास्त्र हा विषय शिकवतात. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक भेदभावाकडं लक्ष वेधून त्या सांगतात की, ''कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष असा भेद हा कायमचा काढून टाकायला हवा."

त्या पुढे सांगतात, ''कंपनीची लीव्ह पॉलिसी ही लवचिक असावी. काळानुरूप आणि गरजेनुसार ती बदलणारी असायला हवी. ज्यामुळं आजारी पडल्यास कंपनीत काम करणाऱ्या लोकांना सुट्टी घेता येईल, मग त्यांच्या आजारपणाचं कारण काहीही असो!"

"या पद्धतीचा अवलंब केल्यास कुणालाही झुकतं माप देण्याचा प्रश्न येणार नाही. शिवाय, ही बाब सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवेल आणि लैंगिक गैरसमजांनाही यामुळं आळा बसेल'', असं त्या म्हणतात.

"पीरियडसंबंधीच्या गैरसमजांना तिलांजली देणं हा या मेन्स्ट्रुअल लीव्हचा एक भाग असेल तर पुन्हा याच नावानं गैरसमज का निर्माण करायचे?" असा मुद्दा ओवेन मांडतात.

मासिक पाळी हा आजार नसून महिलांच्या आरोग्याशी निगडित, त्या सातत्याने अनुभवत असणारं एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तेव्हा 'पीरियड लीव्ह' बाबतीत कंपन्यांनी लवचिक धोरण बाळगणं आवश्यक आहे. जेणेकरून महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात पर्सनल लीव्ह घेता येईल, असं ओवेन सुचवतात.

''पीरियड लीव्हचा प्रश्न मोठा बनवून त्याला सर्वांपर्यंत पोहचवल्यास, त्याबद्दल सर्वांगानं चर्चा झाल्यास पाळीबद्दलचे अनेक समज दूर होऊ शकतात,'' असं वॉटर एड अमेरिकेच्या लिसा स्केचमन यांनी सांगितलं.

त्या पुढं सांगतात की, ''मासिक पाळीसंबंधीची धोरणं पुरुष मंडळी तयार करू शकत नाही. महिला मासिक पाळी प्रत्यक्ष अनुभवतात, त्यांना त्यातून जावं लागतं. त्यामुळं त्यांनीच ही धोरणं बनवण्याकरता, त्यांच्या अंमलबजावणीकरता पुढाकार घेणं गरजेचं आहे.''

बॅक्स्टर हे सर्व करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे फीडबॅकही घेत आहेत.

को-एक्झिस्ट पुढच्या महिन्यात मासिक पाळीसंबंधीचं नवीन धोरण जाहीर करणार आहे. त्यात मासिक पाळीच्या काळातील सुट्ट्यांचा समावेश कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक वेळापत्रकात करण्याचा त्यांचा विचार आहे.

लारा ओवेन यांच्यासोबत तळमळीनं काम करणाऱ्या बॅक्स्टर यांना पीरियड्सबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)