शरद पवार कधीपासून सरकारच्या घोषणा करू लागले? चंद्रकांत पाटील यांची टीका #5मोठ्या बातम्या

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Getty Images

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा

1. मुख्यमंत्री बदलले का? शरद पवार सरकारच्या घोषणा कधीपासून करू लागले? - चंद्रकांत पाटील

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. शरद पवार कधीपासून सरकारच्या घोषणा करू लागले? मुख्यमंत्री बदलले आहेत का? असे सवाल चंद्रकांत पाटलांनी केले आहेत.

ऐन सणासुदीच्या काळात होत असलेल्या या संपामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळं उच्च न्यायालयानंही या संपाची दखल घेत, संप मागं घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नसल्यानं हा विषय अधिक गंभीर बनला आहे.

याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यानं हे घडत आहे, असं पवार म्हणाले होते. न्यायालयानंही संप कायदेशीर नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं कोर्टाचा आदर करून विषय संपवण्याचं आवाहन पवारांनी केलं आहे.

यावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही. सरकार अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही, मात्र भाजप ताकदीने त्यांच्या मागे असल्याचं पाटील म्हणाले.

लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.

2. मुकेश अंबानी भारत सोडून जाण्याच्या चर्चा खोट्या, रिलायन्स समूहाचं स्पष्टीकरण

मुकेश अंबानींनी लंडनमध्ये एक मोठी मालमत्ता खरेदी केल्यानंतर ते कुटुंबासह लंडनला स्थायिक होणार अशी चर्चा होती. मात्र रिलायन्स समूहानं एका निवेदनाद्वारे ही चर्चा चुकीची असून ते लंडनमध्ये स्थायिक होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

अंबानी कुटुंब

फोटो स्रोत, Getty Images

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष किंवा त्यांच्या कुटुंबाची अशा प्रकारची कोणतीही योजना नसून ते लंडन किंवा जगातील इतर कोणत्याही ठिकाणी स्थायिक होणार नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

मुकेश अंबानी यांनी लंडनच्या बकिंघमशायरमधील स्टोक पार्क याठिकाणी 300 एकरची जागा विकत घेतली आहे. याठिकाणी एक ऐतिहासिक महालदेखील आहे. या वास्तुच्या आवारात एक हॉटेल आणि गोल्फ क्लबही आहे.

आगामी काळात वेगानं वाढणारा व्यवसाय लक्षात घेता ही मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या मालमत्तेचा वापर गोल्फ आणि इतर क्रीडा प्रकारांसाठी केला जाणार असल्याचंही रिलायन्सच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

3. पोटनिवडणुकीत लोकांनी आरसा दाखवताच इंधनाचे दर घटवले, काँग्रेसची सरकारवर टीका

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क कमी केल्यानं पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यावरून काँग्रेसनं सरकारवर पोटनिवडणुकीतील पराभवामुळं हे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.

यावर्षी पेट्रोलचे दर 28 रुपयांनी तर डिझेलचे दर 26 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. मात्र देशात 14 ठिकाणी पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळं लगेचच सरकारनं दर घटवले आहेत.

पेट्रोल डिझेल

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी सरकारचा टॅक्सजीवी आणि अर्थव्यवस्थेचा मोदीनॉमिक्स असा उल्लेख केला. मतांच्या माध्यमातून जनतेनं सरकारला आरसा दाखवल्याचं ते म्हणाले.

2014 कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 105.71 डॉलर एवढा होता. आज हा दर 82 डॉलर आहे. तरीही 2014 च्या तुलनेत पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड जास्त आहेत. ते 2014 एवढे कधी होणार असं सूरजेवाला यांनी म्हटलं आहे.

आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

4. पुनीत राजकुमारच्या निधनानंतर नेत्रदान वाढले, तिघांची नेत्रदानासाठी आत्महत्या

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या निधनानंतर दु:खामध्ये जवळपास 10 चाहत्यांनी प्राण गमावले आहेत. विशेष म्हणजे मृत्यूनंतर लाडक्या हिरोप्रमाणे नेत्रदानाचा संकल्पही चाहत्यांनी केला आहे.

पुनीत राजकुमार

फोटो स्रोत, TWITTER\@PUNEETHRAJKUMAR

पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर धक्क्यात झालेल्या मृत्यूचा विचार करता, 10 पैकी 7 जणांनी आत्महत्या केली आहे. तर तिघांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.

आत्महत्या केलेल्या चाहत्यांपैकी तीन जणांनी नेत्रदान करण्यासाठी आत्महत्या केली असल्याचंही म्हटलं आहे. सुपरस्टार पुनीत राजकुमारनं मरणोत्तर नेत्रदान केलं होतं. त्यामुळं चाहत्यांनीही त्याचं अनुकरण केलं आहे.

पुनीत याच्या मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. लोकमतनं याबाबत वृत्त दिलं आहे.

4. देवगड हापूसची पहिली पेटी पुण्यात दाखल, 18 हजारांना झाली विक्री

आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप काही महिन्यांचा वेळ असला तरी देवगडच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल झाली आहे. उत्तम फोंडेकर या शेतकऱ्यांनी ही पहिली पेटी पुण्यात पाठवली.

देवगड हापूसच्या प्रत्येकी 5 डझन आंबे असलेल्या या दोन्ही पेट्यांची विक्री प्रत्येकी 18 हजार रुपयांना झाली आहे. फोंडेकर यांनी तिसऱ्यांदा हापूसची पहिली पेटी पाठवण्याचा मान मिळवला आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या संकटातही फोंडेकर यांनी योग्य व्यवस्थापनाच्या आधारे झाडांवरचा मोहोर टिकवून ठेवला आणि फळांचं संरक्षण केलं.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास महिनाभर आधीच हापूसची पेटी बाजारात आली आहे. टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)