नवनीत राणा यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेचा अर्थ काय?

फोटो स्रोत, PTI
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी अमरावतीहून
कोव्हिडची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली आहे.
नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभेत केलेल्या या मागणीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवनीत राणा या केवळ राष्ट्रपती राजवटीची मागणी करून थांबल्या नाहीत, तर उद्धव ठाकरे घरात बसून राज्याचा कारभार हाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. या उलट ऐंशीच्या घरात असलेले शरद पवार राज्याचा दौरा करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्य सरकार कोव्हिडची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नारायण राणे, रामदास आठवले यांनीही केली होती. पण ते विरोधक असल्यामुळे त्यांच्या या मागणीचा वेगळा राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला नाही.
मात्र नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून अमरावतीची जागा सोडण्यात आली होती. त्यामुळे राणा यांच्या या विधानाचा राजकीय अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकमेव अपक्ष खासदार
राज्यातल्या एकमेव अपक्ष खासदार म्हणून नवनीत राणा निवडून आल्या आहेत. पाच वेळा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवलेल्या शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा त्यांनी पराभव केला होता.
पण अमरावती लोकसभेसारख्या मोठ्या मतदारसंघात अपक्ष म्हणून खासदार निवडून येणं त्यांच्यासाठी एवढंही सोपं नव्हतं. त्यामुळे नवनीत राणा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवला.

फोटो स्रोत, Facebook
तत्पूर्वी 2014 मध्ये नवनीत राणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 2019 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आला होता. मात्र ते नाकारून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणं त्यांनी पसंत केलं.
मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा मोठा विरोध होता. मात्र तो विरोध झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणांना पाठिंबा दिला.
'प्रसिद्धीचा मिळवण्याचा हेतू'
दुसरीकडे नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा पर्याय नव्हता, असं मत 'लोकसत्ता'चे पत्रकार मोहन अटाळकर यांनी व्यक्त केलं आहे.
त्यांनी म्हटलं, "राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता. गेल्या काही वर्षांत पक्षाने सक्षम उमेदवार तयारच केला नाही. काँग्रेसमधून किशोर बोरकर यांचं नाव पुढे होत. मात्र मेरिटच्या आधारावर ते नाव मागे पडलं आणि 2014 च्या निवडणुकीचा आलेख बघता नवनीत राणा दुसऱ्या क्रमांकावर होत्या.

फोटो स्रोत, Facebook
नवनीत राणा यांचा त्यांच्या मतदार संघात करिष्मा आहे, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळं त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट सहज मिळालं असतं. मात्र, मोदी लाट बघता त्या भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नात होत्या. मात्र ते प्रयत्न अपयशी ठरल्याने पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अमरावतीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांचा त्याला विरोध होता. पण दुसरा सक्षम चेहरा नसल्याने नवनीत राणा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाल्या, आणि त्या विजयी झाल्या."
अटाळकर यांनी म्हटलं, "त्यांच्या वक्तव्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा आणि भाजपच्या निकट असल्याचं दर्शवण्याचा हेतू नवनीत राणा यांचा असू शकतो. दुसरं सत्तेत असून त्याचे फायदे त्यांना मिळत नाहीत. फक्त अपक्ष उमेदवार म्हणून बोलण्यासाठी त्यांना स्पेस मिळतेय. त्यांना बोलण्याचं स्वतंत्र आहे," अटाळकर सांगतात.
'आधी धर्मनिरपेक्ष भूमिका, मग भाजपची स्तुती'
लोकसभेत सुरवातीला नवनीत राणा यांनी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली. लोकसभेत खासदारकीची शपथ घेताना 'जय श्री राम'च्या घोषणेला नवनीत राणांनी विरोध केला होता.
त्यानंतर त्यांनी काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याला पाठिंबा दिला तसंच तिहेरी तलाकच्या कायद्यावरही केंद्र सरकारची स्तुती केली.
"नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला आपला लेखी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट करणं त्यांच्या राजकारणाचा एक भाग असू शकतो," असं मत 'तरुण भारत'चे पत्रकार गिरीश शेरेकर यांचं आहे.

