अजित पवारांचा राजीनामा निराशेपोटी - सुधीर मुनगंटीवार

"अजित पवारांनी निराशेपोटी राजीनामा दिला. आचारसंहिता लागल्यानंतर राजीनाम्याला काय अर्थ आहे? त्यांना सत्तेची सवय होती. आता त्यांना रोज भीती वाटते की कोण पक्ष सोडतंय. यातून हताशा आणि निराशा येते. त्याशिवाय दुसरं काही कारण असेल असं मला वाटत नाही," असं सुधीर मुनगंटीवार बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' या कार्यक्रमात म्हणाले.
युती होणारच
शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीची घोषणा केव्हा होईल असा प्रश्न विचारला असता अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की भाजप-शिवसेनेचा संसार हा 1989 पासून ते आजपर्यंत सुरू आहे. त्यामध्ये कुरबुरी होऊ शकते पण कोणत्याही दोन पक्षात हे होतच असतं असं मुनगंटीवार सांगितलं.
शिवसेना आणि भाजप युतीबाबत घोषणा, जागा वाटप याबाबत आम्ही पत्रकार परिषदेतून माहिती देऊ असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
कलम 370 या मुद्द्याचा वापर निवडणूक प्रचारात केला जात असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे याबद्दल मुनगंटीवार म्हणाले, "370 कलम रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात नोकरी मिळणार नाही. पण भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आपण घेतो पण काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली नाही. काश्मीरच्या तरूणांना त्याचा फायदा आहे."
राष्ट्रवादीबाबत जर बोलायचं झालं तर ते कुठे राज्याच्या मुद्यांवर बोलतायेत. ते पण फक्त हाच प्रश्न विचारत आहेत की ईडीने नोटीस का पाठवली? मुद्द्यांवर तर ते पण बोलत नाहीत असं मुनगंटीवार म्हणाले.
एकनाथ खडसे म्हणाले होते की शरद पवारांचं नाव या प्रकरणात कुठून आलं हे मला कळलं नाही. याबाबत मुनगंटीवार यांनी खुलासा केला.
"खडसे बरोबर बोलतायेत त्यांच्या तक्रारीत नावं नसेल शरद पवारांचं... आम्हीही म्हणतोय नाव नव्हतं पण ज्यांनी तक्रार केली त्यात पवारांचं नाव आहे."

मोठा भाऊ कोण?
भाजप हा स्वतःला शिवसेनेचा मोठा भाऊ समजतो का? असं विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले, "मोठे छोटे भाऊ असं काही नाही. आम्ही दोघं समविचारी पक्ष आहोत. वेगळ्या विदर्भाचा ठराव रद्द झालेला नाही. ज्यावेळी आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं तर आमचा प्रस्ताव वेगानं पुढे जाईल. आता कॉंग्रेस राष्ट्रवादीने पाठींब्याची भूमिका घ्यावी आणि पाठिंबा द्यावा. आम्ही प्रस्ताव पुढे नेऊ."
अजित पवारांचा राजीनामा नैराश्यातून आहे. आता आचारसंहिता असताना राजीनामा देण्याचा काय विषय आहे. त्यांना सत्तेची सवय आहे. आता कोण कधी पक्ष सोडेल माहिती नाही अशी परिस्थिती आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
'खडसे नाराज नाहीत'
"खडसे साहेबांच्या तक्रारीत शरद पवारांचं नाव नव्हतं. ज्यांनी केस केली त्यांच्या तक्रारीत (शरद पवारांचं) नाव आहे. एकनाथ खडसे नाराज आहेत का, असं विचारल्यावर मुनगंटीवार म्हणाले, "मी अनेकदा त्यांच्याशी बोलतो. मला नाराजी जाणवली नाही. ते पक्षासाठी जीव ओतून काम करतात. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. त्यांच्याविषयी पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय करेल. भिन्न मत असणं म्हणजे नाराजी नाही. माझ्या माहितीनुसार एकनाथ खडसे नाराज असण्याचं कारण नाही. अनेक पार्लमेंटरी बोर्डांच्या बैठकीत ते येतात."
एकनाथ खडसे मंत्रिमंडळात परत येणार का असं विचारल्यावर मुनगंटीवार म्हणाले, "कुणी मंत्रिमंडळात यावं, हे ठरवण्याचा निर्णय अजून पक्षाने मला दिला नाही."
सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रमात आयोजित करण्यात आल्या होत्या.
संपूर्ण समाजाचं नेतृत्व महिलेकडं आलं तर सकारात्मक बदल होतील
संपूर्ण समाजाचं नेतृत्व जर महिलांकडे आलं तर समाजात सकारात्मक बदल घडतील असं मत सामाजिक कार्यकर्त्या रश्मी पारसकर यांनी व्यक्त केलं.

