Pushpa सिनेमातल्या आयटम साँगमधील 'या' शब्दांमुळे का सुरू झालीये चर्चा?

फोटो स्रोत, SCREENSHOT FROM YOUTUBE
- Author, शरण्या ऋषिकेश
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
'पुष्पा' चित्रपटातील तोकड्या कपड्यांतील लक्षवेधक नृत्य असलेलं एक गाणं देशातील सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झालं आहे.
दाक्षिणात्य तेलुगू चित्रपट सृष्टीतलं हे नवं गाणं डिसेंबर महिन्यात रिलीज झालं. पुरुष महिलांना कशाप्रकारे नजर रोखून पाहतात याबाबतचं वर्णन असलेल्या या गाण्याकडं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
तेलुगू, तमीळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. केवळ 19 सेकंदाच्या फुटेजसह हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
सर्व भाषांमधील गाण्यांमधील शब्दांचा अन्वयार्थ मात्र सारखाच आहे. तो म्हणजे, 'महिला तरुण असो वा वयस्कर, उंच असो वा ठेंगणी, तिनं साडी परिधान करू द्या अथवा गाऊन काहीही झालं तरी पुरुषांच्या नजरांपासून ती वाचू शकणार नाही.'
पण अनेक महिलांना हे भावलेलं नाही. हा केवळ नौटंकीचा प्रकार आहे, असं त्यांचं मत आहे. तसंच ज्या गोष्टीवर हे सर्व आधारीत आहे तेच मोडीत काढल्याचा दावा करत हे आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं आहे. ती गोष्ट म्हणजे पुरुषांची नजर.
या गाण्यातील शब्दांवरून महिला म्हणजे रोखता न येणारा सायरन आणि पुरुष स्वतःवर नियंत्रण नसलेले आहेत, असं जाणवतं असा युक्तीवाद काही समीक्षकांनी केला आहे.
तर, त्यांच्या मते सध्याच्या काळात सर्वांना परिचित असलेल्या फॉर्म्युला मधील सर्व काही यात आहे. हा फॉर्म्युला म्हणजेच महिला नृत्य करताना डोलते तेव्हा पुरुष तिच्याकडे खेचला जाणं, नायिका सरकत असताना नायकावर स्वःला झोकून देणं आणि यादरम्यान कॅमेरा हा सातत्यानं तिच्या शरिरावर फोकस झालेला असणं.
एका समीक्षकाच्या मते, "या सर्वामुळं गाण्यामध्ये असलेले जे शब्द आक्षेपार्ह आहेत, ते उलट अधिक चवीनं पसंत केले जातील, याबाबत शंका नाही."
कामुक पण यशस्वी
"मी वेगवेगळ्या गाण्यांचे शब्द तपासले. जवळपास सर्वच व्हर्जनमध्ये एक ओळ आहे. त्याद्वारे महिलेची तुलना अन्नाशी करण्यात आली आहे," असं न्यूज मिनिट मधील फिचर्स एडिटर सौम्या राजेंद्रन म्हणाल्या. त्या प्रामुख्यानं चित्रपटांविषयीच लिखाण करतात.
"तमिळमध्ये मिठाई या अर्थाने, तेलुगूमध्ये अंगूर, मल्याळममध्ये साखर अशा प्रकारे उल्लेख आहे. महिलांना उपभोग्य वस्तू म्हणायचं आणि पुरुषांची नजर आणि कामुकता याचा उल्लेख करत ते योग्य ठरवायचं."

फोटो स्रोत, TWITTER/ALLUARJUN
प्रेक्षकांना (त्यापैकी बहुतांश पुरुष आहेत) गाणं आवडलं आहे. प्रेक्षक गाण्यातील नायिका आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सध्याची प्रमुख अभिनेत्री असलेल्या समांथा रुथ प्रभू हिचं तिच्या परफॉर्मन्ससाठी कौतुक करत आहे. पुष्पा चित्रपटात समांथा केवळ या गाण्यापुरतीच झळकणार आहे. आतापर्यंत अभिनयासाठी कौतुक होत असलेल्या समांथाचं हे रुप पाहून प्रेक्षक तिचं भरभरुन कौतुक करत आहेत.
