राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील 'या' 64 पानी पुस्तकाची चर्चा होतेय, कारण...

फोटो स्रोत, IMRAN QURESHI
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरूहून
कन्नड साहित्यिक देवानुर महादेव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर लिहिलेली 'आरएसएस आला मट्टु अगाला (आरएसएसची खोली आणि रुंदी) हे छोटेखानी पुस्तक व्हायरल झाले आहे. आरएसएसने या पुस्तकावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण भाजपने मात्र या पुस्तकाला 'कचरा' म्हटले आहे.
या पुस्तकाच्या छापील प्रतींची मागणी एवढी वाढली आहे की, या पुस्तकाच्या प्रती बाजारात आता उपलब्ध होत नाही आहेत. सायबर विश्वात या पुस्तिकेची पीडीएफ कॉपी शेअर होत आहे आणि या पुस्तकाचा हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजी भाषेत अनुवाद करवून घेतला जात आहे.
या पुस्तकाचा मराठी अनुवादही प्रकाशित झाला आहे. प्रा. दत्ता दंडगेंनी या पुस्तकाचा केलेला अनुवाद मधुश्री प्रकाशननं प्रकाशित केला आहे.
64 पानांचे हे पुस्तक एका नव्या फॉरमॅटमध्ये असून हे पुस्तक आता कोणीही प्रकाशित करत आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील महिला गट आणि तालुका स्तरावर विद्यार्थ्यांच्या गटानेही या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
आरएसएसचे संस्थापक डॉक्टर के. बी. हेडगेवार आणि सर्वात शक्तिशाली सरसंघचालक एम. एस. गोळवलकर आणि वि. दा. सावरकर यांची विधाने समाविष्ट असलेल्या या पुस्तकात सर्वांनाच इतके स्वारस्य आहे की, भाजप कार्यकर्ते आणि सदस्य या पुस्तकाचे छुप्या पद्धतीने वाटप करत असल्याचा दावा महादेव करत आहेत.
म्हैसूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी श्री. रामकुमार यांनी बीबीसी हिंदीला सांगितले, " बहुतेक विद्यार्थ्यांना या पुस्तकाविषयी माहीत आहे. आम्ही या पुस्तकाच्या दोन हजार प्रती प्रकाशित केल्या आहेत आणि चार दिवसांच्या आत या सर्व प्रती विकल्या गेल्या. आता आमच्याकडे या पुस्तिकेच्या 500 प्रती आहेत आणि अधिक प्रती छापण्यासाठी परवानगी मागितली आहे. आम्ही मंड्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात मोठ्या संख्येने या पुस्तकाची विक्री केली. आम्ही काही प्रती घेऊन स्थानिक चहाच्या स्टॉलवर पण जातो आणि तिथे तीस रुपयांमध्ये लोक हे पुस्तक विकत घेतात."
कर्नाटकच्या उत्तरेला असलेल्या कलबुर्गी या जिल्ह्यातील 'प्रभूता भारत संघर्ष समिती' नावाच्या एका महिला संघटनेने या पुस्तकाच्या एक हजार प्रती छापल्या. या समितीशी संबंधित असलेल्या अश्विनी मगांकर म्हणतात, "काही दिवसांतच आमच्याकडील सर्व प्रती विकल्या गेल्या. आम्हाला अधिक प्रती छापायच्या आहेत कारण इकडचे लोक आणि बिदर मधील लोक या पुस्तकांची मागणी करत आहेत."

फोटो स्रोत, MUJEEB FARUQUI/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES
महादेव यांना आपल्या कल्पना आणि रूपकांसाठी ओळखले जाते. त्यांनी आरएसएसची तुलना एका जादूगाराशी केली आहे. या जादूगाराने आपला आत्मा एका चिमणीमध्ये लपवून ठेवला आहे. ही चिमणी सातासमुद्रा पार एका गुहेत राहते. जोपर्यंत या चिमणीला शोधून तिला मारले जाणार नाही तोपर्यंत हा जादूगारही मरणार नाही. हॅरी पॉटर सीरीजमध्ये व्होल्डेमोर्ट मारण्यासाठी हॉक्रक्स नष्ट करणे आवश्यक असते. त्यातलाच हा प्रकार आहे.
महादेव म्हणतात की, भगवद्गीता शिकविण्यावर भर देणे हे देशात जातीव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. ते म्हणतात की, संविधान हे 'कॉपी-पेस्ट' असल्याचे सांगून बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यातलाच हा प्रकार आहे.
