हीच ती अभिनेत्री जिचं उत्तर कोरियाने अपहरण करून आपले सिनेमे बनवले!

    • Author, स्टिफन इव्हान्स
    • Role, बीबीसी न्यूज, सेऊल

उत्तर कोरियाचे माजी अध्यक्ष किम जाँग-इल यांच्या हुकुमावरून अपहरण करण्यात आलेल्या दक्षिण कोरियन अभिनेत्री चॉई उन ही यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या.

त्या दक्षिण कोरियातल्या प्रथितयश अभिनेत्री होत्या. पण 1970च्या दशकात त्यांना किम जाँग इल यांच्या हुकुमावरून उत्तर कोरियात पळवून आणण्यात आलं. आणि तिथे आणल्यावर त्यांना तिथल्या चित्रपटांत काम करण्याची सक्ती करण्यात आली.

पुढे त्यांनी राष्ट्राध्यक्ष किम यांचा विश्वास संपादन केला, आणि संधी मिळताच तिथून निसटल्या. आधी त्या व्हिएन्नाला गेल्या आणि तिथून अखेर मायदेशी दक्षिण कोरियात आल्या.

चॉई उन ही यांची कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे - दक्षिण कोरियातले चित्रपट दिग्दर्शक आणि त्यांची अभिनेत्री पत्नी यांचं अपहरण करून त्यांना उत्तर कोरियात आणलं जातं. त्यांना तिथे ठेवून एक चित्रपट बनवण्याची सक्ती राष्ट्राध्यक्ष किम त्यांच्यावर करतात.

पण असं का केलं?

उत्तर कोरियाला चित्रपट क्षेत्रातली कौशल्यपूर्ण माणसं हवी होती. ती दक्षिण कोरियाकडे होती. मग उत्तर कोरियाच्या चित्रपटवेड्या अध्यक्षांनी काय करावं?

तर त्यांनी सरळ शेजारी देशातल्या कुशल लोकांनाच पकडून आपल्या देशात आणलं.

अपहरणाचा हा कट प्रत्यक्ष किम जाँग-इल यांनीच रचला. त्यांचे वडील तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते आणि जाँग-इल यांच्यावर चित्रपट उद्योगाची जबाबदारी होती.

जाँग-इल चित्रपट वेडे होते, विशेषतः हॉलिवुडपटांचे चाहते. त्या स्टाईलचे चित्रपट उत्तर कोरियात बनावेत आणि ते जगभर पाहिले जावेत, अशी त्यांची इच्छा होती.

त्यासाठी मग त्यांनी हा अपहरणाचा मार्ग शोधला. पहिला डाव साधला तो चॉई यांच्यावर.

असं केलं अपहरण

स्वत:ला हाँगकाँग स्थित उद्योजक म्हणवून घेणारी एक व्यक्ती चॉई यांना भेटायला आली.

या तथाकथित उद्योजकाला एक चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करायची होती. ही एक नवीन संधी आहे, जी चॉई यांच्या कारकीर्दीला नवी उभारी देईल, असं त्यांनी चॉईला पटवून दिलं.

'अ किम जाँग-इल प्रोडक्शन' या पुस्तकात याचं वर्णन आहे. चॉय यांना हाँगकाँगमध्ये येण्यासाठी उद्योजकानं गळ घातली. एकदा तिथे गेल्यावर त्यांना पकडण्यात आलं आणि काही दांडगट पुरुषांनी त्यांचा ताबा घेतला. त्यांना गुंगीचं औषधंही दिलं.

आठ दिवसांनंतर त्यांना जाग आली ती प्याँगयांगमधल्या एका सुसज्ज घरात. पण त्यांच्यावर अहोरात्र पहारा होता.

चॉई यांचा घटस्फोट झाला असला तरी आधीचे पती शिन सँग-ओक यांच्याबरोबर त्यांची मैत्री कायम होती. ते ही मागोमाग चॉई यांना शोधायला हाँगकाँगला गेले. पण काही महिन्यांनी त्यांचंही अपहरण झालं.

उत्तर कोरियात आल्यावर दोघांनी मिळून काही चित्रपट केले. सुरुवातीला शिन सँग-ओक यांनी किम जाँग यांना विरोध केला. त्यामुळे त्यांना चार वर्षं तुरुंगात काढावी लागली. पण अखेर दोघांनीही उत्तर कोरियन राजवटीसमोर मान तुकवली.

आठ वर्षं कोरियात काम केलं

ही परिस्थिती स्वीकारायला त्यांना पाच वर्षं लागली. चित्रपट हा जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग होता. त्यांनी काम सुरू केलं. किम जाँग-इल यांना चित्रपट निर्मितीबद्दल बरंचसं ज्ञान होतं, असं दोघांचं मत होतं.

शिवाय, जगभरात कशा प्रकारचे चित्रपट बनत होते याचं भानही त्यांना होतं, असं 'अ किम जाँग-इल प्रोडक्शन' पुस्तकात लेखक पॉल फिशर यांनी लिहून ठेवलं आहे.

शिन आणि चॉई यांनी उत्तर कोरियात बरेच चित्रपट केले. त्यांच्या 'पुलगॅसरी' या चित्रपटाला विशेष प्रसिद्धी मिळाली. यातलं साम्यवादी पात्र सावकाराविरोधातल्या लढ्यात शेतकऱ्यांना मदत करतं.

शिन आणि चॉई यांनी आठ वर्षं उत्तर कोरियात काम केलं.

एकदा एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी व्हिएन्नाला जाण्याची परवानगी मागितली. तिथे पोहोचल्यावर त्यांनी अमेरिकन दूतावासाकडे राजाश्रय मागितला आणि तिथून ते दक्षिण कोरियात सटकले.

शिन यांचा 2006मध्ये मृत्यू झाला. तर चॉय उन ही यांचं सोमवारी दक्षिण कोरियात एका रुग्णालयात निधन झालं.

दोघांचं अपहरण केल्याचा उत्तर कोरियानं कायमच इन्कार केला आहे. उलट त्यांनीच उत्तर कोरियात आश्रय मागितल्याचा त्यांचा दावा आहे.

दक्षिण कोरियात चॉय यांचा चाहता वर्ग

चॉय उन ही यांची कारकीर्द तशी बघितली तर उत्तर कोरियातच घडली. त्यांच्या निधनानंतर दक्षिण कोरियातही अनेकांनी शोकसभा घेतल्या. त्यांना श्रद्धांजली वाहिली.

"मी शाळेत असताना त्यांचा सिनेमा पाहिला होता. त्यांचा अभिनय पाहून मी ही चित्रपटात येण्याचं नक्की केलं," असं चॉय यांचा प्रभाव सांगताना 82 वर्षांच्या अभिनेत्री उम एंग-रॅन म्हणाल्या.

सोशल मीडियावरही त्यांच्या निधनाच्या बातमीवरून चर्चा होती.

"सौंदर्यवतींमध्ये तुमची गणना होईल. तुमचं आयुष्य कठीण होतं. आज तुम्ही आमच्यात नसला तरी तुमचा अभिनय आम्ही कधीही विसरणार नाही," असा संदेश नेव्हर या सोशल मीडिया साईटवर एका तरुणानं दिला.

"प्रत्येकाचं जीवन हीच एक कथा असते. पण त्यांच्याइतकं नाट्यमय जीवन कुणाचं नसेल. त्यांचं देखणं व्यक्तीमत्त्व कायम स्मरणात राहील," अशी श्रद्धांजली नेव्हरवर आणखी एका चाहत्याने त्यांना वाहिली.

चॉय यांचा अंत्यविधी गुरुवारी सेऊलमध्ये होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)