मक्का मशिदीचा ताबा जेव्हा 200 बंदूकधारी माथेफिरूंनी घेतला होता...

साधारण 40 वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात अशी घटना घडली ज्यामुळे पुढचे 15 दिवस इस्लामी राष्ट्रं हादरुन गेली होती. सलाफी समुहानं इस्लाममधलं सर्वात पवित्र स्थळ असणाऱ्या मक्का मशिदीवर हल्ला करत कब्जा केला. या घटनेत शेकडो लोकांचा जीव गेला.

या घटनेविषयी लिहिताना बीबीसीच्या एली मेल्कीनं म्हटलं आहे, की मक्केवरील या हल्ल्याने मुस्लीम जगताचा पायाच हादरला आणि सौदीचा इतिहास बदलला.

तो दिवस होता 20 नोव्हेंबर 1979...इस्लामिक कॅलेंडरनुसार तो वर्षाचा पहिला दिवस होता. जगभरातून आलेले तब्बल 50 हजार मुस्लीम भाविक हजसाठी मक्केत आले होते.

इस्लाममधील सर्वांत पवित्र ठिकाण असलेल्या काबाभोवतालच्या मोकळ्या आवारात पहाटेच्या नमाज पठणासाठी हज यात्रेकरुंची गर्दी जमली होती. नमाज संपत असताना पांढऱ्या कपड्यांमध्ये आलेल्या 200 जणांपैकी काहींनी नमाज पठण करणाऱ्या इमामांना घेरलं. नमाज संपताच त्यांनी माईक आपल्या ताब्यात घेतला.

त्यांनी तिथे काही शवपेट्या ठेवल्या. घरात कुणाचा मृत्यू झाला असेल तर मृतात्म्याला शांती मिळावी, यासाठी काबामध्ये रिकामी शवपेटी ठेवण्याची प्रथा आहे. मात्र, जेव्हा शवपेट्या उघडल्या तेव्हा त्यात बंदुका आणि रायफली होत्या. काही मिनिटात सर्व शस्त्रास्त्रं त्या 200 जणांमध्ये वाटण्यात आली.

यानंतर माईकवरून घोषणा करण्यात आली, "मुस्लीम बंधुंनो, आज आम्ही माहदीच्या आगमनाची घोषणा करत आहोत. जे अन्याय आणि अत्याचाराने भरलेल्या या पृथ्वीवर न्याय आणि निष्पक्षता स्थापित करतील."

इस्लाममधल्या मान्यतेनुसार माहदी हे असे उद्धारकर्ते आहेत, जे 'कयामत' येण्यापूर्वी पृथ्वीवर अवतरून वाईटाचा नाश करतील. ही घोषणा ऐकून तिथे आलेल्या हजारो भाविकांना वाटलं, की ही कयामतची म्हणजे पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात आहे.

हे बंदूकधारी अति-कट्टरतावादी सुन्नी मुस्लीम सलाफी होते. बदू वंशाचा तरुण सौदी प्रचारक जुहेमान अल-ओतायबी त्यांचं नेतृत्व करत होता.

हा सगळा गोंधळ सुरू असताना खालीद अल-यामी नावाच्या धर्मप्रचारकाने माईकवरून घोषणा केली की, माहदी आपल्यात आले आहेत आणि त्यांचं नाव आहे मोहम्मद बिन अब्दुल्लाह अल-कहतानी.

एका अज्ञात प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, की सर्वात आधी जुहेमानने मोहम्मद अब्दुल्लाप्रती (कथित माहिदी) आदर व्यक्त केला. त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी मानवंदना दिली आणि बघता बघता अवघा परिसर 'अल्लाह महान आहे'च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

त्याचवेळी अब्दुल मुने सुलतान नावाचा एक विद्यार्थी काय सुरू आहे, हे बघण्यासाठी मशिदीच्या आत गेला. त्यांनी सांगितलं, त्यावेळी मशिदीत मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक आले होते. त्यांना अरबी भाषाही येत नव्हती. त्यामुळे नेमकं काय घडतंय, हे त्यांना कळतच नव्हतं.

