अदलाबदल जालेल्या हिंदू-मुस्लीम मुलांची गोष्ट

- Author, गीता पांडेय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एका रुग्णालयात दोन मुलांचा जन्म होतो, पण काही काळानं कळतं की त्यांची अदलाबदल झाली आहे. हिंदी सिनेमामध्ये शोभेल अशी ही घटना प्रत्यक्षात घडते तेव्हा काय होतं?
आसाममध्ये हे घडलं. दोन परिवारांमध्ये मुलांची अदलाबदल झाली. एकाचे पालक आदिवासी आहेत तर दुसऱ्याचे मुस्लीम.
या दोन कुटुंबांनी आपापली मुलं मिळवण्यासाठीच्या DNA चाचणी आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या. पण भावना आड आल्या आणि...
अखेर बुधवारी या दोन्ही जोडप्यांना न्यायायलयाला एकमेकांच्या मुलांचं संगोपन करू अशी शाश्वती द्यावी लागली.
कशी ही अदलाबदली...
आसाममध्ये 11 मार्च 2015चा तो दिवस. शहाबुद्दीन अहमद आपल्या पत्नी सलमा परबीन यांना मंगलदाई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तासाभरानं त्यांना मुलगा झाल्याची बातमी मिळाली. डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळे सलमा यांना दुसऱ्याच दिवशी घरी सोडण्यात आलं. शहाबुद्दीन अहमद पुढे सांगतात :
"एका आठवड्यानंतर माझ्या बायकोनं मला सांगितलं की हे मूल आपलं नाही!"
"काय सांगतेस?" मी अचंबित होऊन म्हणालो, "एका निरागस मुलाबद्दल असं कसं बोलू शकतेस?"
पण माझ्या बायकोनं मला सांगितलं की डिलिव्हरी रूममध्ये एक बोडो आदिवासी बाई होती. "मला वाटतंय की आपलं मूल बदललं गेलं आहे."
मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. पण ती हट्टाला पेटली. तिने मला सांगितलं की आधीपासूनच तिला वाटत होतं की जोनाईत आमचा मुलगा नाही.
कायदेशीर लढाई
"मी जेव्हा त्याचा चेहरा पाहिला, तेव्हा मला शंका आली. मला लेबर रूममध्ये असलेल्या दुसऱ्या बाईचा चेहरा आठवत होता. आणि याचा चेहरा तिच्याशी मिळताजुळता होता. मला त्याच्या डोळ्यांवरून ते कळत होतं. त्याचे डोळे छोटे होते. आमच्याकडे कोणाचेच डोळे असे नाहीत," त्या सांगत होत्या.
पत्नीच्या हट्टापोटी अहमद यांनी रुग्णालय गाठलं आणि तिथल्या अधीक्षकांना बायकोची शंका बोलून दाखवली. तेव्हा ते म्हणाले, "तुमची बायको मनोरुग्ण आहे,तिला उपचारांची गरज आहे."
अहमद यांना हे उत्तर मुळीच पटणारं नव्हतं. त्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज केला आणि त्या दिवशी त्या रुग्णालयात सात वाजताच्या दरम्यान जन्मलेल्या सगळ्या बाळांची माहिती मागवली.
एका महिन्यानंतर त्यांना सात स्त्रियांची माहिती मिळाली. त्यातल्या नोंदी पाहून त्यांनी त्या बोडो आदिवासी स्त्रीचा माग घेण्याचं ठरवलं. कारण त्यांना बरंच साम्या त्यांना जाणवलं - दोघींनी मुलांना जन्म दिला होता, दोघांचंही वजन 3 किलो होतं आणि दोघांचाही जन्म पाच मिनिटांच्या अंतरानं झाला होता.
"मी त्यांच्या गावात गेलो, पण त्यांच्या घरी जाण्याची माझी हिम्मत झाली नाही," अहमद सांगतात.

