शिवांगी सिंह : हवाई दलाच्या चित्ररथावरील राफेलच्या पायलटची ही कहाणी

फोटो स्रोत, PIB
- Author, सुशिला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राफेल फायटर जेट उडवणाऱ्या पायलट शिवांगी सिंह यंदाच्या 26 जानेवारीच्या परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या चमूत सहभागी झाल्या होत्या.
एखादी महिला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात हवाई दलाच्या टीममध्ये महिलेचा समावेश असल्याची ही दुसरी वेळ आहे.
गेल्यावर्षी फ्लाइट लेफ्टनंट भावना कांतदेखील राजपथावर झालेल्या या परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात बीबीसी हिंदीनं पायलट शिवांगी सिंह यांच्या आई सीमा सिंह यांच्याशी बातचित केली होती.
त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीला एअरफोर्समध्ये पायलट बनण्याची प्रेरणा कशी मिळाली होती, याची कहाणी सांगितली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"अनेक लोकांना फार उंचीकडे किंवा उंचीवरून पाहून भीती वाटायला लागते. आम्ही स्वतःदेखील घाबरतो मात्र तिला आकाशाला गवसणी घालायची इच्छा होती. तिची प्रचंड इच्छा होती आणि त्यामुळं तिनं पायलटच बनणार असं ठरवलं होतं."
एवढं बोलल्यानंतर लेफ्टनंट शिवांगी सिंह यांच्या आई खळखळून हसल्या.
फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह भारतीय हवाई दलाच्या राफेल स्क्वाड्रनच्या पहिल्या महिला पायलट असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशच्या बनारसमधील शिवांगी सिंह 2017 मध्ये हवाई दलात दाखल झाल्या आणि त्या मिग-21- बायसन उडवत आहेत.
त्यांच्या आई सीमा सिंह सांगतात की, शिवांगी नववीमध्ये असताना आजोबांबरोबर दिल्लीमधील एअर फोर्स म्युझियम पाहण्यासाठी गेल्या होत्या.
त्याठिकाणी हवाई दलात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गणवेश पाहून त्या एवढ्या भारावून गेल्या की, त्याच दिवशी त्यांनी हवाई दलात जाऊन केवळ पायलटच बनणार हे ठरवून टाकलं होतं.

फोटो स्रोत, निलांबुज तिवारी
शिवांगी यांना हवाई दलात दुसरं काहीही करायची इच्छा नव्हती. त्या बीएससी करत होत्या त्यावेळी त्या नॅशनल कॅडेट कोर म्हणजे एनसीसीच्या एअर विंगमध्येही सहभागी होत होत्या. बीएससीच्या दुसऱ्या वर्षात त्यांनी एअर फोर्समध्ये प्रवेशासाठी परीक्षा दिली. प्रचंड मेहनत घेतल्यानं त्यांची निवडही झाली.
पण त्यांची निवड झाली तेव्हा त्यांच्या आजोबांनी हवाई दलात 'नॉन फ्लाइट स्ट्रीम' घेण्याचा सल्ला दिला आणि पायलटचं काम सोडण्यास सांगितलं.
त्यावर शिवांगी यांनी, "माझं स्वप्न पायलट बनण्याचं आहे. जर नॉन फ्लाइंग स्ट्रीम घ्यायची असेल तर मी स्वतःच हवाई दल सोडून देईल," असं म्हटलं होतं.
सीमा सिंह सांगतात की, शिवांगी या सुरुवातीपासूनच बोल्ड आहेत. खेळातही त्यांना भरपूर आवड होती. त्या बास्केट बॉल क्रीडा प्रकारात नॅशनलपर्यंत गेल्या होत्या आणि चॅम्पियनही बनल्या होत्या. अॅथलेटिक्समध्ये शिवांगी यांना दोन वेळा सिलव्हर आणि गोल्ड मेडल मिळालं आहे.
"शिवांगी खेळण्यासाठी ट्रॅकसूट सारखे कोणतेही कपडे परिधान करून निघून जायच्या. माझा पुतण्या मला सांगायचा की, घरापासून शाळेपर्यंत शिवांगीकडे कोणताही मुलगा अगदी नजर वर करूनही पाहत नव्हता. कुणाचीही तशी हिम्मत नव्हती. त्यावर ही चांगली बाब आहे, असं मी म्हणायचे," अशा आठवणी सीमा यांनी सांगितल्या.

