कोरोना : मुंबईतली मुलं तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत का?

मुंबईत 50 टक्के लहान मुलांमध्ये कोव्हिड-19 विरोधी अॅन्टीबॉडीज (प्रतिपिंड) आढळून आल्या आहेत. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.

कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत 'सीरो' सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

पालिका अधिकारी सांगतात, यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणापेक्षा यावेळी मुलांमध्ये अॅन्टीबॉडीज जास्त प्रमाणात निर्माण झाल्याचं दिसून आलंय.

मुंबई महापालिकेचं सर्वेक्षण

कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्ग किती पसरलाय, हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने हे सीरो सर्वेक्षण केलं होतं.

  • 51.8 टक्के लहान मुलांमध्ये प्रतिपिंड (अॅन्टीबॉडीज) तयार झाल्या आहेत.
  • 10 ते 14 वर्षं वयोगटातील सर्वाधिक 53.43 मुलांमध्ये अॅन्टीबॉडीज आढळून आल्या.
  • 1 ते 4 वर्षं वयोगटातील 51 टक्के बालकांमध्ये अॅन्टीबॉडीज तयार झालेल्या पाहायला मिळाल्या.
  • तर 5 ते 9 वर्षं वयोगटातील 47.33 टक्के मुलांमध्ये अॅन्टीबॉडीज होत्या.
  • 15 ते 18 वर्षं वयाच्या 51 टक्के मुलांमध्ये कोव्हिडविरोधी अॅन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत.

याबाबत बोलताना मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "मार्च महिन्यात करण्यात आलेल्या अभ्यासात 39 टक्के मुलांमध्ये अॅन्टीबॉडीज तयार झाल्याचं आढळून आलं होतं. याचा अर्थ कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत 18 वर्षांपेक्षा लहान मुलं आणि बालकं कोव्हिड-19च्या संपर्कात आली होती."

केव्हा करण्यात आला सीरो सर्व्हे

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, 1 एप्रिल ते 15 जून दरम्यान हे सीरो सर्वेक्षण करण्यात आलं.

  • यासाठी 2,176 मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते .
  • सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांतून हे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

सुरेश काकाणी पुढे सांगतात, "कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग पसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, सीरोसर्व्हे पाहाता असं लक्षात आलंय की, 50 टक्के मुलांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली आहे किंवा ही मुलं विषाणूच्या संपर्कात आली आहेत."

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून, लहान मुलांमध्ये संसर्गाचं संक्रमण कमी करण्यासाठी आरोग्य शिक्षण, कोव्हिडच्या नियमांची जनजागृती करण्यात आल्याची माहिती, पालिकेने दिली आहे.

लहान मुलं तिसऱ्या लाटेत सुरक्षित आहेत का?

अगदी पहिल्या लाटेपासून दर महिन्याला शहर पातळीवर असे सीरो सर्व्हे होत आलेले आहेत. आणि विषाणूचा किती प्रसार त्या भागात झाला आहे ते जाणून घेण्यासाठी अशी सर्वेक्षणं मदतच करतात. पण, त्यासाठी सँपल साईझ म्हणजे किती नमुन्यांचा अभ्यास झाला, नमुन्यांची निवड कशी करण्यात आली आणि मापन पद्धती काय होती हे समजून घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते वर्षाच्या सुरुवातीला केलेला सर्व्हे 10,000 ते 30,000 नमुन्यांचा आणि पुढचा सर्व्हे काही हजार नमुन्यांचा असेल तर चालण्यासारखं आहे. तर शहरातली किती टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत आणि किती लोकसंख्या इतर रहिवासी वस्त्यांमध्ये राहते हे पाहून नमुने गोळा करण्याची पद्धत ठरवली पाहिजे. सध्याच्या सीरो सर्व्हेमध्ये फक्त 2176 नमुने तपासले गेले आहेत. त्यातले 1,283 नमुने सरकारी प्रयोगशाळांमधून तर 893 नमुने खाजगी प्रयोगशाळांमधून घेण्यात आले होते.

आता या निकषांवर मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या या सर्व्हेला ग्रीन म्हणजे विश्वसनीयतेच्या निकषांवर उच्च दर्जाचं प्रमाणपत्र मिळालं आहे. पण, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व्हेचा अर्थ काय आणि त्यातून आपण काय बोध घ्यायचा?कोव्हिड कृतीदलाच्या विदर्भ विभागाचे सदस्य आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "सीरो सर्व्हे इतकी 50% नाही तरी 30% मुलांमध्ये अँटीबॉडीज् निर्माण झालेल्या असू शकतात. सर्वेक्षणासाठी घेतलेले नमुने संख्येनं कमी असल्यामुळे निष्कर्ष परिपूर्ण असण्याची शक्यता थोडी कमी आहे, असं त्यांचं म्हणणं पडलं. पण, कोरोना अँटिबॉडीज् किती प्रमाणात मुलांमध्ये आहेत हे समजून घेण्यात मात्र त्यामुळे मदतच होते." "मुलांमध्ये कोरोनाची गंभीरता कमी असते ती तीन कारणांमुळे. एक तर त्यांच्याकडे जन्मजात रोगप्रतिकारक शक्ती असते. आणि दुसरं म्हणजे कोरोना व्हायरस शरीरात पसरण्यासाठी ACE2 हे अन्झाईम असावं लागतं. तेच मुलांच्या शरीरात 12व्या वर्षापर्यंत नसल्याने व्हायरस फुप्फुसांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी कोरोना व्हायरसचे गंभीर परिणाम मुलांवर होत नाहीत. अशावेळी सीरो सर्व्हेमधून आलेले निष्कर्ष हे लहान मुलांसाठी चांगलेच म्हटले पाहिजेत," असं डॉ. बोधनकर यांनी सांगितलं. शाळा उघडू शकतात का?

या सीरो सर्व्हेच्या निकषांनंतर शाळा उघडू शकतात का? अनेक तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट टाळता येणार नाही. पण ती कधी येईल आणि किती मोठी असेल हे सांगता येत नाही.

कोरोनाचा संसर्ग थोपवायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण हाच त्यावरचा उपाय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

महाराष्ट्रात शाळा उघडण्यावर सरकारनं खूपच सावध भूमिका घेतलीय. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी असेल तिथे जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावेत असं सरकारनं सांगितलं होतं. पण आता तिसऱ्या लाटेचा धोका बघता सगळ्याच गोष्टी लांबणीवर पडल्यात.

डॉ. उदय बोधनकर यांनीही शाळा सुरू करण्यापूर्वी पुरेसं लसीकरण झालं पाहिजे ही भूमिका मांडली आहे. "मुलं आपले पालक, मित्र आणि आजी-आजोबा यांच्या संपर्कात असतात. त्या लोकांचं लसीकरण झालेलं असेल तर मुलंही कोरोनापासून सुरक्षित राहणार आहेत. शिवाय लहान मुलांच्या लशीच्या ट्रायलही लवकरच संपतील. आणि पुढच्या तीन महिन्यांत मुलांच्या लसीकरणालाही परवानगी मिळू शकते. तसं झालं आणि लसीकरण खरंच पार पडलं तर शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल," असं परखड मत डॉ. बोधनकर यांनी मांडलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)