पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता भारतापेक्षा जास्त?

सख्खे शेजारी असलेल्या पाकिस्ताननं 1980च्या दशकात क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला. लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि साधनसंपत्तीच्या बाबतीत आघाडीवर असूनही भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्षेपणास्त्र निर्मित्तीत अग्रेसर आहे.

1947 मध्ये अखंड भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. तेव्हापासून अनेकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावले आहेत.

दोन्ही देशातले संबंध तणावपूर्ण असतांना पाकिस्ताननं अनेकदा क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. पाकिस्तानच्या ताफ्यातल्या क्षेपणास्त्रांचा घेतलेला हा आढावा.

हत्फ 1

पाकिस्तानचं हे पहिलं क्षेपणास्त्र आहे. कमी अंतरावरचं लक्ष्य गाठणारं हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रात दिशादर्शक उपकरणाचा समावेश असतो.

तसंच क्षेपणास्त्र सोडल्यानंतर ते गुरुत्वाकर्षण नियमांनुसार जातं आणि विशिष्ट लक्ष्याचा वेध घेतं.

याची क्षमता ताशी 70 ते 100 किलोमीटर अंतरावर मारा करण्याची आहे. यामध्ये 500 किलोग्रॅम स्फोटकं वाहून नेली जाऊ शकतात.

1989 मध्ये पाकिस्ताननं या क्षेपणास्त्राच्या निर्मितीची घोषणा केली होती. यशस्वी चाचणीनंतर 1992 मध्ये हत्फ 1चा पाकिस्तानी सैन्यात समावेश करण्यात आला.

या क्षेपणास्त्राची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेआण करणं सोपं आहे.

हत्फ 2

अब्दाली या टोपणनावानं हे क्षेपणास्त्र प्रसिद्ध आहे. 180 ते 200 किलोमीटरवरील लक्ष्याचा हे क्षेपणास्त्र वेध घेऊ शकतं.

250 ते 450 किलो स्फोटकं यात सामावली जाऊ शकतात. 2005 मध्ये हत्फ2ला पाकिस्तानी सैन्यात समाविष्ट करण्यात आलं.

याची लांबी 6.5 मीटर आहे तर व्यास 0.56 मीटर आहे. या क्षेपणास्त्रात आण्विक अस्त्रं घेऊन जाण्याची क्षमता असल्याचा दावा पाकिस्ताननं 2013 मध्ये केला होता.

हत्फ 3

हे क्षेपणास्त्र गजनवी नावानंही ओळखलं जातं. कमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेण्यासाठी या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली.

290 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा हे क्षेपणास्त्र वेध घेऊ शकतं. 700 किलो स्फोटकं वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

हत्फ 4

शाहीन असं या क्षेपणास्त्राचं दुसरं नाव आहे. कमी अंतरावरचं लक्ष्य भेदण्याचं उदिष्ट असलेलं हे क्षेपणास्त्र 750 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं.

हजार किलो स्फोटकं वाहून नेण्याची शाहीनची क्षमता आहे. 1993 मध्ये याच्या निर्मितीला सुरुवात झाली.

1997 मध्ये चाचण्या घेण्यात आल्या. 1999 मध्ये पहिल्यांदा हे क्षेपणास्त्र सार्वजनिक ठिकाणी मांडण्यात आलं.

2003 पासून शाहीन पाकिस्तानी सैन्याचा भाग झालं. 12 मीटर लांबी आणि एक मीटर व्यास असा याचा पसारा आहे.

हत्फ 5

मध्यम अंतरासाठीच्या या क्षेपणास्त्राला गौरी नाव देण्यात आलं. 1250 ते 1500 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा हे वेध घेऊ शकतं.

700 किलो स्फोटकं वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इराक यांनी संयुक्तपणे 1980 मध्ये या क्षेपणास्त्राच्या निर्मितीची सुरुवात केली.