त्यांचा दावा आहे की, या देशावर आपला देव लादण्याच्या आरएसएसच्या योजनेसाठी संविधान हे एक दुःस्वप्न आहे. आरएसएसचा देव म्हणजे ज्याला ब्राह्मणाचे शीर आहे, क्षत्रियाचे बाहू आहेत, वैश्याची जांघ आहे आणि शूद्र पायाशी आहे
पण भारताचे पंतप्रधान ओबीसी वर्गातील नरेंद्र मोदी आहे आणि राष्ट्रपतीपदी आदिवासी समुदायातील द्रौपदी मुर्मु या आदिवासी समाजातील आहेत. अशा परिस्थितीत आरएसएस आपल्या मनुस्मृतीच्या तर्काला सिद्ध कसे करू शकतील? या प्रश्नाच्या उत्तर देताना महादेव यांनी बीबीसी हिंदीला सांगितले, "आपल्याला एक सत्य समजून घ्यावे लागेल. भाजप हा एक गैर-संवैधानिक पक्ष आहे. त्या पक्षाचे नियंत्रण आरएसएसच्या हाती आहे. त्यांचा देव गाभाऱ्यात आहे, जो नागपूरमध्ये आहे. भाजपचे नेतृत्व नागपूरमधील देवाकडून मिळालेल्या आदेशानुसार चालते. फूल डाव्या बाजूला पडले आहे की उजव्या बाजूला, हा त्या देवाने दिलेला खास संदेश असतो.
ते म्हणतात, "याच कारणामुळे भाजपचे नेते आरएसएसला खुश करण्यासाठी स्पर्धा करत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संविधान नसलेल्या भाजपसारख्या पक्षामध्ये कोणत्याही एका व्यक्तीला स्वबळावर मजबूत होऊ देत नाहीत. पंतप्रधान इतर मागासवर्गीय गटातील असले तरी त्यांनी इतर मागासवर्गीयांना काही फायदा मिळवून दिला आहे का? मोठा राहू दे, पण छोटा लाभ तरी दिला आहे का? इतर मागासवर्गीय जमातीतील लोक लहान-सहान कामे करतात. त्यांच्यासाठी रोजगार संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले आहेत का? मला तरी असे काहीही दिसले नाही. त्यांनी कोट्याधीशांवर कर निश्चितच कमी केला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK@RSSORG
त्यांची कर्जे माफ होत आहेत. सार्वजनिक संपत्ती त्यांना कमी किमतीत विकली जात आहे. श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये कोट्यवधींची वाढ होत आहे. सरकारतर्फे कॉर्पोरेट सेक्टरला लाभ दिला जात आहे. पंतप्रधान त्यांच्या संपत्तीची चौकीदारी करत आहेत. पूर्वी जेव्हा राजा, सरदार किंवा सामंतांचे राज्य होते, तेव्हा ज्यांनी चातुवर्ण्य व्यवस्थेचे पालन केले, केवळ तेच टिकून राहू शकले. ज्यांनी हे तत्व पाळले नाही त्यांचा सर्वनाश झाला. म्हणजे प्रत्यक्षात सत्ता कोण चालवत होते? खरेच सत्तेचे नियंत्रण राजांच्या हाती होते का? आपल्याला जे दिसते त्याच्या पलिकडे पाहिले पाहिजे."
ते पुढे म्हणतात, "आदिवासी हेच मूळ निवासी आहेत. पण या लोकांनी मूळ निवासींचे नावच घालवून टाकले आहे आणि त्यांना वनवासी बनवून टाकले आहे (संघ परिवारातर्फे आदिवासी भागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमांच्या संदर्भात हे विधान करण्यात आले आहे.) आणि आज आदिवासी हे या कट्टर शक्तींमार्फत दुसऱ्या धर्मांशी लढण्याचे हत्यार झाले आहेत. याने काही बदल होणार आहे का? हाच योग्य विकास आहे? आपल्याला या दृष्टिकोनातूनही विचार करून पाहिले पाहिजे.
या पुस्तकात आरएसएसच्या समर्थकांवर टीका करण्यात आली आहे.
आरएसएस समर्थक या पुस्तकाला 'कचरा' म्हणून हिणवत आहेत.
महादेव यांना देवानुरू या त्यांच्या गावाच्या नावानेही ओळखले जाते. त्यांनी दावा केला आहे की, त्यांनी या पुस्तकात आरएसएसचे विचार, गोळवलकरांचे विचार आणि सावरकरांच्या विचार समाविष्ट केले आहेत.
ते विचारतात, "या पुस्तकाला ते कचरा म्हणत असतील तर गोळवलकर आणि सावरकरांचे विचारही कचऱ्यासमान आहेत, असे त्यांना म्हणायचे आहे का?"
