Diabetes : मातीच्या भांड्यात इन्शुलिन साठवणाऱ्या अल्केशला मिळाला फ्रीज

इन्शुलिन, डायबेटिस, आरोग्य

फोटो स्रोत, Ganesh Gangaram Wasalwar

फोटो कॅप्शन, अल्केशला फ्रीज देण्यात आला.
    • Author, मयांक भागवत,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

टाईप1 मधुमेहाने ग्रस्त आणि फ्रीज नसल्याने मातीच्या भांड्यात इन्शुलिन ठेवणाऱ्या औरंगाबादच्या अल्केश पिंपळेची व्यथा बीबीसी मराठीने मांडली. अवघ्या 24 तासात अल्पेशला मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने फ्रीज आणि सायकल दोन्ही मिळालं आहे.

मंगळवारी अल्पेशची कहाणी बीबीसी मराठीने प्रसिद्ध केल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यासंदर्भात बीबीसीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांच्याशी संवाद साधून अल्पेशबाबत विचारणा केली. आदित्य ठाकरे यांचे सहकारी राहुल कनाल यांनी अल्पेशला आवश्यक वस्तूंची माहिती घेतली.

औरंगाबादस्थित 'आय लव्ह औरंगाबाद' या स्वयंसेवी संघटनेचे इरबाज अन्सारी यांनी अल्पेशला भेटून फ्रीज, सायकल आणि एक वर्ष पुरेल एवढा प्रोटिनचा साठा सुपुर्द केला. याबरोबरीने कपडे, स्कूल बॅग आणि स्टेशनरी हेही देण्यात आलं.

इन्शुलिन, डायबेटिस, आरोग्य

फोटो स्रोत, Ganesh Gangaram Wasalwar

फोटो कॅप्शन, अल्केशला सायकल देण्यात आली.

अल्केशचं कुटुंब अत्यंत गरीब आहे. आईला रोजंदारीवर फक्त 200 रूपये मिळतात. यातच अल्केशचे उपचार आणि घरातील पाच तोंडांची भूक भागवावी लागते.

इन्शुलिन अल्केशसाठी जीवनवाहिनी आहे. इन्शुलिन साठवण्यासाठी तो मातीचं भांडं वापरतो.

इन्सुलिन थंड ठेवणारा हा मातीचा पॉट आहे तरी काय? त्यात इन्सुलिन थंड कसं रहातं? ग्रामीण भागातील हजारो मुलांचं आरोग्य या पॉटमुळे कसं बदललं? हे आम्ही जाणून शोधण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबादपासून साधारण: 60 किलोमीटरवर जालना जिल्ह्यातील अवनी गावात अल्केश आई, भाऊ आणि आजोबांसोबत रहातो. घर तीन खोल्यांचं असलं तरी, अगदी छोटं आहे. घरातील मुख्य खोलीतच पंखा आहे.

मातीच्या लाल भांड्याने जीव वाचवल्याचं अल्केशने बीबीसी मराठीने सांगितलं. अल्केश दररोज वापरात येणारं इन्सुलिन या पॉटमध्ये ठेवतो आणि जास्तीचं शेजारच्यांच्या फ्रीजमध्ये. अल्केशच्या घरी फ्रीज नाही.

मधुमेह तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रत्येक रुग्णाला त्याच्या गरजेनुसार इन्सुलिनचे तीन किंवा पाच डोस दिवसातून घ्यावे लागतात.

फ्रीज विकत घेणं परवडणारं नाही, त्यामुळे मातीच्या भांड्यातच दररोज लागणारं इन्शुलिन अल्केश ठेवतो. इन्सुलिन घेण्याआधी शरीरातील साखरेची पातळी तपासावी लागते. अल्केश दररोज स्वत:चं स्वत: इंजेक्शन टोचून घेतो.

मातीच्या भांड्यात दिवसातून सहा ते आठ ग्लास पाणी घालावं लागतं. रेतीत पाणी घातलं नाही, तर पॉट थंड राहत नाही आणि इन्शुलिन खराब होतं.

लोडशेडिंगमुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित होतो. वीज नसली तरी मातीचं हे भांडं कामी येतं असं अल्केश सांगतो.

