You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलींना वेश्याव्यवसायात ढकलत आहेत इराकी मौलवी, निकाहच्या नावाखाली सुरू आहे रॅकेट - बीबीसी इनव्हेस्टिगेशन
- Author, नवल अल-मगफी
- Role, बीबीसी न्यूज अरबी
बगदाद आणि करबाला. इराकमधली या दोन सर्वाधिक पवित्र शहरांमध्ये काही मौलवी लहान मुली आणि तरुणींच्या लैंगिक शोषणाचं एक रॅकेट चालवतात असं बीबीसीच्या एका अंडरकव्हर मोहिमेतून उघड झालं आहे.
हे मौलवी आधी गरिबीने पिचलेल्या तरुणी हेरतात आणि त्यानंतर शियांच्या वादग्रस्त 'मुता निकाह' किंवा 'Pleasure Marriage' या धार्मिक प्रथेच्या नावाखाली त्यांची दलाली करतात. हा मुता निकाह इराकमध्ये मात्र बेकायदेशीर आहे.
या धार्मिक प्रथेनुसार शिया मुसलमान पैसे खर्च करून तात्पुरती पत्नी ठेवू शकतात. मात्र, या धार्मिक प्रथेचा वापर काही मौलवी स्त्रिया आणि लहान मुलींचं लैंगिक शोषण करण्यासाठी करत आहेत.
या पवित्र स्थळांजवळ काही मौलवींनी आपली विवाह मंडळं स्थापली आहेत. याच कार्यालयांमध्ये बीबीसीला आपल्या अंडरकव्हर तपासात आढळलं की बहुतांश मौलवी खूप कमी काळाच्या प्लेजर मॅरेजसाठी मुली द्यायला तत्पर होते. कमी काळ म्हणजे अगदी तासाभरासाठीसुद्धा मुता निकाह लावून द्यायला तयार होते. जेणेकरून केवळ शरीर संबंध ठेवता येतील.
काही मौलवींनी तर निकाह मुतासाठी 9 वर्षांची मुलगी द्यायचीही तयारी दाखवली. तर काहींनी कमी वयाच्या मुली आणि तरूणी देण्याचा प्रस्ताव दिला.
डॉक्युमेंट्रीवरून लक्षात येतं की मौलवी दलाल बनून लहान-लहान मुली आणि तरुणींना एकप्रकारच्या वेश्याव्यवसायात लोटत आहेत.
प्लेजर मॅरेज किंवा निकाह मुता
प्लेजर मॅरेज किंवा निकाह मुता एक अशी वादग्रस्त धार्मिक प्रथा आहे जिचा उपयोग शिया मुसलमान तात्पुरत्या विवाहासाठी करतात आणि यासाठी स्त्रीला पैसे दिले जातात. सुन्नीबहुल देशांमधली 'मिस्यार निकाह' ही देखील अशीच प्रथा आहे.
हे लग्न एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणे असतं. असं म्हणतात की पूर्वी लांबच्या प्रवासात मुस्लिमांना एका पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळावी, यातून निकाह मुताची सुरुवात झाली. मात्र, आज याचा वापर झटपट शरीरसंबंध ठेवण्यासाठी केला जात आहे.
या प्रथेविषयी मुस्लीम विद्वानांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते यामुळे वेश्यावृत्तीला मान्यता मिळते. शिवाय, लग्न कमीत कमी किती काळासाठी असावं, हादेखील वादाचा मुद्दा आहे.
बीबीसी इराक आणि ब्रिटिश टीमने तब्बल 11 महिने तपास केला. यात मौलवींचा अंडरकव्हर व्हिडिओ तयार करण्यात आला. तर ज्या महिलांचं लैंगिक शोषण झालं आहे, अशा महिलांशी बातचीत करण्यात आली. शिवाय ज्या मुस्लीम पुरूषांनी निकाह मुतासाठी मौलवींना पैसे दिले होते त्यांच्याशीही बातचीत करण्यात आली.
एका अहवालानुसार तब्बल 15 वर्षं युद्धाची झळ सोसणाऱ्या इराकमध्ये जवळपास 10 लाख विधवा महिला आहेत. तर यापेक्षा कितीतरी जास्त महिला स्थलांतरित आहेत.
आपल्या तपासात बीबीसीला असं लक्षात आलं की अनेक मुली आणि स्त्रियांनी कमालीच्या दारिद्र्याला कंटाळून निकाह मुतासाठी होकार दिला.