फोटो स्रोत, Facebook
ते म्हणतात "राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतर राणा यांनी नैसर्गिकरित्या त्यांच्या बाजूने उभे राहायला हवं होतं. पण राजकीय दृष्ट्या पाहिल्यास विरोधी पक्षाला लक्ष्य करून मत व्यक्त करणंही नैसर्गिक आहेच. त्यांचे पती रवी राणा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले तेव्हाही असाच प्रकार बघायला मिळाला होता.
"सत्तेसोबत जाण्याचा त्यांचा जुना इतिहास आहे. त्यामुळं आता जे काही नवनीत राणा करत असतील ते व्यावहारिक आहे. दुसरं म्हणजे राज्य सरकारच्या विरोधातला विधान करून त्या आपण इतर खासदारांपेक्षा चांगलं काम करतो आणि स्वत:चं वेगळेपण दाखवण्याची धडपड असू शकते," शेरेकर सांगतात.
ज्येष्ठ पत्रकार संजय शेंडे यांनी म्हटलं की, "नवनीत राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. मात्र त्यांच्या हल्लीच्या या विधानामुळे जिल्ह्यातील जनता संभ्रमात पडली आहे. विशेषत: अमरावती मतदारसंघ हा अनूसुचित जातीसाठी आरक्षित आहेत. या मतदारसंघात मुस्लीम आणि दलित मतदारांची मोठी संख्या आहे. हा समाज राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. किंबहुना मोदी लाटेला नाकारुन या मतदारसंघाने एका अपक्ष महिलेला विजयी केले. त्यामुळे अशा प्रकारच्या विधानामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो."
"त्याचे राजकीय पडसाद निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणावर उमटू शकतात. नवनीत राणांच्या विधानामुळे त्यांची राजकीय वाटचाल कुठल्या दिशेने जात आहे. ते स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र दलित, मुस्लिम आणि थोड्या फार प्रमाणात बहुजन जोभाजप विरोधी आहे, त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं मत पत्रकार संजय शेंडे यांनी व्यक्त केलं.
'माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री कधी म्हणणार?'
या सर्व प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना नवनीत राणा यांनी म्हटलं, "माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच घर बघावं. मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढले, पण इतरांनी स्वतःच घर बदलून विरोधी पक्षासोबत सरकार स्थापन केलं. शिवसेना भाजपसोबत युतीत लढली आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी केली. कोव्हिडमुळे आज ज्या प्रकारे महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर गेली त्यामुळं राष्ट्रपती राजवटीची मी मागणी केली आहे."
"अमरावतीसारख्या जिल्ह्यात रुग्णांना बेड मिळत नाहीये. दररोज कोव्हिड रुग्णांची भर पडतीये. अशा परिस्थितीत 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' अस मुख्यमंत्री म्हणत आहेत. कोणताही कुटुंब प्रमुख त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम असतो. पण 'माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी' असं मुख्यमंत्री कधी म्हणणार?" असं नवनीत राणा यांनी म्हटलं.
"मला कोरोना झाला म्हणून मी लोकसभेत प्रश्न मांडला नाही. माझ्या जनतेसाठी मी हा प्रश्न लावून धरलाय. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात पूर आला तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरा केला? त्यातच पवार साहेबांकडे बघा...ते दौरे करतात. त्यांच्याविषयी मी चांगलच म्हटलं आहे. पवार साहेब जे करू शकतात ते मुख्यमंत्री का करू शकत नाहीत? "कोव्हिड बाबतीत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती भयावह आहे. सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र्र अव्वल आहे. पण कोव्हिडमध्येही अव्वल येईल असा विचार केला नव्हता. त्यामुळं महाराष्ट्र सगळ्या बाबतीत अव्वल असावा आणि कोरोनाच्या बाबतीत मात्र शेवटी असावा त्यासाठी माझा लढा सुरू आहे," असं राणा पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