इन्शुलिन, डायबेटिस, आरोग्य
फोटो कॅप्शन, अल्केश पिंपळे

ग्रामीण भागातल्या अल्केशसारख्या हजारो टाईप-1 मधुमेही मुलांसाठी आणि मधुमेह असलेल्या प्रौढांसाठी इन्सुलिन थंड ठेवण्यासाठी हे मातीचं भांडं एक प्रकारची जीवनवाहिनी आहे.

भांड्यातलं इन्शुलिन खराब झालं तर काय करायचं याबाबत अल्केश सांगतो, गावातील एकाच घरात फ्रीज आहे. पण, सारखं त्यांच्याकडे जाणं योग्य नाही. त्यामुळे, जास्तीचा डोस त्यांच्याकडे ठेऊन दररोज वापरातलं इन्सुलिन या पॉटमध्ये ठेऊन वापरतो.

आंतरराष्ट्रीय डायबिटीस फेडरेशनच्या माहितीनुसार भारतात सध्या अडीच लाख टाईप-1 मधुमेही रुग्ण आहेत. पण या रुग्णांची नोंद ठेवण्यासाठी रजिस्ट्री नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या जास्त असू शकते.

मातीच्या पॉट इन्सुलिन थंड कसं राहतं?

टाईप-1 डायबिटीसग्रस्त मुलांसाठी औरंगाबादमध्ये 'उडान' नावाची संस्था काम करते. या संस्थेकडून अल्केशला इन्सुलिन थंड ठेवण्यासाठी हे मातीचं भांडं मिळालंय. दर महिन्याला लागणारं इन्सुलिनही त्याला संस्थेतून दिलं जातं.

'उडान'च्या संस्थापक मधुमेहतज्ज्ञ डॉ. अर्चना सारडा यांनी इन्सुलिन थंड ठेवण्यासाठी हा मातीचा पॉट तयार केलाय.

बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "ज्या रुग्णांकडे फ्रीज नाही किंवा वीज नाही. अशांची गरज ओळखून इन्सुलिन थंड ठेवण्यासाठी हा पॉट तयार करण्यात आला आहे."

ग्रामीण भागातून डॉ. सारडांकडे उपचारासाठी येणाऱ्या मुलांची शुगर अचानक वाढल्यानंतर इन्सुलिन खराब झाल्यामुळे हा त्रास होत असल्याचं त्यांना आढळून आलं. या मुलांसाठी उपाय शोधणं महत्त्वाचं होतं जेणेकरून इन्सुलिन सुरक्षित ठेवता येईल आणि प्रभावी राहील.

इन्शुलिन, डायबेटिस, आरोग्य
फोटो कॅप्शन, अल्केश आणि आई

"असं झालं नसतं, तर, मुलं जिवंत राहिली नसती," डॉ. सारडा सांगत होत्या. त्यामुळे इन्सुलिन पॉट मुलांची तात्काळ गरज ओळखून तयार करण्यात आलाय.

ग्रामीण भागात उन्हाळा अत्यंत कडक असतो. तापमान 40 अंशं सेल्सिअस पार पोहोचतं. इन्सुलिन लवकर खराब होण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. इन्सुलिन खराब झालं तर मुलांना याचा फायदा होत नाही. परिणामी तब्येत बिघडते.

डॉ. अर्चना सारडा म्हणतात, "उन्हाळ्यात बाहेरील तापमान 40 च्या पलिकडे गेलं आणि घरातील तापमान 35 अंश असलं तरी या मातीच्या भांड्यातील तापमान 26 अंशापर्यंत नियंत्रित रहातं." रोजच्या वापरात असलेलं इन्सुलिन सुरक्षित ठेवण्यासाठी 26 अंशापर्यंत तापमान गरजेचं आहे.

त्या पुढे सांगतात, आम्ही या भांड्यात शास्त्रीय पद्धतीने इन्सुलिन सुरक्षित राहू शकतं यावर संशोधन केलंय.

इन्सुलिन पॉट एक ठोस पर्याय आहे?

