गरोदर महिला आरोग्य: 'आम्ही गेली अनेक वर्षं 'हे' करतोय, पण यापूर्वी ती कधीच प्रेग्नंट राहिली नाही'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. शैलजा चंदू
- Role, बीबीसीसाठी
मी आत शिरताना पाहिलं, तर बाहेर एक माणूस उभा होता. हातात पाण्याची रिकामी बाटली आणि चेहऱ्यावर निराशा. बाजूला सरकत त्याने मला आत जायला वाट करून दिली.
स्कॅनिंग रूममध्ये गेले, तर बेडवर एक पेशंट होती. माझी सहकारी डॉ. वर्षिता स्कॅन करत होती. मी हळूच तिच्या मागे जाऊन उभी राहिले.
रडत, पदराच्या टोकाने चेहरा झाकत त्या पेशंटने तोंड दुसऱ्या बाजूला फिरवलं.
कदाचित तिला त्रास होत असावा.
पण तिच्या पोटावर फिरवण्यात येणाऱ्या स्कॅनिंग प्रोबशी याचा काही संबंध असेल असं त्या पेशंटकडे पाहून मला वाटलं नाही.
मी पडद्यावरच्या स्कॅनकडे पाहिलं.
तिच्या गर्भाशयाला लागूनच रिंगसारखं काहीतरी दिसत होतं.
मी स्क्रीनच्या जवळ जात नीट निरखून पाहिलं... Ectopic Pregnancy…गर्भाशयाबाहेर झालेली गर्भधारणा.

फोटो स्रोत, Getty Images
कधीकधी गर्भधारणा ही गर्भाशयाच्या आत न होता, त्याच्या बाजूच्याच नलिकेत ( Fallopian Tube) होते. नलिकेचा आकार कमी असल्याने गर्भाची वाढ दोन महिन्यांपेक्षा अधिक होऊ शकत नाही. वर्षिता गर्भाचा आकार तपासत होती, "मॅडम 4.2 सेंटीमीटर्स," तिने सांगितलं. म्हणजे हृदयाचे मंद ठोके असणारा अतिशय लहान गर्भ.
नलिकेतली ही गर्भधारणा अतिशय लहान असेल तर कधी कधी इंजेक्शनद्वारे उपचार करता येतात. पण जर गर्भाचा आकार 3.5 सेंटीमीटरपेक्षा मोठा असेल, किंवा हृदयाचे ठोके ऐकू येत असतील तर मग असा गर्भ शस्रक्रियेद्वारे लवकरात लवकर काढावा लागतो. कारण जर तातडीने हे केलं नाही तर ही नलिका फुटण्याचा धोका असतो.
"तिने काही खाल्लंय का?"
त्या महिलेने कधी खाल्लं-प्यायलं होतं याची वर्षिताने चौकशी केली. आम्हाला तिच्या खाण्यापिण्याची सोय करायची नव्हती. पण जर ती रिकाम्या पोटी आलेली असेल तर तिच्या शस्त्रक्रियेची ताबडतोब तयारी करता आली असती.
"कोणी नातेवाईक आहे का?" मी कुजबुजत विचारलं.
"मॅडम, नवरा बाहेरच आहे."
आम्ही तिच्याकडून आणखी माहिती घेतली. तिने वयाची चाळीशी ओलांडलेली होती आणि तिला कॉलेजला जाणारी मुलं होती.
या खोलीत आल्यापासून ती रडत असल्याचं माझ्या लक्षात आलं.
तिला वेदना होत असल्याचं वाटून वर्षिताने तिला स्कॅनिंग प्रोबवरची जेल पुसत पुसत विचारलं, "मॅडम, तुम्हाला दुखतंय का?" तिने मान हलवत नकार दिला, पण तिच्या चेहऱ्यावर काळजी होती.
"वाईट वाटून घेऊ नका, आम्ही आहोत. काळजीचं कारण नाही असं मी म्हणणार नाही. पण गर्भ अतिशय लहान आहे. शस्त्रक्रिया अर्ध्या तासात होईल. आणि आम्ही लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) सर्जरी करणार असल्याने टाकेही घालावे लागणार नाहीत.
दुसऱ्याच दिवशी तुम्ही घरी जाऊ शकाल. आठवड्याभराने तुम्हाला कामावरही जाता येईल," मी त्या महिलेच्या जवळ जात समजावलं. तरीही तिने चेहऱ्यावर ओढलेला पदर काढला नाही. ती रडतच होती.
"तुम्हाला ऑपरेशनची भीती वाटतेय का?"
"नाही..."
"मग काय?"

फोटो स्रोत, Getty Images
"ते काय म्हणतील माहित नाही. त्यांना पटकन राग येतो."
"ते कशाला काही म्हणतील?"
"आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं. तो खरंच गर्भ आहे का?"
