मेक्सिको भूकंप : अलार्म ऐकू न आल्यामुळे जीवितहानी जास्त?

फोटो स्रोत, Getty Images
मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी शहर परिसरात झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृतांचा आकडा 225 च्या पुढे गेला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 एवढी होती.
भूकंपाचा अॅलर्ट अलार्म देणारी यंत्रणा बिघडल्यामुळे व्यवस्था असूनही लोकांना वेळेत सूचना मिळू शकली नाही, अशी माहिती पुढे येत आहे.
हा अलार्म वाजला असता तर लोकांनी वेळीच इमारती रिकाम्या केल्या असल्या आणि जीवितहानी कमी झाली असती, असं बोललं जात आहे.
या भूकंपामुळे असंख्य इमारती भुईसपाट झाल्या आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी एक वाजून 14 मिनिटांनी भूकंप झाला.
मेक्सिको सिटी, मॉरेलोस आणि प्युबेला भागाला भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू प्युबेला प्रांतातल्या एटेंसिगोच्या जवळ होता. हा भाग मेक्सिको सिटीपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे धक्के 51 किलोमीटर परिसरात जाणवले. मॉरेलोस आणि प्युबेलामध्ये जीवितहानी झाली आहे.
मेक्सिको सिटीतही जीवितहानी झाली आहे. 32 वर्षांपूर्वी मेक्सिकोत झालेल्या भूकंपात दहा हजारहून अधिक नागरिकांनी जीव गमावला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी भूकंपाचा सामना कसा करावा याचं प्रात्यक्षिक सुरू असतानाच भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे थोड्या वेळासाठी विमानतळावरील वाहतूक थोड्या वेळासाठी थांबवण्यात आली होती.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लगेचच शहरातील बहुतांशी इमारती रिकाम्या करण्यात आल्या.
भूकंपप्रवण देशांमध्ये मेक्सिकोचा समावेश होतो. याच महिन्यात देशाच्या दक्षिणेकडील प्रांतात 8.1 रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंप झाला होता. या घटनेत 90 जणांचा मृत्यू झाला होता.
भूकंप बाधित परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसंच दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)








