उदगीर साहित्य संमेलन : शरद पवारांनी प्रोपंगडाबाबत व्यक्त केली चिंता

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

"विशिष्ट विचारधारेचा प्रचार, प्रोपगंडा हा ग्रंथातूनच होतो त्यामुळे आपण कुणाच्या विचारधारेला बळी तर पडत नाहीत ना याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवायला हवं," असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केली.

उदगीर येथे होत असलेल्या 95 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवारांनी साहित्याच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली.

"विशिष्ट विचारधारेचा प्रचार ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे," असे पवार म्हणाले.

"अडॉल्फ हिटलरने लिहिलेले माइन काम्फ हे त्याचे अत्यंत भयानक उदाहरण आहे असे मी समजतो. कुठल्याही विचारधारेचा विरोध नसावा ही बाब मान्य आहे पण त्या विचारधारेत लॉजिक असावे आणि इतरांच्या संस्कृतीचा देखील त्यातून सन्मान व्हावा."

साहित्य आणि राजकारणात समन्वय हवा असं शरद पवार म्हणाले. पण साहित्यिकांमध्ये होत असलेल्या राजकारणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

"1878 ला साहित्य संमेलन सुरू झाले. तेव्हापासून ते 1961 पर्यंत एकही महिला साहित्यिक या संमेलनाची अध्यक्ष बनली नाही. पुढे शांता शेळके, अरुणा ढेरे यांनी हे पद भूषवले पण आता आपण या मंडपात पाहिले तर लक्षात येईल की या मंडपात 10 टक्के देखील महिला नाहीत.

जर त्यांना समान संधी नसेल, त्यांचा सन्मान होत नसेल तर त्या का येतील. याचा देखील विचार व्हायला हवा," असं पवार म्हणाले.

आवश्यकता भासल्यास साहित्य मंडळाने आपल्या घटनेत बदल करावा आणि किमान पाच संमेलनानंतर किमान एक तरी महिला अध्यक्ष असावी अशी तरतूद करावी अशी सूचना शरद पवार यांनी दिली.

साहित्य संमेलन

ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दिवाकर मावजो यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण करण्यात आल्यानंतर काही स्तरातून वाद निर्माण झाला होता. मावजो यांनी मराठीचा विरोध केला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत त्यांनी वेळोवेळी सांगितले या वादावर देखील शरद पवारांनी भाष्य केली.

ते म्हणाले, "मराठी आणि कोकणी वाद घालत बसू नये. अनेक भाषांमध्ये साम्य आहे. चांगली उदाहरणं, प्रथा जर आपण समजून घेतल्या, त्यांचं मराठीने अनुकरण केलं तर मराठी भाषा शक्तिशाली होईल. सर्व भाषांना सोबत घेऊनच माय मराठीची प्रगती होईल," असं पवार म्हणाले.

लेखकाने सत्य मांडले पाहिजे आणि त्याचबरोबर त्याने सत्य निर्भिडपणे मांडले पाहिजे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी मांडले आहे. आज सर्वत्र एक चतुर मौन पसरले आहे असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी अन्याय होत आहे त्याबाबत कुणीच काही बोलताना दिसत नाही हे एक चतुर मौन आहे. हे आज आपण पाहत आहोत कदाचित उद्या हे आपल्याला भोगावे लागेल असा इशारा भारत सासणेंनी दिला.

ग्रंथदिंडीला नागरिकांचा प्रतिसाद

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं 22 ते 24 एप्रिलदरम्यान हे संमलेन पार पडेल.

आज सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीस उत्साहात प्रारंभ झाला. त्याला नागरिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यंदाचं साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रंथदिंडी

देशभरातील 1000 पेक्षा जास्त मराठी साहित्यिक आणि कवींना या संमेलनात निमंत्रित करण्यात आलं आहे.

दरम्यान, उदगीरमध्येच 23 आणि 24 एप्रिल रोजी विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. कवी गणेश विसपुते या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे.

या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार उपस्थित राहणार आहेत.

विद्रोही साहित्य संमेलन

फोटो स्रोत, Tushar kulkarni

या वर्षी रसिकांसाठी काय?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रमाने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. 21 तारखेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. चला हवा येऊ द्या कार्यक्रम साहित्य संमेलनात असल्याने सोशल मीडियावर टीका झाली होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

फोटो स्रोत, Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal

22 एप्रिलला ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरुवात होईल. त्यानंतर ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन, चित्र-शिल्प-कला प्रदर्शनाचे उदघाटन होईल. त्याच दिवशी अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन, कविकट्टा उद्घाटन यांसारखे कार्यक्रम पार पडतील.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

फोटो स्रोत, Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal

दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक चर्चा आणि परिसंवादाचे आयोजन साहित्य संमेलनात करण्यात आलं आहे. : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : काय कमावले, काय गमावले?, मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण : किती खरे, किती खोटे?, मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्रीवादात अडकले आहे का? या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हे परिसंवाद 22 एप्रिलला होतील

23 एप्रिलला ज्येष्ठ लेखक राजन गवस यांची प्रकट मुलाखत आहे. त्यानंतर मान्यवर लेखक प्रकाशकांचा सत्कार आहे. तसंच आजच्या कादंबरीकारांशी संवादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बालसाहित्याचं वाचन, बाळमेळावा उद्घाटन आहे. विशेष म्हणजे निमंत्रितांचं बाल कविसंमेलनही आयोजित करण्यात आलं आहे. एकूणच बाल साहित्यावर या संमेलनात भर देण्यात आला आहे. कविकट्टा आणि गझलमंच हेही कार्यक्रम 23 तारखेला होतील

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

फोटो स्रोत, Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal

24 एप्रिल म्हणजे शेवटच्या दिवशी अवधूत गुप्ते संगीत रजनीचा कार्यक्रम आहे. तसंच वाचन साहित्य आणि आधुनिकता, सीमाभागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार ? या विषयावर परिसंवाद आहे. या दिवशीही बालकादंबरी वाचन आणि बालसाहित्यिकांशी संवाद व गप्पा आणि सरतेशेवटी समारोपाचा कार्यक्रम आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)