बेधडक सुरू आहे व्यवसाय
इराकमधल्या दोन सर्वांत पवित्र शहरांमध्ये निकाह मुता सुरू असल्याचे पुरावे बीबीसीच्या डॉक्युमेंट्री टीमला मिळाले आहेत.
उदाहरणार्थ ते बगदादमधल्या खदिमीया भागात 10 मौलवींना भेटले. खदिमीया शिया मुस्लिमांसाठी एक पवित्र स्थळ आहे.
या 10 पैकी 8 मौलवींनी आपण निकाह मुता करत असल्याचं सांगितलं. यातल्या निम्म्या मौलवींनी यासाठी 12-13 वर्षांच्या मुली पुरवू शकतो, असंही म्हटलं.
शिया मुस्लिमांसाठी जगात सर्वांत पवित्र स्थळ असलेल्या करबलामध्ये ही टीम 4 मौलवींना भेटली. चारही मौलवींचा गुप्तपणे व्हिडियो शूट करण्यात आला. यापैकी तिघांनी निकाह मुतासाठी महिला उपलब्ध करण्याची तयारी दाखवली. यातल्या दोघांनी तरूण मुली देऊ, असं आश्वासन दिलं.
बगदादमधले एक मौलवी सैय्यद राद यांनी बीबीसीच्या अंडरकव्हर रिपोर्टरला सांगितलं की शरिया कायद्यांतर्गत निकाह मुतासाठी निश्चित कालमर्यादा नाही.
ते सांगतात, "एक पुरूष हव्या तितक्या महिलांशी विवाह मुता करू शकतो. तुम्ही एका मुलीशी अर्ध्या तासासाठीसुद्धा लग्न करू शकता आणि हा अर्धा तास संपताच तुम्ही दुसरा निकाह मुताही करू शकता."
निकाह मुतासाठी 9 वर्षांहून मोठी मुलगी चालते
बीबीसीच्या रिपोर्टरने सैय्यद राद यांना विचारलं की यासाठी अल्पवयीन मुलगी शरिया कायद्याला मंजूर आहे का? यावर त्यांचं उत्तर होतं, "फक्त तिचं कौमार्य भंग होणार नाही तेवढी काळजी घ्यायची."
ते म्हणाले, "तुम्ही तिच्याशी फोरप्ले करू शकता. तिच्या स्तनांना, शरीराला हात लावू शकता. मात्र, शरीर संबंध ठेवू शकत नाही. अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवू शकता."
मुलीला जखम झाली तर काय करायचं, हे विचारल्यावर मौलवींनी खांदे उडवत उत्तर दिलं, "ती किती वेदना सहन करू शकते, हे तुम्ही दोघांनी ठरवायचं."
निकाह मुतासाठी 12 वर्षांची मुलगी कायद्याला मंजूर आहे का, असं विचारल्यावर करबलामधले एक मौलवी शेख सलावी म्हणाले, "हो. 9 वर्षांपेक्षा मोठी मुलगी असेल तर काहीच अडचण नाही. शरिया कायद्यानुसार यात काहीच अडचण नाही."
सैय्यद रादप्रमाणे यांनीही मुलीचं कौमार्य भंग होऊ नये, एवढी काळजी घ्यावी, इतकंच म्हटलं. फोरप्लेची परवानगी आहे आणि अल्पवयीन मुलीने परवानगी दिली तर अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवायलाही हरकत नाही.
फोनवरचं झालं लग्न
मौलवी सैय्यद राद हे तर मुलीशी न भेटताच फोनवरच लग्न लावून द्यायला तयार झाले. अंडरकव्हर रिपोर्टरसमोर टॅक्सीमध्ये बसून फोनवरून त्यांनी मुलीला विचारलं, "तुला लग्न मंजूर आहे का?" त्यांनी एक दिवसाच्या लग्नासाठी तिला दीड लाख दिनारच्या रकमेची ऑफर दिली. शेवटी ते म्हणाले, "आता तुम्हा दोघांचं लग्न झालं आहे. तुम्ही एकत्र राहू शकता."
त्यांनी काही मिनिटांच्या या लग्नासाठी रिपोर्टरकडून 200 डॉलर्स घेतले आणि यादरम्यान त्या मुलीविषयी त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता दिसली नाही.
धर्माच्या नावाखाली...
