नवनीत राणा: 'शरद पवार हेच महाविकास आघाडीचे कर्ता-धर्ता, बाकी कुणाचं काही चालत नाही'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महराष्ट्रात ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणावी अशी मागणी लोकसभेत केली होती. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा लोकसभा निवडणूक जिंकल्या.
मग तीच राष्ट्रवादी काँग्रेस ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे त्या सरकारवर त्या इतकी टीका का करतात? त्यांच्या टीकेचं सगळं लक्ष्य फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेना का असते याबद्दल बीबीसी मराठीशी त्यांनी सविस्तर बातचित केली. त्याचा हा गोषवारा.
प्रश्न: नवनीत राणा महाविकास आघाडी सरकारवर इतकी कडाडून टीका का करतायत?
नवनीत राणा: महाराष्ट्र पूर्वी सगळ्यात अव्वल असायचा. टुरिझम असेल, उद्योगधंदे असतील, शिक्षण असेल, आजही आपण या सगळ्यांत अव्वल आहोत पण दुःख याचं आहे की आपण कोरोनाच्या बाबतीतही देशात अव्वल आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
महाराष्ट्राचा मृत्यूदर सगळ्यात जास्त आहे. हॉस्पिटलमध्ये लोकांना ऑक्सिजनचा तुटवडा आहे, बेड्स मिळत नाहीय. पण मुख्यमंत्री 'मातोश्री'मध्ये बसून म्हणणार 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी'. तुम्ही CM आहात, माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी हे कधी समजणार? शरद पवार साहेबांचं वय ऐंशी वर्षांच्या घरात आहे ते दौरे करतायत, देवेंद्र फडणवीस साहेब दौरे करतायत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन विचारपूस करतायत हे सगळं आम्हाला CM कडून अपेक्षित होतं. आपण वैयक्तिकरीत्या जातो तेव्हा परिस्थितीचा अंदाज येतो.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

प्रश्न: पण मुख्यमंत्री म्हणाले होते की ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या न जाण्याने नुकसान होत नाहीय.
नवनीत राणा: आम्ही लोकसभेत येऊन कशाला धोका पत्करला? 800 खासदार संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले ते मूर्ख आहेत का? आम्हीही VC द्वारे सत्रात सहभागी होऊ शकलो असतो. आई जशी आमची काळजी करते तशी आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून होती. त्यांच्यावर संपूर्ण महराष्ट्राची जबाबदारी आहे.
ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका इथल्या लोकप्रतिनिधींना बाहेर पडण्याचा सल्ला देतायत. पण स्वतः बाहेर पडत नाहीत.
प्रश्न: तुमचा राग महाविकास आघाडीवर आहे की शिवसेनेवर? कारण तुम्ही टीका फक्त उद्धव ठाकरेंना लक्ष्य करून करताय.

फोटो स्रोत, Getty Images
नवनीत राणा: या सरकारचे कर्ता-धर्ता शरद पवार आहेत. बाकी कुणाचं चालत नाही. शिवसेनेचं नाही, काँग्रेसचंही नाही. दुःख याचं आहे की जबाबदारी घेतलेले लोक ती पार पाडत नाहीयत.
प्रश्न: तुमच्या मते शरद पवार सरकारचे कर्ता-धर्ता आहेत, पण मग तुमचा सगळा राग शिवसेनेवर का?
नवनीत राणा: याला एकच कारण आहे. महाराष्ट्राची सद्यस्थिती. जेव्हा एखादा खासदार-आमदार जेव्हा मातोश्रीवर शंभर वेळा मुख्यमंत्र्यांना फोन करतो आणि ते त्याचं उत्तरही देत नाही त्यावरून ते सामान्य जनतेला किती उत्तरं देतील याचा अंदाज येतो.
प्रश्न: तुम्ही अनेकदा फोन करूनही मुख्यमंत्र्यांनी तो घेतला नाही?
नवनीत राणा: 100% . उत्तरच येत नाहीय. आम्ही आमच्या खासगी कामासाठी फोन करत नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी फोन करतोय. जर पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्स करू शकतात तर मुख्यमंत्री ते करू शकत नाहीत? एकदाही त्यांनी महाराष्ट्रातल्या खासदारांशी चर्चा का नाही केली? ते महत्त्वाचे नाहीत?

