अमेरिका हिंसाचार: मला श्वास घेता येत नाहीये, असं का म्हणत आहेत कृष्णवर्णीय?

जॉर्ज फ्लॉईड

फोटो स्रोत, TWITTER/RUTH RICHARDSON

मला श्वास घेता येत नाहीये...हे वाक्य सध्या अमेरिकेत आणि जगात गाजतंय.

हे वाक्य कुणा कोव्हिड रुग्णाचं नाही. ते अमेरिकेतल्या एका कृष्णवर्णीय माणसाचं आहे, ज्याचा जीव एका गोऱ्या पोलिसामुळे गेला. ही ठिणगी पडताच आता देशभरात वणव्यासारख्या दंगली पसरल्या आहेत.

आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या अमेरिकेत हे नवं मोठं संकट आलंय. तिथे जाळपोळ, लुटालूट होतेय. 40 शहरांमध्ये कर्फ्यू लागलाय. पण असा उद्रेक होण्याची ही पहिली वेळ नाही. काळ्या-गोऱ्यांच्या संघर्षावरून अमेरिकेत 4 वर्षं गृहयुद्ध पेटलं होतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

भारतात जसा जातीय संघर्ष होत आलाय, तशी अमेरिकेत वांशिक भेदभाव झाल्यामुळे हिंसक आंदोलनं झाली आहेत. पण हे का घडतंय आणि त्याचा इतिहास काय आहे?

'मला श्वास घेता येत नाहीये'

25 मे च्या दिवशी अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातल्या मिनिआपोलिस शहरात 46 वर्षांच्या जॉर्ज फ्लॉइड या माणसाला पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. फ्लॉइडवर आरोप होता एका दुकानदाराला 20 डॉलर्सची खोटी नोट दिल्याचा. पोलीस आणि फ्लॉइड यांच्यात काही काळ वाद झाला.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - अमेरिकेत हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत. त्यांच्या या संतापाचं कारण काय आहे?

त्यानंतर जमिनीवर पडलेल्या फ्लॉइड यांच्या गळ्यावर डेरेक चाऊविन या 44 वर्षांच्या पोलिसाने गुडघा दाबून ठेवला. त्याचा व्हीडिओ कॅमऱ्यात कैद झाला आणि पाहता पाहता व्हायरल झाला

त्या पोलीस अधिकाऱ्याने फ्लॉइड यांचा गळा आपल्या गुडघ्याखाली सुमारे पावणे नऊ मिनिटं दाबून ठेवला होता. फ्लॉइड सातत्याने आपण गुदमरत असल्याचं सांगताना व्हीडिओत दिसतात. मला श्वास घेता येत नाहीये, असं ते विनवणीच्या स्वरात म्हणतात. पण पोलीस काही त्याला सोडत नाहीत. फ्लॉइड बेशुद्ध झाल्यानंतरही सुमारे तीन मिनिटं या पोलिसाने आपला गुडघा हलवला नाही.

डेरेक चाऊविन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डेरेक चाऊविन

त्यानंतर निपचित पडलेल्या फ्लॉइड यांना दवाखान्यात नेलं गेलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. फ्लॉइड हे एका स्थानिक पबमध्ये बाउन्सरचं काम करायचे. डेरेक चाउविन या पोलिसावर खुनाचा आरोप ठेवला गेलाय आणि त्यांच्याबरोबर असलेल्या इतर पोलिसांची चौकशी सुरू आहे.

या घटनेनंतर बघता बघता निदर्शनांचं लोण अमेरिकेत पसरलं. अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये पोलिसी अत्याचारांविरोधात निदर्शनं झाली, अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या, पोलिसांनी जमावांना पांगवण्यासाठी अश्रुधूर, पेपर स्प्रे, पाण्याचे फवारे, हवेत फायरिंग अशा तंत्रांचा वापर केला. पण एक आठवडा उलटून गेला तरी ही निदर्शनं संपायला तयार नाहीत. अमेरिकेतले कृष्णवर्णीय या घटनेनंतर कमालीचे संतापले आहेत.

ट्रंप यांनी आगीत तेल ओतलं?

