You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्स स्कँडल : अमेरिकेत तेलुगू अभिनेत्रींना देहविक्रय करायला भाग पाडणारं रॅकेट
अमेरिकेतल्या पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये तेलुगू सिमेमांशी संबंधित मुली आणि अभिनेत्री सहभागी आहेत. शिकागो हे शहर या सेक्स रॅकेटचं केंद्र आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एका तेलुगू जोडप्याला अटक केली असून हे जोडपं हे रॅकेट चालवत होतं.
फेडरल पोलिसांच्या मते अमेरिकेत होणाऱ्या तेलुगू आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांकात सहभागी होण्याच्या बहाण्यानं तेलुगू सिनेमांतील कलाकारांना बोलावलं जात होतं आणि त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावलं जात होतं.
होमलँड सेक्युरिटीचे अधिकारी ब्रायन जिन म्हणाले, "34 वर्षांचा किशन मोडुगमुडी या रॅकेटचा मास्टरमाईंड असून त्याची पत्नी चंद्रकला मोडुगमुडी त्याला त्यात मदत करायची."
ब्रायन यांनी इलिनॉय न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे.
किशनला राज चेन्नुपती याही नावानं ओळखल जातं. तर त्याची पत्नी चंद्रकला हिला विभा आणि विभा जया नावांनी ओळखलं जातं.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 42 पानांच्या या याचिकेमध्ये सेक्स रॅकेटमध्ये सहभागी महिलांची ओळख सांगण्यात आलेली नाही. याचिकेत त्यांना ए, बी, सी, डी अशी कोड नावं दिलेली आहेत.
या केसचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सेक्स रॅकेटमधल्या पीडित मुली आणि ग्राहकांचीही चौकशी केली आहे. अधिकाऱ्यांनी न्यायलायात सांगितलं की संशयितांच्या घरी काही वह्या मिळाल्या आहेत, त्यात या धंद्याशी संबंधित हिशोब, अभिनेत्रींची आणि ग्राहकांची नावंही आहेत.
असं उघडकीस आलं सेक्स रॅकेट
ब्रायन यांनी न्यायालयात दिलेल्या माहिती नुसार 20 नोव्हेंबर 2017ला दिल्लीतून एक मुलगी शिकागोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली होती.
न्यायालयात दिलेल्या माहितीत या मुलीचा उल्लेख 'ए' असा करण्यात आला आहे. या मुलीजवळ बी1/बी2 टुरिस्ट व्हिसा होता. विमानतळावर इमिग्रेनशनला या मुलीनं जी माहिती दिली त्यानुसार 18 नोव्हेंबर 2017ला तिचा दक्षिण कॅलिफोर्नियातील तेलुगू असोसिएशनच्यावतीनं सत्कार होणार होता.
इतर कागदपत्रांत म्हटलं होतं की तिला कॅलिफोर्निया तेलुगू असोसिएशनच्या स्टार नाईटमध्ये सहभागी व्हायचं होतं आणि ती 10 दिवस अमेरिकेत राहणार आहे.
इमिग्रेशन अधिकाऱ्यांना या मुलीवर संशय आला कारण तिला 18 नोव्हेंबरला कॅलिफोर्नियात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं, पण ती 2 दिवस उशिरा शिकागो विमानतळावर उतरली होती.
तिला याबद्दल विचारण्यात आल्यानंतर तिनं सांगितलं की तिला नॉर्थ अमेरिका तेलुगू सोसायटीच्या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे. तिनं जे पत्र दाखवलं त्यात म्हटलं होतं की ती इलिनॉयमधील स्कॅमबर्ग इथं होणाऱ्या एका परिषदेत पाहुणी आहे.
तेलुगू असोसिएशनकडे चौकशी
अधिकाऱ्यांनी जेव्हा दक्षिण कॅलिफोर्नियातल्या तेलुगू असोसिएशनच्या अध्यक्षांशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, 18 नोव्हेंबरला कॅलिफोर्नियात त्यांचा एक कार्यक्रम होता, पण त्या या अभिनेत्रीला ओळखत नाहीत, तसंच ती त्यांची गेस्टही नाही.