फोटो स्रोत, PTI
प्रश्न: भाजपचे लोक राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाहीत, मग नवनीत राणा का करतायत?
नवनीत राणा: त्यांच्या मनात कितीही काही असलं तरी त्यांना काही बंधनं असतात. मी माझी मतं मांडण्यासाठीच लोकसभेत आलेली आहे. गेला दीड महिना महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. सरकार मुद्द्यांवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय. ड्रग्ज, रिया चक्रवर्ती वगैरे वगैरे.
सरकार डेथ रेट सुद्धा लपवतंय.

फोटो स्रोत, Twitter
प्रश्न: तुम्ही म्हणताय सरकार डेथ रेट लपवतंय? ते आकडे कमी करून सांगतायत? कारण सरकारकडून दररोज येणाऱ्या अहवालात मृत्यांचा आकडा आणि मृत्यूदर दोन्ही दिलेले असतात.
नवनीत राणा: हो ते 100% तसं करत आहेत. कोरोनाचं गांभीर्य वाढतंय. गरीबांना महागडी औषधं घेता येत नाहीत. आम्ही रेमडेसिव्हिर चढ्या किमतीने घेतलंय. गरीब रुग्णांना सरकारी दवाखान्यातून 4 दिवसांत सोडलं जातं आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची कोव्हिड मृत्यू अशी नोंद केली जात नाही.
प्रश्न: तुम्ही परिस्थितीवरून निष्कर्श काढताय. पण सरकार मृत्यू लपवतंय याचे काही पुरावे काही कागदपत्रं तुमच्याकडे आहेत? ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही कुठल्या यंत्रणेकडे हे पुरावे दिलेत?
नवनीत राणा: मी सरकारी अधिकाऱ्यांशी बोलत असते. पुण्यात पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना कशी होती. सरकारने मोठ्या कोव्हिड सेंटरचं उद्घाटन केलं होतं पण त्या पत्रकाराला अँब्युलन्स मिळाली नाही. या सगळ्याला काय म्हणायचं? कागदपत्रं माझ्या हाती आली तर मी प्रयत्न करणार आहे. पण कागजपत्र मिळवण्यातही खूप वेळ लागणार आहे कारण या लोकांनी तिथेही खूप घोळ घातलेला आहे.