बीबीसीच्या राष्ट्र महाराष्ट्र या कार्यक्रमात राजकारणात तरुण महिलांचं स्थान या विषयावरील चर्चासत्रात रश्मी पारसकर, स्थानिक पत्रकार अंकिता देशकर आणि पर्यावरण कार्यकर्त्या सुरभी जैस्वाल यांनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात महिलांना रोजच्या आयुष्यात जगताना येणाऱ्या संघर्षाबाबत पाहुण्यांनी आपली मतं व्यक्त केली. करिअर गाइडन्सपासून ते हवामान बदलासंदर्भातल्या विविध समस्या महिला कशा सोडवू शकतात याचा वेध या चर्चासत्रात घेण्यात आला.
महिलांना नव्या दिशांना गवसणी घालण्यासाठी घरून पाठिंब्याची गरज असते, त्यांना मार्गदर्शन हवं असतं, असं मत या चर्चासत्रात रश्मी, अंकिता आणि सुरभि यांनी व्यक्त केलं आहे.

मुलगा असो वा मुलगी स्ट्रगल सगळ्यांना करावं लागतं. फक्त आपल्याला ते करायचं आहे हे वाटायला पाहिजे. प्रत्येक मुलीनं स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत असं ठरवलं तरच ते प्रत्यक्षात येऊ शकेल असं अंकिताला वाटतं.
तर, रश्मी यांना मुली मुलांपेक्षा हुशार आहेत, फक्त मुलीनं ते शिकून आपल्या जीवनात आजमवायला पाहिजे. मुलींनी चुका करायला शिकलं पाहिजे असं मत मांडलं.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप वागत नाही - शिवानी दानी
निवडणुकांच्या तोंडावर भाजप काश्मीरच्या मुद्द्यावर राज्यांमध्ये बोलत आहे असा आरोप होत आहे. हा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरच्या अध्यक्ष शिवानी दानी यांनी फेटाळून लावला.
निवडणुका आहेत म्हणून आम्ही 370 चे कार्यक्रम करत नाहीयेत. ते आधीच ठरलेलं होतं. ते आम्हाला साध्य करता आलं. योगायोगानं निवडणुका आल्या आहेत. आम्ही विकासाची कामं करत आहोत, असं मत भाजपच्या शिवानी दानी यांनी व्यक्त केलं.

कलम 370 हा राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे. पण आज आपल्या बरेच प्रश्न भेडसावत आहेत असं मत काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं.
"काँग्रेसच्या दृष्टीने या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा आहे. कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची दुरावस्था आहे. हे प्रश्न राष्ट्रवादाच्या प्रश्नामुळे डायव्हर्ट होतो. आज बेरोजगारी, बलात्कार, अ्याचार आदी मुदद्यावर आपण दूर चाललो आहोत. 370 मुद्दा आहेच. पण आपण विदर्भात राहतो. विदर्भाच्या मुद्द्यावर जनतेने भाजपाला निवडून दिलं. पण हे लोक आता विसरून गेले," असं काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
पवारांकडून काँग्रेसने शिकावं - यशोमती ठाकूर
बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांची स्तुती केली. "शरद पवार आघाडीचे नेते आहेत, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, मग ते आमच्या नेत्यांनीही शिकायला हवंय. आम्ही त्यांना मानसन्मान देतोच. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची लढवय्या वृत्ती हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांनी ज्याप्रकारे राजकारण उभारलं आहे, ते सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे," असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
काँग्रेस हा लढणारा पक्ष आहे आणि आमच्या पद्धतीने प्रचार करत आहोत असं काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.
सध्या शरद पवार यांचं ईडीच्या तक्रारीत नाव आलं आहे. 'जर पवारांची चौकशी होणार असेल तर पीकविमा घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक जे घोटाळे आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी,' असं ठाकूर म्हणाल्या.

