मनसुख हिरेन प्रकरण: स्फोटकांच्या गाडीचा तपास NIAकडे देण्यामागे काळंबेरं - उद्धव ठाकरे

मुकेश अंबानी, मनसुख हिरेन, सचिन वाझे
फोटो कॅप्शन, घटनास्थळाचं दृश्य

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं मिळालेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएला देण्याबाबतचे आदेश जारी केले.

मनसूक हिरेन प्रकरणाचा तपास अचानक एनआयएकडे देणं यात त्यांचं काहीतरी काळंबेरं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये ज्या जिलेटीन कांड्या सापडल्या. त्याचा तपास एटीएस करत होती. एटीएस चांगल्या पद्धतीने तपास करत होती. आज एकाएक परत केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे दिला. सात महिन्यापूर्वी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी महाराष्ट्र पोलीस चांगला तपास करत होते. पण, एकाएक सीबीआयने त्याचा तपास हाती घेतला.

सात महिने झाले अजूनही सीबीआयने सुशांतने आत्महत्या केली की ही हत्या आहे याचा निष्कर्ष सांगू शकलेली नाही. केंद्राचा अधिकारी आहे त्यांनी तो घेतला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विमला हिरेन यांच्या जबाबावरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा तपास एटीएस करणार आहे," असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांनी केली होती NIA तपासाची मागणी

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास NIA ला देण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी फेटाळून लावली होती. शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने स्फोटकं मिळालेल्या गाडीचं प्रकरण आणि मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी एटीएसला दिली होती.

रविवारी एटीएसने मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सोमवारी विधीमंडळात निवेदन दिलं होतं. एटीएसने मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा प्रथमदर्शनी संशय व्यक्त केला होता.

हा तपास NIA ने राज्याकडून परस्परच काढून घेतल्यानंतर येत्या काळात पुन्हा राज्य विरुद्ध केंद्र असा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.

5 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण मांडलं होतं.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटीननी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला नेमका विचारला होता.

मुकेश अंबानी, मनसुख हिरेन, सचिन वाझे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोलीस अधिकारी सचिन वाझे

ते म्हणाले होते, "26 तारखेला जिलेटीनने भरलेली गाडी अंबानींच्या घराजवळ सापडली. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. ठाण्याच्या एका व्यक्तीची ती स्कॉर्पिओ कार होती. 'अगली बार पुरी फॅमिली को उडाएंगे.. ऐसीही गाडीसे आएंगे' असं पत्र सापडलं. 'जैश-उल-हिंद' ने जबाबदारी स्वीकारली असं पोलिसांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांनीही चालवलं. पण दुसर्‍या दिवशी 'जैश-उल-हिंद' ने ही चुकीची बातमी असल्याबाबत पत्रक काढलं."

"काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वाझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वाझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

या प्रकरणात गाडी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली होती.

याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पत्रकार परिषदही घेतली. स्फोटकं प्रकरण NIA कडे द्यावं, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

या प्रकरणात अनेक योगायोग आहे. कॉल रेकॉर्ड पाहिल्यास जून-जुलै 2020 दरम्यान याच गाडी मालकाशी सचिन वाझे यांचा संवाद झाल्याचा पाहायला मिळतो. यात अनेक संशय निर्माण झाले आहेत. यात काहीतरी गौडबंगाल आहे. या केसमधल्या इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा असा मृतदेह मिळणं संशयास्पद आहे. ही केस एनआयएकडे सूपूर्त करण्यात यावी, ही मागणी लावून धरणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)