रणवीर दीपिकाच्या लग्नाचे हे पहिले फोटो तुम्ही पाहिलेत का?

    • Author, समृद्धा भांबुरे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

तर हे आहेत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाचे पहिले फोटो. कोकणी आणि सिंधी अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय.

इटलीच्या लेक कोमो इथल्या 'विला डेल बालबीएनलो' या निसर्गरम्य ठिकाणी हा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरुवात झाली आणि मंगळवारी कोकणी पद्धतीनेच दीप-वीरचा साखरपुडा झाला. नंतर मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात लग्न झालं. गुरुवारी सिंधी पद्धतीने हे दोघे पुन्हा विवाहबद्ध झाले. दीपिका कोकणी तर रणवीर सिंधी आहे. त्याचं आडनाव भवनानी आहे.

लग्नाच्या पार्श्वभूमीवर लेक कोमो परिसरात कडेकोड सुरक्षाव्यवस्था असल्यामुळे लग्नविधीचे फोटो किंवा व्हीडिओ आतापर्यंत समोर आले नव्हते. पण सोशल मीडियावर #DeepikaWedsRanveer हा हॅशटॅग ट्रेंड होताच, आणि दोघांवरही त्यांचे मित्र आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आता अखेर हे फोटो त्यांनी स्वतः आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केले आहेत.

संजय लीला भन्साळींच्या 'रामलीला'मध्ये रणवीर-दीपिका एकत्र आले आणि दोघांची मनेही त्याचवेळी जुळली. 'बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत'सारख्या भन्साळींच्याच दोन आणखी हिट चित्रपटांमध्ये हे दोघं एकत्र झळकले आहेत.

लेक कोमोची सगळ्यांवर जादू...

लेक कोमो, जिथे रणवीर आणि दीपिका यांचं लग्न झालं, हा इटलीतला तिसरा सर्वांत मोठा तलाव आहे. एवढंच नाही तर हा जगातील सर्वांत खोल तलावांपैकी एक आहे. रोमन काळापासून श्रीमंत लोकांचे लेक कोमो हे सर्वांत आवडीचं स्थळ राहिलं आहे.

रोमन युगापासून लेक कोमो लग्नाच्या डेस्टिनेशनसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्यने पर्यटन इथे फिरायला येतात.

विशेष म्हणजे लेक कोमोजवळ सर्व इमारतींची रचना गॉथिक पद्धतीने करण्यात आली आहे. इथला पूर्ण परिसर इथल्या रंग-बिरंगी इमारतींसाठीही ओळखला जातो.

इथे राहणाऱ्यांमध्ये सेलिब्रिटीजची संख्या जास्त आहे. हॉलीवुडचे फेमस सेलिब्रिटीज जॉर्ज क्लूनी आणि मडोना यांचं इथे एक आलिशान घरसुद्धा आहे. फक्त लग्न किंवा साखरपुड्यासाठीच नाही तर चित्रपटांच्या शूटिंगसाठीही ही जागा प्रसिद्ध आहे.

लेक कोमोची सगळ्यांना भुरळ

इटलीत लग्न करणारं रणवीर-दीपिका पहिलंच जोडपं नाही. गेल्या वर्षी विराट-अनुष्का यांना देखील इटलीने आपल्या सौंदर्याची भुरळ घातली होती. पण इटलीत जाऊन लग्न करायला बॉलीवुडच्या या पिढीत सुरुवात केली ती राणी मुखर्जी-आदित्य चोप्रा यांनी.

उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा देखील आनंद पिरामल यांच्यासोबत इटतील्या 'विला डेल बालबीएनलो' या व्हिलामध्ये साखरपुडा केला.

इटलीच्या या भागातलं हवामान मेपासून ऑक्टोबरपर्यंत उत्तम असतं. ना फार थंड ना फार गरम. त्यात इटालियन क्यूझिन्स आणि तिकडची वाईन देखील प्रसिद्ध आहे. त्यात इथल्या नयनरम्य देखाव्यांमुळे अनोखा त्रिवेणी संगम तयार होतो. या संगमावरच आजवर हजारो युगुलांनी प्रेमाच्या आणाभाका आणि लग्नाच्या शपथा घेतल्या आहेत.