देवानुरु महादेव कोण आहेत?
महादेव विद्रोही साहित्य चळवळीचे प्रणेते लेखक असून ते सामाजिक आणि आर्थिक अन्यायावर लेखन करतात..
त्यांनी लाहिलेल्या ओडालाला या कादंबरीच्या एक लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या आणि आता ते या पुस्तकाच्या विक्रीचा हिशेब ठेवत नाहीत, असे ते म्हणतात.

फोटो स्रोत, ANURAG BASAVARAJ
त्यांनी लिहिलेल्या 'कुसुमाबळे' या कादंबरीची सर्वात जास्त चर्चा झाली आणि या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता.
महादेव म्हणतात की, जेव्हा ते या पुस्तकाची छपाई करत होते तेव्हा याच्या एक हजार प्रती खपल्या तरी खूप आहेत, असे त्यांना वाटत होते. पण या पुस्तकाच्या प्रती अजूनही छापल्या जातात आणि आतापर्यंत एक लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.
पुरस्कार नाकारला
त्यांनी 2010 मध्ये नृपाथुंगा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. कारण प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत कन्नड ही शिक्षणाची भाषा केली गेली नव्हती.
2015 मध्ये त्यांनी पद्मश्री आणि केंद्राचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता.
1990 च्या दशकात लेखकांच्या वर्गातून त्यांना राज्यसभेत जाण्याचा प्रस्ताव मिळाला होता. परंतु त्यांनी तो स्वीकारला नव्हता.
लोक एवढ्या मोठ्या संख्येने हे पुस्तक का वाचत आहेत, या प्रश्नावर महादेव म्हणतात, "मी याबद्दल काय बोलू, या प्रश्नाचे मी उत्तर कसे देऊ?"
गीतेमधील शिक्षण आणि संविधान
महादेव म्हणतात, "देवानेच चातुर्वण्य व्यवस्था निर्माण केली यावर विश्वास ठेवणे हे सर्वनाशक आहे. पण, खऱ्या महाभारतात याचा उल्लेख नसेल. असेही म्हणतात की, स्वतः शंकराचार्यांनीच हा भाग महाभारतात समाविष्ट केला. मी असेही म्हणत नाही की, हे स्वामी विवेकानंदांचे शब्द असतील. मला असेच वाटते की ते खरेच असेल.
त्यांनी भगवद् गीतेच्या संपूर्ण रुपाला फेटाळले नव्हते. यात अनेक बौद्ध विचारही आहेत. आम्हाला असचे वाटते की, गीता एखाद्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तीने रचली आहे. याची एक उणी बाजूसुद्धा आहे. ती म्हणजे गीतेमुळे चातुर्वण्य व्यवस्था कायम राहिली. यात सामाजिक भेदभाव कायम ठेवला असला तरी यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, असे मला वाटते.
"आजच्या काळात प्रश्न उद्भवतो की भगवद्गीतेला प्रोत्साहन देणे हा संविधानावर घाव नाही का, कारण गीता हिंदू धर्मावर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्थेला प्रोत्साहन देते."
महादेव पुढे म्हणतात, "इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक एका मर्यादेपर्यंत भाजपला समर्थन देत आहेत. पण यात अनेक माध्यमांचा हात आहे, असे म्हणावे लागेल. त्यांनी असा एक आभास निर्माण केला आहे की, भाजप या समुदायांसाठी बरेच काम करत आहे. माझ्यामते वस्तुस्थिती ही नाही. आपण सध्याच्या काळात झालेल्या भारतातील विकासकार्ये पाहिली तर वेगळे चित्र दिसून येते. फक्त बेरोजगारीचा विकास झालेला दिसून येतो.

फोटो स्रोत, Getty Images
"इतर मागासवर्गीय, अनुसूचित जातीचे व जमातींचे तरूण अस्वस्थ आहेत आणि ते बेरोजगारीशी संघर्ष करत आहेत. पण त्यांच्या (ओबीसी, एससी आणि एसटी) तरुणांसमोर आरएसएस असे भासवत आहे की, या वाईट परिस्थितीसाठी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म कारणीभूत आहे.
ते म्हणतात, "अजून एक गोष्ट म्हणजे एखाद्याला भारताची मानसिकता समजून घ्यायची असेल तर चातुर्वण्य व्यवस्था सामान्य करण्यासाठी धर्माच्या नावावर शास्त्राला शस्त्र करण्यात आले आहे."