उत्तर अमेरिकेच्या तेलुगू असोसिएशननं अधिकाऱ्यांना सांगितलं की ते या अभिनेत्रीला ओळखतही नाहीत आणि त्यांचा 25 नोव्हेंबरला कोणताही कार्यक्रम नाही.
अधिकाऱ्यांनी या मुलीला अमेरिकेत येण्याचं खरं कारण विचारलं त्यावेळी ती म्हणाली की तेलुगू असोसिएशनच्या निमंत्रणावर ती अमेरिकेत आली असून तिला हे पत्र राजू नावाच्या एका व्यक्तीनं दिलं आहे.
राजूनेच या मुलीच्या विमानाच्या तिकिटाचे आणि हॉटेलच्या भाड्याचे पैसे भरले होते. राजू या मुलीला विमानतळावर घ्यायला येणार होता. या मुलीनं राजूचा इमेल आयडी आणि फोन नंबरही दिला.
तपास केल्यानंतर या अधिकाऱ्यांना एक इंटरनेट पोस्ट मिळाली. ज्यात लिहिलं होत की किशन मोडुगमुडी उर्फ चेन्नुपती काही फिल्मी कलाकारांना वेश्या व्यवसायात आणू इच्छितो.
तो खोट्या व्हिसावर या मुलींना अमेरिकेत आणतो आणि त्यांना सेक्स रॅकेटमध्ये सहभागी करून घेतो. शिकागोमध्ये विभा जयम त्याची मदत करते.
दिल्लीतून आलेल्या या मुलीकडील ई-मेल आयडी आणि फोन नंबरवरून समजलं की किशन मोडुगमुडी तोच आहे. किशनचा दुसरा एक ई-मेल मिळाला, त्यावरून त्याच्या शिकागोमधल्या घराचा पत्ता मिळाला.
नेवार्क विमानतळावर दुसरी अभिनेत्री
इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी नेवार्क विमानतळावर दुसऱ्या महिलेची चौकशी केली. ही महिला 26 नोव्हेंबरला मुंबईतून आली होती.
व्हिसावरील कागदपत्रांवरून असं लक्षात आलं की ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी झाली होती आणि 3 महिने ती अमेरिकेत राहाणार होती. व्हिसाच्या कागदपत्रांत म्हटलं होतं की ती परफॉर्मर असून एका कार्यक्रमात ती पाहुणी म्हणून आली आहे.
त्या महिलीनं अधिकाऱ्यांना सांगितलं की व्हिसा मिळवून देण्यासाठी राजू गारू नावाच्या एका व्यक्तीनं मदत केली होती आणि तिला टेक्सास एअरविंगमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित हॉलीवूड डान्स कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे.
वेश्याव्यवसायात ढकललं
या अभिनेत्रीनं सांगितलं की राजू गारूकडून आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती पेन्सेलव्हेनिलाही गेली होती.
त्यावेळी तिला जबरदस्तीनं वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं गेलं होतं. तिनं सांगितलं की ती वेश्या व्यवसायात सहभागी नाही. तिनं ग्राहकांसोबत काही वेळ घालवला आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला होता.
या ग्राहकानं तिला असा सल्ला दिला होता की तिनं विभाला सांगावं की तिचं काम झालं आहे आणि तिला परत जाण्यासाठी तिकीट काढून द्यावं.
पूर्वीच्या दौऱ्यात ही महिला विभासोबत चार वेगवेगळ्या शहरांत गेली होती आणि तिला ग्राहकांकडे विविध खोल्यांमध्ये पाठवण्यात आलं होतं. शिकागोमध्ये तिला एका खोलीत ठेवण्यात आलं होतं.
कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार या महिलेला नेवार्कमधून परत पाठवण्यात आलं.
