कॅटलोनिया सार्वमत : हिंसाचारात शेकडो जखमी

फोटो स्रोत, Reuters
कॅटलोनियामध्ये सार्वमतादरम्यान झालेल्या हिंसाचारात 460 जण जखमी झाले आहेत. स्पेन सरकारनं या सार्वमताला विरोध केला आहे.
स्पेनच्या संविधान न्यायालयानं हे सार्वमत बेकायदेशीर ठरवलं आहे.
मतदान केंद्रावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर स्पेन पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या आहेत. त्यात शेकडो जण जखमी झाल्याचं आत्पकालीन सेवा यंत्रणेनं सांगतिलं आहे.
पोलिसांनी मतदारांना अटकाव केल्यानंतर कॅटलोनियामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मतदान केंद्र आणि मतपत्रिका ताब्यात घेतल्या आहेत.
या हिंसाचारात 11 पोलीस जखमी झाल्याचं स्पेनच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. कतालानचे नेते कॅलस पुजडिमाँ यांनी पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
"पोलिसांनी तेच केलं आहे जे त्यांनी करायला हावं होतं" असं स्पेनचे उपपंतप्रधान सोराया सेंझ यांनी म्हंटलं आहे.
"हिंसेचा अनैतिक पद्धतीनं वापर करून स्पेन सरकार कातालान लोकांची इच्छा मारू शकत नाही" असं त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं आहे.
दरम्यान स्पेनचे गृहमंत्री जॉन इनाशिओ झोईडो यांनी मात्र या हिंसेच खापर कॅलस पुजडिमाँ यांच्यावर फोडलं आहे.
तर स्थानिक पोलिसांनी ट्विट करून "आम्ही फक्त कायदा आणी सूव्यवस्था राखण्याचा काम करत आहोत" असं म्हंटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








