मुंबई वाहतूक कोंडी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे सुटणार का?

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राजधानी मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत आहे. मुंबईतील वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आधुनिक वाहतूक प्रणाली 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (ITMS) हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी तब्बल 891 कोटी रुपयांचा खर्च करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.
मंगळवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती.
सगळे रस्ते, उड्डाणपूल यांच्यावरील एकत्रित वाहतूक नियंत्रण आणि नियोजनासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 891 कोटी 34 लाखांचा खर्च होणार आहे, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
ITMS प्रकल्पामध्ये विकसित होणारी यंत्रणा ही अत्याधुनिक असेल. रस्त्यांच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्चित करून तसंच रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण विचारात घेऊन प्रत्यक्षपणे सिग्नल यंत्रणेच्या वेळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करणे शक्य होणार आहे. तसंच गरजेप्रमाणे सिग्नल यंत्रणेची वेळ प्राधान्यक्रमानुसार बदलता येणार आहे. स्मार्ट सिग्नलिंग, लायसन्स नंबरप्लेट ओळख, अतिवेगवान अथवा चुकीच्या दिशेने येणारी वाहने आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, चोरीची वाहने शोधण्यास मदत, दंडवसुलीत वाढ हे फायदे या प्रकल्पातून साध्य होणार आहेत.
आजघडीला मुंबईची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 30 लाख इतकी आहे. शहराचं क्षेत्रफळ सुमारे 438 चौरस किलोमीटर आहे. मुंबईत सध्या सुमारे 35 लाख वाहने असून प्रति हजार व्यक्ती 261 जणांकडे स्वतःचे खासगी वाहन आहे. सुमारे 2 हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. यातील सुमारे 95 टक्के रस्त्यांची देखभाल ही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/getty images
या सर्व बाबींचा विचार करता मुंबईतील वाहतूक व्यवस्था नागरिकांसाठी तोकडी पडत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. मुंबईतील वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा यातून प्रवासासाठी लागणारा वेळ व इंधनावर होणारा खर्च, प्रवासासाठी लागणारा वेळ व इंधनावर होणारा खर्च, प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेतून कार्यक्षमतेवर होणारा परिणाम या सर्वांवर उपाय म्हणून अद्ययावत वाहतूक व्यवस्थापनाची गरज आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
ITMS म्हणजे नेमकं काय?
मुंबई शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त दिपाली मसीरकर यांनी ITMS बाबत अधिक माहिती दिली.
"ITMS ही पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेचा उपयोग शहरातील वाहतुकीचे नियंत्रण योग्य प्रकारे करण्यासाठी सिस्टिमची मदत होणार आहे, मुंबईतील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहे," असं मसीरकर सांगतात.

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images
"ITMS मध्ये शहरातील सगळे सिग्नल एकमेकांशी जोडलेले असतील. ही पूर्णपणे स्वयंचलित असणार आहे. यात कसल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसेल. एखाद्या रस्त्यावरची गर्दी आणि बाकीच्या रस्त्यांवरची स्थिती बघून ही सिस्टिम काम करेल. यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येईल."
"उदाहरणार्थ, सकाळी दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यांना गर्दी असते. संध्याकाळी उत्तरेकडे जाणाऱ्या दिशेला गर्दी होते. ट्रॅफिक सिस्टिममधून या सगळ्या बाबींचा समन्वय राखला जाईल. जास्त गर्दी असलेले रस्ते, कमी गर्दीचे रस्ते या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणच्या सिग्नलच्या वेळेमध्ये आवश्यक बदल करण्यात येईल. विदेशातील प्रमुख शहरांमध्ये वापरण्यात येत असलेली यंत्रणा प्रथमच मुंबईत वापरण्यात येणार आहे."
"यासोबतच ऑनलाईन दंड पद्धत तसंच वाहतूक नियोजनासाठीच्या इतर उपक्रमांसाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो. सध्या मुंबईत ठराविक ठिकाणीच ऑनलाईन दंड पद्धत सुरू आहे. पण या सिस्टिममुळे मुंबईच्या प्रत्येक चौकात ऑनलाईन दंड प्रक्रिया राबवता येईल. यामुळे दंडाची वसुली वाढणार आहे," असं पोलीस उपायुक्त मसीरकर सांगतात.
हॅकिंगची शक्यता किती?
तुम्ही हॉलीवूडचे डाय हार्ड 2.0, द इटालियन जॉब यांसारखे चित्रपट पाहिलेत का? त्यामध्ये शहरातील ट्रॅफिक सिस्टिम हॅकिंगच्या मदतीने विस्कळीत केल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशाप्रकारे एखादी ट्रॅफिक सिस्टिम हॅक करून संपूर्ण शहरात चक्काजाम करणं शक्य आहे का, याबाबत बीबीसीने संदीय गादिया यांच्याशी संवाद साधला. संदीप गादिया हे सायबर इन्व्हेस्टिगशन क्षेत्रात काम करणाऱ्या सायबर फर्स्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सायबर क्राईम एक्सपर्ट आहेत.

फोटो स्रोत, Bill Hinton/getty images
गादिया सांगतात, "ट्रॅफिक सिस्टिमचे तंत्रज्ञान विदेशात आधीपासूनच वापरण्यात येतं. विदेशात अशाप्रकारच्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा असतात. त्यामुळे या यंत्रणेची भारतीय परिस्थितीत कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाईल, याबाबत उत्सुकता आहे."
"ITMS यंत्रणा योग्य पद्धतीने वापरात आणल्यास वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल यात शंका नाही. पण कोणतंही तंत्रज्ञान दोषमुक्त असू शकत नाहीत. त्यामुळे ITMS च्या यंत्रणेसंदर्भात सर्व शक्यता तपासणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या समस्यांसाठी आपण तयार असायला हवं."
"तंत्रज्ञानामध्ये हॅकिंग करून होत्याचं नव्हतं केलं जाऊ शकतं. त्यामुळे ही यंत्रणा सुरक्षित आहे किंवा नाही याची खात्री करावी लागेल. त्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री म्हणजेच सेन्सर्स, कनेक्टिव्हीटी, ट्रान्समीटर्स, रिसिव्हर्स, सर्व्हर यांचा योग्य वापर व्हावा."

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images
"भारतीय परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम लगेच लक्षात येणार नाही. हँकिंग टाळण्यासाठी बरेच सुरक्षा उपाय करावे लागतील. हॅकिंग रोखणं, हॅकिंग होऊ नये म्हणून उपाययोजन, हॅकिंग झाल्यास पर्यायी योजना काय असेल, हॅकिंगचे प्रयत्न होत असल्यास ते प्रयत्न हाणून पाडणे यांच्यासाठी तज्ज्ञ लोक लागतील. हा पसारा खूप मोठा आहे."
"नव्या तंत्रज्ञानाला हॅकर्स एक आव्हानाप्रमाणे पाहतात. काही जण ठरवून हॅक करायचं बघतात. ITMS सारखं तंत्रज्ञान हॅक झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान आणताना सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार होणं आवश्यक आहे."
शासन अशा सर्व बाबींचा विचार करूनच ITMS यंत्रणेची अंमलबजावणी करणार असल्यामुळे शहराला त्याचा फायदा होणार असल्याचं पोलीस उपायुक्त दिपाली मसीरकर यांनी सांगितलं. "ITMS तंत्रज्ञानाचा वापर अनेक देशात होत आहे. भारतात प्राथमिक स्वरूपात याची चाचणी घेतल्यानंतरच ही यंत्रणा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही यंत्रणा अत्यंत सुरक्षित असेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊनच यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे." मसीरकर सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