चित्रपट प्रदर्शित झालेला असला तरी अद्याप पूर्ण व्हीडिओ समोर आलेला नाही. मात्र तसं असलं तरी केवळ तेलुगू व्हर्जनमध्येच यूट्यूबवर 10 कोटींपेक्षा जास्त वेळा हे गाणं पाहिलं गेलं आहे. तसंच त्याचं शीर्षक असलेलं ओओ अंटावा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.
अशा प्रकारचं आयटम साँग (भारतीय पुरुषांच्या बोलण्यातील उल्लेखानुसार आयटम असं आकर्षक महिलेला म्हटलं जातं) हा कायमच कामुक आणि यशस्वी फॉर्म्युला ठरला आहे.
बहुतांश आयटम साँगमध्ये गाण्यातील बोलांचा आणि दृश्यांचा विचार करता महिलांना मांसाच्या तुकड्याप्रमाणं सादर केलं जातं, असं सौम्या राजेंद्रन म्हणतात.
राजेंद्रन यांच्या मते, अशा गाण्यांमध्ये सर्वात वाईट किंवा कुप्रसिद्ध गाणं हे करिना कपूर खानवर चित्रित झालेलं 'फेव्हिकॉल' हे आहे. या गाण्यात नायिकाच स्वतःचा उल्लेख 'तंदुरी मुर्गी' असा करत दारु किंवा अल्कोहोलबरोबर तिचं सेवन करावं, अशा अर्थाचे बोल गाताना दिसते.
"अशा बहुतांश चित्रपटांतील गाण्यांमध्ये असलेल्या महिलेला काहीही पार्श्वभूमी नसते. ती केवळ गाण्यापुरती येते आणि नंतर गायब होते," असंही राजेंद्रन यांनी सांगितलं.
'आयटम साँग'वर दीर्घकाळापासून महिलांना आक्षेपार्ह पद्धतीनं सादर केल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यात घट्ट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे, सूचक असं नृत्य, विशिष्ट असे कॅमेरा अँगल याचा मोठा वाटा असतो. पण ते पुरुष प्रेक्षकाचं प्रमाण जास्त असलेल्या देशामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत, हे नाकारता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
लोकांना चित्रपट पाहण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि संगीत लोकप्रिय व्हावं म्हणून प्रसिद्ध गाणं हे चित्रपटांसाठी एकेकाळी गरजेचं असायचं. त्यात आता युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या काळात तर गाणी अधिकच फायदेशीर ठरत असल्याचं जाणवत आहे.
दशकांपासून 'वस्तू' म्हणून मांडणी
पत्रकार अरुण कटियार यांनी 1994 मध्ये एका गाण्याबाबत लिहिलं होतं.
'गेल्यावर्षी आलेल्या या गाण्याच्या यशामुळं लोकं ज्याला फॉर्म्युला म्हणतात अशा आयटम साँगची क्रेझ वाढण्यास मदत झाली. लोकांना त्यातील अश्लील शब्द आवडतात.'
हे गाणं होतं, चोली के पिछे क्या है. त्याचा अर्थ तुमच्या ब्लाऊजच्या मागे काय आहे? असा होतो आणि त्याचं अगदी साधं उत्तर होतं ते म्हणजे, माझं मन किंवा हृदय. पण त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या नृत्यातील छातीच्या भागाकडे संकेत करणाऱ्या स्टेप्स आणि हावभाव यातून इतरही काही उत्तरं दिसू लागली होती.
या गाण्यातील आक्षेपार्ह शब्द आणि विशिष्ट नृत्यांमुळं काही लोकांनी संताप व्यक्त केला. त्यात काही राजकारण्यांचाही समावेश होता. यामुळं पुरुषांना महिलांची छेड काढण्यास प्रोत्साहन मिळेल असं म्हटलं गेलं. पण हे गाणं प्रचंड हिट झालं.

फोटो स्रोत, FACEBOOK/ANARKALIOFAARAH
कालांतरानं कपडे अधिक कमी आणि घट्ट होत गेले. नेकलाईन्स आणखी खाल्या आल्या. गाण्यांतील शब्दांमुळं महिलांचं वस्तूसारखं सादरीकरणं होत नसलं तरी ते कॅमेऱ्यामुळं होऊ लागलं. हळू हळू "आयटम" साँग हे चित्रपटातील प्रमुख आकर्षण बनू लागले. ऐश्वर्या रायपासून ते कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणसारख्या अभिनेत्रीही यात झळकू लागल्या.