"बिटा एचसीजी (Beta HCG) काय आहे?" मी वर्षिताला विचारलं.
"600 मॅडम."
"प्रेग्नन्सीमुळे हार्मोनची पातळी इतकी वाढलेली आहे. गर्भधारणा नसती तर ही पातळी शून्यावर असतील. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्कॅनिंगमध्ये प्रेग्नन्सी दिसतेय. पण गर्भायशाच्या पिशवीऐवजी गर्भधारणा नलिकेत झालीय."
"पण तुम्हाला ही शंका का आली?"
"हे कसं झालं माहित नाही. आम्ही काळजी घेतली होती."
"काळजी...म्हणजे तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या वा इंजेक्शन घेतलं होतं का?"
"नाही मॅडम..." सांगायला ती चाचरत होती.
"ही काळजी तेच घेतात..."
"ओह! तुम्ही काँडम वापरता का? त्यातही होतं असं कधीकधी."
आमच्या प्रश्नांनी तिला अवघडल्यासारखं होत होतं.
नजर वर न वळवता ती उत्तरं देत होती.
"नाही, नाही. आम्ही या कोणत्याही पद्धती वापरत नाही. ते काळजी घेतात."
आम्ही दोघी ऐकत होतो.
"ते शेवटच्या क्षणी खबरदारी घेतात..." थोडं थांबून ती म्हणाली.
तिला काय सांगायचंय ते आम्हाला कळलं.
शेवटच्या क्षणी लिंग बाहेर काढत योनीच्या बाहेर वीर्यपतन करण्याची ही पद्धत.
"गेली अनेक वर्षं आम्ही हे करतोय. पण असं कधी घडलं नव्हतं."
"तुम्ही नशिबवान म्हणून असं घडलं नाही. गर्भधारणा रोखण्यासाठीच्या इतर पद्धतींशी तुलना केली तर ही पद्धत सर्वात असुरक्षित आहे."
"तसंही मी गर्भार कशी राहिले, यावरून ते रागवले आहेत."
"रागवायचं का? ते का चिडले आहेत?" वर्षिताने चिडून विचारलं.
"तुम्ही वापरत असलेली पद्धत ही फारशी परिणामकारक नाही. यामुळे गर्भधारणेपासून 100 टक्के संरक्षण मिळतं असं जर कोणाला वाटत असेल, तर ते चूक आहे. मी सांगेन त्यांना. काळजी करू नका."
"तुम्ही कसं सांगाल?" ती साशंक होती.
या गोष्टींबाबत त्याच्याशी बोलता येईल का, याची तिला खात्री नव्हती. आणि जरी सांगितलं असतं, तरी त्याचा यावर विश्वास बसला नसता. हे इतक्या सहजपणे पटेल का, याबाबत तिला शंका होती.
"आमची सांगायची एक पद्धत असते. मी तुमच्यासमोरच सांगेन त्यांना. ही पद्धत परिणामकारक कशी ठरत नाही, हे तुम्हालाही माहिती हवं."
"नाही, नाही. प्लीज नको."
अशा गोष्टी बायकोने ऐकलेल्या त्याला आवडत नाही, हे तिला माहिती होतं.
"यामध्ये अपमानास्पद काहीच नाही. आपण खासगीमध्ये करतो त्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या नसतात. आपण आंघोळही खासगीतच करतो की."
"हे सगळं मी तुम्हाला बोलायला सांगितलं, असं त्यांना वाटलं तर?"
"त्यांना असं वाटण्याची शक्यताच नाही. विज्ञानाबद्दलच्या खऱ्या गोष्टी या शंका दूर करतात, निर्माण करत नाहीत."
तिला पुन्हा एकदा रडू कोसळलं.
लग्न न झालेल्या मुलींना या गोष्टींवरून रडताना मी पाहिलं होतं. पण ही महिला 40 वर्षांची होती. शालेय खात्यात अधिकारी म्हणून काम करत होती. मोठ्या पदावर होती.
या वयातली प्रेग्नन्सी, ऑपरेशन करायला लागणं, ही कारणं होतीच. पण नवऱ्याचा तिच्यावर विश्वास नाही याचं दुःख होतं. या तिसऱ्या अडचणीच्या तुलनेत पहिल्या दोन अडचणी लहान होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
नवरा बाहेर कॉरिडॉरमध्ये वाट पाहत होता. चेहऱ्यावर फारसे चांगले भाव नव्हते. आत यायला सांगितल्यावर त्याने हातातली रिकामी बाटली टाकली आणि आत आला.
वर्षिताने ऑपरेशनसाठी गरजेचे असणारे कन्सेन्ट पेपर्स (Consent Paper - ऑपरेशनसाठी तयार असल्याची लेखी हमी) तयार करून टेबलवर ठेवले. माहिती देऊन समजवल्यानंतर तो ऑपरेशनसाठी लगेच तयार होईल, असं तिला वाटलं.