फोटो स्रोत, PTI
महाराष्ट्रात सध्या चित्रपटसृष्टी आणि अमली पदार्थांच्या कनेक्शनवरून प्रचंड वादंग सुरू आहे. अभिनेत्री कंगना राणावतने यातील अनेक आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी स्वतः चित्रपटसृष्टीत काम केलंय. त्यांन या सगळ्याबद्दल काय वाटतं?
प्रश्न: तुम्हाला लोकसभेत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, रवी राणा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतात. भाजप आणि राष्ट्रवादीने पुन्हा एकत्र यावं अशी तुमची इच्छा आहे का आणि तशी शक्यता वाटते का?
नवनीत राणा: काहीही शक्य आहे. एकमेकांना कट्टर विरोध करणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार बनवू शकतात तर महाराष्ट्रात काहीही शक्य आहे. हे तीन पक्ष एकत्र येतील असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं.
मी पवार साहेबांचा कायमच आदर केलाय आणि करत राहीन. पवार साहेबांनी आणि अजित दादांनी मला कायम पाठिंबा दिलाय. भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार बनलंही होतं. पण ते काही कारणाने टिकलं नाही.
प्रश्न: असं सरकार परत बनावं अशी तुमची इच्छा आहे? असे काही प्रयत्न सुरू आहेत?
नवनीत राणा: 24 तासांत जर सरकार बनू आणि बिघडू शकतं आणि एकमेकांचे विरोधक तीन पक्ष एकत्र येऊ शकतात तेव्हा काहीही शक्य आहे. त्यात काहीही शंका नाही.
प्रश्न: चित्रपट सृष्टी आणि ड्रग्जचा संबंध नेहमी का जोडला जातो?
नवनीत राणा: जिथे पैसा असतो, नाव-प्रसिद्धी असते तिथे ड्रग्ज आहेतच यात काही दुमत नाही. आम्ही काम करायचो तेव्हाही रेव्ह पार्ट्या चालायच्या. मोठे डिरेक्टर, निर्माते ज्यांच्याकडे करोडो-अब्जावधी रुपये आहेत त्यांचीच नावं यात येतात. मधल्या स्तरातले लोक जे आहेत ज्यात असिस्टंट दिग्दर्शक येतात, इतर अभिनेते येतात, प्रॉडक्शनमधील लोक यांची नावं कधीही पुढे येत नाहीत. क्रिकेटमध्येही अशी काही प्रकरणं घडली. आज हा ड्रग्जचा मुद्दा का एवढा गाजतोय? ड्रग्ज काही आज नाही आले महाराष्ट्रात, बॉलिवूड किंवा कोणत्याही इंडस्ट्रीत तो आज नाही आलेला. आज याची इतकी चर्चा का होतेय? हा फक्त महाराष्ट्र सरकारचा इतर मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष वळवण्यासाठीचा प्रयत्न आहे, महाराष्ट्र सरकार यावर पूर्ण जोर लावतंय.
प्रश्न: अनेकांचा आरोप हा आहे की कंगना राणावत भाजपच्या बाजूने बोलतायत आणि भाजपलाच कोरोना वरून लक्ष याकडे वळवून सरकारला अडचणीत आणण्याचा.
नवनीत राणा: कंगना राणावतने महाराष्ट्राबद्दल जे विधान केलं त्याचा विरोध मी केलाय. महाराष्ट्राबद्दल कुणी अपमानकारक बोललं नाही पाहिजे. असं बोलणाऱ्या व्यक्तीचे डोळे काढून देण्याची ताकद महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आहे. पण एक राज्यसभेचा सदस्य एका बाईला शिवीगाळ करत असेल तर त्याचं समर्थन आपण कसं करायचं?
कंगना राणावतने बोलताच तात्काळ तिचा बंगला तोडण्याची कारवाई केली गेली. मग कायदा कुठे गेला? राज्यसभेचे सदस्य आहात आणि तुम्ही बाहेर येऊन मीडियामध्ये शिवीगाळ करता याचं एक बाई म्हणून मी समर्थन कसं करणार?
प्रश्न: हे सगळं सूडापोटी केलं जातंय?
नवनीत राणा: तेवढंच केलं जातंय. कुणी त्यांच्याबद्दल बोलला म्हणून त्याला शिवीगाळ करणं, त्याचं घर तोडणं हे सगळं का?
प्रश्न: जया बच्चन यांनी राज्यसभेत म्हटलं होतं की काही लोकांच्या कृत्यांमुळे सगळ्या बॉलिवूडला बदनाम करू नये. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात का?
नवनीत राणा: मी या भावनेशी सहमत आहे. काही मोजक्या लोकांबद्दल आपण बोलतोय. ड्रग्ज सेवन करणं ही चांगली गोष्ट नाहीय. आणि हे ड्रग्ज कुठून येतायत याबद्दल कुणीच बोलत नाहीय. हे कसे पाकिस्तानातून पंजाबात येतात कसे बॉलिवूड, मुंबई या सगळ्यावर हे ड्रग्ज भारी ठरतात याबद्दल कुणीच बोलत नाहीय. कुठून इतकं प्रेशर येतं आणि या ड्रग्जना देशात येण्यासाठी मार्ग मिळतो याबद्दलही बोललं पाहिजे. एखादी गोष्ट देशात आलीच नाही तर सेवन कसं करणार? राजकीय पाठिंब्याशिवाय हे करता येणार नाही.
प्रश्न: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केंद्राच्या अखत्यारित आहे. मग त्यांच्या कामात कोण हस्तक्षेप करतंय असं तुम्हाला वाटतं?
नवनीत राणा: ज्या राज्यात ही चौकशी सुरू आहे तिथे ज्या इमारतीत चौकशी सुरू आहे तिथे आग लागते? जिथे या सगळ्या प्रकरणाशी संबंधित फाईल्स आहेत तिथे आग कशी लागते? तिथे तर राज्याचं नियंत्रण आहे. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असतं तेव्हा असा राजकीय परिणाम होतोच.
प्रश्न: म्हणजे राज्य सरकार एन सी बीच्या कामात थेट ढवळाढवळ करतंय असा तुमचा आरोप आहे?
नवनीत राणा: 100% तसं दिसत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









