प्रताप सरनाईक पत्र : देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'अशी अनेकांची इच्छा असू शकते'

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Facebook

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी युती करण्याची विनंती केलीय. सरनाईकांच्या या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्रताप सरनाईकांनी भाजपसोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केलीय, यावर देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं मत विचारलं असता ते म्हणाले, "अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण त्या संदर्भात आमचं स्पष्ट मत आहे की, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. तो त्यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहिलाय, त्यांच्या प्रमुखांनी काय सांगायचंय."

फडणवीस पुढे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाचं एक पक्कं आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही समोर मांडतोय. आम्हाला विश्वास आहे की, जनतेच्या मनात आम्ही ज्याप्रकारे प्रतिमा निर्माण केलीय. मागच्यावेळेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. कारण आम्ही युतीत लढलो होतो. येत्या काळात आम्ही बहुमतानं निवडून येऊ, याचा आम्हाला विश्वास आहे."

"भाजप स्वबळावरच लढते. प्रश्न त्यांचा आहे. आता त्यांनी ठरवायचंय की, कुणी कुणाला जोडे मारायचे, कुणी कुणाला हार घालायचे, कुणी कुणाच्या सोबत जायचंय, हा त्यांचा निर्णय त्यांनी करायचा आहे. आमची बांधिलकी ही जनतेशी आहे. याच बांधिलकीतून भाजप काम करत राहील," असं म्हणत फडणवीसांनी शिवसेना-काँग्रेसच्या स्वबळाच्या विधानांवर भाष्य केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

प्रताप सरनाईकांनी पत्रात काय म्हटलंय?

दोन पानी पत्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचं कौतुक केल्यानंतर पत्राच्या दुसऱ्या पानावर सरनाईक म्हणतात, "सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतेलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे."

प्रताप सरनाईक

"निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे," असंही पुढे प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

या पत्राच्या शेवटी प्रताप सरनाईक म्हणतात, "पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल."

"याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल, असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनातल्या भावना आपल्याला कळवल्या आहेत," असं शेवटी सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलंय.

प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रामध्ये काही अत्यंत गंभीर असे मुद्दे मांडले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असं भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

काँग्रेसनं एकिकडं 'एकला चलो' अशी भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेते-कार्यकर्ते फोडून शिवसेनेलाच हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप सरनाईकांनी पत्रातून केला आहे.

प्रताप सरनाईक

फोटो स्रोत, Pratap Sarnaik

काँग्रेस-राष्ट्रवादीची कामं लवकर होतात, पण आपला मुख्यमंत्री असूनही आपली कामं लवकरत होत, नाहीत असं अनेक शिवसैनिकांचं मत असल्याचं सांगत सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंपर्यंत ही नाराजी थेटपणे पोहोचवली आहे.

भाजपबरोबरची युती तोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मोठं करण्यासाठी 'महाविकास आघाडी' स्थापन केली की काय? असा उल्लेखही या पत्रात आहे.

'तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबेल'

आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे गेल्या काही दिवसांमध्ये केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याला कंटाळून त्यांनी उद्धव ठाकरेंनी ही विनंती केली आहे. त्याचवेळी भाजपच्या किरिट सोमय्या यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका केली आहे.

प्रताप सरनाईक यांचे पत्र

फोटो स्रोत, Pratap Sarnaik

''शिवसेनेमुळं 'माजी खासदार' झालेल्या नेत्याकडून मोठ्या प्रमाणावर बदनामी केली जात आहे. आम्हाला टार्गेट केलं जात असतानाच, आमच्या कुटुंबावरही आघात केले जात आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की दुसऱ्यात अडकवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्यात गुंतवणे असं काम तपास यंत्रणा करत आहेत. एका निर्णयामुळं हे थांबू शकतं,'' असं सरनाईकांनी पत्रात लिहिलं आहे.

तपास यंत्रणा या शिवसेनेच्या नेत्यांच्याच मागे हात धुवून लागल्या आहेत, याचा उल्लेख करताना प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांवर आरोप केले आहेत.

''महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि सनदी अधिकारी चौकश्या मागे लागू नये म्हणून, केंद्रातील सत्ताधारी पक्षाबरोबर आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,'' असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांवर नाव न घेता टीका

भाजपशी जुळवून घेण्याची विनंती करताना प्रताप सरनाईक यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

सरनाईकांनी पत्रात म्हटलंय की, "कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे 'माजी खासदार' झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही कुठेतरी आळा बसेल."

"आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा ससतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसंमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल," अशी हतबलताही सरनाईकांनी व्यक्त केलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिाय दिलीय.

आपल्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ जारी करत त्यात सोमय्या म्हणतात, "प्रताप सरनाईकांनी MMRDA घोटाळा केला. आता जेलचा दरवाजा दिसतोय म्हणून तपास यंत्रणेवर आरोप करायचा? उद्या अनिल परब पण जेलमध्ये जाणार. तेही पत्र लिहणार. उद्धव ठाकरेंची सेना कोव्हिडमध्ये भ्रष्टाचार करणारी सेना आहे. आज ना उद्या अर्धा डझन शिवसेना नेत्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे."

कोण आहेत प्रताप सरनाईक?

आधी ठाण्यातील बांधकाम व्यवसायात नाव कमावलेल्या प्रताप सरनाईक यांनी 1997 साली राजकारणात प्रवेश केला. 1997 सालच्या ठाणे महापालिका निवडणुकीत ते विजय होऊन पहिल्यांदा नगरसेवक झाले. ठाणे महापालिकेत ते सलग दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले.

मग 2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघातून आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते सलग तीनवेळा म्हणजे 2009, 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले.

प्रताप सरनाईक हे आता ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि तिथूनच विधानसभेत प्रतिनिधित्व करतात.

प्रताप सरनाईक

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP SARNAIK

स्वत: प्रताप सरनाईक आमदार आहेत, पत्नी परिषा सरनाईक या नगरसेविका, तर दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश हे राजकारणात सक्रीय आहेत.

पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आणि नगरसेवक आहेत, तर विहंग सरनाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या व्यावसायिक कामांची सुद्धा नेहमी चर्चा होत राहते. बांधकाम क्षेत्रातील त्यांची कामगिरी नेहमीच चर्चेत असते. बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रातील 'विहंग ग्रुप ऑफ कंपनी'चे प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत.

तसंच, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ते करतात. यातील दहीहंडीचं आयोजन अनेकांना परिचितही आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)