कोरोना व्हायरस : 'जिनोम सिक्वेंसिंग' केलेल्या 61 टक्के नमुन्यात आढळलं कोरोनाचं 'डबल म्युटेशन'

फोटो स्रोत, Cavan Images/Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाचा झपाट्याने प्रसार होतोय. राज्यात 14 एप्रिलला 58 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून, दररोज राज्यात 50 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट राज्यात त्सुनामीसारखी पसरतेय. सद्यस्थितीत महाराष्ट्रात 6 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 80 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र, रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय.
राज्यात कोरोना संसर्गाचा स्फोट होण्यामागे कोरोना व्हायरसमध्ये झालेलं 'डबल म्युटेशन' कारणीभूत आहे का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. याचं कारण, कोरोना रुग्णांच्या 'जिनोम सिक्वेंसिंग' चा रिपोर्ट धक्कादायक आहे.
नॅशनल इंनस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीने (NIV) महाराष्ट्रातील कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांच्या 'जिनोम सिक्वेंसिंग'च्या रिपोर्टबाबत राज्य सरकारला माहिती दिली आहे.
काय आहे NIV चा रिपोर्ट?
पुण्याच्या नॅशनल इंनस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये (NIV) कोरोनाग्रस्त रुग्णांचं 'जिनोम सिक्वेंसिंग' करण्यात येतं आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 361 कोरोनाग्रस्तांच्या नमुन्यांचं NIV मध्ये 'जिनोम सिक्वेंसिंग' करण्यात आलं. यातील 61 टक्के नमुन्यात 'डबल म्युटेशन' आढळून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जानेवारी ते मार्च या महिन्यात कोरोनाबाधितांचे नमुने 'जिनोम सिक्वेंसिंग' साठी गोळा करण्यात आले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 मार्चला महाराष्ट्रात 'डबल म्युटेशन' आढळून आल्याची माहिती दिली होती.
कोरोना व्हायरसमध्ये E484Q आणि L452R ही दोन म्युटेशन आढळून आली आहेत.
महाराष्ट्रातून गोळा करण्यात आलेल्या 15 ते 20 टक्के नमुन्यात हे म्युटेशन सापडलं होतं. पण केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेत पसरणाऱ्या संसर्गाला हे म्युटेशन कारणीभूत असल्याचे ठोस पुरावे नसल्याचं सांगितलं होतं.
'डबल म्युटेशन' मुळे पसरला संसर्ग?
महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास फेब्रुवारी महिन्यात सुरूवात झाली. कोरोना व्हायरस इतक्या तीव्रतेने का पसरतो आहे? याचा शोध घेण्यासाठी 'जिनोम सिक्वेंसिंग' करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images / Peter Zelei Images
मुंबईतील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. इश्वरीप्रसाद गिलाडा म्हणतात, "हे 'डबल म्युटेशन' खूप जास्त संसर्गजन्य आहे. यामुळे 3 आठवड्यात कोरोना संसर्गाचा प्रसार चार ते आठ पटींना वाढण्याची शक्यता आहे. राज्यासह देशभरात संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतंय."
विदर्भाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, पुणे, वर्धा या जिल्ह्यात कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याचं आढळून आलं होतं.
राज्याच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "हा नवीन व्हायरस तीव्र वेगाने पसरणारा आहे. म्युटेशन झालेल्या व्हायरसचा वेगळा पॅटर्न आहे."
तज्ज्ञांच्या मते, "E484Q हे एक एस्केप म्युटेशन आहे. स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाल्याने शरीरातील अॅन्टिबॉडी या बदललेल्या व्हायरसला कमी प्रमाणात ओळखतात. त्यामुळे याची तीव्रता वाढते."

फोटो स्रोत, Getty Images
तर, अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आढळून आलेलं L452R म्युटेशन तीव्रतेने पसरणारं म्हणून ओळखलं जातं.
"राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य सुविधांवर मोठा ताण पडतोय. संसर्गाची तीव्रता जास्त असल्याने अनेक लोक गंभीर स्वरूपात रुग्णालयात दाखल होत आहेत. या व्हायरसचा संसर्ग एकापेक्षा जास्त व्यक्तींना होत आहे," असं डॉ. गिलाडा म्हणाले.
'डबल म्युटेशन' काळजीचं कारण आहे का?
तज्ज्ञ सांगतात, कोरोना व्हायरसमध्ये आढळून आलेलं 'डबल म्युटेशन' नक्कीच काळजीचं कारण आहे.
इन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स एंड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणतात, "डबल म्युटेशन' नक्कीच काळजीचं कारण आहे. पण, यामुळेच देशभरात रुग्णसंख्या वाढली, किंवा कोरोना पसरण्यासाठी हे म्युटेशन कारणीभूत हे असं ठोसपणे म्हणता येणार नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये हे म्युटेशन पहिल्यांदा आढळून आलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images / SOPA Images
तज्ज्ञांच्या मते, भारतात सापडलेल्या या 'डबल म्युटेशन'ला B.1.617 असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे.
मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. तनु सिंघल म्हणतात, "राज्यात गेल्या दोन महिन्यात परिस्थितीत अचानक बदलली आहे. एक नवीन व्हायरस पसरलाय हे नश्चित. त्यामुळे रुग्णवाढीचं एक कारण डबल म्युटेशन नक्कीच म्हणता येईल. नवीन व्हायरसची संसर्ग पसरवण्याची क्षमता खूप जास्त आहे."
तज्ज्ञ सांगतात, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कुटुंबातील सर्वांना संसर्ग होत नव्हता. पण, दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून येत आहे.
"कोरोना व्हायरसमध्ये अनेक म्युटेशन झाले आहेत. पण, सद्यस्थितीत आमचं लक्ष E484Q आणि L452R या दोन म्युटेशनवर आहे," असं डॉ. अनुराग अग्रवाल पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








