उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पारनेरच्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी

शिवसेना
    • Author, प्राजक्ता पोळ आणि नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे पाच नगरसेवक स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक परतले आहेत.

स्थानिक नेतृत्वाबाबत आमची नाराजी होती शिवसेना पक्षावर नव्हती असं स्वगृही परतलेल्या नगरसेवकांनी म्हटलं आहे.

हे सर्व प्रकरण काय होतं आणि त्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम झाला आहे याबाबत अधिक जाणून घ्या या लेखातून.

अजित पवारांचा निशाणा नेमका कुणावर?

पारनेरच्या मुदद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताणलं जात आहे की हे अजित पवार यांचं नवं राजकारण आहे?

करण हा प्रवेश उद्धव ठाकरे यांना चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय.

त्यामुळेच 'राज्यात सत्ता अबाधित ठेवायची असेल तर पारनेरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा,' असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिल्याचं बोललं जातंय.

शिवसेनेच्या एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला ही माहिती दिली.

मुख्य म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर सोमवारी बैठक झाल्यानंतर शिवसनेनं हा इशारा दिल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

दोन्ह पक्षांच्या नेत्यांकडून हे स्थानिक राजकारण असल्याचं सांगण्यात आलं.

कोरोना

फोटो स्रोत, Alamy

लाईन

पण राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे नगरसेवक का फोडले? या एका मुद्याचा परिणाम राज्यातल्या सत्तेवर होईल का? उध्दव ठाकरे यांनी हा निरोप देऊन राष्ट्रवादीला इशारा दिलाय का?

शिवाय वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीशिवाय स्थानिक नेते निर्णय घेतात का? तसंच अशी कुठली तातडीची गरज होती की अजित पवार यांनी बारामतीमध्ये त्यांना बोलावून घेऊन त्यांचा प्रवेश घडवून आणला?

असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, TWITTER

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी याबाबत बोलताना सांगितलं, "पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला, पण याचा अर्थ अजित पवार यांनी ते नगरसेवक फोडले असा होत नाही. पारनेरच्या मुद्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे तो विषय स्थानिक पातळीवरचा होता, तो आता चर्चेला येऊ नये असं वाटतं."

नेमकं पारनेरमध्ये घडलं काय?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन पारनेर नगरपंचायतीत सत्ता आणली होती. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी हे आमदार असताना त्यांनी नगरपंचायतीवर वर्चस्व राखलं.

पण अनेक महिन्यांपासून नगराध्यक्ष पदावरून विजय औटी आणि स्थानिक नगरसेवकांमध्ये खदखद सुरू होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाली. त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले निलेश लंके तिथून आमदार झाले. या निवडणुकीत त्यांना त्यांच्या आधीच्या पक्षातल्या म्हणजेच शिवसेनेतल्या नगरसेवकांची साथ मिळाली.

त्यानंतर आता लंके यांनी त्यांचे समर्थक असलेल्या शिवसेनेच्या 5 नगरसेवकांना चार दिवसांपूर्वी बारामतीला जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश चार महिन्यांनी असलेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं बोललं जातय. पण यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.

'त्यांचा' भाजप प्रवेश निश्चित होता

याबाबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार निलेश लंके यांच्याशी चर्चा केली.

पारनेर नगर पंचायत
फोटो कॅप्शन, पारनेर नगर पंचायत कार्यालय

ते म्हणतात, "शिवसेनेचे नगरसेवक अनेक महिन्यांपासून त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत. शिवसेनेच्या नगराध्यक्षाला पाडून त्यांनी अपक्ष नगराध्यक्ष केला. काही महिन्यांपूर्वी या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे ते अशक्य असल्याचं मी त्यांना सांगितलं.

त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला. ते पुन्हा माझ्याकडे आले आणि शेवटचा प्रस्ताव दिला. त्यावेळी मी अजितदादांशी बोललो तेव्हा अजित दादांनी आपलं महाविकास आघाडीचं सरकार आहे. हा प्रवेश शक्य नाही असं स्पष्ट सांगितलं. मग मी अजितदादांना सांगितलं आपल्या तीनही पक्षांना भाजप विरोधात लढायच आहे. जर भाजपची ताकद वाढली तर स्थानिक पातळीवर अडचणीचं ठरेल त्यासाठी तुम्ही कृपया विचार करा.

मग अजितदादांनी त्यांना समजावलं पण ते शिवसेनेत रहायला तयार नव्हते. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला होता. त्यानंतर अजित पवारांनी त्या नगरसेवकांना प्रवेश दिला. यात भाजपविरोधी ताकद मिळवणं हा एकमेव हेतू आहे. शिवसेनेला दुखावणं हा हेतू नाही".

लंके यांच्या या दाव्याबाबत आम्ही शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

'शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अंतर'

पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आता या मुद्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

त्यांच्या मते "जर त्या नगरसेवकांचा प्रवेश भाजपमध्ये निश्चित झाला होता तर त्यांना कोणीच थांबवू शकलं नसत. भाजपनेही ताकद लावली असती. त्यामुळे ते भाजपमध्ये चालले होते म्हणून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे त्या घटनेवर पांघरून घालण्यासारखं आहे. अजित पवार यांनी आक्रमकपणे हा प्रवेशाचा निर्णय घेतला असू शकतो."

या सरकारमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकांमध्ये अंतर असल्याचं या घटनेवरून जाणवत असल्याचं देसाई यांना वाटतं.

ते सांगतात "अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेत अंतर जाणवतं. काल मातोश्रीवर शरद पवार आणि उध्दव ठाकरेंमध्ये जी खलबतं झाली त्यामध्ये पारनेरचीही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यापुढे सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील, पण सध्यातरी राष्ट्रवादी पांघरून घालण्याचा प्रयत्न करतेय."

शिवसेनेत परत जाणार नाही

काही झालं तरी शिवसेनेत परत जाणार नाही असा पवित्रा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या नगरसेवकांनी घेतला आहे.

"सध्याचे स्थानिक आमदार निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते ते आता राष्ट्रवादीत गेले आहेत आम्ही त्यांचे जुने कार्यकर्ते आहोत. तसंच पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या मनमानीला कंटाळून आम्ही शिवसेना सोडली आहे.

माजी आमदारांनी इथं मी म्हणजे शिवसेना असं धोरण राबलं. आता आमचं ठरलं आहे आम्ही निलेश लंके यांच्या बरोबर राहणार आहे. शिवसेनेनं परत बोलावलं तरी जाणार नाही. आम्ही पदाचा राजीनामा देऊ, पण शिवसेनेत परत जाणार नाही," असं बंडखोर शिवसेना नगरसेवक नंदकिशोर देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पारनेरच्या मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने या 5 शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.

पारनेर नगर पंचायतमध्ये सध्या 19 सदस्य आहे. त्यापैकी 2 स्वीकृत आहेत. तर शिवसेना-9 राष्ट्रवादी-2 काँग्रेस-1 आणि अपक्ष-5 असं पक्षीय बलाबल आहे. सत्ता शिनसेनेचे असली तरी नगराध्यक्ष मात्र अपक्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे पारनेरच्या नगर पंचायतीची मुदत ऑक्टोबरमध्ये संपत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)