समीर वानखेडे : क्रांती रेडकर सतत मराठी अस्मिता आणि महिला हे मुद्दे का मांडताहेत?

फोटो स्रोत, Kranti Redkar@instagram
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहीत न्याय देण्याचं आवाहन केलंय.
समीर वानखेडे आर्यन खान अटक प्रकरणात चर्चेत आले होते आणि त्यानंतर आता वानखेडे हिंदू की मुस्लीम हा वाद सुरू झाला आहे.
समीर वानखेडे यांनी धर्मांतराच्या माध्यमातून दुहेरी लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. त्यासंबंधी नवाब मलिकांनी 27 ऑक्टोबरला सकाळी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामादेखील ट्विटरवर पोस्ट केला.
याआधी क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी एका मध्यस्थाच्या माध्यमातून शाहरुखचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी 8 कोटी रुपयांची मागणी केली असा आरोपही केला गेला.
या प्रकरणात होत असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरुवातीपासून प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर पत्रकार परिषदांच्या माध्यमातून एनबीसीवर अनेक आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर क्रांती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्या पुढे लिहितात, "आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लक्तरं चारचौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे..विनोद करून ठेवला आहे. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय..तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती."

फोटो स्रोत, Kranti Redkar@instagram
याआधीही बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, "मी एक मराठी मुलगी आहे, मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि जर मला माझ्या राहात्या महाराष्ट्रात काही झालं तर माझ्या मराठी जनतेला यांना उत्तर द्यावं लागणार ना?."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्या पुढे असंही म्हणाल्या की, "आम्हाला अनोळखी नंबरवरुन धमक्यांचे फोन येतात, फेक अकाऊंटवरून कमेंट येतात. समीरवर जे आरोप होता आहेत त्यामागे खूप मोठ्या व्यक्तींचे हात आहेत. उद्या जर समीर वानखेडे या खुर्चीवर नाही टिकले तर त्यामागे खूप मोठं कटकारस्थान असेल."
क्रांती रेडकर यांच्या बोलण्यात वारंवार मराठी असण्याचा, महिला असून त्रास होत असल्याचा, त्यातही शिवरायांच्या महाराष्ट्रात एका महिलेची इभ्रत पणाला लागल्याचा उल्लेख होतोय.
त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की आधी ड्रग्स, नंतर भ्रष्टाचार आणि त्यानंतर धर्म बदलून पदाचे फायदे मिळवले अशा स्वरूपाचे आरोप होत असताना इथे मराठी अस्मितेचा किंवा महिलेच्या होणाऱ्या छळाचा काय संबंध असू शकतो? क्रांती रेडकर शिवसेनेला भावनिक आवाहन करत आहेत का?
आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यावरून लक्षात येतंय की महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या तीन पक्षापैकी राष्ट्रवादी या प्रकरणी सक्रिय आहे, त्यांच्या मंत्र्याकडून रोज नवेनवे आरोप समीर वानखेडेंवर केले जात आहेत, काँग्रेसने अजून विशेष प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शिवसेना या प्रकरणी कशी वागेल यावर पुढच्या गोष्टी ठरतील.
सामना या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखात काही मुद्दे आलेत.
या अग्रलेखात एका ठिकाणी म्हटलंय की, "या प्रकरणी केंद्रस्थानी असलेले समीर वानखेडे यांच्या आधीच्या कारवाया धाडसी होत्या हे सगळे ठीक पण कायद्याची चौकट पाळावीच लागेल. त्यात गफलत झाली की कारवाई वादग्रस्त ठरते. आपल्या कारवाया वादग्रस्त का ठरत आहेत याचा शोध ज्याने त्याने घ्यायला हवा. परत अशा कारवायांवर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने ज्याला त्याला दिला आहे."

