‘सचिन वाझे यांची मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात भूमिका काय?’

मुकेश अंबानींच्या घराजवळील गाडीत सापडली स्फोटकं

फोटो स्रोत, Getty Images

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणाशी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले, "26 तारखेला जिलेटीनने भरलेली गाडी अंबानींच्या घराजवळ सापडली. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. ठाण्याच्या एका व्यक्तीची ती स्कॉर्पिओ कार होती. 'अगली बार पुरी फॅमिली को उडाएंगे.. ऐसीही गाडीसे आएंगे' असं पत्र सापडलं. 'जैश-उल-हिंद' ने जबाबदारी स्वीकारली असं पोलिसांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांनीही चालवलं. पण दुसर्‍या दिवशी 'जैश-उल-हिंद' ने ही चुकीची बातमी असल्याबाबत पत्रक काढलं."

"सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून याप्रकरणी नेमलं. पण तीन दिवसांपूर्वी त्यांना काढलं आणि दुसरी नेमणूक केली. त्यांना का बदललं? ज्या माणसाने स्कॉर्पिओ गाडी बंद पडल्याची तक्रार केली. तो माणूस ओलामध्ये बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला. मग तो तिथं कोणाला भेटला," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

"काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वाझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वाझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वाझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ममसुख हिरेन यांचा मृत्यू

या प्रकरणात गाडी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली होती.

या केसमधल्या इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा असा मृतदेह मिळणं संशयास्पद आहे. ही केस एनआयएकडे सूपूर्त करण्यात यावी, ही मागणी लावून धरणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

बीबीसीशी बोलताना पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे म्हणाले, "मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. सद्यस्थितीत काहीच माहिती देता येणार नाही. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहात आहोत."

मनसुख हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीतून पोलिसांनी ताब्यात घेतलाय.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी 8 वाजल्याच्या आसपास मनसुख हिरेन दुकानातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. पण ते घरी परतले नाहीत. शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिसांमध्ये मनसुख हिरेन यांच्या गायब होण्याबाबत तक्रार केली.

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर मुंब्रा खाडीत एक मृतदेह मिळाल्याचं समोर आलं. मृतदेहाचा फोटो मनसुख हिरेन यांच्याशी मिळताजूळता असल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात हा मृतदेह मनसुख हिरेन यांचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत निधानसभेत निवेदन दिलं.

मुंबई पोलीस चौकशीसाठी सक्षम- गृहमंत्री

" जप्त करण्यात आलेली गाडी सॅम पीटर न्यूटन यांची होती. ती गाडी मनसुख हिरेन यांच्याकडे नुतनीकरणासाठी दिली होती. पण त्यांनी पैसे दिले नाही म्हणून मनसुख हिरेन यांनी ही गाडी स्वतःकडे ठेवून घेतली होती. मनसुख यांचा मृतदेह सापडलेला आहे. त्यांच्या शरीरावर कुठलेही घाव नाहीत. त्यांच्या मृतदेहाचं सध्या शवविच्छेदन सुरू आहे," असं गृहमंत्री अनील देशमुख यांनी म्हटलंय.

तसंच मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान पोलीसांचा अहवाल आणि गृहमंत्र्यांचं निवेदन यामध्ये तफावत असल्याचं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

प्रदीप शर्मा आणि सचिन वझे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे

"मनसूक हिरेन यांनी त्याच्या जवाबामध्ये ती गाडी त्यांनी विकत घेतली होती असं सांगितलं होतं. त्यांच्या मृतदेहाचे हात मागे बांधले होते. हे संशयास्पद आहे," असं फडणवीस यांनी म्हटलं.

त्यांच्या मृतदेहाचे हात मागे बांधलेले नव्हते, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सचिन वाझे यांनी अर्णबला आत टाकलं म्हणून तुमचा राग आहे का, असा सवाल अनिल देशमुख यांनी केलाय.

सचिन वाझे यांच्याबाबत संशयाचं वातावरण तयार करणं चुकीचं आहे. योग्य प्रकारे तपास होईल, हे वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका असं आमचं मत आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.

गृहमंत्र्यांनी तरी राजकीय वळण देऊ नये. जर हे प्रकरण मागे टाकण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही केंद्राला सांगू की या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

ज्यांच्याकडे या केससंदर्भात जे कागदपत्रं आहेत ते द्या त्यानुसार तपास केला जाईल. मुंबई पोलीसांवर थोडा विश्वास ठेवा, असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय.

मी घटनास्थळी सर्वांत आधी गेलो नव्हतो - सचिन वाझे

"मला मनसुख यांच्या मृत्यूबाबत काहीच माहिती नाही. पत्रकार आणि पोलीस त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो," असं सचिन वझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माहितीनुसार, "उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या सापडल्या आहेत."

"या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल," असंही अनिल देशमुख म्हणाले.

मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.

स्फोटकांचं नागपूर कनेक्शन

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कार मधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे.

सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात.

सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल याविषयी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिका-यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली."

"आम्ही प्रत्येक बॉक्सवर बार कोड लावतो त्याद्वारे जिलेटीन कुणी केले घेतले त्याचा कसा प्रवास झाला याची माहिती आमच्याकडे आणि Petroleum and explosive safety Organisation या संस्थेकडेकडे असते. मात्र, नुसत्या जिलेटीनच्या कांड्या पाहून त्यानुसार ते आले कुठून सांगता येणार नाही कारण त्यावर बारकोड नसतो," असं ते पुढे म्हणाले.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात सापडलेलं जिलेटिन सुटं होतं. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनी सुट्या एक्स्पोजिव्ह कांड्या विकत नाही. येथील एक्स्प्लोझिव्ह कंपनी पॅकिंग बॉक्समध्येच त्यावर संबधित कारखानदार किंवा अन्य कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनी संचालकांचे कोड टाकून जिलेटीनचे बॉक्स विकतात. वाहनात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्या कुठल्या डब्यातील आहे याचा शोध घेतला तर अधिक माहिती मिळू शकते, असंही त्यांनी म्हटलं.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)