सगळीकडे गोळीबाराचा आवाज येत होता. मशीद परिसरात हिंसाचार निषिद्ध असल्याचं कुराणात म्हटलं आहे. मात्र, मक्केसारख्या मुस्लिमांच्या सर्वात पवित्र स्थळी गोळीबार सुरू होता. तिथे आलेले हजारो भाविक दहशतीखाली होते. सगळे आपला जीव वाचवण्यासाठी गेटच्या दिशेने पळत सुटले होते.

सुलतान पुढे म्हणाले, "लोकांना धक्का बसला होता. ते पहिल्यांदाच हरममध्ये बंदूकधारी बघत होते. असं पहिल्यांदाच घडत होते. ते घाबरले होते."

दरम्यान जुहेमानने आपल्या माणसांना मशिदीचे गेट बंद करण्याचे आदेश दिले. माईकवरून सुरू असलेल्या घोषणेच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये जुहेमान आपल्या अनुयायांना आदेश देत असल्याचं स्पष्ट ऐकू येतं. "बंधुंनो लक्ष द्या! अहमद अल्-लेहबी छतावर जा. गेटवर कुणी जुमानत नसल्याचं दिसतं असेल तर त्याला गोळी घाल." त्याने बंदूकधाऱ्यांना मशिदीच्या उंच मिनारांमध्ये पोझिशन घ्यायला सांगितलं.

पुढच्या तासाभरात त्या बंदूकधारी कार्यकर्त्यांनी मक्का मशिदीचा ताबा घेतला होता. सौदीच्या राजघराण्याला त्यांनी आव्हान दिलं होतं.

कोण होते हे हल्लेखोर?

हे सर्व जण अल-जमा अल-सलाफिया अल-मुह्तासिबा (JSM) या संघटनेचे बंडखोर होते. सौदी अरेबियामध्ये सामाजिक आणि धार्मिक नितीमूल्यांचा ऱ्हास होत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

तेलविहिरींमुळे सौदी अरेबियात पैसा वाढू लागला होता. त्यामुळे सौदी अरेबियाचं हळूहळू उपभोगवादी समाजात परिवर्तन होऊ लागलं होतं. देशात कार आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सुळसुळाट होऊ लागला होता. कबिल्यांचं वेगाने शहरीकरण होत होतं. काही भागांमध्ये तर सार्वजनिक ठिकाणी पुरुषांसोबत स्त्रियाही दिसू लागल्या होत्या.

मात्र JSM च्या सदस्यांची राहणी साधी होती. ते धर्मपरिवर्तन घडवायचे. कुराण आणि हदितचा अभ्यास करायचे. सौदीच्या धर्मसत्तेने सांगितलेल्या इस्लामच्या तत्त्वांचं पालन करायचे.

मूळचा सौदीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साजीर वसाहतीतला असणारा जुहेमान JSMच्या संस्थापकांपैकी एक होता. आपल्या वाकचातुर्याने तो सर्वांना भुरळ पाडायचा. वाळवंटात शेकोटीभोवती बसून किंवा एखाद्या अनुयायाच्या घरात बसून तो त्यांच्याशी गप्पा मारायचा. आपण आपल्या भूतकाळात कशा चुका केल्या, त्यातून आपण कसा धडा घेतला, हे तो सांगायचा.

धर्माचा अभ्यास करणारे उसामा अल-कौसी हेदेखील या बैठकांना जात. "अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या अवैध व्यापारात आपण गुंतल्याचं जुहेमान सांगायचा", असं कौसी यांनी सांगितलं.

मात्र, याचा आपल्याला पश्चाताप झाला आणि धर्मात आपल्याला समाधान सापडल्याचं जुहेमान म्हणायचा.

पुढे तो एक निष्ठावंत धार्मिक नेता बनला. JSMची स्थापना केली. JSMचे अनुयायी विशेषतः तरुण अनुयायांवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वक्तृत्वाचा मोठा प्रभाव पडला.

मुतवाली सालेह सांगतात, "त्यांच्यासारखं दुसरं कुणी आम्ही बघितलेलंच नव्हतं. ते वेगळे होते. त्यांच्याकडे करिश्मा होता. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, दिवस आणि रात्र अल्लाहला अर्पण केलं होतं."

मात्र, एक धर्मगुरू म्हणून त्याचं ज्ञान खूप तोकडं होतं.