पापाराझींपासून पळा!

"इटलीतील लेक कोमो परिसर जगातली सर्वांत रोमँटिक जागा म्हणून ओळखले जातो," असं मुंबईतल्या वेडिंग प्लॅनर प्रियंका वासनिक म्हणतात.

सध्या सेलिब्रिटींमध्ये परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड आहे. त्यामागे दोन कारणं असल्याचं प्रियंका सांगतात. "एक म्हणजे, लग्न हा कोणाच्याही आयुष्यातला सर्वांत अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतो. तो आपल्या जवळच्या खास लोकांच्याच उपस्थितीत व्हावा, अशी इच्छा असते. पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात सेलिब्रिटींना हे सुख लाभनं थोडं अवघड झालं आहे. त्यामुळेच ते कोट्यवधी रुपये खर्चून पत्रकार किंवा पापाराझींपासून दूर कुठल्या तरी बेटावर किंवा परदेशात जाऊन लग्न करणं पसंत करतात."

तसंच, आपल्या लग्नाच्या भव्यतेची चर्चा किमान पुढचे काही महिने होत राहावी, अशीही काही जणांची इच्छा असते. बॉलिवुडमध्ये तर सध्या परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंडच सुरू आहे. त्यासाठी ते पाण्यासारखे पैसे ही खरच करतात, असंही प्रियांका सांगतात.

जेव्हा निर्वासितांनी घातला गराडा...

2016 साली जेव्हा भूमध्य समुद्रामार्गे हजारोंच्या संख्येने निर्वासित युरोपात येऊ लागले, तेव्हा लेक कोमो परिसरातल्या अब्जाधीशांना कल्पनाही नव्हती की हे लोंढे त्यांच्या अंगणात येऊन धडकतील.

अफ्रिकेतून शेकडो तरुणांना खरं तर स्वित्झर्लंडला जायचं होतं. त्यासाठी ते स्वित्झर्लंड-इटली सीमेवरच्या लेक कोमोपर्यंत आले. पण स्विस पोलीस त्यांना अडवत होते. त्यामुळे जिवावर उदार होऊन हजारो किलोमीटर दूर आलेल्या या निर्वासितांनी लेक कोमो परिसरातच राहुट्या उभारल्या.

बीबीसीने ऑगस्ट 2016मध्ये या निर्वासितांचा प्रवास या बातमीतून दाखवला. अबुबक्र या गिनी या अफ्रिकन देशातून आलेला तरुण बीबीसीशी बोलताना म्हणाला होता, "मी 3 वेळा रेल्वेने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण मला जाता आलं नाही. अजून फार काळ मी इथे उघड्यावर राहू शकत नाही."

लेक कोमो परिसराची अर्थव्यवस्था मुख्यतः लग्न समारंभ, सिनेमांचं शूटिंग आणि पर्यटन यांच्यावर अवलंबून आहे. पण इथे युद्ध, दारिद्र्य आणि उपासमारीने गांजलेले हजारो निर्वासित येऊन थडकल्यामुळे स्थानिकांना काळजी वाटू लागली होती.

पाहुण्यांपुढे ठेवली अट

दरम्यान, आपल्या लग्नातले फोटो कुठेही लीक होणार नाही याची काळजी दीपिका आणि रणवीर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत घेतली आहे. त्या दोघांचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र हे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असं दिसतंय.

कारण या दोघांनीही लग्नातले कोणत्याही प्रकारचे फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट पाहुण्यांपुढे ठेवली आहे. त्यामुळे लग्न होऊन बारा तास उलटल्यानंतरही सोहळ्यातील एकही फोटो समोर आलेला नाही.

तसंच, या सोहळ्यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीनं प्रवेश करू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं हा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करू नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजतंय.

इथे ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली असून लेक कोमो परिसरात सुरक्षारक्षकांच्या बोटी गस्त घालत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)