आजपासून होणाऱ्या 'या' बदलांमुळे तुमच्या खिशाला लागणार कात्री

फोटो स्रोत, Getty Images
देशभरामध्ये बुधवारपासून (1 सप्टेंबर) बँक आणि जीएसटीशी संबंधित काही बदल होणार आहेत. एका प्रमुख बँकेनं आधीच बचत खात्याचे व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे.
काही बँका चेक क्लिअरन्सच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत. काही बँकांनी आधीच अशाप्रकारचे बदल लागूदेखील केले आहेत.
नवा महिना सुरू होताच घरगुती वापराचा सिलेंडर पुन्हा 25 रुपयांनी महागला आहे.
एक सप्टेंबरपासून अंमलात येणाऱ्या या काही बदलांचा परिणाम तुमच्या खिशावरही होऊ शकतो.
पीएनबीची व्याज दरात कपात
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेली पीएनबी बुधवारपासून (1 सप्टेंबर) बचत खात्यांच्या व्याजदरात बदल करत आहे.
पंजाब नॅशनल बँक त्यांच्या बँकेत सेव्हिंग अकाऊंट (बचत खाते) असलेल्या ग्राहकांना एक सप्टेंबरपासून कमी व्याज देणार आहे. एक सप्टेंबरपासून बचत खात्यांवरील व्याजदर घटून 2.9 टक्के होईल. सध्या बचत खात्यावर तीन टक्के व्याज मिळतं.

फोटो स्रोत, Getty Images
नवीन व्याजदर हा नव्या आणि जुन्या अशा सर्व खात्यांसाठी असेल. बँकेनं त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे.
अनेक बँका चेक क्लिअर करण्यासंदर्भात नवा नियम लागू करणार आहेत. रिझर्व्हं बँकेनं सर्व बँकांना सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शाखेत इमेजच्या आधारे चेक ट्रंकेशन सिस्टीम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं चेक क्लिअर होण्याचा वेग वाढेल.
ईपीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे
ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खातं असलेल्यांसाठीही एक सप्टेंबरची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे.
पीएफ खात्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजे, यूएएनला आधारशी जोडण्याची अखेरची तारीख एक सप्टेंबरच आहे. आधी यासाठी अंतिम तारीख एक जून होती ती तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती.
या बदलामुळे एकिकडं कंपन्या किंवा नियोक्त्यांना कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात अडचणी होतील, त्याचप्रमाणे खाते धारकांनाही पैसे काढताना अडचणींचा सामना करावा लागेल.
जीएसटीशी संबंधित बदल
जीएसटी नेटवर्कनंही एक सप्टेंबरपासून होत असलेल्या बदलांची माहिती दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार ज्या व्यावसायिकांनी जीएसटीआर-3बी रिटर्न भरलेलं नसेल त्यांना बुधवारी 1 सप्टेंबरपासून जीएसटीआर-1 फॉर्म भरता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
एक सप्टेंबरपासून सेंट्रल जीएसटीचा नियम 59(6) लागू होईल, असं पीटीआयनं जीएसटी नेटवर्कच्या हवाल्यानं सांगितलं. त्या अंतर्गत जीएसटीआर-1 वर स्थगिती आणली जाईल.
व्यावसायिकांना कोणत्याही महिन्याचा जीएसटीआर-1 त्याच्या पुढच्या महिन्याच्या 11 दिवसांपर्यंत भरावा लागतो. जीएसटीआर-3बी च्या माध्यमातून व्यावसायिक कर भरतात. त्याच्या पुढच्या महिन्याच्या 20 ते 24 दिवसांपर्यंत ते दाखल करायचं असतं.
स्वयंपाकाच्या गॅसचे दर
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वयंपाकाच्या गॅसचे दर निश्चित केले जातात. सप्टेबर महिना सुरू होताच घरगुती वापराचा सिलेंडर पुन्हा 25 रुपयांनी महागला आहे.
जूनमध्ये आढावा घेतला त्यावेळी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांत वाढ करण्यात आली नव्हती. पण जुलै आणि ऑगस्टमध्ये किमती वाढवण्यात आल्या होत्या. घरगुती आणि व्यावसायिक दोन्हींच्या सिलेंडरचे दर वाढले होते.

फोटो स्रोत, Getty Images
स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर होतो. दोन्ही महिन्यांमध्ये दोन्ही प्रकारच्या सिलिंडरच्या दरांमध्ये प्रत्येकी 25 रुपयांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








