You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझी खतना झाली, पण मी माझ्या मुलींची खतना होऊ देणार नाही'
- Author, सिंधुवासिनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जर तुमच्या शरिराचा एखादा हिस्सा जबरदस्तीने कापून घेतला तर? ते योग्य ठरेल का ? पण तसं केलं जातं. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये.
पुण्यात राहणाऱ्या निशरीन सैफ यांच्याबरोबरही असं झालं होतं.
त्या सांगतात, "तेव्हा मी जवळपास सात वर्षांची असेन. मला नीटसं आठवतही नाही. पण त्या घटनेचं अधुंकसं चित्र माझ्या मनाच्या एका कप्प्यात आजही आहे."
बोहरी मुस्लीम समाजातील खतनासारख्या अनिष्ट प्रथेविरूद्ध लढणाऱ्या मासूमा रानालवी यांच्याशी झालेली बातचीत.
निशरीन यांनी बीबीसीला सांगितलं, "आई मला घेऊन घरातून निघाली. त्यानंतर आम्ही एका अंधाऱ्या खोलीत गेलो. तिथं आधीपासूनच एक महिला बसलेली होती. तीने मला झोपवलं आणि माझी पॅंटी उतरवली."
त्या पुढे म्हणतात, "त्यावेळेस फारशा वेदना झाल्या नाहीत. असं वाटलं की कुणी सुई टोचत आहे. सगळं झाल्यावर मात्र तीव्र वेदना सुरू झाल्या. अनेक दिवस लघवी करताना त्रास व्हायचा. वेदनांमुळं मी रडायचे."
मोठी झाल्यावर निशरीन यांना कळलं की त्यांची खतना करण्यात आली होती.
भारतात खतनाची प्रथा
सर्वसाधारणपणे पुरूषांचीच सुंता केली जाते. पण जगातील अनेक देश असे आहेत, जिथं महिलांना पण खतना या वेदनादायी प्रकाराला सामोरं जावं लागतं.
भारतही यांच्यापैकीच एक देश आहे. इथं बोहरी मुस्लीम समाजात (दाऊदी बोहरी आणि सुलेमानी बोहरी) ही प्रथा आहे.
भारतात साधारणपणे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये बोहरी मुसलमान लोक आहेत.
दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला हा समाज खुप समृद्ध असून भारतातील सर्वाधिक शिक्षित समाजांपैकी एक आहे.
निशरीन सैफ यासुद्धा बोहरी मुस्लीम समाजातील आहेत. त्यामुळेच त्यांची लहानपणीच खतना करण्यात आली.
महिलांची खतना?
त्याला फीमेल जेनाइटल म्युटिलेशन (FGM) असंही म्हटलं जातं.
संयुक्त राष्ट्राच्या व्याख्येनुसार, "FGM मध्ये मुलींच्या जननेंद्रीयाचा बाहेरील भाग कापण्यात येतो किंवा त्याची बाहेरील त्वचा काढून टाकण्यात येते."
संयुक्त राष्ट्रानं या प्रकाराला मानवाधिकारांचं उल्लंघन मानलं आहे.
महिलांच्या खतनेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि खतना रोखण्यासाठी दरवर्षी 6 फेब्रुवारीला 'इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर FGM' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
बोहरी मुस्लीम
मुलींची खतना किशोरीवस्थेत, म्हणजेच सहा-सात वर्षे वय असतानाच केली जाते. याच्या अनेक पद्धती आहे.
'क्लिटरिस'च्या बाहेरील भागाला कट लावणं किंवा बाहेरची त्वचा काढून टाकणं, हा त्यापैकी एक प्रकार.
खतना करण्याआधी गुंगीचं इंजेक्शनही दिलं जात नाही. मुली पुर्ण शुद्धीत असतात आणि वेदनांमुळे ओरडत असतात.
पारंपरिक पद्धतीत यासाठी ब्लेड किंवा चाकूचा वापर केला जातो.
खतना केल्यानंतर हळद, गरम पाणी आणि एखादं-दुसरं मलम लावून त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
बोहरी मुस्लीम समाजाशी संबधित इंसिया दरीवाला यांच्या मते, 'क्लिटरिस'ला बोहरी समाजात 'हराम की बोटी' असं म्हटलं जातं. यामुळे मुलींमध्ये लैंगिक भावना वाढते, असं बोहरी मुस्लीम मानतात.
इंसिया दरीवाला यांनी सांगितलं, "असं मानतात की, क्लिटरिस काढून टाकल्यास मुलीची लैंगिक इच्छा कमी होते आणि लग्नाआधी ती लैंगिक संबध ठेऊ शकत नाही."
क्रुर प्रथेविरोधात आवाज
इंसिया या नशीबवान आहेत. त्यांच्या आईनं या त्रासापासून त्यांना वाचवलं.
त्या सांगतात, "माझ्या आईने मला तर वाचवलं पण माझ्या मोठ्या बहिणीला ती वाचवू शकली नाही. कुटुंबातीलच एका महिलेने सिनेमा दाखवण्याच्या आमिषानं घराबाहेर नेऊन तीची खतना करून टाकली."
इंसिया यांची आई ख्रिश्चन असल्यानं त्यांना खतना या प्रकाराविषयी माहिती नव्हती. त्यांच्या मोठ्या मुलीची त्यांच्या नकळतच खतना करण्यात आली होती. तिला ज्यावेळेस वेदनेनं विव्हळताना आईने पाहिलं, त्याचवेळेस आपल्या लहान मुलीबरोबर असं होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला.
इंसिया यांनी सांगितलं, "सुरुवातीला कुटुंबातील जेष्ठ आणि वयोवृद्ध मंडळी आईवर नाराज झाली. पण नंतर हळूहळू ही गोष्ट विस्मरणात गेली. मी माझ्या बहिणीचा त्रास जवळून अनुभवला आहे. त्यामुळेच या क्रुर प्रथेविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला."
