पद्मावत : इतिहास खरा की आजीने सांगितलेल्या गोष्टी?

पद्मावत, करणी सेना, राजस्थान, राजपूत, इतिहास, चित्रपट.

फोटो स्रोत, Twitter/Deepika Padukone

फोटो कॅप्शन, पद्मावत चित्रपटात दीपिका पदुकोणने राणी पद्मावती यांची भूमिका साकारली आहे.
    • Author, अंशु सिंह
    • Role, सामाजिक मानवशास्त्राच्या संशोधक

राणी पद्मावती खरंच अस्तित्वात होती का, हे शोधण्यासाठी सगळे इतिहासात डोकावून पाहत आहेत. पण 'कथनमीमांसा' किंवा 'नॅरेटिव्ह स्टडीज' नावाची नवी ज्ञानशाखा या वादाकडे पूर्णतः वेगळ्या नजरेने पाहते.

आपल्या आजीचा किंवा एखाद्या पूर्वजाचा व्हावा तसा उल्लेख पद्मावतीचा एखाद्या राजपूत घरात होत असतो. प्रत्येक कथेत ती एक सुंदर आणि शूर अशी राजपूत राजकन्या असते. तिचं लग्न चित्तोडच्या राजाशी होतं आणि तिचा मृत्यू चितेवर होतो.

काही कथांमध्ये चितेची जागा 'जोहर'ने घेतलेली असते. आपले राजे ठार किंवा बंदी झाले आहेत, हे कळल्यानंतर त्या स्त्रियांनी एकत्रितपणे स्वतःला अग्नीस समर्पण म्हणजे जोहार करणं. तर इतर काही कथांमध्ये पद्मावती सती जाताना दिसते.

या सार्‍या कथांमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं पात्र येतं. त्याने तिला पाहिलेलं नसतं, केवळ तिच्या सौंदर्याविषयी ऐकलेलं असतं. या सुंदर राजकन्येच्या कल्पनेच्या प्रेमात पडलेला खिलजी चित्तोडवर चढाई करतो. तो हे युद्ध जिंकतो खरा पण तो तिला मिळवू शकत नाही, तिला पाहू शकत नाही. कारण त्याआधीच ती अग्निसमर्पण करून मरण पत्करते!

मी ज्या वातावरणात वाढले, ज्या संस्कारांत वाढले त्यांचा भागच आहे ही गोष्ट! बालपणापासून अनेकोवेळा मी ही कथा ऐकली आहे. पण कधीच या गोष्टीची सत्यता पडताळून बघावी, याची खरं म्हणजे गरजच वाटली नाही! जे ऐकत गेले ते सारं खरंच मानत गेले.

त्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या भावंडांसाठी पद्मावती म्हणजे एक कल्पनारंजन कधीच नव्हते, ती आमच्यासाठी एक खरीखुरी हाडामासाची सुंदर, कुलीन आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे एक शूर बाई आहे!

इतिहास की मौखिक परंपरा?

ऐतिहासिक पुरावे आणि दावे काहीही सांगोत, पण त्याने का आमच्या या मौखिक परंपरेने चालत आलेल्या पद्मावतीच्या कहाणीला तडा जातो! वस्तुनिष्ठ इतिहासाच्या परिभाषेत पद्मावती असो अगर नसो, आमच्याकडे चालत आलेल्या कहाण्यांमध्ये मात्र तिचं असणं नाकारता येऊच शकत नाही! प्रश्न ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित सत्यासत्यतेचा नसून पिढ्यानुपिढ्या या गोष्टीच्या चालत येण्याचा आहे! हे चालत येणं थोडंच नाकारता येऊ शकतं!

पद्मावत, करणी सेना, राजस्थान, राजपूत, इतिहास, चित्रपट.

फोटो स्रोत, Viacom 18 Motion Pictures

फोटो कॅप्शन, पद्मावत चित्रपटात रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे.

म्हणून जेव्हा इतिहासकार म्हणतात की पद्मावती नावाची कुणी बाई अस्तित्वातच नव्हती, तेव्हा पद्मावतीबाबतच्या माझ्या आकलनात काही विशेष फरक पडत नाही. कारण माझ्यासाठी ती एक ऐतिहासिक वस्तुनिष्ठ तथ्य नसून एक सांस्कृतिक खूण आहे, एक अभिमानाने सांगता यावी, ऐकता यावी अशी गोष्ट आहे.

ती खरी होती अगर नव्हती, यामुळे माझा सांस्कृतिक अवकाश काही कम-अस्सल होत नाही की तिचं मूल्य आमच्या लेखी काही कमी होत नाही.

