नाना पटोले - 'उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवतायत'

फोटो स्रोत, NANA PATOLE/FACEBOOK
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय.
स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय.
पटोले लोणावळ्यामध्ये काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहिली हे त्यांना माहितेय. रोज आयबीचा रिपोर्ट, आता मी इथे आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना 9 वाजता, गृहमंत्र्यांना 9 वाजता विभागाला नेऊन द्यावा लागतो. कुठे काय चाललंय, मीटिंग चाललीय, राजकीय परिस्थिती काय, आंदोलन कुठे झालं? त्यांच्या पाया खालची वाळू सरकलीय हे काय कळत नाही? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार."
आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार असल्याचं नाना पटोलेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतल्या कुरबुरींविषयीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती.
पाठीत खंजीर खुपसण्याची आमची वृत्ती नाही, असंही विधान पटोलेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
त्यावर प्रतिक्रिया द्यायला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला होता. 'पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू,' असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
"या गोष्टींत मी पडत नाही. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत, लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी भाष्य केलं असतं," असं शरद पवारांनी म्हटल्याचं टीव्ही9 मराठीच्या बातमीत म्हटलंय.
"नाना पटोलेंबाबत मी काही बोलणार नाही. मी इथे महागाईवर बोलण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसबद्दल एच. के. पाटील बोलतील. ते उद्या परवा मुंबईत आहेत. तुम्ही त्यांना विचारा", असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज खरगेंची पत्रकार परिषद आहे. आपण तर भेटतच असतो. मी आता यावर काहीच बोलणार नाही असं काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
'पटोलेंनी सिस्टम समजून घ्यावी'
नाना पटोले यांनी सिस्टम समजून घ्यावी असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.
"पटोले यांनी माहितीअभावी हे आरोप केले आहेत. राज्यात सरकार कोणाचंही असो, राजकीय पक्षांच्या सभा, मोठ्या नेत्यांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे याची माहिती पोलीस यंत्रणेला ठेवावी लागते. त्यासाठी असलेली विशेष शाखा याबाबत गृहखात्याला माहिती देत असते. ही माहिती कुठल्याही पक्षाशी संबंधित असू शकते.
कुणा एका पक्षाविषयी नसते. पटोलेंना हे माहीत नसेल तर त्यांच्या पक्षात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून त्यांनी ही माहिती घेतली पाहिजे", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
पटोले यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या नेत्यांना, काँग्रेसच्या मंत्र्यांना पोलीस सुरक्षा नको असेल तर त्यांनी तसं सांगावं. त्याबाबत गृहखातं निर्णय घेऊ शकतं,' असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