यापूर्वी अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांवर आपल्या कारकीर्दीत वर्णभेदाच्या गंभीर घटना हाताळण्याची वेळ आली आहे. आता ती पाळी डॉनल्ड ट्रंप यांच्यावर आहे. मिनिआपोलिसमध्ये हिंसक निदर्शन करणाऱ्या निदर्शकांना ट्रंप यांनी 'दंगलखोर' म्हटलं. ते बाहेरच्या राज्यांमधून मिनिआपोलिसमध्ये गेले होते आणि हा गुन्हा आहे असंही ट्रंप यांनी म्हटलं.

यानंतर जशी हिंसक आंदोलनं अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरायला लागली तशी ट्रंप आणि विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये खटके उडू लागले. डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर आणि मेयर हे तातडीने केंद्रीय नॅशनल गार्डला पाचारण करत नसल्याने जग त्यांना हसतंय अशी टीका ट्रंपनी केली आणि माझं ऐकलं नाही तर फेडरल म्हणजे केंद्र सरकार हस्तक्षेप करेल असा इशाराही दिला.

अमेरिका आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

हिंसक निदर्शनांमागे अँटिफा ही कट्टर डाव्या विचारांची संघटना असल्याचंही ट्रंप यांनी म्हटलं आणि तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणार असल्याचंही जाहीर केलं. देशातली परिस्थिती अत्यंत नाजूक असतानाही ट्रंप पक्षीय राजकारण आणि त्यांना अनुकूल नसलेल्या प्रसारमाध्यमांची टिंगल करण्यापासून लांब राहिलेले दिसत नाहीत. CNN, New York Times, Washington Post यांसारखी माध्यमं फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोपही ट्रंप यांनी ट्विटरवरून केला.

बीबीसीचे नॉर्थ अमेरिका करस्पाँडंट अँथनी झर्कर म्हणतात, "सध्याची परिस्थिती एखाद्या अत्यंत कसबी नेत्याची कौशल्यंही पणाला लावेल. पण ट्रंप यात हरवून जाण्याची शक्यता आहे. ते एकीकडे लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन करतायत तर दुसरीकडे ट्विटरवरून लोकांना नावं ठेवतायत आणि भांडण उकरून काढतायत. कोव्हिडच्या आरोग्य संकटामुळे देशातली राजकीय परिस्थिती कोरड्या माळरानासारखी झालीये. जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूने त्यावर वीज पडल्यासारखं झालंय. हा वणवा थांबवणं ट्रंप यांना जमेलच असं नाही."

'ब्लॅक लाईव्ह्ज् मॅटर'

अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर गोऱ्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असतात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही अशी तक्रार वारंवार येत असते. यावरून अनेकदा मोठी आंदोलनं आणि निदर्शनं उभी राहिली आहेत.

यातली गेल्या दशकातली सगळ्यांत हादरवून टाकणारी घटना होती ट्रेव्हॉन मार्टिन या 17 वर्षांच्या मुलाची 2012 साली झालेली हत्या. आपल्या वडिलांना भेटायला गेलेल्या ट्रेव्हॉन मार्टिनला पाहून जॉर्ज झिमरमन या माणसाने 911 या हेल्पलाईनला फोन केला आणि आपल्याला एक संशयास्पद व्यक्ती दिसल्याचं सांगितलं. यानंतर झिमरमनने स्वतःच जाऊन ट्रेव्हॉनला हटकलं आणि त्याच्यावर गोळी झाडली. त्याचा यात मृत्यू झाला.

अमेरिकेत सुरू असलेलं आंदोलन

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, अमेरिकेत सुरू असलेलं आंदोलन

या घटनेने अमेरिका ढवळून निघाली. सगळीकडे निदर्शनं झाली आणि झिमरमन यांच्या कथित वर्णद्वेषी कृत्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी झाली. स्वसंरक्षणासाठी आपण गोळ्या झाडल्याचं झिमरमन यांनी सांगितलं, 2013 मध्ये झिमरमनची आरोपांतून सुटका झाली. यानंतर अमेरिकेत 'ब्लॅक लाईव्हज् मॅटर' ही संघटना उभी राहिली. कृष्णवर्णीयांचं जीवनही गोऱ्यांइतकंच महत्त्वाचं आहे, हे सांगण्याची वेळ या संघटनेवर आली आहे.

2014 साली फर्ग्युसनमध्ये मायकल ब्राऊन या तरुणावर डॅरेन विल्सन या पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आणि मायकलचा मृत्यू झाला.