1998 मध्ये पहिल्यांदा याची चाचणी घेण्यात आली. 2003 मध्ये याला पाकिस्तानी सैन्यात समाविष्ट करण्यात आलं. 15.9 मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्राचा व्यास 1.35 मीटर आहे.

मे, 2014 मध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र आण्विक अस्त्रंही बाळगू शकतं असा दावा पाकिस्ताननं केला होता.

हत्फ 6

हे क्षेपणास्त्र शाहीन 2 नावानं प्रसिद्ध आहे. मध्यम अंतरासाठीचं बॅलिस्टिक स्वरुपाचं क्षेपणास्त्र आहे. 1500 ते 2000 किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा हे क्षेपणास्त्र वेध घेऊ शकतं.

700 किलो स्फोटकं वाहून नेऊ शकतं. पण, ही क्षमता 1230 किलोपर्यंत वाढवली जाऊ शकते. या क्षेपणास्त्राची लांबी 17.2 मीटर आहे तर व्यास 1.4 मीटर आहे.

2004 मध्ये याची चाचणी घेण्यात आली आणि 2014 मध्ये पाकिस्तानी लष्करात याचा समावेश करण्यात आला. लक्ष्याची वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता अतिशय अचूक असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

हत्फ 7

बाबर क्रुझ नावानंही हे क्षेपणास्त्र ओळखलं जातं. पारंपरिक तसंच आण्विक अस्त्र घेऊन जाण्याची या क्षेपणास्त्राची ताकद आहे.

हे क्षेपणास्त्र 350 ते 700 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. सबसॉनिक क्रुझ प्रकाराचं हे क्षेपणास्त्र जमिनीवरून सोडता येतं.

भारतानं 1990च्या दशकात क्रुझ मिसाइल निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं क्रुझ क्षेपणास्त्राची निर्मिती केली.

सोडल्यानंतर क्षेपणास्त्राची दिशा बदलली जाऊ शकते. स्वंयचलित स्वरुपाचं शक्तिशाली इंजिन क्रुझ क्षेपणास्त्राची ताकद आहे.

450 किलो स्फोटकं वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. 2010 मध्ये हे क्षेपणास्त्र पाकिस्तानी सैन्याचा भाग झालं. 6.2 लांबीच्या या क्षेपणास्त्राचा व्यास 0.52 इतका आहे.

हत्फ 8

राद क्रुझ या नावानं हे क्षेपणास्त्र प्रसिद्ध आहे. 350 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा हे क्षेपणास्त्र वेध घेतं.

लढाऊ स्वरुपाचं हे क्षेपणास्त्र कमी उंचीवरच्या लक्ष्यभेदासाठी उपयुक्त आहे. आण्विक अस्त्र दागण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची लांबी 4.85 मीटर आहे तर व्यास 0.5 मीटर आहे.

हत्फ 9

हे नस्र नावानं ओळखलं जातं. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र आण्विक अस्त्र डागू शकतं. 60 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचं हे वेध घेऊ शकतं.

2011 मध्ये याची चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्रविरोधी बचाव यंत्रणेला मात देण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

शाहीन 3

मध्यम अंतरासाठीचं हे बॅलिस्टक स्वरुपाचं क्षेपणास्त्र आहे. 2750 किलोमीटरपर्यंच्या अंतरासाठी उपयुक्त आहे.

पारंपरिक आणि आण्विक अशा दुहेरी अस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. याची लांबी 19.3 मीटर आहे तर व्यास 1.4 मीटर आहे.

मार्च, 2016 मध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. 2015 मध्ये या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता.

अबाबील

जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारं आणि 2500 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकणारं हे क्षेपणास्त्र आहे. जानेवारी, 2017 मध्ये पहिल्यांदा याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेण्याची याची क्षमता आहे. 1.7 मीटर व्यासाचं हे क्षेपणास्त्र ठोस इंधनाचा वापर करतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)