जुहेमानचा मौलवींसोबत संघर्ष

जुहेमानचा जवळचा सहकारी नासेर अल-होझेएमी सांगतो, "जुहेमानला बदू लोक राहणाऱ्या ग्रामीण भागात जायला आवडायचं. कारण त्याला उत्तम अरब भाषा बोलता येत नव्हती. त्याचे उच्चारही बदू होते. त्यामुळे शिक्षित लोकांसमोर भाषण केल्याने आपलं अज्ञान उघड होईल, अशी भीती त्याला वाटायची."

दुसरीकडे, जुहेमान सौदीच्या नॅशनल गार्डमध्ये सैनिक होता. मशिदीचा ताबा घेण्यासाठी रणनीती आखण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या संघटन कौशल्याचं ट्रेनिंग त्याला सैन्यातच मिळालं होतं.

पुढे JSMने सौदी मौलवींसोबत संघर्ष सुरू केला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या संघटनेवर कारवाई केली.

या कारवाईनंतर जुहेमान वाळवंटात पळून गेला. तिथे त्याने अनेक पत्रकं छापून सौदी राजघराण्यावर आरोप केले. आपल्या ऱ्हासासाठी राजघराणेच जबाबदार आहे आणि मोठ्या फायद्यासाठी मौलवींनीदेखील त्यांच्याशी संगनमत केल्याचे आरोप जुहेमानने केले. हळूहळू त्याची खात्री पटत गेली, की सौदीचं राजघराणं भ्रष्ट आहे आणि यातून तारण्यासाठी दैवी हस्तक्षेपाचीच गरज आहे.

दैवी हस्तक्षेपाचा विचार मनात घोळत असतानाच त्याची भेट झाली मोहम्मद बिन अब्दुल्ला अल-कहतानी याच्याशी. कहतानी तरुण धर्मोपदेशक होता. स्वभावाने शालीन, कवी आणि भाविक असलेला कहतानीच माहदी असल्याचं जुहेमानने म्हटलं.

हदीसमध्ये माहदीचं वर्णन करताना म्हटलं आहे की, माहदीच्या पहिल्या नावात आणि वडिलांच्या नावात पैगंबरांचं नाव असेल. त्याचं कपाळ मोठं असेल आणि बारीक, गरुडाच्या चोचीसारखं त्याचं नाक असेल. जुहेमानला या सर्व गोष्टी कहतानीमध्ये दिसल्या. मात्र, कथित तारणहारालाच ही कल्पना पसंत पडली नाही.

मात्र, पुढे जुहेमानने त्याचं मन वळवलं आणि तोच माहदी असल्याची खात्री पटवून दिली. पुढे कहतानीच्या मोठ्या बहिणीचं लग्न जुहेमानशी झालं. ती जुहेमानची दुसरी पत्नी होती. या संबंधानंतर जुहेमान आणि कहतानी यांचं नातं अधिक घट्ट झालं.

कशी झाली हल्ल्याची तयारी?

दरम्यान मशिदीवर हल्ला करण्याच्या काही दिवस आधी अशी अफवा पसरली की, मक्केत राहणाऱ्या आणि हज यात्रेसाठी येणाऱ्या हजारो लोकांनी स्वप्नात अल-कहतानीला मक्केत उंचावर उभं राहून हातात इस्लामचा ध्वज पडून उभा असल्याचं बघितलं आहे.

यामुळे जुहेमानच्या अनुयायांची खात्रीच पटली. JSMचा सदस्य असलेला मुतवली सालेह सांगतो, "मला शेवटची बैठक आठवते. माझ्या भावाने मला विचारलं तुला माहदीबद्दल काय वाटतं? मी त्याला म्हटलं, की याविषयी बोलू नको. तेवढ्यात कुणीतरी मला तू सैतान आहेस, असं म्हटलं. माहदी वास्तवात आहे आणि मोहम्मद बिन अब्दुला अल-कहतानीच माहदी आहे."

जुहेमान याने वाळवंटातल्या ज्या दुर्गम भागात आसरा घेतला होता, तिथेच त्याने आपल्या अनुयायांसह मक्केवरच्या हल्ल्याची योजना आखायला सुरुवात केली.

