मुंबईत आलेल्या आंबेडकरी अनुयायांना ओखी वादळाचा तडाखा

    • Author, राहूल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीसाठी देशभरातून अनेक आंबेडकरी अनुयायी मुंबईतल्या दादर भागात असलेल्या चैत्यभूमीच्या दर्शनासाठी येत आहेत. मात्र, ओखी वादळामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे.

मुंबईत शहरात तसंच उपनगरात सोमवार संध्याकाळपासून पाऊस पडत आहे. मात्र, मुंबईत ओखी वादळामुळे पाऊस पडत असल्याची कल्पना महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या बहुतेकांना नव्हती. त्यामुळे या वादळी परिस्थितीत सापडलेले हे अनुयायी आसरा शोधत आहेत.

या स्थितीचा अंदाज जाणून घेण्यासाठी मी दादर रेल्वे स्थानक गाठलं. स्थानकातच अनेक जण आसरा शोधण्याच्या गडबडीत असलेले दिसले. स्थानकाच्या पादचारी पूलावर काही कुटुंबीय धावपळ करत होते.

अमरावती जिल्ह्यातल्या खडका या गावातून सोमवारी मुंबईत आलेल्या शांताबाई सिहारी या अशाच आसरा शोधण्याच्या लगबगीत होत्या.

त्या सांगतात, "आम्ही ३ तारखेला नरखेडवरून बसनं अमरावतीला आलो आणि तिथून रेल्वेनं मुंबईत आलो. इथं आल्यावर आम्ही थेट चैत्यभूमीकडे गेलो. त्यानंतर तिथून दर्शन घेऊन निघतांना पावसाला सुरूवात झाली. आम्ही मग तिथंच एका मांडवात थांबलो."

"आम्हाला कोणीतरी सांगितलं की, कबूतरखान्याजवळच्या एका शाळेत राहाण्याची सोय करण्यात आली. आम्ही पावसातच शाळा शोधत निघालो. मात्र ती शाळा काही सापडलीच नाही. मग आम्ही दादर स्थानकावरच रात्र काढली." असं त्यांनी हताश होऊन सांगितलं.

पाथ्रीवरून आलेल्या राहुल घुगे यांना प्रशासन मदत करेल अशी अपेक्षा आहे. ते म्हणतात "प्रशानाचं कामच आहे सहकार्य करायचं आणि आम्हाला सुध्दा वाटतं की, त्यांनी सहकार्य करावं. आम्ही काल नंदीग्राम एक्स्प्रेसनं मुंबईला आलो."

"आम्हाला चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करायचं होतं दर्शन घ्यायचं होतं. मात्र पावसामुळे जाता आलं नाही. उद्यापर्यंत जर पाऊस थांबला तर दर्शन घेऊन आम्ही परत गावाकडे जाऊ." असं घुगे यांनी सांगितलं.

शिवाजीपार्कवरील चित्र याहूनही बिकट झाल्याचं दिसलं. शिवाजीपार्कमध्ये मुंबई महापालिकेतर्फे अनुयायांसाठी एका मोठा मांडव घालण्यात आला होता. मात्र या वादळी पावसापुढे तो मांडवही अपूरा पडला. मांडव अनेक ठिकाणाहून गळत असल्यानं संपूर्ण मांडवात चिखल साचला होता.

त्यामुळे लोकांना उभ्यानंच घरून आणलेलं जेवण जेवावं लागत होतं. तर, अनेकांना दिवस कुठे काढावा याची चिंता सतावत असलेली दिसली.

याचा सगळ्यात जास्त त्रास महिला आणि लहान मुलांना होत आहे.

प्रशासनातर्फे मुंबईतल्या काही शाळांमध्ये या सर्व लोकांची सोय करण्यात आली आहे. मात्र, शाळा प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांना याची पुरेशी माहिती नसल्याचं लक्षात आलं.

दरम्यान, हवामान खात्यानं वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच मुंबईतील नागरीकांनी आणि चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांनी समुद्राजवळ जाऊ नये असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)