इन्सुलिन पॉट म्हणजे एक मातीचं भांडं आहे. यात दोन मातीची भांडी वापरण्यात आली आहेत. एक मोठं आणि दुसरं छोटं. या दोन भांड्यांमध्ये रेती किंवा वाळू भरायची. रेतीवर दिवसभरात सहा के आठ ग्लास पाणी टाकायचं. छोट्या भांड्यात इन्सुलिन ठेऊन भांडं थंड राहील अशी ठिकाणी झाकून ठेवायचं.

मातीचं भांडं थंड असतं. त्यातील रेतीत पाणी टाकल्यामुळे पॉट थंड रहातो आणि परिणामी इन्सुलिन थंड रहाण्यास मदत होते.

इन्सुलिन प्रभावी ठेवण्यासाठी त्याला चार ते आठ अंश सेल्सियस तापमानात फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. इन्सुलिन पॉटमध्ये हे शक्य आहे नाही. मग, हा पॉट मधुमेही रुग्णांसाठी एक ठोस पर्याय असू शकतो का? आम्ही डॉ. अर्चना सारडा यांना याबाबत प्रश्न विचारला.

इन्शुलिन, डायबेटिस, आरोग्य
फोटो कॅप्शन, उडान'च्या संस्थापक मधुमेहतज्ज्ञ डॉ. अर्चना सारडा

त्या म्हणाल्या, "हे अगदी खरं आहे की इन्सुलिन पॉट ठोस आणि अंतिम पर्याय नाही. मातीच्या या भांड्यात फक्त रोजच्या वापराचं इन्सुलिन ठेवता येतं. टाईप-1 मधुमेही रुग्णांना दररोज इन्सुलिन घ्यावं लागतं. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात इन्सुलिन यात ठेवता येत नाही. तापमानाचा इन्सुलिनवर परिणाम होतोच. "

या मातीच्या भांड्यात ठेवण्यात आलेलं इन्सुलिन किती दिवस चांगलं आणि सुरक्षित राहतं?

डॉ. सारडा सांगतात, "आम्हाला आढळून आलंय की, महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे शेवटचे काही दिवस आम्ही मुलांना डोस वाढवण्यासाठी सांगतो." इन्सुलिनची नवी बाटली उघडली की डोस पहिले काही दिवस कमी करायचा. याचं कारण नवीन इन्सुलिन प्रभावी असतं.

डॉ. सारडा म्हणाल्या, "हा काही उत्तम आणि अंतिम पर्याय नक्कीच नाही. पण, ज्यांच्याकडे फ्रीज किंवा वीज नाही. इन्सुलिन पॉट त्यांचे जीव वाचवतोय हे मात्र नक्की."

'उडान' या संस्थेशी सध्या महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यातील जवळपास 1000 मुलं संलग्न आहेत. यात प्रामुख्याने मराठवाड्याच्या जालना, बीड, औरंगाबाद, प्ररभणी आणि लातूर या जिल्ह्यांमधील मुलं आहेत. डॉ. सारडा म्हणाल्या, दरवर्षी जवळपास 500 मुलांना आम्ही हा पॉट वापरण्यासाठी देतो.

जगभरात हा पॉट वापरणं शक्य आहे?

या इन्सुलिन पॉटबाबत फार जास्त लोकांना माहिती नाही. भारतातही याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.

ही कल्पना भारतातील इतर जिल्ह्यात आणि जगभरात वापरता येणं शक्य आहे का?

याबाबत विचारल्यानंतर डॉ. अर्चना सारडा म्हणाल्या, "हा पॉट रुग्णांची गरज लक्षात ठेऊन तयार करण्यात आलाय. भारतात किंवा जगभरात वापरायचा असेल तर पॉट कसा असावा, कसा वापरावा याबाबत अभ्यास करून ठोस शिफारस करावी लागेल."

"आपल्याला माहिती शेअर करायला हवी. जेणेकरून याचा फायदा जास्तीत-जास्त लोकांना होईल. भारतात किंवा परदेशातही याचा फायदा लाखो लोकांना होऊ शकेल. ज्यांच्याकडे फ्रीज नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)