फोटो स्रोत, सीमा सिंह/निलांबुज तिवारी
सीमा सिंह यादेखील लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील म्हणजे शिवांगी यांचे आजोबा हे लष्करामध्ये कर्नल होते. पण शिवांगी यांनी सशस्त्र दलामध्ये सहभागी व्हावं, असं स्वप्न सीमा यांनी कधीही पाहिलं नव्हतं. शिवांगी यांचे वडील उद्योजक आहेत. मुलीला तिचं स्वप्न पूर्ण करता आलं, याचा त्यांना प्रचंड आनंद आहे.
जिद्दीमुळं गाठलं ध्येय
"शिवांगी या लहानपणापासून मस्तीखोर आणि जिद्दी होत्या," असं सीमा सांगतात. पतंग उडवायचा नाही, असं त्यांना खूप समजावलं जात होतं, पण त्या कुणाचंही ऐकत नसायच्या.
दिवाळीमध्ये फटाके फुटत असतानाही त्यांना लांब राहायला सांगितलेलं असायचं, मात्र त्यांची मस्ती सुरुच असायची.
एकदा अपघातातूनही ते थोडक्यात बचावल्या होत्या.
शिवांगी यांना त्यांच्या आईनं एक दोन वेळा मारही दिला होता. अभ्यातसात त्या नेहमी हुशार होत्या. पण एखाद्या गोष्टीची जिद्द केली, तर ती त्या पूर्ण करायच्याच. या जिद्दीच्या जोरावरच त्या इथपर्यंत पोहोचल्या, असं त्यांच्या आईनं सांगितलं.

फोटो स्रोत, सीमा सिंह/निलांबुज तिवारी
आता शिवांगी राफेल उडवणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर आईचं मन काय म्हणतं?
याचं उत्तर देताना सीमा सिंह म्हणाल्या, "पायलट बनल्यानंतर धोका तर असतोच. पण मी आनंदीही आहे आणि घाबरलेलीही आहे. पण जिला विमान उडवायचं आहे, तिला भीती वाटत नाही."
भारतीय हवाई दलातील महिला
सरकारच्या PIB वेबसाईटवर 4 मार्च 2020 ला प्रकाशित माहितीनुसार, भारतीय लष्करात 6892, हवाई दलात 1878 आणि नौदलात 685 महिला अधिकारी आहेत.
भारतीय हवाई दलाच्या कोणत्याही ब्रँच किंवा स्ट्रीममध्ये महिला सहभागी होऊ शकतात.
'इंडक्शन अँड एम्पॉवरमेंट ऑफ विमेन इन आर्म्ड फोर्सेस' या धोरणांतर्गत महिलांना हवाई दलात करिअर करता यावं यासाठी प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जाहिरातीही दिल्या जातात.

फोटो स्रोत, सीमा सिंह/निलांबुज तिवारी
सरकारने 2015 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे फायटर विंगमध्ये महिलांना स्थान देण्यास सुरुवातही केली होती. या महिलांना फायटर विंगमध्ये कायमस्वरुपी कमिशन देण्याची तयारीही सध्या सुरू आहे.
शिवांगी जे राफेल लढाऊ विमान उडवणार आहेत, ते जगातील सर्वोत्तम आणि प्रभावी शस्त्रांपैकी एक आहे. राफेल हे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र हल्ला करण्यातही सक्षम आहे.
फ्रान्समधून पाच राफेल विमानं याचवर्षी भारतात दाखल झाले आहेत. त्यांचा हवाई दलामध्ये समावेशही करण्यात आला आहे. अंबालाला पोहोचलेल्या या राफेल विमानांसाठी भारत 60-70 किलोमीटरच्या अंतरापर्यंत योग्य मारा करणारं हॅमर क्षेपणास्त्रदेखील खरेदी करत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