पीडित मुलींना फोनवरून धमक्या
तपासात असं आढळून आलं की या महिलेची दिल्लीतही चौकशी करण्यात आली आहे. फोटो पाहून तिनं किशन मोडुगमुडी उर्फ राजूला ओळखलं. तिला व्हिजा न मिळाल्यानं राजूनं तिला फोनवर धमकी दिली की तिच्या व्यवसायाबद्दल जर तिनं कुणाला माहिती दिली तर तिची हत्या करण्यात येईल.
या महिलेनं सांगितलं की तिला शिकागोमध्ये ज्या घरात ठेवण्यात आलं होतं तिथून त्यांना एकटं बाहेर पडू दिलं जात नव्हतं. प्रत्येक वेळी कुणाला तरी तिच्या सोबत पाठवण्यात येतं होतं.
पीडितांची संख्या जास्त
पीडित मुलीनं व्हिसासाठीच्या अर्जाला दोन पत्र जोडली होती. ही पत्र तेलंगाना पिपल्स असोसिएशन ऑफ डलास आणि तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकेची होती. या दोन्ही संस्थांनी ही पत्र बनावट असल्याची माहिती दिली आहे.
तपासामध्ये असं लक्षात आलं की 2016 ते 2017 या कालावधीत बऱ्याच मुली किशनच्या मदतीनं अमेरिकेत आल्या होत्या. या पीडित मुलींना बी, सी, डी, ई अशा प्रकारे कोड नावं देण्यात आली आहेत. पीडित बी 24 डिसेंबर 2017ला शिकागोमध्ये आली होती आणि 8 जानेवारी 2018ला परत गेली होती.
व्हिसा संपल्यानंतरही किशन, विभा अमेरिकेत
किशन तेलुगू चित्रपट निर्माता नाही. तो काही चित्रपटांचा सहनिर्माता होता. 2014मध्ये त्यानं 2 वेळा व्हिसासाठी अर्ज केला होता. पण बनावट कागदपत्र सादर केल्यानं त्याला व्हिसा मिळाला नाही. 2015ला त्याला व्हिसा मिळाल्यानंतर तो 6 एप्रिलला शिकागोला आला होता.
त्याचा व्हिसा 5 ऑक्टोबर 2015पर्यंत वैध होता. पण तो परत आला नाही. त्याच प्रमाणे चंद्रकला मोडुगमुडी 11 ऑगस्टला शिकागोला आली. तिचा व्हिसा 10 फेब्रुवारी 2016ला संपला. तो पुढं 8 ऑगस्ट 2016पर्यंत वाढवून मिळाला. ऑगस्टमध्ये व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला.
23 जानेवारीला किशन आणि चंद्रकला यांना ओहोयो इथं अटक झाली होती, त्यांची 23 फेब्रुवारीला जामिनावर मुक्तता करण्यात आली.
ग्राहकांशी फोनवर ठरत होता व्यवहार
16 फेब्रुवारी 2018ला अधिकाऱ्यांनी किशन आणि चंद्रकला यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत त्यांना 70 कंडोम, निवासाचे बनावट कार्ड, अमेरिका तेलुगू असोसिएशनचे बनावट लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड आणि काही डायऱ्या सापडल्या. डायऱ्या आणि 4 मोबाईल फोनवरून तपास यंत्रणांना या सेक्स रॅकेटचा छडा लागला.
ते ग्राहकांशी एक वेळसाठी 1 हजार डॉलर, 2 वेळसाठी 2 हजार डॉलर असा व्यवहार करत. तेलुगू सिनेमातली अभिनेत्री किंवा अँकर फार कमी वेळासाठी अमेरिकेत येणार आहेत, असं सांगून हे व्यवहार ठरवत. प्रत्येक व्यवहार, दिलेले आणि घेतलेले पैसे, येणं-जाणं यांची सर्व माहिती या डायऱ्यांमध्ये लिहून ठेवत.
तपास अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी झालेल्या चर्चांचा तपशीलही न्यायालयात सादर केला आहे. यातून स्पष्ट होतं की किशन आणि चंद्रकला भारतातून तरुणींना अमेरिकेत बोलावून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत होते.
किशन आणि चंद्रकला यांना 29 एप्रिलला न्यायलयात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)