प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे (सीएसडीएस) संचालक संजय कुमार यांनी एका ट्विटमध्ये भाजपच्या बदलत्या व्होट बँकेबद्दल लिहिले होते, "लोकनीती सीएसडीएसच्या निष्कर्षांनुसार भाजपच्या समर्थकांचा वर्ग बदलू लागला आहे. 1996 मध्ये भाजपला मिळणाऱ्या मतांपैकी 49 टक्के मते सवर्ण जातींची होती, 33 टक्के मते ओबीसींची होती, 11 टक्के एससी होते आणि 7 टक्के एसटी होते. 2019 मध्ये भाजपला मिळालेल्या एकूण मतांपैकी 30 टक्के मते सवर्णांची होती, 44 टक्के ओबीसी होते, 16 टक्के एससी होते आणि 10 टक्के एसटी होते."
महादेव म्हणतात, "सध्याच्या घडीला बेरोजगारांसाठी अन्न उपलब्ध आहे का? द्वेष हा एक प्रकारचा आहारच आहे. आरएसएस आणि संघ परिवार त्यांनी दुसऱ्या धर्मांविरुद्ध द्वेष वाढतात आणि दुसऱ्या धर्मांविरुद्ध त्यांना भडकवतात. गोळवलकर आणि सावरकर हे नाझीवादारेच समर्थक आहे, हे स्पष्टपण दिसून येते. सध्या भाजप सत्ते असताना हे आता पद्धतशीरपणे होत आहे."
सामान्य जीवन आणि अर्थव्यवस्थेवर मनुस्मृतीचा प्रभाव
महादेव म्हणतात की, पंतप्रधानांनी एका झटक्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या (ईडब्ल्यूएस) वर्गासाठी 10 टक्के आरक्षण लागू केले.
ते म्हणतात, "पण हे दहा टक्के आरक्षण, जे दुसऱ्या कोणत्याही वर्गाला उपलब्ध नाही, ते ईडब्ल्यूएस वर्गाला देण्यात आले आहे, जे सामाजिक दृष्टिकोनातून वरच्या स्तरावर आहे आणि ज्यांचे शिक्षण व रोजगारात अधिक प्रतिनिधीत्व आहे. या व्यतिरिक्त ईडब्ल्यूएस वर्गातील लोकसंख्या ही केवळ पाच टक्के आहे. हे काम पंतप्रधानांनी केले आहे."

फोटो स्रोत, Thinkstock
"या निर्णयामुळे आरक्षणामुळे जो न्याय होणे अपेक्षित होते, त्याला हरताळ फासला गेला. जे अग्रस्थानी आहेत, त्यांनाच अधिकाधिक लाभ झाला पाहिजे, या सिद्धांतासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे, असे दिसते. हा सिद्धांत आला कुठून? मनुधर्म शास्त्रच याचा स्रोत आहे."
हे छोटेखानी पुस्तक लिहिले का?
महादेव यांच्या म्हणण्यानुसार अलीकडील काळातील अनेक घटनांमुळे ते चिंतित झाले होते.
"ईडब्ल्यूएस आरक्षण हे त्याचे प्रमुख कारण होते. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या धर्मांतर कायद्यामुळे त्यांना विचार करण्यास भाग पाडले. त्याच्या काही दिवसांनी पाठ्यपुस्तकासंदर्भातील वाद सुरू झाला. बसवण्णांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला वेगळ्याच प्रकारे सादर करण्यात आले आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या प्रकाराला क्षुल्लक चूक म्हणाले."
महादेव म्हणतात की, कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ रिलिजिअस फ्रीडम अॅक्टच्या (धार्मिक स्वातंत्र्य सुरक्षा कायदा) माध्यमातून आरएसएस मनुस्मृती लागू करत आहे. ते म्हणतात की, हा कायदा मनोरुग्ण, अल्पवयीन, महिला आणि दलितांना एकाच वर्गात ठेवतो. दलित आणि महिला मनोरुग्ण आहेत? या सरकारने महिलांना व दलितांना दुय्यम नागरिकाचा दर्जा दिला आहे. हे मनुस्मृतीप्रमाणेच आहे. मनुस्मृतीत वेगवेगळ्या लोकांसाठी दर्जा व वर्णानुसार एकाच अपराधासाठी वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा नमूद केलेली आहे."
भाजपने या पुस्तकाला 'काँग्रेसने लिहिलेला कचरा' असे संबोधले आहे
म्हैसूरमधील भाजप खासदार प्रताम सिम्हा यांनी बीबीसी हिंदीला सांगितले, "कुसुबाळेप्रमाणे त्यांनी जी प्रतिभा दाखवली होती, ती त्यांच्यात अजूनही आहे, असे मला वाटले होते. राहुल गांधी यांच्या नीरस भाषणानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअॅप व फेसबुकवर ज्या पोस्ट केल्या होत्या, त्यांचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे, असे वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणे हिंदू धर्माने दुसऱ्या देशावर कब्जा केलेला नाही आणि लोकांना धर्मपरिवर्तनासाठी वेठीस नाही धरले. त्यांना किमान एवढे माहीत असायला हवे होते."