अनोळखी पुरूषाशी शरीर संबंध ठेवण्यासाठी निकाह मुताचा वापर करणाऱ्या एका विवाहित इसमाने बीबीसीला सांगितलं, "12 वर्षांची मुलगी मिळणं भाग्यच आहे. कारण ती अजूनही फ्रेश असते. मात्र, ती महाग आहे. जवळपास 500 ते 800 डॉलर्स लागतील आणि या वयाच्या मुलीशी केवळ मौलवीच निकाह मुता करवू शकतात."
त्यांच्या मते यासाठी मौलवींना धार्मिक मान्यता मिळाली आहे. ते सांगतात, "धर्माशी संबंधित व्यक्ती हे सांगतो की निकाह मुता हलाल (धर्मानुसार) आहे तर त्याला पाप मानता येत नाही."
इराकमध्ये स्त्रियांसाठी आश्रम चालवणाऱ्या महिला अधिकार कार्यकर्त्या यानर मोहम्मद म्हणतात मुलींना माणूस न मानता 'विक्रीयोग्य वस्तू' मानलं जातं.
त्या म्हणतात, "यात मुलींचा काही विशिष्ट पद्धतीने वापर करण्याची परवानगी आहे. मात्र, त्यांची वर्जिनिटी अबाधित ठेवली जाते. जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून चांगली कमाई करता यावी. चांगली कमाई म्हणजे लग्न."
त्या पुढे सांगतात, "एखाद्या मुलीची व्हर्जिनिटी आधीच गेली तर तिला विवाहयोग्य मानलं जात नाही. शिवाय, तिचे कुटुंबीय तिला ठार करण्याची जोखीमही असते. मात्र, काहीही झालं तरी किंमत अखेर मुलगी किंवा स्त्रीलाच चुकवावी लागते."
निष्पाप मुलींचे दलाल
डॉक्युमेंट्रीमध्ये मौलवींचा गुप्तपणे व्हिडियो शूट करण्यात आला. यात ते निकाह मुतासाठी अल्पवयीन मुली उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असल्याचं स्पष्टपणे दिसतं.
यात एका अल्पवयीन मुलीची साक्षही आहे. यात ती मौलवीवर आपली दलाली करत असल्याचा आरोप करते आणि तिथे उपस्थित असलेले काही जण त्याला दुजोरा देतात.
यात एका अशा मौलवीचाही व्हिडिओ आहे ज्याने अंडरकव्हर रिपोर्टरसमोर त्या मुलीला आणलं जिला त्याने 24 तासांसाठीच्या निकाह मुतासाठी विकत घेतलं होतं.
तो मौलवी दलाली करत होता, हे उघड आहे.
अंडरकव्हर रिपोर्टरने निकाह मुता करण्यास नकार दिला तेव्हा मौलवी म्हणाले की तुम्हाला अल्पवयीन मुलगी आवडेल. मी तुमच्यासाठी अशी मुलगी शोधू का?
प्रतिक्रिया
लंडनमध्ये राहणारे इराकचे माजी शिया धर्मगुरू आणि इस्लामचे अभ्यासक गैथ तमीमी यांना निकाह मुतावर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणतात, "ती व्यक्ती जे म्हणत आहे तो गुन्हा आहे आणि त्याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे."
काही इराकी शिया धर्मगुरूंनी लिहलं आहे की इस्लामी कायदा लहान मुलांसोबत फोरप्लेची परवानगी देतो. तमीमी यांनी शिया नेत्यांना या प्रथेविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे.
बीबीसी न्यूज अरबीने ज्या शिया मौलवींचा गुप्तपणे व्हिडियो शूट केला त्यापैकी दोघांनी स्वतःला शियांच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक अयातुल्लाह सिस्तानी यांचे अनुयायी असल्याचं सांगितलं.
मात्र, अयातुल्लाह सिस्तानी यांनी बीबीसीला सांगितलं, "तुम्ही म्हणत आहात, त्याप्रमाणे जर या प्रथा सुरू असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो."
ते म्हणतात, "निकाह मुताला सेक्स विकण्याचं साधन म्हणून मान्यता नाही. यामुळे स्त्रियांची प्रतिष्ठा आणि मानवी मूल्य अव्हेरली जातात."
इराकी सरकारच्या एका प्रवक्त्याने बीबीसी अरबीला सांगितलं, "स्त्रिया मौलवींची तक्रार घेऊन पोलिसांकडे जात नाही तोवर कारवाई करणं, अधिकाऱ्यांसाठी कठीण आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)