चाळीस वर्षांच्या निशरीन या दोन मुलींच्या आई आहेत. त्यांनी आपल्या मुलींची खतना न करण्याचा निर्धार केला आहे.
त्या म्हणाल्या,"हे बाल शोषणासारखं आहे. माझी खतना झाली, पण मी माझ्या मुलींची होऊ देणार नाही."
महिलांचं जीवन
निशरीन यांना सांगण्यात आलं होतं की, खतना हे 'हायजीन' म्हणजेच स्वच्छतेच्या उद्देशानं करण्यात येते. पण त्यांना आता कळलंय की, याचं 'हायजीन'शी काही एक देणं-घेणं नाही.
इंसिया सांगतात, "आमच्या समाजातील लोक खतनाचं कारण दरवेळेस बदलून सांगत असतात. आधी ते सांगायचे हे स्वच्छतेसाठी केलं जातं. नंतर म्हणाले, मुलींची लैंगिक इच्छा नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येतं आणि आता जेव्हा याला विरोध होऊ लागला तर ते म्हणतात लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी ते केलं जातं."
त्या विचारतात, "जर हे लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी असेल तर सात वर्षांच्या मुलीची खतना करून ते काय मिळवू पाहतात? लहान मुलीचा सेक्स आणि लैंगिक इच्छेशी काय संबध? स्पष्टच आहे, ते आम्हाला वेड्यात काढत आहेत."
भारतात FGM विरोधात मोहीम सुरू करणाऱ्या मासूमा रानालवी म्हणतात की, यातील एकाही दाव्यात तथ्य नाही. खतनेमुळे महिलांच्या जीवनावर वाईटच परिणाम होतो.
विपरीत परिणाम
त्यांनी सांगितलं, "खतनेमुळे महिलांना शारीरिक त्रासच सहन करावा लागतो. याशिवाय विविध प्रकारच्या मानसिक त्रासालाही तोंड द्यावं लागतं. त्यांच्या सेक्स लाइफवरही याचा परिणाम होतो आणि त्या सेक्स एंजॉय करू शकत नाही."
निशरीन मानतात की, लहानपणी खतना झाल्यानंतर मुलींना कुणावरही विश्वास ठेवणं अवघडं होतं. कारण घरातलीच मंडळी त्यांना आमिषं दाखवून खतना करण्यासाठी घेऊन जातात.
त्या म्हणाल्या, "लहानपणी निर्माण झालेला हा अविश्वास पुढे बराच काळ तसाच राहू शकतो. शिवाय, कोणत्या न कोणत्या कारणांमुळे महिलांच्या जीवनावर त्याचा परिणाम होताना दिसतो."
'सहियो' आणि 'वी स्पीक आऊट' यासारख्या संस्था भारतात FGMला गुन्हा ठरवून त्यावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, यूके, अमेरिका, स्वीडन, डेन्मार्क आणि स्पेनसारख्या काही देशांमध्ये या प्रकारास गुन्हा ठरवण्यात आलं आहे.
भारतात बंदी का नाही?
अलिकडेच सर्वोच्च न्यायालयानं FGMवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेची दखल घेत महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून खुलासा मागितला होता.
मंत्रालयानं त्यांच्या उत्तरात सांगितलं की, भारतात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोमध्ये FGMशी संबधित कुठलीही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. यामुळेच सरकार यावर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही.
'वी स्पीक आऊट' च्या संस्थापिका मासूमा रानालवी म्हणतात, "सरकार हे का मानायला तयार नाही की जेव्हा FGMला देशात गुन्हाच मानला जात नसेल तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोमध्ये त्याची आकडेवारी कुठून येईल?"
मासूमा पुढे म्हणतात, "दूसरी गोष्टी म्हणजे मुलींची खतना फार लहानवयातच केली जाते. त्यावेळेस त्यांना काही माहितच नसते. मग त्या पोलिसांना काय सांगतील? तसंच, खतना करणारे घरचेच लोक असल्यानं ही बाब बाहेर कशी येईल?"
इंसिया यांच्या मते, सरकारने बोहरा समाज आणि FGMवर झालेल्या संशोधनाचा अभ्यास करावा. यावर काम करणाऱ्यांशी बोलावं आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा.
डॉक्टरांचाही यात सहभाग
त्यांनी सांगितलं, "यासोबतच सरकारने बोहरी समाजातील धार्मिक नेत्यांशीही चर्चा करायला हवी. त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय ही अमानवी परंपरा संपवणं फार कठीण आहे."
मासूमा सांगतात, अलिकडच्या काळात एक नवी प्रथा पाहायला मिळत आहे.
सुशिक्षित आणि हाय-प्रोफाइल बोहरी कुटुंबातल्या मुलींची खतना करण्यासाठी डॉक्टरांकडे नेलं जातं.
त्या म्हणाल्या, "जेव्हा की खतना ही मेडिकल प्रॅक्टीस नसल्यानं डॉक्टरांनाही याविषयी माहित नसतं. तरीसुद्धा पैशासाठी ते यात सहभागी होतात. हे सगळे गोपनीय पद्धतीनं होतं आणि याविषयी कोणीचं बोलू इच्छित नाही."
मासूमा यांनी यासंदर्भात मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाला एक पत्रही लिहलं आहे. पण त्यावर अद्याप त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेलं नाही.
त्या म्हणतात, "FGM थांबवण्यासाठी आम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. जन्माआधी गर्भजल लिंग निदान चाचणी बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे खतनालाही बेकायदेशीर ठरवलं जावं."
तुम्ही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)