नाना पटोले: 'महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, केवळ 5 वर्षांसाठी'

फोटो स्रोत, Facebook/Nana Patole
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, केवळ 5 वर्षांसाठी - नाना पटोले
"राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी कायमस्वरूपी झालेली नाही. राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे," असं विधान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या ऑनलाईन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला टोले लगावले होते. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
"काँग्रेससोबत भाजपनंही स्वबळाचा नारा दिला आहे. याआधीही भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे यात काहीच गैर नाही," असंही नाना पटोले म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
पक्षाची ताकद वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, असं सांगताना नाना पटोले यांनी पुढे म्हटलं, "कोरोना काळात जनतेला मदत करण्याला काँग्रेस पक्षानं नेहमीच प्राधान्य दिलं आहे. मग ते रक्तदान असो, ऑक्सिजन असो किंवा मग प्लाझ्मा, कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी मदत केली आहे."
स्वबळापेक्षा कोरोनाच्या स्थितीकडे लक्ष देणं महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते, त्या वक्तव्याला नाना पटोलेंचं हे उत्तर मानलं जात आहे.
2) उद्धव ठाकरे गँगप्रमुखच, नादाला लागू नका - गुलाबराव पाटील
"शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले आहे," असं प्रत्युत्तर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना दिलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना म्हटलं होतं, "उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण सत्तेच्या खुर्चीच्या आसपास घुटमळणारं होतं. आपल्या भूमिकेंच उदात्तीकरण करणारं होतं. मला वाटतं हे सरकारच्या प्रमुखाचं भाषण नव्हतंच, ते एका गँग प्रमुखाचं भाषण होतं."
या टीकेला गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं आहे.

फोटो स्रोत, Facebook/Gulabraoji Patil
वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते, "दोन दिवसांपासून शिवसेनाप्रमुखांचं एक भाषण व्हायरल होतंय. ते का होतंय हे आपल्याला माहितीय. याला शिवसैनिक म्हणतात."
"नुसत्या हाणामाऱ्या करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हे आपलं गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक आहे. पण रक्तपाताची ओळख मुद्दामून कोणी करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख अनेकांना आहे," असंही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले होते.
3) मुंबै बँक घोटाळ्याचा तपास बंद करण्यास कोर्टाचा नकार
मुंबई जिल्हा नागरी सहकारी बँकेतील 123 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्यास महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नकार दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजी नलावडे यांच्यासह इतरांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

फोटो स्रोत, Twitter/Pravin Darekar
तपास बंद करण्याची परवानगी मागणारा 'सी समरी' अहवाल स्वीकारण्यास न्यायदंडाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले, "विरोधी पक्षनेता म्हणून मी महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. हा विषय संपला असून, मी या प्रकरणाला काडीचीही किंमत देत नाही."
4) हिंमत असल्यास राणे पुत्रांनी खुल्या मैदानात यावं - वैभव नाईक
हिंमत असेल तर निलेश राणे आणि नितेश राणे या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावं, असं आव्हान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी कमी किंमतीत पेट्रोल वाटपाच्या कार्यक्रमात राणे समर्थक आणि वैभव नाईक यांच्यात वाद झाला आणि त्यातून कुडाळमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी फेसबुकच्या माध्यमातून राणे पुत्रांना उघड आव्हान दिलं आहे.
"दहा वर्षांपूर्वी वेंगुर्ला शहरात झालेल्या राड्यामध्ये नितेश राणेंनी शिवप्रसादाची चव चाखली होती. त्यावेळी शिवसैनिकांना घाबरून कार्यालयात शटर ओढून लपून बसलेले नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले," असं म्हणत वैभव नाईक यांनी नितेश राणेंना डिवचलं आहे.
ट्विटरवरून टिवटिव करण्याशिवाय राणे पुत्र काहीच करू शकत नाहीत, हे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळून चुकलंय, असंही वैभव नाईक म्हणाले.
5) 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर आम्हाला भाषण देऊ नका'
अमेरिकेत बसलेल्या कंपन्यांनी भाषणाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही या विषयावर आम्हाला व्याख्यान देऊ नका, असं म्हणत भारताचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी समाजमाध्यमांना फटकारलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
समाजमाध्यमे भारतात नफा कमावत असतील, तर त्यांना भारतीय राज्यघटना आणि कायद्याचं पालन करावंच लागेल, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter/Ravi Shankar Prasad
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने आयोजित केलेल्या 'सोशल मीडिया आणि सोशल सिक्युरिटी अँड क्रिमिनल जस्टिस सिस्टम रिफॉर्म : अँड अनफिनश अजेंडा या विषयावरील व्याख्यानमालेमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाषण केले.
"भारतात स्वातंत्र्यासह निःपक्ष निवडणुका होत आहेत. आमच्याकडे स्वतंत्र न्यायालय आहे. मीडिया, नागरी समाजाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे आणि त्यांचे प्रश्नसुद्धा ऐकत आहे. खरोखर हिच लोकशाही आहे. म्हणून या कंपन्यांनी आम्हाला लोकशाहीवर भाषणे देऊ नये," असं रविशंकर प्रसाद म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