हल्ला झाला त्यावेळी सौदी प्रिन्स फाहद बिन अब्दुल्लाझिझ अल्-सौद अरब लिग परिषदेसाठी ट्युनिशियाला गेले होते, तर राजघराण्याच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या नॅशनल गार्ड या सुरक्षा दलाचे प्रमुख प्रिन्स अब्दुल्ला मोरोक्कोत होते. त्यामुळे हल्ल्यानंतरची कारवाई करण्याची जबाबदारी आजारी राजे खालीद आणि संरक्षण मंत्री प्रिन्स सुलतान यांच्यावर येऊन पडली.

सौदीच्या पोलिसांना सुरुवातीला हा हल्ला किती मोठा आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी काही मोजक्या पेट्रोलिंग गाड्या पाठवल्या. मात्र, या गाड्या मशिदीच्या जवळ येताच मशिदीतून बेछूट गोळीबार सुरू झाला. हल्ल्याचं गांभीर्य लक्षात येताच नॅशनल गार्डला पाचारण करण्यात आलं.

त्यावेळी अमेरिकेचे राजदूत मार्क ग्रेगरी हॅम्बली अमेरिकेतील जेद्दाहमधल्या दूतावासात राजनयिक अधिकारी होते.

त्यांनी सांगितलं, "हल्लेखोरांकडे मोठा आणि ऑटोमॅटिक शस्त्रसाठा होता. त्यामुळे ते मोठं नुकसान करू शकले."

हा योजनाबद्ध हल्ला आहे आणि घुसखोरांना हुसकावून लावणं सोपं नाही, हे लक्षात आल्यावर मशिदीला घेराव घालण्यात आला. विशेष सुरक्षा बल, पॅराट्रुपर्स आणि सशस्त्र दलांना पाचारण करण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी दुपारनंतर संघर्ष अधिक वाढला, असं मशिदीच्या आत अडकलेले विद्यार्थी अब्दुल मुने सुलतान यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं, "मिनारांच्या दिशेने तोफा डागण्यात येत होत्या. हवेत हेलिकॉप्टर सतत घिरट्या घालत होते. लष्कराची विमानही दिसली."

मक्का मशीद शेकडो मीटर लांब एक भव्य, दुमजली वास्तू आहे. त्यात अनेक गॅलरी आणि कॉरिडोर आहेत. काबाच्या भोवताल मशीद उभारण्यात आली आहे.

पुढचे दोन दिवस सौदीच्या लष्कराने मशिदीच्या आत प्रवेश करता यावा, यासाठी समोरून हल्ला चढवला. मात्र, बंडखोरांनी सगळे हल्ले परतवून लावले.

सुलतान सांगतात की, जुहेमान अत्यंत आत्मविश्वासाने भरलेला आणि रिलॅक्स वाटत होता. ते सांगतात, "माझ्या मांडीवर डोकं ठेवून जुहेमान अर्धा-पाऊण तास झोपला. त्याची पत्नी शेजारीच उभी होती. तिने त्याची साथ सोडली नाही."

बंडखोरांच्या बीमोडासाठी क्षेपणास्त्रं

बंडखोरांनी कारपेट आणि रबराचे टायर पेटवून मोठा धूर केला. या धुरातून जात ते सौदीच्या जवानांवर हल्ला करायचे. बघता बघता मोठ्या संख्येने माणसं ठार होऊ लागली.

इंटेरियर स्पेशल फोर्स मंत्रालयाचे कमांडर माज मोहम्मद अल-नुफाईंनी सांगितलं, "हा एका मर्यादित जागेत समोरासमोर सुरू असलेला संघर्ष होता. आजू-बाजूने बुलेट्स जात होत्या. हे सगळं अकल्पित होतं."

दरम्यान, सौदीच्या राजघराण्याने धार्मिक नेत्यांना मशिदीच्या आत बळाचा वापर करण्याची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर मिनारांवर चढून बसलेल्या बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला आणि मशिदीचे गेट तोडण्यासाठी सशस्त्र वाहनं पाठवण्यात आली.

तिकडे माहदीमुळे बंडखोरांमध्ये स्फुरण चढलं होतं. अब्दुल मुने सुलतान यांनी सांगितलं, "मला त्याच्या डोळ्याखाली दोन किरकोळ जखमा दिसल्या. कपडेही फाटले होते. कदाचित त्यांना वाटत होतं की, ते माहदी असल्याने त्यांना काही होणार नाही. त्यामुळे ते कुठेही आरामात फिरत होते."