सिनेमा निर्माण करतो नवं 'सत्य'!

चित्रपटाचं हे कथानक हे काही ऐतिहासिक दस्तावेज नव्हे की मौखिक परंपरेचं सादरीकरणही नव्हे. आजच्या प्रेक्षकांना आवडेल, रुचेल अशा वेष्टनात परंपरेचं एक रिमिक्स देण्याचा भाग या चित्रपटाच्या व्यावसायिक आणि कलात्मक गाभ्यात आहे.

परंतु अशा प्रकारे दिव्य सादरीकरणाचे धोके हे असतातच. यातून असं होऊ शकतं की या मौखिक परंपरा आणि इतिहास असं दोन्हीचं हरण हा रुपेरी पडदा करणार!

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळाने करणी सेना आणि इतिहासकार यांचे स्वर पार्श्वभूमीला गेलेले असतील आणि उपलब्ध असेल व्यापक, सहज विकत घेता येऊ शकेल, जाऊन पाहता येऊ शकेल असं एक कथानक आणि बहुसंख्य लोक याच एका कथनाला सत्य मानू लागतील. आणि अनेक वर्षांपासून घराघरातून सांगितल्या जाणार्‍या या कथेची जागा नकळतपणे हा चित्रपट घेऊन टाकेल!

पद्मावत, करणी सेना, राजस्थान, राजपूत, इतिहास, चित्रपट.

फोटो स्रोत, Twitter/RanveerOfficial

फोटो कॅप्शन, पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला करणी सेनेनं विरोध केला आहे.

माझी लहान भावंडं, पुतण्यापुतणे यांच्या ऐकिवात येणारी गोष्ट बदलेल. एखादा व्हॉट्सअॅप मेसेज जसा इकडून तिकडे फिरत राहतो, तसेच एक कथानक हे सर्वदूर पसरत राहील का?

सांस्कृतिक वारशाचा ऱ्हास

या व्यावसायिक चित्रपटाच्या बाजाराच्या व्यवस्थेत मौखिक परंपरेतून आलेल्या अनेक अर्थांचं, अनेक कथांचं काय होईल? एखादीच कथा जेव्हा चित्रपटात रूपांतरित होते, तेव्हा त्याच कथेच्या इतर प्रकारांवर अर्थातच अन्याय होतो, त्या ऐकल्या ऐकवल्या जाईनाशी होतात. त्याचप्रमाणे हे सारं थोतांड, मिथक आहे असं म्हणणारे इतिहासकारही या कथांच्या वैविध्याला दाद देऊ शकत नाहीत.

पद्मावत, करणी सेना, राजस्थान, राजपूत, इतिहास, चित्रपट.

फोटो स्रोत, ALOK PATHANIA/Getty Images

फोटो कॅप्शन, पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावरून जम्मू काश्मीरमध्ये एका चित्रपटगृहात जाळपोळ करण्यात आली.

रात्री झोपी जाता ऐकल्या ऐकवल्या जाणार्‍या गोष्टी खोटा इतिहास म्हणून डावलल्याने आपली जबाबदारी संपते का? खरंतर जी जी महाकाव्यं - मग ती रामायण महाभारतच का असेनात -पडद्यावर आली ती त्या एका सादरीकरणात बंदिस्त झाली. यातून एकच एक कथानक जिवंत राहतं. आपण कथांचं वैविध्य हरवून बसतो, आपला सांस्कृतिक वारसा आपण हाताने गमावून बसतो!

तथ्य नसलं तर काय झालं?

पद्मावती आणि जोहर असं कधी काही झालंच नव्हतं असं म्हणून इतिहासकार एक समग्र मौखिक संस्कृतीच नाकारत असतात. एक राष्ट्र, एक इतिहास, एक कथा, एक दृश्यसंस्कृती अशा एककात आपली अनेकता आपण हरवूया नको!

पद्मावत, करणी सेना, राजस्थान, राजपूत, इतिहास, चित्रपट.

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/Getty Images

फोटो कॅप्शन, पद्मावत चित्रपटाला विरोध म्हणून गुजरातमधील अहमदाबाद शहरात बस जाळण्यात आली.

या कथांच्या अनेकतेला दाद द्यायची असेल, त्या अनेक कथांची जोपासना करायची असेल, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणं शोधल्याने काहीही हाती लागणार नाही.

