Pushpa सिनेमाने हिंदीत 'या' कारणांमुळे कमावला कोट्यवधींचा गल्ला

पुष्पा सिनेमा, अल्लू अर्जुन

फोटो स्रोत, Twitter / @PushpaMovie

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, भारतीय भाषा

'पुष्पा' या तेलुगू चित्रपटाचा हिंदी व्हर्जनदेखील चांगला व्यवसाय करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अगदी रणवीर सिंगच्या 83 चित्रपटापेक्षाही चांगली कमाई हा चित्रपट करत आहे. त्यामुळं आता सिनेचाहत्यांमध्येही 'पुष्पा' चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वांत महत्त्वाचं तुम्हाला जर अद्याप अल्लू अर्जुन कोण आहे हे माहिती नसेल, तर तो साऊथचा सुपरस्टार असून त्याच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्याचे वडील अल्लू अरविंद हे बॉलिवूडमधील चित्रपटांची निर्मिती करायचे. गझनीसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे.

'पुष्पा' हा पूर्णपणे मसाला आणि पुरुषप्रधान चित्रपट आहे. सुकुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यातील नायकाचा वेगळाच स्वॅग असून गाणी, अॅक्शन हे अगदी सलमान खान किंवा अक्षय कुमार यांच्या चित्रपटांसारखे आहेत. या चित्रपटांप्रमाणेच हिरो या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

या चित्रपटाची कथा ही ग्रामीण भागातून उदयाला आलेल्या नायकाची आहे. हा नायक वंचित पार्श्वभूमीतला असून गावात त्याला किंवा त्याच्या आईला कोणत्याही प्रकारचा सन्मान किंवा अगदी ओळखही मिळत नाही. अगदी जन्मापासून अशीच स्थिती असते. पण तो एक साधारण कुली ते मोठा चंदन तस्कर कसा बनतो याची ही कथा आहे.

हा चित्रपट तीन तासांचा असल्यामुळं सलग बसून राहण्यासाठी काहीसा संयम लागतो. पण चित्रपट टप्प्याटप्प्यानं का होईना, पण खिळवून ठेवतो. जंगलातली काही उत्तम अशी सिनेमॅटोग्राफी तसंच अल्लू अर्जुनचा रांगडी स्टाइल हे आवडून जातं. अल्लू अर्जुननं या भूमिकेत जीव ओतला आहे.

पण चित्रपट मध्येच भरकटल्याचं जाणवतं. तसंच अचानक आलेला रोमँटिक ट्रॅक विचित्र वाटतो. सर्वांत मोठा तस्कर बनण्याची कथा असलेल्या या चित्रपटात नायकाला टक्कर देणारं दुसरं कोणीही नाही. एक धाडली पोलिस दाखवला आहे, मात्र तोही चित्रपटातून अचानकच बेपत्ता होतो.

चित्रपटातील अल्लू अर्जुनची प्रत्येक फ्रेम आणि प्रत्येक डायलॉग पाहिल्यानंतर त्यानं संपूर्ण चित्रपटाचं ओझं एकट्यानं खांद्यावर वाहिल्याची जाणीव होते.

अल्लू अर्जुन पुष्पा

फोटो स्रोत, PUSHPA/YOUTUBE

अल्लू अर्जुनशिवाय इतर विचार करता चित्रपटात महिला पात्रांना अगदी मर्यादित संधी दिली आहे. त्याशिवाय केवळ अल्लू अर्जुनचा डायलॉग, डान्स आणि अॅक्शन हेच असणार हे सुरुवातीलाच स्पष्ट होतं.

चित्रपटातील मुख्य नायिकेचं पात्र श्रिवल्ली हे आहे. मात्र तिलाही चित्रपटामध्ये ग्रामीण अडाणी तरुणीच्या अभिनयाशिवाय फारसा वाव नाही. चित्रपटाच्या क्रेडिटमध्येही अभिनेत्रीचं नावही बरोबर दिलेलं नाही. क्रेडिटमध्ये Rasmika Madona असं नाव आहे. मात्र ते Rashmika Mandanna असायला हवं.

चित्रपटामध्ये काही दृश्य आक्षेपार्हही आहेत. मात्र, चित्रपटाच्या गाजावाजामध्ये त्याकडे दुर्लक्ष झालं आहे. उदाहरण दयायचं झाल्यास नायक (त्यावेळी नायिकेशी ओळख नसलेला) तिच्यावर प्रेम आहे म्हणून तिनं त्याला किस करू द्यावं यासाठी भरपूर पैसे देऊ करतो. तो तिची परवानगी किंवा तिच्या भावना जाणून घेण्याचाही प्रयत्न करत नाही.