"चित्रपटात मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीला अशा प्रकारच्या गाण्यात पाहण्यात लोकांना फारसा रस नसल्यानं, जेवढी मोठी अभिनेत्री अशा आयटम साँगमध्ये असेल, तेवढं त्याला यश मिळण्याची शक्यता असते," असं टी सिरीजचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी विनोद भानुशाली यांनी 2010 मध्ये इंडियन एक्सप्रेसबरोबर बोलताना सांगितलं होतं.
त्यामुळं आयटम साँग हे 'कूल' ठरू लागले आणि नाईटक्लब्स तसेच लग्नांमध्ये डान्स करणाऱ्यांसाठी ते प्रेरणा ठरू लागले.
'आयटम' साँगने महिला सक्षम होतील?
"एखाद्या मुदद्याकडे तुम्ही कोणतच्या दृष्टीकोनातून पाहता ते तुम्ही त्याची मांडणी कशी करता आणि तुमचा कॅमेरा कसा वापरता, यावरून ठरत असतं," असं बिहारमधील गायिका आणि नृत्यांगनेवरील 'अनारकली ऑफ आरा' चित्रपट तयार करणारे अविनाश दास म्हणाले.
चित्रपटात अनारकलीची भूमिका साकारलेली स्वरा बिनधास्त नृत्य करताना दिसते. पण चित्रपटात तिला कधीही एखाद्या वस्तूसारखं सादर केलेलं नाही. तिच्या शरीराचे क्लोज शॉट्स कॅमेऱ्यानं टाळले आहेत. उलट तिच्या भोवतीचे प्रेक्षक तिला कशाप्रकारे नजरा रोखून पाहतात हे दाखवण्यासाठी कॅमेऱ्यानं शक्यतो, दुरुन शॉट घेतले आहेत.
एका अत्यंत समाधानकारक अशा आयटम साँगच्या वेगळ्या व्हर्जनमध्ये अनारकली ही शेवटी एक नृत्य सादर करते. तिला पूर्वी स्टेजवर छळणाऱ्या एका शक्तीशाली व्यक्तीचा बदला घेण्यासाठी ती याचा वापर करते.
हे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलं नाही. मात्र महिलेच्या लैंगिकतेला एका मर्यादेत सादर केल्याबद्दल समीक्षकांनी त्याचं कौतुक केलं. आयटम साँग याच्या अगदी विपरित असतात असं ते म्हणाले.
"जेव्हा तुम्ही महिलेच्या शरीराचे आकर्षक भाग तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहत असता, त्यात छाती, नाभी, नितंब यांच्या विशिष्ट हालचाली यांचा समावेश असतो. तेव्हा तुम्ही तिच्या स्वायत्तेवर दरोडा घालत असता. तर त्यात नृत्य करणारी महिला पुरुषांच्या त्या नजरांप्रती जणू स्वतःच समर्पण करत असते," असं अभिनेत्री शबाना आझमी 2018 मध्ये म्हणाल्या होत्या.
काही महिला कदाचित याबाबत सहमत नसतील. मलायका अरोरानं मला कधीही अशा गाण्यांमध्ये मला वस्तूसारखं सादर केलं असं वाटलं नाही, असं म्हटलं. कतरिना कैफनंही 2012 मध्ये तिचं प्रचंड हिट झालेलं आयटम साँग करताना मजा आल्याचं म्हटलं होतं. तर त्याच चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं मात्र आयटम साँगचा चित्रपटात समावेश केल्याबद्दल माफी मागितली होती.
आयटम साँग हे महिलांच्या लैंगिकतेचं सेलिब्रेशन असल्याचं म्हणत त्याचा काही वेळा बचाव केला जातो. पण तसं करणारे चित्रपट अनेकदा अडचणीत येतात, असं राजेंद्रन म्हणाल्या.
या सर्व दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी या गाण्यांचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम तपासायला हवा, असंही त्या म्हणाल्या.
"गाणं लोकांना त्यांच्या पूर्वग्रहांचा सामना करण्यासाठी दबाव आणून अस्वस्थ करत आहेत का? की ते त्यांना अधिक दृढ बनवत आहेत?" हे पाहणं गरजेचं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