इतिहास ही ज्ञानशाखा आज बरीच प्रगल्भ झालेली असली तरी लोकांना इतिहास म्हणजे वस्तुनिष्ठ तथ्यावर आधारलेलं असं काहीतरीच वाटतं. त्यामुळे ऐतिहासिक कारणं शोधत असताना आपण तथ्यात्म, तार्किक किंवा वस्तुनिष्ठ भूतकाळाच्या कल्पनेवर भर देत असतो. त्यातून एखादे कथानक ऐतिहासिक नाही, असे ठरवणे सोपे होते आणि त्यावर सरसकट फुली मारून टाकता येते.

पद्मावत, करणी सेना, राजस्थान, राजपूत, इतिहास, चित्रपट.

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/Getty Images

फोटो कॅप्शन, करणी सेनेनं पद्मावत चित्रपटाला असलेला विरोध तीव्र केला आहे.

राजकीय कारणाचा माग घेतल्यास अनेकदा राजकारण हे बहुसंख्यांचं असं असतं. त्यातून अनेक पदरी जिवंत अशा पद्मावतीच्या कथानकासारखे कथानक एककल्ली होऊन बसू शकते. पद्मावतीची ही अनेक जीवने आणि कथने - मग ती सारीच्या सारीच काल्पनिक असेनात का - ती समजून घेण्यासाठी आपल्याला असा सुवर्णमध्य शोधायला हवा, अशी जागा, असा अवकाश शोधायला हवा जिथून ती सारी कथने ऐकता आणि सांगता येतील.

पद्मावती हे एक पूर्ण कल्पनारंजन आहे, हे एक टोक आणि पद्मावती हे आमचं दैवत आहे हे दुसरं टोक यातला सुवर्णमध्ये म्हणजे पद्मावतीच्या कथा ऐकून घेण्यासाठी आणि सांगता येण्यासाठी एक अवकाश निर्माण करणं.

मूळ मुद्दा हा की आपल्या गोष्टी या कधीच तथ्यावर आधारलेल्या नव्हत्या. आपण त्या गोष्टींचा अर्थ मात्र त्या जणू तथ्यात्म आहेत असं समजून लावत आलेलो आहोत.

चित्रपट बनवताना अर्थातच एकच कथानक निवडावं लागत असल्याने 'एक गोष्ट = एक तथ्य' असे एकवचनी आणि एकरेषीय समीकरण होऊन बसते जे कथेच्या अनेकतेचा घात करणारे आहे.

गोष्टींचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा

प्रत्यक्ष लोक कसा अन्वय लावतात, कशा प्रकारे गोष्ट रचतात, कशी सांगतात त्यात त्यांचं मत आणि त्यांची गोष्ट कशी उतरते, इत्यादी अनेक प्रश्न आपण विचारू आणि हाताळू शकलो तर आपण आपल्याविषयी खूप मोलाचं काहीतरी शिकू शकतो.

पद्मावत, करणी सेना, राजस्थान, राजपूत, इतिहास, चित्रपट.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/Getty Images

फोटो कॅप्शन, काही राज्यांमध्ये पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

हे ज्ञान झापडबंद तर्क, तथ्य, वस्तुनिष्ठता यांवर आधारून आपण मिळवू शकणार नाही. एखाद्या वादाकडे पाहताना इतिहासात डोकावण्याऐवजी आपण वाद घालणार्‍यांच्या कथनात डोकावू शकलो तर नेमका त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, हे अधिक नीट समजू शकते.

अशा प्रकारे कथनांना प्राधान्य देऊन कथक (कोण बोलते ती व्यक्ती), कथित (काय बोलले जाते ते) यांच्याबद्दलही आपण जास्त उपयुक्त माहिती मिळवू शकतो. 'कथनमीमांसा' किंवा 'नॅरेटिव्ह स्टडीज़' नावाची नवी ज्ञानशाखा ही या पद्धतीचा अवलंब करते.

तिचा प्रभाव आता समाजशास्त्र, इतिहासलेखन, साहित्य-समीक्षा इत्यादी अनेक ज्ञानशाखांवर पडत आहे. समरसता म्हणजे न्यायालयीन निर्णय नव्हे की ऐतिहासिक तथ्यांवर आधारित निष्कर्ष नव्हे, तर एकमेकांचं म्हणणं ऐकून घेण्याचं औदार्य दाखवणेच होय!

(अंशु सिंह या सामाजिक मानवशास्त्राच्या दिल्ली विद्यापीठात संशोधक आहेत. त्या 'सेंटर फर विमेन्स स्टडीज' येथे साहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत आहेत. लेखातील विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)