सध्या सर्व पक्षाच्या यात्रा सुरू आहे, प्रचार सुरू आहे पण काँग्रेस कुठेच प्रचारात दिसत नाही असा प्रश्न विचारलं असता यशोमती ठाकूर म्हणाल्या आम्ही सतत प्रश्न मांडत आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी हे प्रश्न आम्ही मांडत आहोत.
या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी मांडलेले मुद्दे:
- काँग्रेस होती आहे आणि राहणारे, मोठ्या प्रमाणात नसलो तरी आमचं अस्तित्व आहे.
- विपरित परिस्थिती असताना लोकांची कशी दिशाभूल करायची हे सत्ताधाऱ्यांकडून शिकायला हवं.
- काँग्रेसने शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी या मुद्दांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हेच मुद्दे मांडत आहोत. आमचा प्रचार डोअर टू डोअर सुरू आहे.
- काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल आहे असं आम्ही म्हणत नाहीत पण कोणत्याच पक्षात सर्वकाही चांगलं आहे असं नाही.
- पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर जात आहेत. इतका खर्च जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केला असता तर त्यांचे सातबारे क्लियर झाले असते.
- माझ्या मतदारसंघामधलं मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल पण या गावात शेतकरी आत्महत्या करतोय.
- कर्जमाफी झाली म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का? असा प्रश्न एका तरुणीने विचारला त्यावेळी ठाकूर म्हणाल्या कर्जमाफी ही आत्ताची गरज आहे. तुम्ही मोठ्यामोठ्या कंपन्यांचे कर्ज माफ करता. पण मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवेतच. अल्पभूधारकांना कर्जमाफी फार गरजेची आहे. कुठल्याही सरकारने पैसे द्यायला हवेत. संत्र द्राक्षासाठी आधार देणं गरजेचं आहेच. अंबानी-अदानींना भरपूर सूट मिळते. पण शेतकरी साधं तेल पण आणू शकत नाही.

तुमच्या मनातले प्रश्न विचारा
निवडणुकीच्या धामधुमीत तुम्हाला भेडसावणारे प्रश्न थेट तुमच्या नेत्यांना विचारण्याची संधी बीबीसी मराठी तुम्हाला देत आहे. 'राष्ट्र महाराष्ट्र' या डिजिटल कार्यक्रमाच्या निमित्तानं.
'राष्ट्र महाराष्ट्र'चं पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतरचा दुसरा कार्यक्रम औरंगाबादमध्ये झाला, आणि आता तिसरा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे.
या कार्यक्रमात तुम्ही नेत्यांना तुमच्या मोबाईल फोनवरून प्रश्न विचारू शकता. राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बीबीसी मराठी हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवेल.
आज दिवसभर नागपूरमध्ये या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन बीबीसी मराठीने केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. ते बीबीसी मराठीच्या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.
हा कार्यक्रम दुपारी 2.30 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 7.30 पर्यंत चालणार आहे. काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या परिसरातील विमलाबाई देशमुख हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बीबीसी मराठीच्या युट्यूब आणि फेसबुकवर होणार आहे.

या कार्यक्रमात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते नाना पटोले, यशोमती ठाकूर, आशिष देशमुख, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, विदर्भवादी नेत्या क्रांती धोटे-राऊत सहभागी होणार आहेत.
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना, त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वापरूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
बीबीसी मराठीची वाटचाल
बीबीसी मराठीच्या वेबसाईट आणि सोशल चॅनल्सची सुरुवात 2 ऑक्टोबर 2017 रोजी झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत ही बीबीसी मराठीची पहिली हेडलाईन होती.
बीबीसी मराठीने गेल्या एक-दीड वर्षांत मराठी पत्रकारितेत अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या.
• पूर्णतः डिजिटल असलेलं हे मराठीतलं पहिलंच व्यासपीठ.
• बातम्या सांगण्याच्या पद्धतीत नवनवीन प्रयोग केले. 360 डिग्री व्हीडिओ आणि VR (Virtual Reality) व्हीडिओ मराठीत पहिल्यांदाच केले.
• जागतिक बातम्या मराठीत नियमितपणे देणारं पहिलं व्यासपीठ.
• महिला, दलित, धार्मिक अल्पसंख्याक आणि लैंगिक अल्पसंख्याकांना समान हक्क मिळावेत यासाठी बीबीसी मराठीने नेहमी पुढाकार घेतला.

• प्रत्येक परिस्थितीत बीबीसी मराठीने निष्पक्ष बातम्या देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तुमच्या कौतुकाची थापही मिळवली.
• बीबीसी मराठीच्या अनेक बातम्यांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात थेट चांगला बदल घडला.
• बीबीसी मराठीने सदैव किचकट विषय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला.
• भारतातले आघाडीचे विचारवंत प्रा. सुहास पळशीकर आणि इतर अनेक मान्यवरांचं लिखाण तरुणांपर्यंत आणलं.
• सर्वांत महत्त्वाचं म्हणजे Jio TV अॅपवर भारतातलं पहिलं डिजिटल व्हीडिओ स्ट्रीमिंग बीबीसी मराठीनं सुरू केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








