You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केसगळती थांबवणारं औषध अखेर शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा
- Author, इयान वेस्टब्रुक
- Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
टक्कल पडलं की सगळं संपलं असं वाटणाऱ्यांना आशा वाटावी अशीच एक बातमी आली आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांच्या आजारावर उपाय म्हणून जे औषध तयार केलं जात होतं ते प्रत्यक्षात टक्कल पडण्यावर लागू पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रयोगशाळेतल्या चाचणी दरम्यान या औषधाचा केसाच्या बीजकोशावर नाट्यमय परिणाम दिसला. त्या बीजकोशांची वाढ होण्यास या औषधाची मदत होत असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं.
या औषधातलं रसायन केसांची वाढ रोखणाऱ्या प्रथिनाला लक्ष्य करतं. त्यामुळेच यातून टक्कलावर मात करण्याचा मार्ग सापडू शकतो.
"केसांच्या गळतीमुळे त्रासलेल्या लोकांना याचा खूप फायदा होऊ शकेल," असं मॅंचेस्टर विद्यापीठातले या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नॅथन हॉकशॉ यांनी सांगितलं.
टकलाच्या समस्येवर आजवर फक्त दोनच औषधं उपलब्ध आहेत.
या संदर्भातलं संशोधन PLOS Biology मध्ये प्रकाशित झालं आहे. या संशोधनासाठी हेअर ट्रान्सप्लांटसाठी आलेल्या 40 रुग्णांच्या डोक्यावरील केसांचे बीजकोश वापरण्यात आले.
अर्थात, ही औषधयोजना सुरक्षित आहे का, त्याचा नेमका काय परिणाम होईल, याची क्लिनिकल ट्रायल होण्याची आवश्यकता आहे, असं डॉ. नॅथन हॉकशॉ यांनी बीबीसीला सांगितलं.
केस का गळतात?
केस रोजच गळतात आणि त्याची फार चिंता वाटण्याचं कारण नाही. काही कारणं तात्पूरती असतात, तर काही कायमस्वरुपी.
पण, खालील लक्षणं महत्त्वाची आहेत.
- अचानक केस गळणे
- टक्कल पडण्याची सुरुवात होणे
- केसांचा पुंजका पडणे
- डोक्यात खाज आणि जळजळ होणे
- केस गळतीची चिंता वाटणे
अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)