नायिकाही तिच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून तयार होते, जणू तिला स्वतःची बुद्धीच नाही. सध्याच्या लैंगिकतेविषयी संवेदनशील अशा काळात 2022 मध्ये आलेल्या या चित्रपटात अशा प्रकारची दृश्य असतील याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. अगदी हा चित्रपट 2000 च्या पूर्वीच्या काळातील असला तरी.

दुसऱ्या एका दृश्यामध्ये जेव्हा खलनायक तिच्याबरोबर बळजबरी शारीरिक संबंध ठेवू इच्छित असतो, तेव्हा अचानक नायक येतो आणि तिच्याविषयीचं प्रेम व्यक्त करून त्यांच्या आधीच्या सर्व कृत्यांचं समर्थनही करतो.

त्यानंतर तिनं दिलेला तर्क आणि त्याबाबतचा डायलॉग हा तर आणखीच आश्चर्यचकित करणारा असा आहे. तो तुम्ही स्वतःच पाहिलेला बरा.

रश्मिका ही लवकरच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.

पुष्पा सिनेमातील दृश्य

फोटो स्रोत, PUSHPA/YOUTUBE

दुसऱ्या एका दृश्यामध्ये आणखी एक पुरुष पात्र, अत्यंत वाईट आणि महिलांवर अत्याचार आणि बलात्कार करणारं असं दाखवण्यात आलेलं आहे. पण एखादं मोठं यश असल्याप्रमाणे, माचो स्टाईलमध्ये हे सर्व दाखवण्याची खरंच गरज होती का? असा प्रश्नही पडतो.

आयटम साँग

अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये अत्यंत गरजेचं असलेलं आयटम साँगही यात आहे. आता याची खरंच गरज आहे का? किंवा कथेला त्याचा फायदा काय? यावर चर्चा होऊ शकते, पण एका विशिष्ट वर्गाच्या मनोरंजनासाठी ते गरजेचं आहे.

पुष्पा आयटम साँग

फोटो स्रोत, SCREENSHOT FROM YOUTUBE

तेलुगू सुपरस्टार समांथा हिनं आयटम साँग केलं असून तिनं नेहमीप्रमाणं चांगला परफॉर्मन्स दिला आहे. समांथा फॅमिली मॅनच्या यापूर्वीच्या सिझनमध्येही झळकली होती.

यातली महत्त्वाची बाब म्हणजे, गाण्याचे बोल हे महिलांकडे पुरुष कशा प्रकारे नजरा रोखून पाहतात, किंवा महिलांनी काहीही परिधान केलं तरी पुरुष महिलांना काय समजतात अशा आशयाचे आहेत. मात्र गाण्याचं चित्रिकरण मात्र, याच्या अगदी उलटं आहे, असं जाणवतं.

यातही एक खास बाब म्हणजे पुरुषांची चुकीची प्रतिमा मांडल्याप्रकरणी पुरुषांच्या एका संघटनेनं याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या गाण्यातील काही ओळींचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत... साडी नेसून आले तरी ते रोखून पाहतात...स्कर्ट परिधान केला तरी ते रोखून पाहतात... पण साडी असू द्या किंवा स्कर्ट कपड्यांनी काय फरक पडतो...पुरुषांच्या नजरा आणि विचारही वाईटच आहेत...

तुम्ही जर अल्लू अर्जुनचे फॅन असाल तर नक्कीच हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. त्याचा स्वॅग, चालण्याची स्टाईल हे सर्वकाही अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. काहींना अल्लू अर्जुन माहिती नसेल तर यापुढं त्याचे आणखी फॅन वाढतील.

हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय करत आहे तसंच ओटीटीवरही हा चित्रपट उपलब्ध आहे. त्यामुळं हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना इतर भाषांमधले चित्रपट पाहण्यासाठी अधिक संधी उपलब्ध आहेत. या सर्वाचा दीर्घकाळात बॉलिवूडवर कसा परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुष्पा चित्रपटाचा दुसरा भागही येणार आहे आणि त्यात फहाद फासील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. फहाद फासील मल्याळी अभिनेता असून गेल्या दोन वर्षात काही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

दिग्दर्शक - सुकुमार संगीत - देवी श्री प्रसाद तेलुगू आणि तमिळ गीतकार - चंद्रबोस आणि विवेक

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)