मुस्लीम महिलांसाठीचं हे 'हलाल सेक्स गाईड' ठरतंय वादग्रस्त

मुस्लीम महिलांचं पतीसोबतचं लैंगिक जीवन कसं असावं हे सांगत असल्याचा दावा करणारं एक पुस्तक वादाचं कारण ठरलं आहे. हे पुस्तक अॅमेझॉनच्या वेबसाईटवर विकलं जातं आहे. त्यावर वाद सुरू झाला आहे.

'द मुस्लीम सेक्स मॅन्युअल : ए हलाल गाइड टू माइंड ब्लोइंग सेक्स' या नावाच्या पुस्तकानं जुलै-2017 पासून वाद ओढावून घेतला. हा विषय संवेदनशील असल्यानं लेखिकेनं तिचं खरं नाव दिलेलं नाही. टोपण नावानं हे लिखाण केलं आहे.

परंतु, त्याचवेळी ब्रिटिश वर्तमानपत्रात लेखिकेच्या मुलाखती छापून आल्या होत्या. 'द ऑब्जर्व्हर'च्या म्हणण्यानुसार लेखिका मुस्लीम महिला आहे.

त्या लेखिकेनं केलेल्या विनंतीनुसार अधिक माहिती देण्यात आली नसल्याचं 'द ऑब्जर्व्हर'नं स्पष्ट केलं होतं.

पुस्तकाविषयी...

'सेक्स'बद्दल मुस्लीम महिलांना विशेषत: जुन्या पिढीतल्या महिलांना काहीच माहिती नसते, त्यामुळेच हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता निर्माण झाली, असं लेखिकेनं मुलाखतीत म्हटलं आहे.

मुस्लीम महिलांच्या आयुष्यात थोडा आनंद निर्माण करण्यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे, असंही त्या लेखिकेनं स्पष्ट केलं.

'टेलीग्राफ' या ब्रिटिश वर्तमानपत्रात मुस्लीम लेखिका शेलीना जनमोहम्मद यांनी या पुस्तकाचं स्वागत करण्याची गरज व्यक्त केली. मुस्लीम महिलांविषयी असलेली मिथकं तोडण्यासाठी, त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी या पुस्तकाची मदत होईल, असं त्या म्हणतात.

अर्थात, या पुस्तकामध्ये महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देण्यात आला आहे. तसंच, महिलांच्या शरीराकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं, असे आक्षेपही पुस्तकावर घेण्यात आले आहेत..

महिलांवरच फोकस...

पण लेखिकेला या आक्षेपाबाबत फारसं घेणंदेणं नाही. 'टेलीग्राफ'च्या मुलाखतीत त्या म्हणतात, ''हे पुस्तक वाचल्यावर मला अनेकांनी इमेल करून त्यातल्या विचारांचं समर्थन केलं आहे. एका मशिदीच्या इमामानं तर नवविवाहितांना या पुस्तकाची एकेक प्रत देण्याचा विचार असल्याचं कळवलं आहे."

या पुस्तकात पुरुषांकडे दुर्लक्ष झाल्याचा आक्षेप मात्र लेखिका म्हणून त्यांना मान्य आहे.

'द ऑब्जर्व्हर'नुसार, मुस्लीम महिला संघटनांनी पुस्तकाचं कौतुक केलं आहे. सेक्सवरुन बिघडणाऱ्या नातेसंबंधांना वाचवण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे महिलांच्या हक्कांची पायमल्लीही रोखली जाईल, असा विश्वास या संघटनांनी व्यक्त केला आहे.

ब्रिटनमधल्या मुस्लीम वूमन्स नेटवर्कच्या मुख्य शाईस्ता गोहिर यांनी सांगितलं की, "माझा याला पूर्ण पाठिंबा आहे आणि का नसावा? सेक्सबद्दल बोलणं यात नवीन काही नाही. यापूर्वी वैज्ञानिकांनींही महिलांच्या लैंगिक सुखाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे."

हे वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)