2014 मध्येच न्यू यॉर्क शहरात एरिक गार्नर या माणसाला पोलिसांनी गळा दाबून धरून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अस्थमाचा आजार असलेल्या गार्नर यांचा यात गुदमरून मृत्यू झाला.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रन्सविक या शहरात अहमद आर्बरी हा 25 वर्षांचा कृष्णवर्णीय तरुण जॉगिंगला गेलेला असताना ग्रेगरी आणि ट्रॅव्हिस मॅकमायकल या पिता-पुत्रांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

अमेरिका आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

या सगळ्या घटनांमध्ये कृष्णवर्णीय व्यक्ती चोर, दरोडेखोर असल्याचा संशय येऊन तिच्यावर हल्ला झाला आणि बहुतांश घटनांमध्ये कठोर शिक्षा झाली नाही किंवा आरोपच सिद्ध केले जाऊ शकले नाहीत.

जेव्हा अमेरिकेत गृहयुद्ध पेटलं होतं...

अफ्रिकेतून आणलेल्या लोकांना गुलाम म्हणून विकत घेण्याची प्रथा अमेरिकेमध्ये सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत होती. त्यावरून 1861 साली गृहयुद्ध पेटलं. गुलामगिरी ठेवायची की, सगळ्यांना समान हक्क द्यायचे यावरून अमेरिकेतली उत्तरेकडची आणि दक्षिणेकडची राज्यं शस्त्रास्त्रं घेऊन एकमेकांविरुद्ध लढली.

अखेर 1856 साली उत्तरेकडच्या राज्यांचा विजय झाला...अमेरिकेतली स्टेट्स युनायटेड झाले आणि अब्राहम लिंकन यांच्या कारकिर्दीत गुलामगिरीची पद्धत कायद्याने नष्ट करण्यात आली. पण यानंतरही कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार थांबले नाहीत. गोऱ्या वर्चस्ववादाचा पुरस्कार करणारी 'कू क्लक्स क्लॅन' ही संघटना उभी राहिली आणि त्यांनी कृष्णवर्णीयांना ठेचून मारायला सुरुवात केली.

19 व्या आणि 20 व्या शतकात अमेरिकेत कृष्णवर्णीयांना गोऱ्या लोकांच्या गटांनी फासावर लटकवून किंवा शारिरीक छळ करून मारल्याच्या अनेक घटना घडल्या.

अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेत 14 व्या घटनादुरुस्तीने सर्व नागरिकांना समान दर्जा दिला पण कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय लोकांसाठी हॉटेलमधल्या जागा, बसमधल्या जागा, चहा-कॉफी पिण्याचे कप हे सगळं वेगवेगळं असायचं. अमेरिकन सुप्रीम कोर्टानेही त्याला मान्यता दिली होती.

1950 आणि 1960 च्या दशकात मार्टिन लूथर किंग जुनियर यांच्या नेतृत्वात अमेरिकेत नागरी हक्कांची चळवळ उभी राहिली. 1963 मध्ये मार्टिन लुथर किंग जुनियर यांच्या नेतृत्वात जवळपास अडीच लाख लोक राजधानी वॉशिंग्टन डीसीवर मोर्चा घेऊन गेले. यानंतर शाळांमध्ये रंगाच्या/वर्णाच्या आधारावर होणारा भेदभाव कायद्याने रद्द झाला, कृष्णवर्णीयांना मताधिकार मिळाला, घर विकत घेण्यात होणारा भेदभावही कायद्याने हद्दपार केला.

पण हे सगळं करूनही अजूनही कृष्णवर्णीय समाजाची स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली नाही. आजही कृष्णवर्णीयांमध्ये बेरोजगारीचं, निरक्षरतेचं प्रमाण मोठं आहे. अमेरिकेच्या अडीचशे वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एक कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेत आणि त्यांच्या अमेरिकन असण्याबद्दलच अनेकांनी गैरसमज पसरवले होते. ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झाला नाही, ते मुस्लीम आहेत असे बिनबुडाचे दावे करणाऱ्या बर्थर कॉन्स्पिरसी थेअरीचा पुरस्कार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनीही केला होता हेही तुम्हाला माहीत असायला हवं.

अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या दंगली आणि संघर्षाला हा दोन शतकांचा इतिहास आहे. एकीकडे आरोग्य संकट आणि दुसरीकडे समाजात दुही माजू न देणं असं दुहेरी आव्हान ट्रंप प्रशासनापुढे आहे. ते हे आव्हान कसं पेलतात. हे येणारा काळच सांगेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)