मात्र, त्यांना हा अतिआत्मविश्वास नडला आणि त्यांनाही गोळ्या लागल्या.

एका अज्ञात प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, "त्यांना गोळी लागताच 'माहदी जखमी झाले' अशी आरडाओरड सुरू झाली. काहींनी त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण, मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू असल्याने त्यांना कहतानीपर्यंत पोचता आलं नाही."

काही लोकांनी खाली उतरून माहदी जखमी झाल्याचं जुहेमानला सांगितलं. मात्र, जुहेमानने त्याच्यासोबत लढणाऱ्या बंडखोरांना म्हटलं, "यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हे पळपुटे आहेत."

सहाव्या दिवशी मशिदीचा ताबा

अखेर सहाव्या दिवशी मशिदीचा ताबा मिळवण्यात सौदी लष्कराला यश आलं. मात्र, काही हल्लेखोर मशिदीच्या तळघरात गेले. माहदी जिवंत आहे आणि मशिदीतच कुठेतरी आहे, या जुहेमानच्या शब्दावर त्यांचा विश्वास होता. शेकडो खोल्या असलेल्या बेसमेंटमधून हे हल्लेखोर दिवस-रात्र लढत होते.

एव्हाना परिस्थिती भीषण झाली होती. एका अज्ञात प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, "कुजलेल्या मृतदेहांची आणि जखमी झालेल्या लोकांच्या जखमांची दुर्गंधी पसरली होती. सुरुवातीला मशिदीत पाणी होतं. मात्र, नंतर तेसुद्धा मोजकंच मिळू लागलं. मग खजूरही संपले. शेवटी ते कच्च्या कणकेचे गोळेच खाऊ लागले. ती अत्यंत भीषण परिस्थिती होती. एखाद्या हॉरर सिनेमात असल्यासारखं वाटत होतं."

इकडे सौदी सरकार एकापाठोपाठ एक आपल्या विजयाच्या घोषणा करत होतं. मात्र, मशिदीच्या नमाजाचं प्रसारण बंद असल्याने इस्लामिक जगतात दुसराच संदेश जात होता. हॅम्बले म्हणतात, "सौदी सरकार वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत होते. मात्र, काहीच उपयोग होत नव्हता. बंडखोर अजूनही शरण येत नव्हते."

बंडखोरांच्या म्होरक्याला जिवंत पकडण्यासाठी आणि हा हल्ला परतवून लावण्यासाठी सौदीला मदतीची गरज होती, हे स्पष्ट होतं. त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष व्हॅलेरी गिसकार्ड डी-इस्टॅइंग यांच्याकडे मदत मागितली.

फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्षांनी बीबीसीला सांगितलं, "आमच्या राजदूताने मला सांगितलं की, सौदीचं सैन्य विस्कळीत आहे आणि प्रत्युत्तर कसं द्यावं, हेदेखील त्यांना कळत नाहीये."

या हल्ल्यात फ्रान्सनेही भूमिका बजावल्याचं त्यांनी पहिल्यांदाच मान्य केलं.

त्यांनी म्हटलं, "कमकुवत यंत्रणा, त्यांची तयारी नसणं, या सर्वांचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होईल, अशी काळजी मला वाटली." त्यामुळे फ्रान्सने काही कमांडो पाठवले.

पण इस्लामच्या जन्मस्थळी पाश्चिमात्य हस्तक्षेप होतोय, ही टीका टाळण्यासाठी ही संपूर्ण मोहीम गुप्त ठेवण्यात आली.

फ्रेंच कमांडो जवळच्या तैफ शहरातल्या एका हॉटेलमध्ये उतरले. तिथून ते बंडखोरांना कसं हुसकावून लावता येईल, याची रणनीती आखत होते. यातलीच एक योजना होती, की मशिदीच्या बेसमेंटमध्ये धूर सोडायचा जेणेकरून तिथे श्वास घ्यायला त्रास होईल.

