भगतसिंगांना न्याय मिळवून देण्यासाठी पाकिस्तानी वकिलाची याचिका

'शहीद-ए-आझम' भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पाकिस्तानी वकील इम्तियाज रशीद कुरेशी एक अनोखी केस लढणार आहेत.

कुरेशी पाकिस्तानच्या न्यायालयात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना न्याय मिळावा म्हणून लढणार आहेत.

पाकिस्तानी वकील इम्तियाज रशीद कुरेशी यांनी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ज्या खटल्यात फाशीची शिक्षा दिली त्या खटल्याची फेरसुनावणी करण्याची मागणी केली आहे.

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना स्वत:चा बचाव करण्याची योग्य संधी दिली नव्हती, हे या याचिकेमागचं प्राथमिक कारण असल्याचं कुरेशी यांनी सांगितलं.

दोन्ही देशांचे हिरो

"भगतसिंग भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी हिरो आहेत. माझ्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांमध्ये प्रेम वाढीस लागण्यास मदत होईल," असंही कुरेशी म्हणाले.

कुरेशी लाहोर येथे 'भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशन' चालवतात. भगतसिंग एक स्वातंत्र्यसैनिक होते आणि एकसंध भारतासाठी ते लढले होते, असं कुरेशी यांनी याचिकेत म्हटलं आहे.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना न्याय मिळाला नाही, कारण त्या वेळचं न्यायालय ब्रिटीशांच्या प्रभावाखाली होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

FIRमध्ये काय?

त्यांनी कोर्टाचा आदेश घेऊन त्यावेळी दाखल केलेल्या 'एफआयआर'ची प्रत मिळवली आहे. त्यात या तिघांच्या नावाचा कुठेही उल्लेख नसल्याची माहिती कुरेशी यांनी दिली आहे.

हा एफआयआर उर्दूमध्ये लिहिल्याची नोंद आहे. अनारकली पोलीस ठाण्यात 17 डिसेंबर 1928 रोजी दोन अज्ञात शस्त्रधारी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

हा खटला भारतीय दंड संहितेच्या कलम 302,1201,109 अंतर्गत नोंदवला होता. सिंग यांचं नाव या 'एफआयआर'मध्ये नव्हतं. पण त्यांना या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावली गेली. या खटल्याप्रकरणी भगतसिंग यांना 23 मार्च 1931 साली लाहोर येथे फाशी देण्यात आली.

खटल्याचा देखावा

कुरेशी म्हणाले की, त्यांना हा खटला पाकिस्तानात चालवतांना अनेक अडचणी आल्या. त्यांना आशा आहे की भगतसिंग यांना न्याय मिळवून देण्यात त्यांना नक्की यश येईल.

कुरेशी सध्या भगतसिंग यांच्या 110व्या जयंतीनिमित्त भारतात आहेत. त्यांनी न्यायालयासमोर कायद्यात असलेली एक उणीव समोर आणली आहे, ज्यामुळे हा खटला आणि फाशी एक देखावाच होता असं सिद्ध होतं.

लेखी माफीची मागणी

ब्रिटीश सरकारने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची या घोडचुकीसाठी लिखित स्वरुपात माफी मागायला हवी, अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे.

ही फाशी बेकायदेशीर आणि न्यायिक हत्या असल्याचे त्यांचं म्हणणं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)