निसर्ग चक्रीवादळ धडकलं : मुंबईकरांनो, या 19 गोष्टींची तयारी करा

अरबी समुद्रात रौद्र रूप धारण करत निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी 1 वाजता अलिबागजवळ धडकलं. पुढच्या तीन तासात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय.

सध्या कोकणात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.

यामुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.

काही वृत्तांनुसार या वादळाला 'निसर्ग' चक्रीवादळ असं नाव देण्यात आलं असून, मुख्यमंत्री कार्यालयानेही हीच संज्ञा वापरली आहे.

अशा चक्रीवादळच्या परिस्थितीमध्ये काय काळीज घेतली पाहिजे, याची माहिती हवामान विभागानं प्रसिद्ध केली आहे. ही दक्षता नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल.

हे करा

1. घराची काळजी घ्या. घरातील फरश्या, खिडक्या, दरवाजे खराब स्थितीत असतील तर त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्या.

2. घराच्या आजूबाजूच्या स्थितीची पाहणी करा. मेलेली आणि उन्मळत आलेली झाडं काढून टाका.

3. घरात लाकडी फळ्या ठेवा. त्याचा उपयोग काचेच्या खिडक्यांना लावण्यासाठी आधार म्हणून करता येईल. जर घरात लाकडी फळ्या नसतील तर खिडक्यांच्या काचांना कागद चिटकवून ठेवा, जेणे करून काच जरी फुटले तरी काचेचे तुकडे पसरणार नाहीत.

4. रॉकेलचा कंदील तयार ठेवा. याशिवाय टॉर्च आणि जास्तीचे बॅटरी सेल असतील याची दक्षता घ्या.

5. धोकादायक इमारतींपासून सतर्क राहा.

6. घरात रेडिओ असेल तर तो सतत सुरू राहील याची दक्षता घ्या. रेडिओवर हवमानाची स्थिती आणि इतर सूचना प्रसारित केल्या जातात. ते काळजीपूर्वक ऐका आणि इतरांनाही त्याची माहिती द्या. इतरांना फक्त अधिकृत माहितीच द्या.

7. सखल भागातल्या समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहा. उंच ठिकाणी वेळेत पोहोचा.

8. जर तुमचं घर उंचावर असेल तर तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सुरक्षित जागी जाण्यास सांगितलं तर सूचनांचे पालन करा.

9. जास्त पावसात ज्या ठिकाणी नद्यांना पूर येतो तिथून दूर राहा.

10. कोरडे खाद्यपदार्थ स्वतःजवळ जास्त प्रमाणात ठेवा. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवा.

11. जर तुमचं घर असुरक्षित ठिकाणी असेल तर नुकसानीचं प्रमाण कमी करण्यासाठी मौल्यवान आणि इतर वस्तू वरच्या मजल्यावर ठेवा.

12. रॉकेलचे डबे, शेती अवजारं, बागकामातील अवजारं, फलक अशा वस्तू वादळात धोकादायक ठरतात. वादळात अशा वस्तू तुमच्यावर आदळू शकतात. अशा वस्तू हटवून योग्य ठिकाणी झाकून ठेवा.

13. मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्या.

14. वादळाचा डोळा जर तुमच्या परिसरावर असेल तर यावेळी पाऊस आणि वाऱ्यापासून दिलासा मिळतो. यावेळात अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ काही दुरुस्तीची कामं करू शकता. पण यावेळी सुरक्षित राहण्याची काळजी घ्या. कारण विरुद्ध दिशेनं अधिक वेगानं वारा येऊ शकतो.

15. शांत राहा. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लढण्याची तुमची क्षमता इतरांनाही मार्गदर्शक ठरेल.

16. समाजविघातक घटकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून प्रवृत्त करा. त्यांची माहिती पोलिसांना द्या.

17. वाहन चालवताना काळजी घ्या.

18. झालेल्या नुकसानाची माहिती प्रशासनाला द्या. आपत्तिग्रस्त परिसरातील लोकांच्या सुरक्षेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवा.

19. सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे शक्यतो फिजिकल डिस्टन्सिंग पाळा. प्रशासनाने कुठे सुरक्षित स्थळी तुम्हाला हलवलं असेल तर तिथेही गर्दी टाळा, इतरांपासून सुरक्षित शारीरिक अंतर राखा.

हे करू नका

1. अफवांवर विश्वास ठेऊ नका.

2. जोपर्यंत आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारी सांगत नाहीत, तोपर्यंत सुरक्षित निवारा सोडू नका.

3. वादळ शांत असल्याच्या काळात सुद्धा सुरक्षित निवारा सोडू नका. यावेळी किरकोळ दुरुस्तीची कामं करू शकता.

4. रस्त्यावरील विजेच्या खांबांना लटकणाऱ्या वायर, तारा यांना स्पर्श करू नका.

हे वाचलं का?

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)