"म्हणून मग मी त्यांना पत्र लिहिलं. त्यातून मी त्यांना सांगितलं की माझ्या बायकोला, असं वाटतं की आपल्या मुलांची अदलाबदल झाली आहे. आणि विचारलं की त्यांनाही असंच वाटत आहे का? खाली मी माझा फोन नंबर दिला आणि मला फोन करण्याची विनंती केली."
अहमद यांच्या घरापासून 30 किलोमीटर दूर एका गावात अनिल आणि शेवाली बोडो राहतात. त्यांच्या मुलाचं नाव रियान चंद्रा.
अहमद यांचं पत्र मिळेपर्यंत या जोडप्याला आपलं मूल बदललं आहे, अशी पुसटशीही शंका आली नव्हती. असं काही झालं असावं, यावर त्यांचा विश्वासही बसत नव्हता. त्यांच्या पत्नीला आणि कुटुंबीयांना सुद्धा तसं वाटत नव्हतं.
पण जेव्हा दोन्ही कुटुंब भेटले तेव्हा मात्र गोष्टी बदलल्या.
"मी जेव्हा पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो, असं मला वाटलं," शेवाली बोरो सांगतात.
"मला खूप दु:ख झालं, मी खूप रडले. आम्ही बोडो आदिवासी आहोत. आम्ही इतर आसामी किंवा मुस्लीम लोकांसारखे दिसत नाही. आमचे डोळे वरच्या बाजूला झुकलेले असतात. आमचे गाल, डोकं आणि चेहरा मोठा असतो. आम्ही वेगळे आहोत. आमचे मंगोलियन फिचर्स असतात," त्या सांगतात.
चाचण्या, चौकश्या आणि चाचपण्या
सलमा परबीन सांगतात की, बघताच क्षणी त्यांना कळलं की रियान त्यांचा मुलगा आहे. "मला अगदी त्याच क्षणी अदलाबदल करण्याची तीव्र इच्छा झाली. पण अनिल बोडो यांच्या आईनं हा प्रस्ताव नाकारला."
अहमद यांच्या विनंतीनंतर हॉस्पिटलनं आरोपांची चौकशी आणि शंकांचं समाधान करण्यासाठी एक समिती नेमली. या बाळांच्या जन्मावेळी कामावर असलेल्या नर्सशी बोलणं झालं, त्यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला.

पण अहमद यांचं समाधान झालं नाही. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या आणि मुलाच्या DNAचे नमुने तपासणीसाठी पाठवले आणि ऑगस्ट 2015 मध्ये निकाल आला. सलमा आणि जोनाईत यांच्यात कोणतंच जनुकीय साम्य नव्हतं!
त्यांना अखेर उत्तर सापडलं होतं. ते रुग्णालयात दाखवल्यावर प्रशासनानं त्यांच्या DNA अहवालाला कायदेशीर मान्यता नसल्याचं सांगितलं.
अखेर त्यांनी डिसेंबरमध्ये पोलीस तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक हेमंत बरुआ यांच्याकडे आली.
बीबीसीशी बोलताना बरुआ म्हणाले की, त्यांनी हॉस्पिटलमधून दोघांच्याही जन्माचे दाखले गोळा केले आणि प्रकरणाचे धागे जोडायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, AFP
जानेवारी 2016 साली त्यांनी दोन्ही जोडप्यांच्या आणि मुलांच्या रक्ताचे नमुने गोळा केले आणि कोलकात्याला चाचणीसाठी नेले. पण काही कारकुनी चुकीमुळे कोलकात्याच्या फॉरेन्सिक लॅबनं चाचणी करण्यास नकार दिला.
"मग आम्ही मागच्या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा नमुने गोळा केले आणि त्यांची गुवाहाटीमध्ये चाचणी केली. नोव्हेंबर मध्ये आम्हाला अहवाल मिळाला, ज्यामधून मुलांच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब झालं."
पण मुलांना कोणी विचारलं होतं का?
अखेर आपल्या खऱ्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी बरुआ यांनी अहमद यांना न्यायालयात जाऊन मुलांची अदलाबदल करण्याची परवानगी मिळवण्याचा सल्ला दिला. पण 4 जानेवारीला जेव्हा ते कोर्टात अदलाबदल करायला गेले, तेव्हा मुलांनी पालकांना सोडण्यास नकार दिला.
"दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की जर मुलांची अदलाबदल करायची असेल तर ते तसं करू शकतात,"सलमा परबीन सांगतात, "पण मग आम्ही सांगितलं की आम्ही असं करणार नाही. कारण आम्ही त्यांना आजवर मोठं केलं आहे. आम्ही त्यांना असंच कसं सोडून देऊ?"