या मोहिमेत सहभागी असणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, "बेसमेंटपर्यंत जाता यावं, यासाठी दर 50 मीटरवर खड्डे खणण्यात आले. या खड्ड्यातून धूर सोडण्यात आला. बंडखोर जिथे लपून बसले होते त्या प्रत्येक कोपऱ्यात ग्रेनेडचा स्फोट करून धूर अधिकाधिक पसरला जाईल, याची खात्री करण्यात आली."

बेसमेंटच्या त्या भागात असणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, "मृत्यू समीप येत असल्यासारखं वाटत होतं. कारण तो आवाज खोदण्याचा होता की रायफलींचा हे कळायला काहीच मार्ग नव्हता. खूप भयानक परिस्थिती होती."

फ्रेंच अधिकाऱ्यांची योजना यशस्वी ठरली.

जुहेमानचा अनुयायी असणाऱ्या नासेर अल-होझैमीने सांगितलं, "शेवटच्या दोन दिवशी जुहेमानकडचा दारुगोळा आणि अन्नधान्य सगळं संपलं होतं. ते सर्व एका छोट्या खोलीत गोळा झाले. त्या खोलीच्या छताला भोक करून जवानांनी धूर सोडला होता आणि म्हणूनच ते सगळे शरण आले. जुहेमान पुढे गेला आणि सगळे त्याच्या मागे गेले."

यानंतर जुहेमानला सौदी प्रिन्सच्या समोर हजर करण्यात आलं. या भेटीचे साक्षीदार असलेले माज नुफाई सांगतात, "प्रिन्स सौद अल-फैजल यांनी त्याला विचारलं - 'जुहेमान, असं का केलं?'

जुहेमान - 'हे नशिबात लिहिलं होतं.'

प्रिन्स - 'तुला काही हवं आहे का?'

जुहेमान - 'मला थोडं पाणी हवंय.'"

जुहेमानची मीडिया कॅमेऱ्यांसमोर परेड घडवण्यात आली आणि पुढच्या एका महिन्यात सौदी अरेबियाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये 63 बंडखोरांना सार्वजनिक फाशी देण्यात आली. सर्वात आधी जुहेमानला फासावर चढवण्यात आलं.

मक्का मशिदीवरील हल्ल्यामागे जुहेमान याचा माहदीवर असलेला विश्वास कारणीभूत असला तरी तो आधुनिकतेच्या विरोधात असणाऱ्या व्यापक सामाजिक आणि धार्मिक चळवळीचा एक भाग होता. या लढ्यात पुराणमतवादी मौलवी राजघराण्यावर कायमच वरचढ ठरले.

सौदीच्या आधुनिकीकरणावर परिणाम

आणखी एका व्यक्तीवर या हल्ल्याचा मोठा परिणाम झाला आणि ती व्यक्ती होती ओसामा बिन लादेन. सौदीच्या राजघराण्याविरोधात लिहिलेल्या एका पत्रकात लादेनने म्हटलं होतं, "ही समस्या शांततेने सोडवता आली असती. पण त्यांनी हरमची (पवित्र मशीद) विटंबना केली. हरमच्या टाईल्सवर त्यांच्या हल्ल्याच्या खुणा मला आजही आठवतात."

या घटनेनंतर सौदी राजघराण्याने आपली इस्लामिक प्रतिमा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आणि जिहादला पाठबळही दिलं.

नासर अल हुसैनी सांगतात, "जुहेमानच्या कृतीने आधुनिकीकरणावर प्रतिबंध आणले. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. टीव्हीवर स्त्री वृत्तनिवेदिका असू नये, अशी मागणी त्याने सौदी सरकारकडे केली. हरमच्या घटनेनंतर सौदीच्या टीव्हीवर कधीही वृत्तनिवेदिका दिसल्या नाही."

गेली चार दशकं सौदी याच अति-पुराणमतवादी मार्गावर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात परिस्थिती बदलत आहे.

मार्च 2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटलं होतं, "1979 आधी इतर आखाती देशांप्रमाणे आम्हीसुद्धा सामान्य आयुष्य जगत होतो. महिला गाड्या चालवत होत्या. सौदीमध्ये सिनेमा थिएटर होते."

हे सांगताना सौदी प्रतिगामी होण्यामागे मक्का मशिदीवर झालेला हल्ला कारणीभूत होता, हे त्यांना सांगायचं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)