You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बाबा कसे आहेत?' : मंगळसूत्र न दिसल्याने कुलभूषण यांचा आईला प्रश्न
कुलभूषण जाधव यांना इस्लामाबादेत भेटायला गेलेल्या त्यांच्या आई आणि पत्नी यांना पाकिस्तानने टिकली, बांगड्या आणि मंगळसूत्रच काढायला सांगितलं. एवढंच नव्हे तर दोघींनाही कपडे बदलण्यास सांगितलं.
भारताच्या पाकिस्तानातल्या उप-उच्चायुक्तांना न सांगताच त्या दोघींना दुसऱ्या दरवाज्यानं बैठकीच्या खोलीत नेण्यात आलं, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली. या भेटीबाबत त्या गुरुवारी संसदेत निवेदन करत होत्या.
स्वराज म्हणाल्या, "कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणखी पुरावे मांडून त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सरकार करत आहे."
"जाधव परिवारासोबतही आपण संपर्कात आहोत. त्यातूनच जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. त्यातूनच जाधव यांची आई आणि पत्नी यांची भेट ठरली. त्याबद्दल दोन्ही देशांमध्ये सहमतीही झाली," असं स्वराज यांनी स्पष्ट केलं.
"जे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळंच घडलं. पाकिस्तानने या भेटीचा वापर करून घेतला. ही भेट मानवतावादातून होऊ दिल्याचं पाकिस्तान म्हणत असला तरी प्रत्यक्षात जे घडलं त्यात मानवता आणि सद्भाव या दोन्हीचा अभाव होता."
"त्या दोघींच्या मानवाधिकारांचं उल्लंघन झालं. त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न झाला. या असभ्य वर्तनाचा हा देश निषेध करतो," असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
तेव्हाच विरोध केला असता
स्वराज संसदेत म्हणाल्या, "जाधव यांच्या पत्नी आणि आई यांना कपडे बदलण्यास सांगितल्याचं उप-उच्चायुक्तांना माहिती नव्हतं. त्या दोघींना मागच्या दरवाज्यानं बैठकीच्या खोलीत नेण्यात आलं. थोड्या वेळानं उप-उच्चायुक्तांनी विचारणा केल्यावर त्यांना तिथं नेण्यात आलं. तिथं गेल्यावर त्यांचे कपडे बदलल्याचं उप-उच्चायुक्तांच्या लक्षात आलं. ते आधीच कळलं असतं, तर त्याचा तिथंच विरोध करण्यात आला असता."
विनंती फेटाळली
जाधव यांच्या पत्नी आणि आई यांना टिकली, बांगड्या, मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगितलं. 'हे सौभाग्याचं प्रतीक असल्यानं मंगळसूत्र राहू द्यावं,' अशी विनंती जाधव यांच्या आईनं केली. मात्र तसे आदेश असल्यानं त्याचं पालन करावं लागेल, असं सोबतच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं.
"त्या दोघींना विधवेच्या रुपात कुलभूषण यांच्यासमोर नेण्यात आलं," असं स्वराज यांनी संसदेत सांगितलं.
"आईच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्यानं कुलभूषण यांनी पहिला प्रश्न विचारला तोच 'बाबा कसे आहेत?' हा. त्यांना काही अशुभ घडल्याचं वाटलं असणार, असं कुलभूषण यांच्या आईनं भावूक स्वरात मला सांगितलं," असंही स्वराज यांनी सांगितलं.
सुरक्षेचा मुद्दा गैरलागू
"कुलभूषण यांच्या पत्नीच्या बुटात रेकॉर्डर, चिप, कॅमेरा असल्याच्या बातम्या पसरवण्यात येत आहेत. ही पाकिस्ताननं काढलेली खोडी आहे," असा आरोप स्वराज यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितलं, "भारतातून पाकिस्तानला जाताना त्यांनी दोन विमानं बदलली. एअर इंडियानं मदत केली असेल, असं मानलं तरी दुबईहून इस्लामाबादला जाण्यासाठी एअर एमिरेट्सचं विमान वापरलं. तेव्हा कोणत्याही सुरक्षा तपासणीत असं काही आढळलं नाही."
"शिवाय, असं काही होतं तर ते लगेचच माध्यमांसमोर न आणता आता विरोधी प्रचारासाठी कंड्या का पिकवल्या जात आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं कुलभूषण यांच्या पत्नीच्या बुटांची तपासणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
इंटरकॉम बंद
कुलभूषण यांच्या आईला मराठीत बोलू दिलं गेलं नाही, तसंच पाकिस्तानी अधिकऱ्यांनी त्यांना मध्येच थांबवलं. इंटरकॉमही बंद करण्यात आल्याचं स्वराज यांनी स्पष्ट केलं.
"मीडियाशी संपर्क येऊ देणार नाही, असं ठरवलं असतानाही, त्या दोघींना मीडियासमोर थांबण्याची वेळ आणली गेली. त्या काळात माध्यमांकडून दोघींचा अपमान करण्यात आला, टोमणे मारण्यात आले," असं स्वराज म्हणाल्या.
आई - पत्नीशी संभाषणादरम्यान कुलभूषण तणावात होते, दडपणाखाली बोलत होते, अगदी पढवल्यासारखं बोलत होते. त्यांची तब्येत पूर्णपणे ठीक वाटत नव्हती, असं कुलभूषण यांच्या आईने सांगितल्याचं सुषमा स्वराज संसदेत म्हणाल्या.
आणखी वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)