अल्पेश यांच्या निर्णयामुळे गुजरात निवडणूक आणखी रंगतदार

गुजरातमध्ये निवडणुकांच्या वारे जोरात वाहताना दिसत आहेत. भाजप आपला बालेकिल्ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे त्याचवेळी काँग्रेस सत्तेत येण्यासाठी जीवापाड मेहनत करताना दिसत आहे.

गुजरातच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते तीन तरुण नेत्यांनी. पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर या तीन नेत्यांची गुजरातमध्ये जोरदार चर्चा आहे.

शनिवारी अल्पेश ठाकोर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा आपला निर्णय घोषित केला.

राहुल यांच्यासोबत करणार प्रचार

अल्पेश गांधीनगरमध्ये सोमवारी एक सभा घेणार आहेत. यावेळी राहुल गांधी देखील उपस्थित असतील. त्याचवेळी ते औपचारिकरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

अहमदाबादमध्ये उपस्थित असलेले बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर यांना दिलेल्या मुलाखतीत अल्पेश यांनी सांगितलं, "आम्हाला वाटतं की सरकारनं गरीब आणि मागासवर्गीय लोकांच्या हितांचा विचार करावा, आपल्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणावं."

"आम्ही या गोष्टी वेळोवेळी सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही," असंही अल्पेश यांनी बीबीसीला सांगितलं आहे.

काँग्रेसमध्ये सामील होण्याबाबत ते म्हणाले, "आमचे आणि काँग्रेसचे विचार समान आहेत. त्याच कारणामुळे आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा विचार करत आहोत असं ते म्हणाले."

शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांना पक्षात सामील होण्याचं नियंत्रण काँग्रेसनं दिलं होतं.

हार्दिक आणि जिग्नेश हे भाजपविरोधी

हार्दिक आणि जिग्नेश हे अद्याप राहुल गांधी यांना भेटले नाहीत. हार्दिक आणि जिग्नेश यांनी याआधीच आपण काँग्रेससोबत जाणार आहोत असे संकेत दिले आहेत. अल्पेश ठाकोर हे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे काँग्रेस मजबूत स्थितीमध्ये आल्याचं दिसत आहे.

गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी बीबीसीला सांगितले, "गुजरातच्या विकासासाठी आणि लोकांच्या इच्छेखातर आम्ही युवा नेत्यांना काँग्रेसमध्ये सामील होण्याचं निमंत्रण दिलं आहे."

"अल्पेश आमच्यासोबत आले आहेत. लवकरच हार्दिक पटेल देखील आमच्यासोबत येतील आणि जिग्नेश यांचा भाजपला विरोध आहे त्यामुळे ते देखील आम्हाला समर्थन करतील," असं ते म्हणाले.

हार्दिक पटेल यांचे साथीदार भाजपमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वेगवेगळ्या विकासकामाचं उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान हार्दिक पाटील यांचे साथीदार वरुण पटेल आणि रेश्मा पटेल हे भाजपसोबत गेले आहेत. निवडणुकांची तारीख मात्र अद्याप जाहीर झालेली नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)