फोटो स्रोत, Twitter
पण याच लेखात पुढे असंही लिहिलंय की, "राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरले आहे. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे पण अशा वादग्रस्त प्रकरणावर टीका करताना संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये हे देखील तितकेच खरे. कठोर टीका करायला हवी पण ती कारवाईपुरतीच मर्यादित असेल हे पाहायला हवे."
या लेखातून शिवसेनेच्या भूमिकेचा अंदाज लावायचा ठरवलं तर लक्षात येतं की शिवसेनेने समीर वानखेडेंना ना पूर्ण पाठिंबा दिलाय ना कडाडून विरोध केलाय.
म्हणूनच मराठी अस्मिता आणि शिवराय हे मुद्दे क्रांतींच्या बोलण्यात येत आहेत का? शिवसेनेचं राजकारण मराठी अस्मितेभोवती फिरतं. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात दैवतासमान आहेत. शिवसेनेनेही अनेकदा शिवरायांचं नाव घेत राजकारण केलेलं आहे. त्यामुळेच या भावनिक मुद्द्यांना हात घालून एकतर शिवसनेचा पाठिंबा मिळवायचा किंवा शिवसेनेला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे का याबद्दल आम्ही तज्ज्ञांशी बोललो.
जेष्ठ पत्रकार संतोष प्रधान यांना वाटतं की क्रांती आता सत्ताधारी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मराठी अस्मिता, शिवसेना आणि बाळसाहेब ठाकरेंचं नाव घेत आहेत.
ते म्हणतात, "त्यांना अशी भीती आहे की राज्य सरकार कारवाई करेल. आज पुन्हा गोसावींनाही अटक झाली आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांचं नाव घेऊन, मराठी असण्याचा मुद्दा काढून भावनिक आवाहन करत आहेत."
पण या प्रकरणी शिवसेनेनी समीर वानखेडे किंवा क्रांती रेडकर यांची साथ दिली नाही तरी त्याचा फटका शिवसेनेला बसेल असं प्रधान यांना वाटत नाही.
"केंद्र-राज्य संबंधांवर आहे हे सगळं. त्यांना असं दाखवायचं आहे की केंद्र सरकार आम्हाला त्रास देत आहे. दसरा मेळाव्यातलं भाषण तुम्ही ऐकलंत तर लक्षात येईल. त्यांनी केंद्र सरकार कसं आम्हाला त्रास देतंय असं डायरेक्ट सांगितलं होतं."

फोटो स्रोत, kranti redkar/instagram
राज्य सरकारच्या निशाण्यावर समीर वानखेडे नाहीत असंही ते म्हणतात. "त्यांच्यादृष्टीने केंद्रीय यंत्रणा राज्याच्या यंत्रणेला कसा त्रास देतेय, कसा राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप करतेय हे त्यांना दाखवून द्यायचं आहे."
तर दुसरीकडे एकाने एक बागुलबूवा उभा केला तर दुसऱ्याने दुसरा असा सगळा खेळ सुरू आहे असंही काहींना वाटतं.
शैंलेद्र तनपुरे जेष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी राज्याच्या राजकारणाचा जवळून अभ्यास केलेला आहे. ते म्हणतात, "हा फक्त चिखलात लोळण्याचा प्रकार आहे. जसं क्रांती रेडकर यांनी मराठी अस्मिता, बाळासाहेब, शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याची गरज नव्हती तसंच नवाब मलिकांनी समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम, त्यांचं पहिलं लग्न झालं होतं की निकाह याबद्दल चर्चा करण्याची गरज नव्हती. मूळ गुन्हा बाजूलाच राहतोय आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू आहे. तुम्ही हे केलं तर आम्ही हे करू असं करताना सगळं प्रकरण भरकटतंय."
मराठी अस्मिता, महिलेची गरिमा आणि शिवरायांचा महाराष्ट्र असे मुद्दे वादात आल्याने आता शिवसेनेला लक्ष्य करणं विरोधकांना सोपं जाईल का आणि भाजप याचा फायदा घेईल का याच प्रश्नाचं उत्तर देताना तनपुरे म्हणतात, "मुळात क्रांती रेडकरला पुढे करून यात उद्धव ठाकरेंना ओढायचं ही लाईन भाजपचीच दिसतेय."
"भाजपची ट्रोल मंडळी आता जातीचं राजकारण करताहेत. दोन्हीकडून राजकारण केलं जातंय. एकेकाचं प्रकरण निघतंय. नवाब मलिकांनी आधीच म्हटलंय की हा त्यांचा वैयक्तिक लढा आहे, आणि असेलच कारण त्यांच्या जावयाला समीर वानखेडेंनी अटक केली होती."

फोटो स्रोत, facebook
इतर राजकीय पक्षांबद्दल बोलताना तनपुरे म्हणतात, "काँग्रेसने मुळात सावधगिरी बाळगून यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये. दुसरीकडे काहीही करून उद्धव ठाकरेंना या प्रकरणात ओढावं असे प्रयत्न चालू आहेत. पण उद्धव ठाकरे या प्रकरणापासून अंतर राखून आहेत."
दरम्यान, क्रांती रेडकर यांनी लिहिलेल्या या पत्रानंतर सोशल मीडियावरही उलट सुलट चर्चा सुरू आहेत. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी क्रांती यांना पाठिंबा देणारं ट्वीट केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
ते लिहितात, "मला राजकारण कळत नाही. खरं खोटं उद्या न्यायव्यवस्था समोर आणेल. कारण माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कलाकार म्हणून आणि कौटुंबिक संबंध म्हणून मी क्रांतीसोबत नक्कीच आहे. राहणार. स्त्री म्हणून तिच्या मानसन्मानाचा आदर केलाच पाहिजे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