"जोनाईत सुद्धा रडायला लागला," सलमा पुढे सांगत होत्या. "तो माझ्या दीराच्या कडेवर होता. त्यानं दीराला घट्ट पकडून ठेवलं होतं. आपल्या हातांनी जोनाईतनं दीराच्या मानेला वेढा घातला होता आणि कुठेही जाण्यास नकार दिला."
रियाननं सुद्धा शेवालीला घट्ट पकडून ठेवलं होतं. तोसुद्धा रडायला लागला आणि त्यानंही जाण्यास नकार दिला.
बळजबरीनं अदलाबदल केली असती तर ते खूप दुखावले असते, असं अनिल बोरो सांगतात. मुलं आता मोठे झाली आहे, आणि काय होतंय, हे त्यांनाही कळतं.
साहजिकच मुलं आता ज्या कुटुंबात राहतात त्यांच्याशी एक प्रेमाचं नातं तयार झालं आहे. कुटुंबीयांचं देखील त्यांना तितकंच प्रेम मिळतं आहे.
मग काय झालं?
मागच्या आठवड्यात मी बोरो यांच्या घरी गेले होते. तेव्हा रियानची आजी त्याला बाहेर घेऊन गेली होती. त्यांना भीती होती की कोणी त्याला पुन्हा घेऊन जाईल.
तासाभरानं त्याचे एक काका त्याला परत घेऊन आले. त्यानंतर काही वेळानं त्याची आजीही आली, त्याच्यासाठी चांदीच्या रंगाचे मासे घेऊन. आजी त्याच्या बाजूला जाऊन बसली आणि मला विचारलं, "काही अडचण आहे का? ते याला घेऊन जातील का?"
मग काका सरसावले, "त्याच्या चेहऱ्याकडे बघा. किती गोंडस दिसतो आहे तो. कसं काय आम्ही त्याला देऊन टाकू?"
रियान तर एक मिनिटसुद्धा शेवालीपासून दूर व्हायला तयार नव्हता.
जोनाईत सुद्धा आता अहमद यांच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहे.
सलमा परबीन यांनी सांगितलं, "जेव्हा आम्ही त्यांची अदलाबदल करायला कोर्टात जात होतो, तेव्हा माझ्या आठ वर्षांच्या मुलीनं मला म्हटलं होतं, की आई त्याला नको नेऊ. तो दूर गेला तर मी मरून जाईन."

पण आणखी एक प्रश्न होताच - दोन्ही कुटुंबांचा धर्म वेगवेगळा होता. याचा काही फरक पडला असता का?
"लहान मूल म्हणजे देवाची भेट असते. ते हिंदू किंवा मुस्लीम, असं काही नाही. प्रत्येक जण एकाच ठिकाणाहून येतो. त्याची रचना पण सारखीच असते. इथे आल्यावरच ते हिंदू किंवा मुस्लीम होतात."
अहमद सांगतात, "आता जर या बालकांची अदलाबदल झाली तर ते राहू शकणार नाही, कारण त्यांची भाषा, संस्कृती, राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी सगळं भिन्न आहे. दोन्ही कुटुंबं वेगळे आहेत."
दोन्ही आयांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनात सुरू असलेला संघर्ष स्पष्टपणे दिसतो. जे मूल या दोघी वाढवत आहेत, त्यांच्याशी त्यांच एक वेगळंच नातं आहे. पण आपल्या गर्भात ज्यांना वाढवलं आहे त्या मुलांशी पण त्यांची नाळ जोडली आहेच.
जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा कुठे रहायचं याचा निर्णय ते घेतील.
सध्यातरी दोन्ही कुटुंब मिळून एक वेळापत्रक बनवत आहेत, जेणेकरून ते भेटू शकतील, मैत्री वाढू शकतील. आणि त्यांच्या खऱ्याखुऱ्या मुलांबरोबर नातं निर्माण होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