ती प्रेग्नंट आहे आणि ही गर्भधारणा नेहमीच्या जागी न होता बाहेरील नलिकेत असल्याचं मी त्याला सांगितलं. यासाठी ऑपरेशन करणं गरजेचं होतं.
"तिला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये रहावं लागेल."
"तिला कोणतीतरी औषधं द्या. आम्ही घरी सगळं तसंच सोडून आलोय. आम्हाला जायला हवं."
"औषधांनी हे शक्य नाही."
"का शक्य नाही? माझ्या मेव्हण्याच्या बायकोची प्रेग्नन्सीही ट्यूबमध्ये होती. त्यांनी तिला औषधं दिली आणि काम झालं. हे तू त्यांना का नाही सांगितलंस?" त्याने बायकोला काहीशा उद्धटपणेच विचारलं.
त्याच्याकडे पाहून तिने मान खाली घातली.
तो वैतागला होता. त्याला घरी जायचं होतं. लवकर घरी गेला असता तर हा राग घरी काढता आला असता. बायकोचा, डॉक्टरचा आणि तिच्या असिस्टंटचा त्याला राग आला होता. सगळ्यांचाच त्याला राग आला होता.
डॉक्टरच्या खोलीत बसून ती सांगत असलेला तपशील ऐकायला त्याच्याकडे वेळ नव्हता.
"भाऊ, मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत."
"हो, काही गोष्टी भावांना आणि मुलग्यांना सांगता येतात."
मी वर्षिताकडे पाहिलं. तिने चौघांसाठी पेपर कपमधून कॉफी आणली.
"पाच मिनिटं मी काय सांगतेय ते ऐका. मी जे सांगणार आहे, ते तुम्हाला माहिती नाही अशातली गोष्ट नाही. पण तरीही ऐका. कॉफी घ्या."
सूचना आणि विनंती कॉफीसोबत कशी द्यायची हे तंत्र मी शिकलेय.
एका कागदावर मी गर्भाशय आणि नलिकांचं चित्रं काढलं.
"हे पहा, या नलिका गर्भाशयाला लागून आहे. या दोन्ही अतिशय पातळ आहेत. इथेच गर्भफलन होतं. म्हणजे अंड (Egg) आणि स्पर्म इथे या नलिकेत एकत्र येतात." मी पेनाने चित्र काढून दाखवत होते.
"फलन झाल्यानंतर गर्भाचं अनेक लहान पेशींत विभाजन होऊन त्याचा गोल आकार होईल. आणि हळुहळू तो सरकून गर्भाशयाच्या भिंतीला चिकटेल. आणि नंतर बाळाची वाढ सुरू होईल."
गर्भाशयाच्या भिंती मजबूत असतात. नऊ महिने बाळाचं वजन पेलण्यासाठी त्या विस्तारू शकतात. 3 अगदी 4 किलोचं बाळही त्या सामावू शकतात. कधी कधी तर जुळी बाळंही.
पण आता भ्रूण हा नलिकेच आहे. आणि नलिका अतिशय लहान आहे. पेनाने दाखवत मी म्हणाले, "इतकी बारीक आहे. या नलिकेला भ्रुणाला आधार देता येणार नाही. वेदना होतील. रक्तस्राव होईल. तातडीने उपचार केले नाहीत, तर ही नलिका फुटायचा मोठा धोका आहे."
"ती फुटली, तर धोका असतो?"
"हो. अंतर्गत रक्तस्राव होईल. खूप रक्त गेलं तर रुग्णावर परिणाम होऊ शकतो."
"पण आमच्या विश्वमच्या बायकोची प्रेग्नन्सीही ट्यूबमध्ये होती. मला वाटतं त्यांनी तिला औषधं दिली."
"हो, तसेही उपचार करता येतात. पण त्यासाठी भ्रुणाचा आकार 35 मिलीमीटरपेक्षा लहान असावा लागतो. आणि प्रेग्नन्सी हार्मोनची पातळी 1500 ते 5000 दरम्यान असावी लागते. शिवाय जर भ्रूणाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत असतील, तर अशी औषधं देण्याचा प्रयत्न करता कामा नये. ऑपरेशन हाच योग्य उपाय आहे."
"पण मला कळत नाहीये...प्रेग्नन्सी कुठेही असली, अगदी ट्यूबमध्येही....तरी सगळी काळजी घेऊनही असं झालंच कसं?"
"गर्भधारणा टाळण्यासाठीच्या प्रत्येक पद्धतीत काही टक्के अपयश येण्याची वा पद्धत परिणामकारक न ठरण्याची शक्यता असतेच. काही पद्धतींमध्ये ती जास्त असते, काहींसाठी कमी."
"गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या हजारोंपैकी एकाच्या बाबतीत त्या गोळ्या परिणामकारक न ठरण्याची शक्यता असते. पण नैसर्गिक पद्धतीमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे...जवळपास 20 टक्के!"
"म्हणजे?"
"असं समजूयात की 100 जोडपी वर्षभर ही पद्धत वापरत आहेत. तर त्यातल्या पाचपैकी एक जोडपं प्रेग्नंट असण्याची शक्यता आहे."
"असं कसं शक्य आहे? जर स्पर्म्स बाहेर सोडले जात असतील, तर गर्भधारणा कशी होऊ शकते?"
"इथेच तुमचं चुकतंय. तुम्हाला असं वाटतं ही सगळे स्पर्म योनीच्या बाहेर पडले. पण नाही...वीर्यस्खलनाच्या आधी जो द्राव स्रवतो, त्यातही स्पर्म असतात. तुमच्याही नकळत ते गर्भाशयाच्या मुखापर्यंत पोहोचतात."
"पण आतापर्यंत असं कधीच घडलं नाही."
"आपण रोज चालतो. पण आपल्याला रोज ठेच लागत नाही."
त्याचा गोंधळ दूर झाल्यासारखा वाटला आणि त्याने पेपर्सवर सह्या केल्या. सही केल्यानंतर त्याने मला अनेक सूचना देत आणि बायकोला धीर देत ऑपरेशन थिएटरकडे पाठवलं.

फोटो स्रोत, Getty Images
शस्त्रक्रिया पार पडली, तेव्हा तो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा होता. ऑपरेशन कसं झालं, याची त्याने चौकशी केली. त्याची चिडचिड आता एकदम गेली होती.
मी काऊन्सेलिंग रूममध्ये त्याला नेऊन ऑपरेशनदरम्यान काढलेले फोटोज आणि व्हिडिओ दाखवले.
"आम्हाला ट्यूब काढावी लागली. बाकीचे अवयव चांगले आहेत."
"डॉक्टर, मला काही शंका आहेत."
"सांगा..."
"गर्भाशयाच्या मुखाशी पडणाऱ्या स्पर्मला नलिकेपर्यंत पोहोचाला किती काळ लागतो?"
"सुमारे अर्धा तास."
नंतर आमच्यात अगदी एखाद्या सेमिनारमध्ये असावं असं संभाषण झालं. आमचे शिक्षक विचारतात त्यापेक्षा कठीण प्रश्न त्याने मला विचारले.
"एकदा बाहेर पडल्यानंतर स्पर्म किती दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो?"
"अंडं तयार झाल्यानंतर ते किती दिवस फलनासाठी योग्य असतं?"
"नलिकेत तयार झालेला भ्रूण गर्भाशयात पोहोचायला किती काळ लागतो?"
यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे होती.
"गर्भाशयाऐवजी नलिकेत गर्भधारणा होऊ नये म्हणून काही औषधं वा प्रक्रिया आहेत का?"
"गर्भाशयाबाहेरची प्रेग्नन्सी टाळण्यासाठी कोणत्याही विशेष प्रक्रिया नाही. प्रभावी गर्भनिरोधकं आणि पद्धती वापरणं हाच एकमेव मार्ग आहे."
"नाही, तसं नाही. म्हणजे तपशील माहिती असेल, तर आम्हाला वेळ ठरवता येईल. असं ऑपरेशन करावं लागू नये यासाठी खबरदारी घेऊ शकतो."
"जर रस्त्याने प्रवास करायचा असेल तर मग ट्रॅफिकचे नियम माहिती असलेले बरे. आपल्याला पूर्ण ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्याची गरज नाही. ते शक्यही नाही."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

दुसऱ्या दिवशी तो बायकोला घेऊन जात असताना आम्ही त्याला हॉस्पिटलबाहेर भेटलो.
"तुमचं घर कुठे आहे?"
त्याने मला ते रहात असलेल्या कॉलनीचं नाव सांगितलं.
"मग, तुम्ही या बाजूला का जाताय?"
"एक्स्प्रेस वे बंद केलाय. म्हणून द्वारकानगर मार्गे जायचा विचार आहे."
बरं म्हणून मी जायला निघाले.
"डॉक्टर, एक शंका आहे."
"बोला."
"तुम्ही एक नलिका काढली. म्हणजे धोका 50 टक्क्यांनी कमी झाला. मग अजूनही खबरदारी घेणं गरजेचं आहे का?"
"हो, गरजेचं आहे."
तो तरीही माझ्याकडे पहात होता.
"दुसरी नलिका अजूनही आहे. खबरदारी घेणं आवश्यक आहे. एक्स्प्रेस वे बंद असला तरी तुम्ही द्वारकानगर मार्गे घरी पोहोलच...हो की नाही? तसंच आहे ते."
प्रत्येकाच्या डोक्यात विचार करणारा एक मेंदू असतोच.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