ज्येष्ठ विश्लेषक विश्वेश्वर भट्ट यांची धारणा आहे की, हे अत्यंत उथळ लेखन आहे जे त्यांच्या प्रतिमेला अजिबात दृढ करत नाही.
ते म्हणतात, "त्यांच्याकडून गुणवत्तायुक्त शोध असलेली विद्वत्तापूर्ण पुस्तकाची अपेक्षा केली जात होती. या पुस्तकातील त्यांचे हेतू उळख आहेत. या पुस्तकाने माझा अपेक्षाभंग केला आहे."

फोटो स्रोत, ANURAG BASAVARAJ
या पुस्तकाबद्दल आरएसएसची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला. पण त्यांच्याकडून काही उत्तर मिळाले नाही. नाव उघड न करण्याच्या अटीवर एका भाजप प्रवक्त्याने बीबीसीला सांगितले की, या प्रकरणाबाबत आरएसएसकडून कोणीही बोलणार नाही. आम्ही याला कचराच समजतो.
ही टीका फेटाळताना महादेव म्हणतात की, हे आरोप माझ्याशी संबंधित नाहीत. मी तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो. काँग्रेसचे सदस्य या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप करत आहे. जेडीससुद्धा वाटप करत आहे. एवढेच नव्हे तर काही भाजप नेतेसुद्धा गोपनीय पद्धतीने हे पुस्तक वाटत आहेत. आरएसएसनेसुद्धा या पुस्तकाचे वाटप केले तर मला खूप आनंद होईल. हे भारतासाठी सुवर्णयुग आहे. मला असेच वाटते."
या पुस्तकाला कचरा संबोधण्यात आल्याच्या टिकेबद्दल महादेव म्हणतात, "मी गोळवलकर आणि सावरकरांचे विचार मांडले आहेत. मी जे लिहिले आहे ते गोळवलकर किंवा सावरकरांनी म्हटलेले नाही, असे तरी त्यांनी म्हणायला हवे होते. त्यांनी असे म्हणायला हवे होते की, आम्ही त्यांच्या विधानांचे समर्थन करतो, किंवा त्यांना किमान असे म्हणायला हवे होते की, त्यांनी (गोळवलकर आणि सावरकर) असे आधी म्हटले होते, पण आता आम्ही ते म्हणणे मानत नाही. ते या पुस्तकाला सरळ सरळ कचरा म्हणत असतील तर ते गोळवलकर आणि सावरकरांनाही हेच म्हणत आहेत."
महादेव असेही म्हणतात की, बहुतेक लोकांचा विश्वास संविधानावर आहे. ते म्हणतात, "मला संविधानाची आवश्यकता आहे. आणि कदाचित तुम्हालाही याची गरज आहे. आणि देशाला संविधानाची आपल्या दोघांहून जास्त गरज आहे. जे लोक सतर्क आहेत त्यांनी समजालाही याबाबत जागरुक केले पाहिजे."
भारताच्या भविष्याबद्दल ते म्हणतात, "आज वैदिक विचारप्रवाहाचे महत्त्व आहे. आपल्याला विचारांचा सहिष्णू प्रवाहसुद्धा आपल्याला कायम ठेवायचा आहे, स्थानिक व आदिवासी विचारांनाही आपल्याला जिवंत ठेवायचे आहे. त्यांच्यात घट्ट मानवी नातेसंबंध व मूल्ये असतात. आपण त्यांच्याकडे आदिवासी म्हणून दुर्लक्षित करतो. त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे."
"ऐतिहासिक वा दुसऱ्या कारणांमुळे एकाच परिवारात हिंदू, मुसलमान किंवा ख्रिश्चन असतात. इतिहासाने हा आश्चर्यकारक प्रयोग केला आहे. म्हणूनच प्रेम व सहिष्णूता ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्याला ही दोन्ही मूल्ये रुजवायची आहेत आणि ही मूल्ये पेरत पुढे जायचे आहे. आपल्याला या मूल्यांचे संवर्धन करायचे आहे. मी भारताबद्दल आशावादी आहे, असे मी कसे म्हणू शकतो? भारताच्या भविष्यासाठी काय करायचे आहे, याचा आपण सर्वांनी एकत्रितपणे विचार करायचा आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








