शाही विवाह सोहळ्याचा खर्च नेमका आहे किती? आणि तो करणार कोण?

विवाह सोहळा म्हटलं की खर्च हा आलाच. फुलांपासून खुर्चीच्या कव्हरपर्यंत अनेक गोष्टींच्या किमती जर पाहिल्या तर त्या गगनाला भिडलेल्या असतात.

पण, जेव्हा शाही विवाह सोहळ्याचा विषय येतो, तेव्हा व्ही.आय.पींची सोय, सुरक्षा आणि इतर गोष्टींचा खर्च हा कोट्यवधींच्या घरात जातो.

त्यामुळे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शनिवारी होणाऱ्या शाही विवाहाचा खर्च नेमका किती असणार आहे? या खर्चासाठी 'यूके'तल्या करदात्यांचे किती पैसे खर्च होणार आहेत? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

सुरक्षेचा खर्च

विंडसर इथे हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाहासाठी या छोट्या शहरात एक लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. विवाहाचं आमंत्रण 600 पाहुण्यांना दिलं गेलं आहे. तसंच, संध्याकाळच्या स्वागत समारंभाला 200 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

जवळपास 1200 नागरिक विंडसर किल्ल्यातल्या मैदानात उपस्थित राहणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक येणार असल्यानं मोठ्या नियोजनाची गरज भासणार आहे.

यासाठी लागणाऱ्या सुरक्षेचा खर्च देखील मोठा असणार आहे. या खर्चाची माहिती घेण्यासाठी बीबीसीच्या रिअॅलिटी चेक टीमनं युकेच्या गृह खात्याकडे विचारणा केली. पण, 'राष्ट्रीय सुरेक्ष'चा विचार करता या खर्चाचा आकडा सांगता येणार नाही असं गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं.

तसंच जेव्हा आम्ही थेम्स पोलिसांना फोन केला तेव्हा त्यांनीही मजेशीर उत्तर दिलं. "आम्ही तुम्हाला कोणतीही माहिती देऊ शकणार नाही. तुम्हाला 'आकडे' आवडत असले तरी आम्हाला ते देता येणार नाहीत," असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

ड्युक आणि डचेस ऑफ केंब्रिज म्हणजेच प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन यांच्या विवाह सोहळ्याच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी यापूर्वी 63.5 लाख ब्रिटीश पाऊंड म्हणजेच 58 कोटी 2 लाख 38 हजार रुपये खर्च केले होते. जे पैसे ब्रिटिश करदात्यांच्या पैशातूनच गृह खात्याकडे आले होते.

UKमधल्या प्रेस असोसिएशननं 'फ्रिडम ऑफ इन्फर्मेशन रिक्वेस्ट'मार्फत (तिथला माहितीचा अधिकार) मागविलेल्या माहितीवरून हा खर्च उघड झाला होता.

पण, या खर्चाचा अंदाज प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या विवाहाशी जुळवून चालणार नाही. कारण, दोन्ही लग्नांच्या पाहुण्यांची संख्या वेगळी आहे.

इतर खर्च

विवाहासाठी नेमका किती खर्च केला जाईल याची अधिकृत माहिती अजून तरी केनझिंग्टन पॅलेसकडून दिली गेलेली नाही. पण, यात काही आश्चर्य वाटण्यासारखी बाब नाही. कारण, प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन यांच्या विवाहाचा खर्च देखील सांगण्यात आला नव्हता.

त्यामुळे आमच्याकडे विवाहाच्या खर्चाचा अधिकृत आकडा नसल्यानं त्याबाबत काळजीपूर्वकच माहिती द्यावी लागेल.

Bridebook.co.uk या वेडिंग प्लॅनिंग सर्व्हिसच्या अंदाजानुसार, सुरक्षेच्या खर्चासह संपूर्ण विवाह सोहळ्याचा खर्च 320 लाख ब्रिटीश पाऊंड असण्याची शक्यता आहे.

यात केकचा खर्चच 50हजार ब्रिटीश पाऊंड, फुलांचा खर्च 110 हजार ब्रिटीश पाऊंड तर केटरर्सचा खर्च 286 हजार ब्रिटीश पाऊंड असा गृहित धरण्यात आला आहे.

या वेडिंग प्लॅनिंग सर्व्हिसचे मालक हॅमिश शेफर्ड यांना बीबीसी रिअॅलिटी चेक टीमनं हा खर्चाच्या अंदाजाबद्दल विचारलं. राजघराणं प्रत्येक गोष्टीचा खर्च बाजारपेठेतील दरांनुसार करेल, त्यावरूनच हा अंदाज लावण्यात आल्याचं शेफर्ड यांनी सांगितलं.

पण, ही अधिकृत आकडेवारी नसल्यानं सध्या फक्त अंदाजच व्यक्त करता येऊ शकतो. कारण, राजघराण्यासाठी लग्नासाठीचं साहित्य द्यायचं असल्यानं व्यापारी कदाचित सवलतीच्या दरात साहित्य देऊ शकतील.

पैसे देणार कोण?

विवाह सोहळ्याच्या सुरक्षेचा खर्च हा करदात्या नागरिकांच्या पैशातूनच केला जाईल. थेम्स व्हॅली पोलिसांना सुरुवातीला हा खर्च करावा लागेल. त्यानंतर, या खर्चासाठी थेम्स व्हॅली पोलीस गृह विभागाकडे खर्चाची मागणी करू शकतील. विशेष अनुदानाच्या रूपात हे पैसे मागितले जातील.

रोजच्या सुरक्षेव्यतिरिक्त पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेसाठी इथल्या पोलिसांना गृह विभागाकडे विशेष अनुदानाच्या रूपात मागता येतात.

सुरक्षेच्या खर्चाव्यतिरिक्त इतर खर्च राजघराण्याकडून करण्यात येईल. दरवर्षी राजघराण्याला कोषागारातून एक विशेष अनुदान दिलं जातं.

लंडनच्या वेस्ट एण्ड भागात असलेल्या क्राऊन इस्टेटमधून (राजघराण्याची स्थावर मालमत्ता) मिळणाऱ्या नफ्याच्या काही टक्के ही रक्कम असते.

ही रक्कम वर्षाला 820 लाख ब्रिटीश पाऊंडांपर्यंत जाते. तर, राजघराण्यातील काही सदस्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळतं. उदाहरणार्थ, प्रिन्स चार्ल्स यांना डची ऑफ कॉर्नवेल इस्टेट इथल्या जमीनी, मालमत्ता आणि आर्थिक गुंतवणूकीतून पैसे मिळतात.

पण, यातले कुठले पैसे या शाही विवाह सोहळ्यासाठी वापरले जातील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी काम करणाऱ्या रिपब्लिकच्या आकडेवारीनुसार, राजघराण्यावर 820 लाख ब्रिटीश पाऊंडांहून जास्त खर्च होतो. त्यामुळे करदात्यांच्या पैशातून शाही विवाहाचा खर्च होऊ नये यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)